Maharashtra

Ahmednagar

CC/18/183

परशुराम ऊर्फ परसराम उत्‍तम शेडाळे - Complainant(s)

Versus

मुख्‍य व्‍यवस्‍थापक, युनियन क्‍वालिटी प्‍लॅस्टिक लि. - Opp.Party(s)

तोडमल

04 Feb 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/18/183
( Date of Filing : 08 Jun 2018 )
 
1. परशुराम ऊर्फ परसराम उत्‍तम शेडाळे
मु.जांब, पो. कौडगांव, ता.नगर,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मुख्‍य व्‍यवस्‍थापक, युनियन क्‍वालिटी प्‍लॅस्टिक लि.
प्‍लॉट नं-204/205, जी.आय.डी.सी.इंडस्ट्रियल इस्‍टेट, उंबरगांव- 396 171
वलसाड
गुजरात
2. व्‍यवस्‍थापक, युनियन क्‍वालिटी प्‍लॅस्टिक लि.
अवफिस डब्‍ल्‍यु.आय.सी.प्‍लॉट नं-42, 4 था मजला, काेंबटटा बिल्‍डींग, इस्‍ट विंग एम.कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई
मुंबई
महाराष्‍ट्र
3. श्रीकृष्‍ण एन्‍टरप्रायजेस चे प्रोप्रा. सचिन नामदेवराव गोंटे
सागर हॉटेलसमोर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:तोडमल , Advocate
For the Opp. Party: Adv.S.C.Ithape, Advocate
Dated : 04 Feb 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०४/०२/२०१९

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराने तक्रारीत असे कथन कले आहे की, तक्रारदाराने शेतात शेततळे तयार करण्‍याचे ठ‍रविले. सामनेवाले क्र.१ ही शेततळ्यासाठी आवश्‍यक असणा-या प्‍लॅस्टिकच्‍या कागदाची उत्‍पादन करणारी कंपनी असुन सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांचेकडुन प्‍लॅस्‍टीक पुरविण्‍याचे काम करतात. सामनेवाले क्र.३ हे अहमदनगर शहरातील व्‍यापारी/ सेवापुरवठादार असुन सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी विक्री केलेल्‍या उत्‍पादनासंदर्भात शेतक-यांच्‍या तक्रारी आल्‍यास त्‍यांचे निवारण करणेकामी व त्‍यांना सेवा देणेकामी सामनेवाले क्र.१ व २ यांनी सामनेवाले क्र.३ यांची नेमणुक केली. तक्रारदार याने सामनेवाले यांना ठरलेल्‍या कामाची किंमत वेळोवेळी रोख स्‍वरूपात अदा केली. सदर रक्‍कम मिळाल्‍यानंतर सामनेवाले क्र.१ व २ यांनी केवळ शेततळ्यासाठीच्‍या प्‍लॅस्‍टीकच्‍या कागद याची किंमत रक्‍कम रूपये १,२७,८२०/- आणि कागद अंथरून व चिकटुन देणे याची किंमत रक्‍कम रूपये २९,८८०/- अशी एकुण रक्‍कम रूपये १,५७,७००/- ची बिले दिली. तसेच सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यास शेततळ्याच्‍या कागदाची पाच वर्षे इतक्‍या कालावधीसाठीची लेखी हमी/ गॅरंटी दिली. शेततळेचे काम जुन २०१५ मध्‍ये पुर्ण झाले. सदरील शेततळे पाण्‍याने भरल्‍यानंतर त्‍यातील पाण्‍याचा वापर न करता तळ्यातील पाण्‍याची पातळी आपोआप ३ ते ५ फुटाने कमी झाल्‍याचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. त्‍यावर तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याकडे संपर्क साधला असता सामनेवाले यांच्‍या तज्ञ कर्मचा-यांनी तक्रारदाराचे शेततळ्यावर येऊन गळती होत असलेल्‍या ठिकाणी दुस-या कागदाची थिगळे लावुन कागद दुरूस्‍त करून दिला. त्‍यानंतर पुन्‍हा पाण्‍याची आपोआप गळती होऊ लागली होती. तक्रारदाराने पुन्‍हा सामनेवाले क्र.१ व २ यांचेशी संपर्क साधला असता त्‍यांच्‍या संमतीने सामनेवाले क्र.३ यांनी दोन वेळेस विनामुल्‍य प्‍लॅस्‍टीक कागदाची थिगळे लावुन दुरूस्‍ती करून दिली. त्‍यावेळी सदरील सामनेवाले क्र.३ यांनी सांगितले की, वारंवार दरूस्‍ती केल्‍यामुळे कागदाची पाणी टिकुन धरण्‍याची क्षमता फार मोठ्यावर कमी झाली आहे. तसेच शेततळ्याचा कागद हा ब-याच ठिकाणी विरण्‍यास सुरूवात झाली आहे. त्‍यामुळे तुम्‍ही कंपनीकडुन कागदच बदलुन घ्‍यावा. सामनेवाले क्र.३ यांनी तक्रारदाराचे शेततळ्याची दुरूस्‍ती करून देखील पाण्‍याची गळती थांबली नाही. त्‍यावेळी तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ व २ यांचेशी संपर्क साधुन शेततळ्याचा कागद बदलुन देण्‍याची मागणी केली, परंतु सामनेवाले क्र.१ व २ यांनी शेततळ्याचा कागद बदलुन दिला नाही. त्‍यावर तक्रारदाराने दिनांक २४-१०-२०१६, १०-११-२०१६, २६-१२-२०१६, २८-०५-२०१७, ११-०६-२०१७, ०४-०७-२०१७, १०-०७-२०१७, ११-०७-२०१७, १८-०७-२०१७, २४-०७-२०१७, २१-०८-२०१७, १०-०९-२०१७, १२-०९-२०१७, १५-११-२०१७, २४-०३-२०१८ रोजी सामनेवाले क्र.१ यांना ई-मेलद्वारे तक्रार केली. सदरील तक्रार प्राप्‍त होऊनही सामनेवाले यांनी तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण केले नाही. त्‍यामुळे दिनांक ३०-१२-२०१६ रोजी सामनेवाले क्र.१ व २ विरुध्‍द जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, नगर आणि अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री यांचेकडे लेखी तक्रार केली. सदरील तक्रारीनुसार सामनेवाले क्र.१ व २ यांचेवर कोणतीही कारवाई झाली नाही. सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍या  सदरील कृत्‍यामुळे तक्रारदाराचे पिकांचे सुमारे ३,००,०००/- चे नुकसान झाले. तसेच शेततळे तयार करण्‍याचा खर्च रक्‍कम रूपये ३,००,०००/-, शेततळ्यासाठीच्‍या  प्‍लॅस्टिकचा कागद याची किंमत रक्‍कम रूपये १,२७,८२०/- आणि कागद अंथरून व चिकटवुन देणे याची किंमत रक्‍कम रूपये २९,८८०/- असे एकुण रक्‍कम रूपये ७,५७,७००/- चे तक्ररदाराचे नुकसान झाले आहे. सामनेवालेने दुषीत सेवा पुरवली म्‍हणुन सदर तक्रार दाखल करणेस कारण घडले आहे.

     तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी ५०० मायक्रॉन जाडीचा १६६० चौ.मीटर क्षेत्रफळाचा नविन शेततळ्याचा कागद तक्रारदारास विना मोबदला द्यावा तसेच सामनेवाले क्र.१ व २ यांनी कोणताही मोबदला न घेता तक्रारदाराचे शेततळ्यामध्‍ये नविन कागद व्‍यवस्थित अंथरून व चिकटवुन द्यावा. तक्रारदाराने प्‍लॅस्‍टीक कागदाचे किंमतीपोटी अदा केलेली रक्‍कम रूपये १,२७,८२०/- व कागद अंथरून व चिकटुन देण्‍यासाठी अदा केलली किंमत रूपये २९,८८०/- अशी एकुण रक्‍कम रूपये १,५७,७००/- तक्रारदारास सामनेवाले क्र.१ व २ कडुन मिळावेत. शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रूपये १,००,०००/-, पिकांचे नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रूपये ३,००,०००/-, तारेचे कुंपन यासाठी रक्‍कम रूपये ३,००,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रूपये २५,०००/- सामनेवाले क्र.१ व २ कडुन मिळावेत.  

३.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवालेंना नोटीस काढण्‍यात आली.  सदर नोटीस प्राप्‍त होऊनही सामनेवाले क्र.१ हजर झाले नाही, म्‍हणुन सदर प्रकरण त्‍यांचेविरूध्‍द एकतर्फा चालविणेचा आदेश पारीत करण्‍यात आला.

