अॅड मुरलीधर पं. बेंन्द्रे तक्रारदारांतर्फे
जाबदेणार एकतर्फा
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 3/6/2014
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने बांधकाम व्यावसायिका विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार हे बिबवेवाडी, पुणे 411 037 येथील रहिवासी असून जाबदेणार क्र 1 ही भागिदारी संस्था आहे. जाबदेणार क्र 2 हे या संस्थेचे भागिदार असून विकसक म्हणून काम करतात. जाबदेणार यांनी सर्व्हे नं 18, हिस्सा नं 2ब/5 या जमिनीचे विकसन करण्याचे ठरविले होते व त्यावर त्यांनी ‘माऊली कॉम्प्लेक्स’ या नावाने इमारत बांधण्याचे जाहीर केले. सदर जमिन त्यावेळी पुणे महानगर पालिकेच्या हद्यी बाहेर होती. ग्रामपंचायतीच्या परवानगीनुसार सदर जमिनीवर जाबदेणार यांनी दोन इमारती बांधल्या आहेत. त्यापैकी बी या इमारतीतील दुस-या मजल्यावरील सदनिका क्र 11 जाबदेणार यांनी तक्रारदार यांना विकण्याचे ठरविले. त्याअनुषंगाने दिनांक 27/6/2000 रोजी सब रजिस्ट्रार हवेली क्र 9 यांच्या समोर लेखी करार नोंदविण्यात आला. सदनिकेची किंमत रुपये 2,74,501/- अशी ठरली होती. सदनिकेचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे करावयाचे ठरले होते व त्यासंबंधीचे खरेदीखत किंवा तत्सम दस्त जाबदेणार यांनी तक्रारदारांना करुन दयावयाचा होता. तक्रारदार यांनी जाबदेणार यांना वेळोवेळी रक्कम रुपये 2,74,500/- अदा केलेली आहे. दिनांक 5/3/2002 रोजी सदनिकेचा ताबा जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिला. परंतू करारात ठरलेल्या अटी व शर्ती प्रमाणे बांधकाम करुन दिले नाही, सुखसुविधा व जीवनावश्यक सोई पुरविल्या नाहीत. तक्रारदार रहात असलेल्या इमारतीस जाबदेणार यांनी बाहेरुन प्लास्टर करुन दिलेले नसल्यामुळे सदनिकेच्या बाहेरुन सतत पावसाचे पाणी पडल्यामुळे आतील भिंतीला ओल आलेली असून सदनिकेच्या भिंतींचा रंग जाऊन भिंतींना पोपडे निघले आहेत. सदर इमारतीमध्ये पुणे महानगर पालिकेचे नळ जोड घेण्याकरिता जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्याकडून रक्कम रुपये 10,000/- घेऊनही पुणे महानगर पालिकेचा नळजोड पुरविलेला नाही. सदनिका धारकांची सोसायटी स्थापन करण्यासाठी जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्याकडून रक्कम रुपये 10,000/- स्विकारली आहे व त्याचबरोबर सदर सदनिकेचे खरेदीखत जाबदेणार यांनी तक्रारदार यांना करुन दयावयाचे होते, तेदेखील करुन दिलेले नाही. तक्रारदारांच्या सदनिकेतील किचन ओटयाला 1.1/2 फूट व्हाईट टाईल्स करारात नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या नाहीत. इमारतीला बाहेरुन सिमेंटचा कलर दिलेला नाही, सदनिकेच्या हॉलला 6 इंच स्कर्टींग करुन दिलेले नाही. जाबदेणार यांनी सदर मिळकत व इमारतीसंदर्भात सदर मिळकत पुणे महानगर पालिकेच्या हद्यीत समाविष्ट झाल्यानंतर योग्य ती कायदेशिर पूर्तता करुन सदर जागेची गुंठेवारी करुन घेतली आहे असे तक्रारदारांना सांगितले होते परंतू त्यासंदर्भातील कागदपत्रे जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेली नाहीत. तसेच तक्रारदारांना त्यांच्या नावाने लाईट मिटर घेण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. सबब तक्रारदारांनी दिनांक 22/8/2012 रोजी जाबदेणार यांना वकीलांमार्फत नोटीस पाठविली. परंतू त्या नोटीसलाही जाबदेणार यांनी प्रतिसाद दिलेला नाही. म्हणून प्रस्तूतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या विरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून करारात नमूद केलेल्या स्पेसिफिकेशन नुसार उर्वरित कामे पूर्ण करुन मागतात, जाबदेणार यांनी पुणे महानगर पालिकेकडून नळजोडाची व्यवस्था करावी अशी मागणी केलेली आहे. तसेच सदनिकेची आवश्यक असलेली व गुंठेवारी केलेली मुळ कागदपत्रे मिळावीत अशी मागणी करतात. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या नावे लाईट मिटर घेण्याकरिता आवश्यक पूर्तता करावी, सोसायटी नोंदवून तक्रारदारांच्या नावे खरेदीखत करुन मिळावे अशीही मागणी तक्रारदार करतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- व नोटीसचा खर्च रुपये 2,000/- मिळावा, अशीही विनंती तक्रारदार करतात. जाबदेणार यांनी सदरील सुविधा सदनिकेचा ताबा देतेवेळी न दिल्यामुळे नुकसान भरपाई म्हणून सदरील सुविधांची पूर्तता जाबदेणार करेपर्यन्त दरमहा रुपये 5000/- जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दयावेत, अशीही विनंती तक्रारदार करतात. जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या सदनिकेच्या किचन ओटयाला 1.1/2 फूट व्हाईट टाईल्स बसवून दयाव्यात, हॉलला 6 इंच स्कर्टींग करुन दयावे, इमारतीला बाहेरुन सिमेंट कलर दयावा अशी विनंती तक्रारदार करतात. तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्यात यावा म्हणून तक्रारदारांनी विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे.
2. या प्रकरणात जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता ती त्यांनी स्विकारली नाही. त्याचप्रमाणे जाहिर नोटीस पाठवूनही जाबदेणार हे मंचासमोर हजर झालेले नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी एकतर्फा करण्यात आली.
3. तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्टयर्थ शपथपत्र, कागदपत्रांच्या नकला, पैसे दिल्याच्या पावत्या, नोटीसची स्थळप्रत व पोहोच इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. जाबदेणार हे गैरहजर असल्यामुळे सदर कागदपत्रे व शपथपत्रातील पुरावा त्यांनी नाकारला आहे असे म्हणता येणार नाही. सदर कागदत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट दिसून येते की, जाबदेणार यांनी करारात नमूद केलेल्या सुखसोई देण्याचे मान्य केले होते व त्या न दिल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांची आहे. त्यास जाबदेणार यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. सबब तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार हे करारात नमूद केल्याप्रमाणे व तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे सुखसुविधा मिळण्यास पात्र आहेत व त्या न मिळाल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई मिळण्यासही पात्र आहेत. सदर प्रकरणात दाखल केलेल्या कागदपत्रांचे, शपथपत्र व तक्रारीतील कथनांचा विचार करुन प्रस्तूतची तक्रार योग्य व मंजूर करण्याजोगी आहे व तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्यायोग्य आहे, असे या मंचाचे मत आहे. सबब खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या करारात नमूद
केलेल्या सुखसुविधा न देऊन सेवेतील त्रुटी निर्माण केली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या सदनिकेत करारात नमूद केलेल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे राहिलेली कामे व पुणे महानगर पालिकेकडून नळ जोड व्यवस्था आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत पूर्ण करुन दयावीत.
4. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या सदनिकेसाठी आवश्यक असलेली व गुंठेवारी केलेली मुळ कागदपत्रे, तक्रारदारांच्या नावे लाईट मिटर घेण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करावी.
5. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांची सदनिका असलेल्या इमारती संदर्भात सहकारी सोसायटी नोंदवून हस्तांतरणपत्र आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन दयावे.
6. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या सदनिकेच्या किचन ओटयाला 1.1/2 फूट व्हाईट टाईल्स, सदनिकेच्या हॉलला 6 इंच स्कर्टींग, सदनिकेच्या इमारतीस बाहेरुन सिमेंटचा कलर आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत करुन दयावे.
7. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 10,000/- [रुपये दहा हजार फक्त] व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 2,000/- [रुपये दोन हजार फक्त] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावे.
8. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत घेऊन जावेत अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.