(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा. सदस्या)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष क्रं 1) चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी आणि इतर यांचे विरुध्द त्याचे विमाकृत वाहनाचा अपघात होऊन वाहन क्षतीग्रस्त झाल्याने दुरुस्तीपोटी आलेल्या खर्चाची विमा रक्कम मिळावी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचे मालकीचे खालील वर्णनातीत वाहन होते-
Bolero PIK-UP FB L 3 T
Vehicle Registration No.-MH-36/AA 1681
Model-Bolero Pickup FB MS 1,3 T
Engine No.-TBK1J76142
Chasis No.-MAIZN2TBKK1J70238
तक्रारकतर्याने विरुध्दपक्ष चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी यांचे कडून सदर वाहनाची विमा पॉलिसी काढली असून सदर विमा पॉलिसीचा क्रं-3379/02510432/000/01 असा असून सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-05.10.2020 पासून ते दिनांक-04.10.2021 असा होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विमाकृत वाहन हे दिनांक-20.02.2021 रोजी भाजीपाला आणि हिरवी मिर्ची धानला, तालुका मौदा, जिल्हा नागपू येथून सागर, तालुका जिल्हा सागर (मध्यप्रदेश) येथे वाहून नेत होते. त्याचे जवळ वैध परमीट होते. परंतु मुंगवाणी, तालुका जिल्हा नरसिंगपूर येथ राष्ट्रीय महामार्गावर अचानक एक गाय विमाकृत वाहना समोर आल्याने विमाकृत वाहन असंतुलीत झाले आणि अपघात होऊन विमाकृत वाहन क्षतीग्रस्त झाले. त्यावेळी विमाकृत वाहनात फक्त वाहनचालक आणि एक व्यक्ती बसून होते परंतु कोणालाही दुखापत झाली नाही. तक्रारकर्त्याने त्वरीत विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीला अपघाताची सुचना दिली. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी दिनांक-22.02.2021 रोजी घटनास्थळी भेट देऊन सर्व्हे करुन घटनास्थळ पंचनामा केला. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे मागणी प्रमाणे तक्रारकर्त्याने वाहना संबधीचे दस्तऐवज पुरविलेत. त्यावेळी सर्व्हेअर यांनी विमा दावा रक्कम देण्याचे आश्वासन देऊन विमाकृत वाहन विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर यांचे कडून दुरुस्त करुन घ्यावे असे सांगितले. विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स, नागपूर यांनी क्षतीग्रस्त विमाकृत वाहन दुरुस्तीचे एकूण रुपये-3,09,222/- एवढया रकमेचे अंदाजपत्रक विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडे दिले. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने दुरुस्तीचे काम करुन घ्यावे असे लेखी आदेश दिलेत परंतु अचानक पणे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने दिनांक-20.04.2021 रोजीचे पत्र तक्रारकर्त्याचे नावे देऊन विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्त्याला सदर विरुध्दपक्ष विमा कंपनीचे पत्र पाहून धक्का बसला कारण त्याचे विमाकृत क्षतीग्रस्त वाहन पूर्णपणे दुरुस्त होऊन विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर यांनी रुपये-1,75,563.72 पैसे बिल दिले व विमाकृत वाहन घेऊन जाण्यास सांगितले परंतु विमा दावा मंजूर न झाल्याने तक्रारकर्ता विमाकृत वाहन परत घेऊ शकला नाही. वस्तुतः अपघाताचे वेळी विमाकृत वाहनातून एकूण 02 व्यक्ती प्रवास करीत असताना विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून विमाकृत वाहनातून अपघाताचे वेळी एकूण 03 व्यक्ती प्रवास करीत होते म्हणून विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्याने विमा दावा देय नसल्याचे कळविले. विमाकृत वाहन न मिळाल्यामुळे तक्राकरर्त्याचे प्रती दिन रुपये-3000/- प्रमाणे नुकसान होत आहे. तक्रारकतर्याने दिनांक-22.06.2021 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे कार्यालयात भेट देऊन विमा दावा मंजूर करण्याची विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केलयात-
1. विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर करुन विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स यांना विमाकृत वाहनाचे दुरुस्तीचे बिल रुपये-1,75,563.72 पैसे दयावे तसेच वाहन नसल्यामुळे त्याचे प्रतीदिन जे नुकसान झाले त्या बद्दल नुसान भरपाई रुपये-5,43,000/- आणि सदर नुकसान भरपाईचे रकमेवर वाहन प्रत्यक्ष ताब्यात मिळे पर्यंत वार्षिक 18 टक्के दराने व्याज विरुध्दपक्षा कडून मिळावे.
