Dated the 17 Jun 2015
न्यायनिर्णय
(द्वारा श्री. म.य. मानकर - मा.अध्यक्ष )
- तक्रारदारांनी आरक्षित केलेल्या सदनिकेचा ताबा न मिळाल्यामुळे तसेच त्याबाबत करारपत्र न केल्यामुळे तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले बांधकाम व्यावसायिक आहेत. सामनेवाले यांचे स्वामी व व्यवस्थापक यांना पाठविलेल्या नोटीसा पोष्टाच्या Unclaimed शे-यासह परत आल्या. त्यानंतर ते मंचासमोर केव्हाही उपस्थित राहिले नाही. प्रकरणामध्ये तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकून अंतिम निर्णयासाठी प्रकरण नेमण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदारांचे विनंतीवरुन प्रकरण वादसूचीमध्ये घेण्यात आले होते व दि. 05/03/2015 रोजी सामनेवाले यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
- तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी की सामनेवाले बांधकाम व्यावसायिक यांचे मौलाना सावर हे प्रोप्रायटर आहेत व मोहंमद आयुब हे मॅनेजर आहेत. सामनेवाले यांनी गुलशन नगर, सर्व्हे क्र. 21 अ वालीव, वसई पूर्व, ठाणे, येथे नविन इमारतीचे बांधकाम सुरु केले होते व तक्रारदारांनी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांसाठी सदनिकांची आवश्यकता असल्याने त्यांनी सामनेवाले यांचेकडून सदनिका क्र. 301 व 302 ई विंग, न्यु स्टार डेव्हलपर्स, गुलशन नगर, सर्व्हे नं. 21 अ वालीव, वसर्इ पूर्व, जिल्हा ठाणे या आरक्षित केले व या दोन सदनिकांकरीता मोबदला रु. 16,82,000/- ठरला होता व त्यापैकी तक्रारदारांनी वेळोवेळी रु. 7.50 लाख सामनेवालेस अदा केले. परंतु सामनेवाले यांनी बांधकाम हे स्थगित केले व इमारत पूर्ण केली नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडे उर्वरीत रकमेकरीता मागणी केली नाही. सामनेवाले यांनी सदनिकांकरीता करारपत्र केले नाही तसेच ते नोंदणीकृतसुध्दा केले नाही. तक्रारदारांनी त्यांचे वकीलांमार्फत दि. 04/10/2012 रोजी नोटीस पाठविली. परंतु ती पोष्टाच्या Unclaimed शे-यासह परत आली. तक्रारदारांनी सामनेवाले हे त्यांनी आरक्षित केलेल्या दोन सदनिका त्रयस्थ इसमास विकतील अशी शंका आहे. तक्रारदारांनी सरतेशेवटी तक्रार दाखल करुन सदनिकेच्या ताब्यासह व खर्चासह विविध मागण्या केलेल्या आहेत.
- तक्रारदारांनी तक्रारीसोबत वेळोवेळी दिलेल्या रकमेबाबत मिळालेल्या पावत्या तसेच नोटीसची प्रत दाखल केली आहे. तक्रार प्रलंबित असतांना मूळ तक्रारदार श्रीमती सलीमन्नुशा शाह या मरण पावल्या व त्यानंतर त्यांचे वारसदार श्री. अब्दुल खलीद नेवास अली शाह तर्फे ही तक्रार चालविण्यात येत आहे. बँकेतील खात्याची प्रत दाखल केली आहे. तक्रारदारांनी त्यांचा लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
-
- अॅड. सुमन सिंग यांनी निदर्शनास आणल्यानंतर प्रकरण परत तोंडी युक्तीवादासाठी नेमण्यात आले होते व अॅड. सुमन सिंग यांचा तोंडी युक्तीवाद पुन्हा दि. 28/05/2015 रोजी ऐकण्यात आला. सामनेवाले हे गैरहजर.