४.   सामेवाले क्र. २ प्रकरणात हजर झाले व त्‍यांचे म्‍हणणे निशाणी १३ वर असे दिले की, सामनेवाले क्र.३ श्रीकृष्‍ण एन्‍टरप्रायजेस चे प्रोप्रायटर सचिन नामदेव गोंटे हे सामनेवाले क्र.२ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.२ कंपनीकडुन प्‍लॅस्‍टीक पेपर घेऊन ते शेतकरी यांना विक्री करण्‍यास तसेच सदरचा कागद शेतकरी यांच्‍या सुचनेनुसार त्‍यांच्‍या शेत तळ्यामध्‍ये बसवुन देण्‍याचा व्‍यवसाय करतात. सदरचा कागद बसवतांना शेत तळ्यात जर बारीक दगड असल्‍यास पेपरास छिद्र पडु शकतात. म्‍हणुन याबाबतची काळजी घेणे ही जबाबदारी ही संबंधीत शेतकरी याची असते व कंपनीच्‍यावतीने तसेच डिलर याच्‍यावतीने शेतकरी यांना तश्‍याच प्रकारची सुचना देण्‍यात येतात. इतक्‍यात नव्‍हे तर सदर सुचना तक्रारदाराला देण्‍यात आली होती. सदर कागद घाईगडबडीत टाकल्‍याने व शेतामध्‍ये बारीक दगड असल्‍याने सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो त्‍यात उत्‍पादक कंपनीची आणि डिलरची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदाराचे प्‍लॅस्‍टीक कपडा बारीक काळे छिद्र पडल्‍याचे तक्रारीत नमुद करण्‍यात आले आहे. ही बारीक छिद्र बारीक दगडांमध्‍ये  झाले असले तरी त्‍यात कोणताही उत्‍पादीत दोष नाही. संपुर्ण महाराष्‍ट्रामध्‍ये त्‍यातल्‍या त्‍यात नगर जिल्‍ह्यामध्‍ये गेल्‍या चार-पाच वर्ष सतत दुष्‍काळी परिस्थिती होती. दुष्‍काळी परिस्थितीमुळे तक्रारदार यांनी कागद टाकलेल्‍या शेत तलावात पाणी न भरल्‍याने उन्‍हाळ्यामुळे तसेच शेततलाव कोरडा असल्‍याने जंगली प्राणी, पशुपक्षी यांचा वापर होऊन त्‍यामुळे तक्रारदार याचे शेत तलावातील कागदाचे नुकसान होऊ शकते. सदरची बाब ही नैसर्गिक असल्‍याने त्‍यास सामनेवाला यांना मुळीच जबाबदार धरता येणार नाही. सदरचा कागद बसवतांना कागद बसविण्‍याचा खर्च हा संपुर्णपणे डिलरला दिलेला असतो. त्‍यामुळे तो सामनेवाला यांच्‍याकडुन वसुल करण्‍याचा कोणताही अधिकार तक्रारदार यांना नाही. शेतात अनेक दिवस पाणीसाठा नसल्‍याने नैसर्गिक कारणाने सदर कागद खराब झाला  असल्‍याचे सामनेवाले यांच्‍याविरूध्‍द खोटी तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. संबंधीत शेतकरी यांनी सदर शेत तलावासाठी लागणारे कागदाची शासनाकडुन मिळणारी संपुर्ण सवलत मिळल्‍यानंतर सदरची खोटी बनावट तक्रार सामनेवाले यांच्‍याविरूध्‍द दाखल करण्‍यात आली आहे. सामनेवाले क्र.२ यांनी महाराष्‍ट्राबाहेर राज्‍यात शेततलावासाठी सदर कागद विकले असुन अशाप्रकारची कोणतीही तक्रार आली नसुन सदर तक्रार खोटी असुन खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे.

५.   सदर प्रकरणात सामनेवाले क्र.३ हजर झाले व त्‍यांचे म्‍हणणे निशाणी ९ वर असे दिले की, तक्रारदाराने तक्रारीत सामनेवाले क्र.३ चे विरूध्‍द लावलेले आरोप खोटे असुन त्‍यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्र.३ ने पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदाराने दाखल केलेल्‍या बिलांप्रमाणे संपुर्ण रक्‍कम ही तक्रारदार याने सामनेवाले क्र.१ व २ यांना अदा केलेली आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराच्‍या  शेततळ्यास प्‍लॅस्‍टीक कागदाचा पुरवठा केलेला आहे. त्‍यामुळे सदर तक्रारदाराच्‍या  कोणत्‍याही मागणीस अथवा तक्रारीस सामनेवाले क्र.३ हे जबाबदार नाहीत. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे. 

६.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, दस्‍तऐवज सामनेवाले क्र.१ व २ यांचे शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र पाहता मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्‍यात येत आहे.

अ.क्र.

मुद्दे

निष्‍कर्ष

१.

तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ?

होय

२.

सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ?

होय

३.

आदेश काय ?

अंतीम आदेशाप्रमाणे

 

मुद्दा क्र.१ -    

७.   तक्रारदाराने सामनेवालेकडुन त्‍याच्‍या शेततळ्यात प्‍लॅस्‍टीक खरेदी व कागद बसविण्‍याकरीता सामनेवाले क्र.१ ला रक्‍कम दिली, ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.६ दस्‍त क्र.१ व २ वरून सिध्‍द होत आहे. म्‍हणुन तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे, असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.   