2. त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल तसेच तक्रार खर्च म्हणून खर्च रुपये-50,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावे. या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनी तर्फे एकत्रीत लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे त्यांनी तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहनाला दिनांक-20.02.2021 रोजी गाय समोर आल्याने वाहन असंतुलीत झाल्याने ते क्षतीग्रस्त होऊन झालेला अपघात या बाबी नामंजूर केल्यात. अपघाताचे वेळी विमाकृत वाहनातून दोन व्यक्ती फक्त वाहन चालक आणि एक प्रवास करीत होते ही बाब नामंजूर केली. विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी दिनांक-20.02.2021 रोजी सर्व्हे केला होता ही बाब मान्य आहे तथापि सर्व्हेअर यांनी संपूर्ण विमा दावा मंजूर करण्याचे आश्वासित केले होते ही बाब नामंजूर केली. विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स यांना विमा दावा मंजूरी बाबत कोणतेही पत्र दिलेले नाही तसेच विमा कंपनीला विमाकृत वाहन दुरुस्तीचे कोणतेही अंदाजपत्रक मिळालेले नाही. विमाकृत वाहन दुरुस्तीचे अंतीम बिल रुपये-1,75,563.72 पैसे विमा कंपनी मध्ये दाखल केले होते ही बाब सुध्दा नामंजूर केली. त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा हा विमा पॉलिसी मधील अटी व शर्ती प्रमाणे नामंजूर केला, त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्यास दिलेली नाही. तक्रारकर्त्याने तक्रारी मधून केलेल्या सर्व मागण्या या नामंजूर करण्यात येतात. तक्रारकर्त्याचा विमा दावा अंतीम सर्व्हे अहवाला प्रमाणे मंजूर करुन बॅंक खात्यात विमा दाव्यापोटी रुपये-93,792/- दिनांक-17.08.2021 रोजी वळती केले आणि त्याचा व्हॉऊचर क्रमांक-1330242548 असा आहे. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असे नमुद केले.
04. विरुध्दपक्ष क्रं 3 चोलामंडलम होम फायनान्स शाखा भंडारा यांना जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे रजिस्टर पोस्टाव्दारे पाठविलेली नोटीस “Refused” या पोस्टाचे शे-यासह परत आली त्यामुळे प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष क्रं 3 यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश तक्रारी मध्ये दिनांक-17.03.2022 रोजी पारीत करण्यात आला.
05. विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर यांनी आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्दप्क्ष क्रं 4 यांनी असे नमुद केले की, ते महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रा कंपनीचे अधिकृत डिलर्स आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 4 यांचे कडून वाहन खरेदी केल्याची त्यांना माहिती नाही. तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहन नोंदणी क्रं -MH-36/AA 1681 त्यांचे सर्व्हीस स्टेशन मध्ये अपघाता नंतर आणले होते, क्षतीग्रस्त वाहनाची तपासणी करुन वाहन दुरुस्ती बाबत रुपये-3,09,222/- चे अंदाजपत्रक तक्रारकतर्यास दिले होते आणि तक्रारकर्त्याने मान्यता दिल्या नंतर त्यांनी क्षतीग्रस्त वाहनाचे काम सुरु केले. सदर वाहन पूर्णपणे दुरुस्त करुन दिनांक-23.04.2021 रोजी रुपये-1,75,563.72 पैसे बिल दिले. तक्रारकर्त्याने दिनांक-23.04.2021 पर्यंत बिल देण्याचे मान्य केले होते. सदर तारखे नंतर दिनांक-01.05.2021 पासून प्रतीदिन रुपये-300/- प्रमाणे पार्कींग शुल्क दयावे लागेल असे तक्रारकतर्यास सांगण्यात आले होते. त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही करीता त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्तर, विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर वाहन दुरुस्ती केंद्र यांचे लेखी उत्तर तसेच तक्रारकर्त्या तर्फे दाखल शपथे वरील पुरावा व लेखी युक्तीवाद आणि उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकतर्या तर्फे वकील श्रीमती गायधनी तर विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील कु. प्रतिभा गवई यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07. तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहन नोंदणी क्रं -MH-36/AA 1681 ची विमा पॉलिसी क्रं-3379/02510432/000/01 विमा पॉलिसीचा कालावधी दिनांक-05.10.2020 पासून ते दिनांक-04.10.2021 या बद्दल उभय पक्षां मध्ये विवाद नाही व ही बाब विमा पॉलिसीचे प्रतीवरुन सिध्द होते. सदर विमा पॉलिसी प्रमाणेवाहनाची आय.डी.व्ही. रुपये-6,17,069/- दर्शविलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे सर्व्हेअर यांनी अंतीम सर्व्हे अहवाल दाखल केला, त्यानुसार Net liability of the Insurer Rs. 93,971.68 दर्शविलेली आहे.