- उपरोक्त बाबींवरुन खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतातः
अ. सामनेवाले यांनी सदनिकेबाबत कायदेशीर बाबींचा भंग केला आहे
- ?
- : तक्रारदार यांचेप्रमाणे ई विंग मधील सदनिका क्र. 301 व 302 करीता एकत्रित मोबदला रु. 16,80,000/- ठरला होता. ही रक्कम दि. 13/03/2007 च्या पावतीमध्येसुध्दा नमूद असल्याचे दिसून येते. तक्रारदार यांनी वेळोवेळी दोन्ही सदनिकांकरीता रु. 7,50,000/- राशी अदा केली आहे. परंतु सामनेवाले यांनी करारनामा केला नाही व तो नोंदणीकृतसुध्दा केला नाही. ही रक्कम 20% पेक्षा जास्त असल्याकारणाने सामनेवाले यांनी मोफा (Maharashtra Flat Ownership Act, 1963) च्या कलम 4 चा भंग केला आहे.
- ?
ब(1): तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पावत्यांमध्ये सदनिका क्र. 301 व 302, मजला, विंग व क्षेत्रफळ स्पष्टपणे लिहिलेले आहे. तक्रारदार यांनी पहिली रक्कम दि. 13/03/2007 ला अदा केली. ही तक्रार दि. 29/04/2013 रोजी दाखल केली आहे. तक्रार दाखल करेपर्यंत इमारत पूर्ण करण्यात आली नव्हती. आमच्यामते सहा वर्षांचा कालावधी एका इमारतीच्या बांधकामाकरीता पुरेसा आहे. यावरुन निश्चितपणे असे म्हणता येईल की सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केली आहे.
- तक्रारदार हे सदनिका क्र. 301 व 302 चा ताबा मिळण्यास पात्र आहेत काय?
क(1): तक्रारदार यांनी सदनिका क्र. 301 व 302 तिस-या माळयावरील आरक्षित केलेबाबत वेळोवेळी आपल्या प्लिडींगस् मध्ये नमूद केले आहे. तक्रारीच्या परिच्छेद क्र. 2,3 व 4 या सदनिकांच्या ठिकाणांबाबत वर्णन करतांना तक्रारदारांनी न्यु स्टार डेव्हलपर्स, गुलशन नगर, सर्व्हे नं. 21 अ वालीव, वसर्इ पूर्व, जिल्हा ठाणेचे प्रकल्पामध्ये असे केलेले आहे. तक्रारीच्या शिर्षकामध्ये नेमका हाच पत्ता सामनेवाले यांचा दर्शविण्यात आलेला आहे. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या छापिल पावत्यांमध्ये सामनेवाले यांचा हाच पत्ता नमूद आहे. त्यामुळे यावरुन असे स्पष्ट आहे की सदनिका क्र. 301 व 302 च्या स्थितीबाबत चुकीची माहिती तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.
क(2): सदनिका क्र. 301 व 302 चे ठिकाण चुकीचे दाखविलेले आहे ही बाब छापिल पावतीवरुन एकदम सुस्पष्ट व उघड होते. या पावत्यांमध्ये इमारतीचे नांव ‘अक्सा कॉम्प्लेक्स’ असे दाखविले आहे. म्हणजे तक्रारादार यांनी ज्या सदनिका आरक्षित केल्या होत्या त्या ‘अक्सा कॉम्प्लेक्स’ मध्ये होत्या. उपरंतु ही इतारत कुठे बांधण्यात येत होती किंवा येणार होती याबद्दल यत्किंचितही माहिती तक्रारीमध्ये नमूद नाही. तक्रारीमध्ये ‘अक्सा कॉम्प्लेक्स’ बाबत कुठेही उल्लेख नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा देण्याबाबत आदेश देता येणार नाही. आमच्यामते तक्रारदार सदनिकेचा ताबा मिळण्यास व तद्संबंधी मागण्यांकरीता पात्र ठरत नाही.