मुद्दा क्र.२ –

८.   तक्रारदाराने नि.क्र.६ वर दाखल दस्‍त क्रमांक ६/१ व ६/२ याची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराला शेत तलावाकरीता प्‍लॅस्‍टीकचे कागद विकलेले होते, तसेच ते बसविण्‍याकरीता २९,८८०/- रक्‍कम स्विकारली होती. सदर प्‍लॅस्‍टीक कागद सामनेवाले क्र.३ कडुन तक्रारदाराकडे लावण्‍यात आलेला होता. सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीत हे मान्‍य केलेले आहे की, सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो. शेततलावात अनेक दिवस पाणीसाठा नसल्‍याने नैसर्गीक कारणाने सदरचा कागद खराब झाला असल्‍यास त्‍यास सामनेवाले हे मुळीच जबाबदार नाही. सामनेवाले क्र.१ व २ यांनी प्‍लॅस्‍टीक कागद बसविण्‍याकरीता रक्‍कम स्विकारली म्‍हणुन त्‍यांची ही जबाबदारी ठरते की, सदर प्‍लॅस्‍टीक कागद बसविणेवेळी योग्‍य काळजी घ्‍यावी. सामनेवाले     क्र.१ व २ यांची ही जबाबदारी आहे की, सदर प्‍लॅस्‍टीक कागद शेत तळ्यात योग्‍य पध्‍दतीने बसविण्‍यात यावा व त्‍याच्‍या जोड ठिकाणी प्‍लॅस्‍टीक कागदाचे कोणतेही नुकसान झाले नाही पाहिजे. तक्रारदाराला सामनेवाले क्र.१ व २ यांनी पुरविलेला प्‍लॅस्‍टीक कागद ५०० मायकॉनचा होता किंवा नाही तसेच सदर प्‍लॅस्‍टीक कागद निम्‍न दर्जाचा होता ही बाब तक्रारदाराने तज्ञ विशेषज्ञानाच्‍या अहवालाअभावी सिध्‍द करू शकले नाही. तसेच तक्रारदाराचे शेत तलावावर पशुपक्षी किंवा जंगली जनावरेमुळे सदर प्‍लॅस्‍टीक कागद खराब झाला किंवा दगडांमुळे झाला ही बाबही सामनेवाले क्र.२ यांनी तज्ञ विशेषज्ञानाचा अहवलाअभावी सिध्‍द करू शकले नाही. सामनेवाले क्र.२ यांनी सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो, ही बाब कैफीयतीत मान्‍य केलेली असुन सदर प्‍लॅस्‍टीक कागद खराब झाला होता, ही बाब सिध्‍द झाली आहे. सामनेवाले क्र.२ व ३ यांनी सदर प्‍लॅस्‍टीक कागद बसविण्‍याकरीता रक्‍कम स्विकारली होती व सामनेवाले क्र.२ व ३ ने ती योग्‍यप्रमाणे शेत तलावामध्‍ये  बसविलेले नव्‍हते व त्‍यानंतर त्‍याची दुरूस्‍ती किंवा त्‍याची पडताळणी करीता सामनेवाले क्र.१ ते ३ यांना तक्रार प्राप्‍त होऊनसुध्‍दा दुर्लक्ष केले, ही बाब सामनेवाले क्र.१ ते ३ यांची तक्रारदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शविते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्र.३ -    

९.   सामनेवालेने दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाड्याची प्रत, त्‍यातील असलेले तथ्‍य सदर प्रकरणात लागु पडत नाही. तक्रारदाराने शेत तलावात पाणी गळुन गेले असल्‍याने त्‍याचे पिकाचे नुकसान रूपये ३,००,०००/- इतके झाले याबाबत तक्रारदाराने कोणताही दस्‍तऐवज पुरावा प्रकरणात सादर केलेला नाही, ही बाब ग्राह्य धरून तसेच मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरुन खालीलप्रामणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.  

अंतीम आदेश

१.  तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.   सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी व्‍यक्तिगत किंवा संयुक्‍तरितीने तक्रारदाराचे शेततळ्याचे प्‍लॅस्‍टीकचे कागद लावण्‍याकरीता घेतलेली रक्‍कम रूपये २९,८८०/- (अक्षरी एकोणतीस हजार आठशे ऐंशी मात्र) तक्रारदाराला परत करावी.

३.  तक्रारदाराला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रूपये २०,०००/- (अक्षरी वीस हजार मात्र), तसेच तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार मात्र) सामनेवाले  क्र.१ ते ३ यांनी व्‍यक्तिगत व संयुक्‍तरितीने द्यावे.

४.  वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसाच्‍या  आत करावी.

५.  तक्रारदारला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करावी.

६.  आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.