08. प्रस्तुत प्रकरणात महत्वाची बाब नमुद करावीशी वाटते की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा दिनांक-20 एप्रिल, 2021 रोजीचे पत्रान्वये नामंजूर केला आणि सदर विमा दावा नामंजूरीचे पत्रात अपघाती घटनेच्या वेळी विमाकृत वाहनातून एकूण 03 व्यक्ती प्रवास करीत असल्याने मंजूर परमीट क्षमते पेक्षा जास्त व्यक्ती बसलेले असल्याने आणि वाहनाचे नोंदणी प्रमाणे फक्त 02 व्यक्तींची क्षमता असल्याने विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी ही अपघात क्षतीग्रस्त विमाकृत वाहनाचे दुरुस्तीची रक्कम देण्यास जबाबदार नाही असे नमुद केले. ज्याअर्थी विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा हा दिनांक-20 एप्रिल, 2021 रोजीचे पत्रान्वये नामंजूर केला होता, त्या परिस्थिती मध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे त्यांनी अंतीम सर्व्हे अहवाला प्रमाणे विमा दावा मंजूर कसा काय केला ही बाब अनाकलनीय आहे.
09. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी तर्फे सर्व्हेअर यांनी त्याला विमाकृत क्षतीग्रस्त वाहन विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर यांचे कडून दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते व त्या प्रमाणे त्याने क्षतीग्रस्त वाहन उन्नती मोटर्स नागपूर यांचे कडून दुरुस्त केले व त्यांनी विमाकृत वाहनाचे दुरुस्तीचे बिल रुपये-1,75,563.72 दिलेले आहे आणि ते देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीची आहे. या उलट विरुध्दपक्ष क्रं 1 व कं 2 विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा अंतीम सर्व्हे अहवाला प्रमाणे मंजूर करुन बॅंक खात्यात विमा दाव्यापोटी रुपये-93,792/- दिनांक-17.08.2021 रोजी वळती केले आणि त्याचा व्हॉऊचर क्रमांक-1330242548 असा आहे परंतु सदर व्हॉऊचरची प्रत तसेच बॅंकेत रक्कम वळती केल्या बाबत त्यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. परंतु तक्रारकर्त्याचे वकील श्रीमती मंजुशा गायधनी यांनी आपले मौखीक युक्तीवादाराचे दरम्यान खात्यात रुपये-93,792/- प्राप्त झाल्याची बाब जिल्हा ग्राहक आयोगाचे निदर्शनास आणून दिली.