ड. तक्रारदार कोणत्या मागण्यांकरीता पात्र आहेत?
ड(1): वरील चर्चेवरुन हे स्पष्ट झाले आहे की सदनिकेबातिची माहिती चुकीची नमूद करण्यात आली आहे. परंतु अभिलेखावरुन हे स्पष्ट होते की तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदनिकांकरीता राशी दिली होती. सामनेवाले यांनी नोंदणीकृत करारनामा न करुन कायदेशीर बाबींचा भंग केला आहे. त्यामुळे तो आपल्या जबाबदारीतून पूर्णतः मुक्त होऊ शकत नाही. सामनेवाले यांनी सदनिकांकरीता राशी घेतली व सदनिका दिल्या नाही. तसेच राशीपण स्वतःकडे ठेवून घेतल्या आहेत. आमच्यामते सामनेवाले यांनी घेतलेल्या राशी तक्रारदार यांना परत करणे आवश्यक व न्यायोचित होईल. सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केल्यामुळे तक्रारदार यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाकरीतासुध्दा तक्रारदार जबाबदार आहेत असे आमचे ठाम मत आहे.
इ. सामनेवालेकरीता कोण जबाबदार आहेत?
इ(1): तक्रारदार यांनी सामनेवाले न्यु स्टार डेव्हलपर्स ही स्वामित्व हक्काची
संस्था दाखविली आहे व मौलाना सावर त्याचे स्वामी व मोहंमद
आयुब हे व्यवस्थापक दाखविण्यात आलेले आहेत. या व्यवस्थापकांची काय भूमिका होती याबाबत तक्रारीमध्ये काही उल्लेख नाही. अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापकाला जबाबदार धरणे अन्यायकारक व अनुचित ठरेल असे आम्हांस वाटते. सामनेवालेमार्फत मौलाना सावर हेच जबाबदार आहेत.
वरील चर्चेवरुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रार क्र. 159/2013 ही अंशतः मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले न्यु स्टार डेव्हलपर्स, प्रोप्रा. मौलाना सावर यांनी सेवा देण्यात कसूर केली आहे असे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले न्यु स्टार डेव्हलपर्स, प्रोप्रा. मौलाना सावर यांनी तक्रारदार यांना रु. 7,50,000/- (अक्षरी रुपये सात लाख पन्नास हजार) द.सा.द.शे. 15% च्या व्याजासह दि. 04/08/2009 (तक्रारदारांनी रक्कम अदा केल्याची शेवटची तारीख) पासून दि. 31/08/2015 किंवा त्यापूर्वी अदा करावी. तसे न केल्यास सदरहू रकमेवर दि. 04/08/2009 पासून द.सा.द.शे. 21% व्याज अदा करेपर्यंत लागू राहिल.
- सामनेवाले न्यु स्टार डेव्हलपर्स, प्रोप्रा. मौलाना सावर यांनी तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रासासाठी रु. 75,000/- (अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार) दि. 31/08/2015 किंवा त्यापूर्वी अदा करावे.
- सामनेवाले न्यु स्टार डेव्हलपर्स, प्रोप्रा. मौलाना सावर यांनी तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च म्हणून रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) दि. 31/08/2015 ला किंवा त्यापूर्वी अदा करावे.
- क्लॉज 4 व 5 मधील नमूद रक्कम मुदतीत अदा ने केल्यास त्यावर दि. 01/09/2015 पासून द.सा.द.शे. 10% व्याज लागू राहिल.
- तक्रारदार यांची तक्रार व्यवस्थापक श्री. मोहंमद आयुब यांचेविरुध्द खारीज करण्यात येते.
- तक्रारदार यांचा संकीर्ण अर्ज क्र. MA/22/2013 नस्ती करण्यात येतो.
- मंजूर न केलेल्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षांना टपालाने निःशुल्क पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.