Dated the 13 Mar 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.म.य.मानकर...................मा.अध्यक्ष.
1. तक्रारदार ही सहकारी गृहनिर्माण पंजिकृत संस्था आहे. सामनेवाले ही भागिदारी संस्था असुन भुमिमालक व विकासक आहे. सामनेवाले यांनी जुना सर्व्हे नंबर-88 हिस्सा क्रमांक-5 नविन सर्व्हे क्रमांक-1 हिस्सा-5 क्षेत्रफळ-583.37 चौरस यार्ड (487.92 चौरस मिटर) वर मौजे गोडदेव, भायंदर जिल्हा-ठाणे येथे इमारत बांधली, त्यातील सदनिकेची विक्री वेगवेगळया करारपत्राव्दारे तक्रारदार यांच्या सदस्यांना केली. भोगवटापत्र न घेता सदनिकेचा ताबा सदस्यांना दिला. सामनेवाले यांनी सदस्यांची गृहनिर्माण संस्था स्थापन केली नाही व पंजिकृत केली नाही. तक्रारदार यांच्या सदस्यांनी स्वतःहुन गृहनिर्माण संस्था स्थापन केली. सामनेवाले यांनी त्या करीता सहकार्य केले नाही. गृहनिर्माण स्थापन व पंजिकृत झाल्यानंतर सामनेवाले यांनी भुमिचे व इमारतीचे अभिहस्तांतरण तक्रारदार यांच्या नांवे करुन देणे आवश्यक होते. पंरतु ते करण्यात आले नाही. सामनेवाले यांनी कराराप्रमाणे व कायदयाप्रमाणे सेवा न दिल्यामुळे ही तक्रार करण्यात आली. तक्रारदार यांनी भोगवटापत्र अभिहस्तांतरण नुकसानभरपाई व खर्च अशा मागण्या केल्या आहेत.
2. तक्रारीची नोटीस सामनेवाले यांना देण्यात आली होती ती नोटीस पोस्टाच्या “ अनक्लेम्ड ” शे-यासह परत आली आहे. तक्रारदार यांनी ता.21.10.2013 रोजी अर्ज दाखल केला व त्यावर सामनेवाले यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात येत असल्याबद्दल आदेश पारित करण्यात आला. सामनेवाले या प्रकरणात आजपर्यंत हजर झाले नाहीत. “ अनक्लेम्ड ”शे-यासह परत आलेली नोटीस ही सामनेवाले यांना प्राप्त झाली असे मान्य करता येऊ शकते. या करीता आम्ही मा.राष्ट्रीय आयोगाने रिव्हीजन पिटीशन नंबर-4091/2014 मेसर्स अंजनीसुत मार्बल्स विरुध्द डॉ. मंजितसिंग मध्ये ता.19.11.2014 रोजी दिलेल्या न्याय निर्णयावर भिस्त ठेवत आहोत.