10. सदर प्रकरणात मुख्य विवाद असा आहे की, तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याला विमाकृत वाहन दुरुस्तीसाठी एकूण खर्च हा रुपये’-1,75,563.72 आला तर विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्या प्रमाणे रुपये-93,792/- विमा रक्कम त्यांना मान्य आहे, याचाच अर्थ रुपये-81,771/- एवढया फरकाचे रकमे बाबत विवाद आहे. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 ते क्रं 3 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांचे सुचने प्रमाणेच विमाकृत वाहन दुरुस्तीचे काम विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर यांचे कडून केले. कोणताही व्यक्ती विमाकृत वाहन आपले मनाने कोठेही दुरुस्त करणार नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर यांनी सुचना दिल्या नंतरच तक्रारकर्त्याने विमाकृत वाहन विरुध्दपक्ष क्रं 4 यांचे कडून दुरुस्त केले. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने सदर विमा सर्व्हेअर यांचे शपथपत्र दाखल केले नाही तसेच तक्रारकर्त्याने सर्व्हेअर यांचे बाबत केलेली विधाने खोडून काढलेली नाहीत. विमाकृत क्षतीग्रस्त वाहन ज्यांचे कडून दुरुस्त करण्यात आले त्या विरुध्दपक्ष क्रं 4 उननती मोटर्स, नागपूर यांचे लेखी उत्तरा नुसार सदर वाहन पूर्णपणे दुरुस्त करुन दिनांक-23.04.2021 रोजी रुपये-1,75,563.72 पैसे बिल दिले.
11. सर्वसाधारण व्यवहारात असे दिसून येते की, विमाधारकाचा जास्तीची दुरुस्ती करण्या कडे कल असतो, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स यांचे विमाकृत क्षतीग्रस्त वाहन दुरुस्तीचे एकूण बिल रुपये-1,75,563/- चे 85 टक्के म्हणजे एकूण रुपये-1,49,229/- या रकमे पैकी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी यांचे कडून सर्व्हेअर अहवाला नुसार विमा कंपनीने यापूर्वीच अदा केलेली रक्कम रुपये-93,792/- वजा करीता उर्वरीत रक्कम रुपये-55,437/- तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने दयावे आणि सदर रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्याचे दिनांक-20.04.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 9 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 चोलामंडलम होम फायनान्स यांचा या तक्रारीशी काय संबध आहे हे कळून येत नाही तसेच त्यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे नाही करीता विरुध्दपक्ष क्रं 3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स यांनी तक्रारकर्त्याचे विमाकृत क्षतीग्रस्त वाहन दुरुस्त करुन दिले, त्यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही व तशी तक्रारकत्याची तक्रार सुध्दा नाही करीता विरुध्दपक्ष क्रं 4 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
12. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीचे सर्व्हेअर यांचे सुचने नुसार तक्रारकर्त्याने वाहन विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स यांचे कडून दुरुस्त केले परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्यामुळे तो दुरुस्त झालेले वाहन विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर यांचे कडून परत नेऊ शकलेला नाही. विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर यांचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्त्याने विमाकृत दुरुस्त केलेले वाहन परत न नेल्यामुळे त्याला दिनांक-01.05.2021 पासून प्रतीदिन रुपये-300/- प्रमाणे पार्कींग शुल्क दयावे लागतील, परंतु या सर्व प्रकारा मध्ये तक्रारकर्त्याचा कोणताही दोष दिसून येत नाही.
13 उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता श्री नाशीक नरेंद्र भूरे यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 चोला मंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चेन्नई तर्फे व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 मंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 चोला मंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चेन्नई तर्फे व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 मंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला विमाकृत वाहन नोंदणी क्रं -MH-36/AA 1681 ची विमा पॉलिसी क्रं-3379/02510432/000/01 पोटी विमाकृत क्षतीग्रस्त वाहन दुरुस्ती संबधात उर्वरीत विमा दाव्याची रक्कम रुपये-55,437/- (अक्षरी रुपये पंचावन्न हजार चारशे सदोतीस फक्त) आणि सदर रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्याचे दिनांक-20.04.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 9 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला दयावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं 1 चोला मंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चेन्नई तर्फे व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 मंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांनी तक्रारकर्त्याला अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 चोला मंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चेन्नई तर्फे व्यवस्थापक आणि विरुध्दपक्ष क्रं 2 मंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष क्रं 3 चोलामंडलम होम फायनान्स कंपनी शाखा भंडारा तर्फे शाखा व्यवस्थापक यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 4 उन्नती मोटर्स नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.