3. तक्रारदार यांनी, शारदा डेव्हलप्मेंट प्रा.लि., गोरेगांव,मुंबई-62 व सामनेवाले यांच्यामध्ये ता.04.04.1991 रोजी झालेल्या करारपत्राची प्रत दाखल केली, त्यावरुन सामनेवाले यांनी सर्व्हे नंबर-88 हिस्सा नंबर-5 क्षेत्रफळ-1754 चौरस यार्डस (1466.5 चौरस मिटर) मौज गोडदेव, भायंदर जिल्हा-ठाणे ही भुमि विकत घेतल्याचे दिसते. तक्रारदार यांनी सामनेवाले व तक्रारदार यांचे सदस्य नामे श्री.गोविंद ज्ञा.लोखंडे यांच्यामध्ये ता.16.11.1991 रोजी ए-विंग मधील सदनिका क्रमांक-203 बाबत झालेल्या करारपत्राची प्रत दाखल केली आहे. सदरील करारपत्रामध्ये सामनेवाले हे जुना सर्व्हे क्रमांक-88 हिस्सा-5 व क्षेत्रफळ-583.57 यार्डसचे मालक व ताबाधारक असल्याचा उल्लेख आहे. या करारपत्रातील परिच्छेद-24 प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या नांवे अभिहस्तांतरण करण्याबाबतचा उल्लेख आहे. तक्रारदार यांनी नोंदणीचे प्रमाणपत्राची प्रत दाखल केली आहे. त्यावरुन तक्रारदार ही संस्था ता.27.07.1999 रोजी पंजिकृत झाल्याचे दिसते. महाराष्ट्र ओनरशिफ ऑफ फ्लॅटस अॅक्ट-1963 प्रमाणे विकासकांनी सदनिकेचा ताबा देण्यापुर्वी भोगवटा प्रमाणपत्र करणे आवश्यक असते. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये नमुद केलेल्या बाबींना शपथपत्र दाखल करुन दुजोरा दिला आहे. तक्रारदार यांनी नमुद केलेल्या बाबी हया अभिलेखात अबाधित आहेत. त्या खारीज किंवा अमान्य करण्या करीता कोणतेही कारण नाही. तक्रारदार यांच्या मागण्या मंजुर करण्या करीता कायदेशीर अडचण नाही. वास्तविक पाहता याबाबत अजुन चर्चेची सुध्दा आवश्यकता नाही.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श -
(1) तक्रार क्रमांक-287/2013 अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) सामनेवाले यांनी सेवा प्रदान करण्याचा कसुर केला असे जाहिर करण्यात येते.
(3) सामनेवाले यांनी सदरील इमारती करीता ता.30.06.2015 पर्यंत किंवा त्यापुर्वी स्थानिक
संस्थेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करावे.
(4) सामनेवाले यांनी जुना सर्व्हे नंबर-88 हिस्सा-5 नविन सर्व्हे क्रमांक-1 हिस्सा-5 क्षेत्रफळ-
583.57 चौरस यार्डस (487.92 चौरस मिटर) मौजे-गोडदेव, भायंदर, जिल्हा-ठाणे ही
भुमि व त्यावरील बांधकाम तक्रारदार यांच्या नांवे ता.30.06.2015 रोजी किंवा त्यापुर्वी
अभिहस्तांतरण करावी. तसेच न वापरलेला एफएसआय व भविष्यात उपलब्ध होणारा
एफएसआय सुध्दा अभिहस्तांतरण करावा.
(5) सामनेवाले यांनी वरील तारखेस किंवा त्यापुर्वी भोगवटा प्रमाणपत्र व अभिहस्तांतरणा
बाबत पुर्तता न केल्यास सामनेवाले, भोगवटा प्रमाणपत्रा करीता प्रतिदिन रु.500/-(अक्षरी
रुपये पाचशे मात्र) व अभिहस्तांतरणा करीता प्रतिदिन रु.500/- (अक्षरी रुपये पाचशे)
ता.01.07.2015 पासुन तक्रारदार यांना अदा करण्यास जबाबदार राहतील.
(6) सामनेवाले यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यास केलेला विलंब (सन-1991 पासुन)
व त्यामुळे सामनेवाले यांना झालेल्या त्रासाबद्दल व नुकसानीबद्दल रु.5,00,000/-
(अक्षरी रुपये पाच लाख) तक्रारदार यांना अदा करावे.
(7) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना खर्चाबाबत रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा-
हजार) अदा करावे.
(8) वरील क्लॉज-6 व 7 ची पुर्तता ता.30.04.2015 रोजी किंवा त्यापुर्वी करावी, न केल्यास
ता.01.05.2015 पासुन त्यावर अदा करेपर्यंत दरसाल दर शेकडा 10 टक्के व्याज लागु
होणार.
(9) अभिहस्तांतरण करेपर्यंत मालमत्ता भरण्याचे दायित्व हे सामनेवाले यांचेवर राहिल.
(10)आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.13.03.2015
जरवा/