निकाल
दिनांक- 07.08.2014
(द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्या )
तक्रारदार शिवदास शेषेबुवा पुरी यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे, तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 यांचे विभागत नौकरीस आहेत. तक्रारदाराने भविष्याचा विचार करुन सामनेवाले क्र.2 यांचे कडे 981803073, 981803104 व 980329230 हया पॉलिसी काढलेल्या आहेत. तक्रारदार हे सामनेवाले क्र.2 चे ग्राहक आहेत. सदर विमा पॉलिसीची मुदत दि.11.9.2013 पर्यत होती. सदर पॉलिसीचे हप्ते सामनेवाले क्र.1 हे कपात करुन सामनेवाले क्र.2 कडे भरत होते. विमा रक्कमे बाबत सामनेवाले क्र.2 कडे दि.15.7.2013 रोजी चौकशी केली असता तक्रारदाराचे विमा पॉलिसीचे हप्ते सामनेवाले क्र.1 कडून सामनेवाले क्र.2 यांचेकडे जमा झालेले नाहीत. सामनेवाले क्र.2 यांनी सामनेवाले क्र.1 यांना विमा हप्ते भरण्या बाबत पत्र दिलेले आहेत. सामनेवाले क्र.1 यांनी एकूण 15 ते 16 हप्ते कपात करुन सामनेवाले क्र.2 कडे जमा केलेले नाहीत. सामनेवाले क्र.1 यांनी विमा हप्ते मे महिन्यात जमा करु असे सांगितले. तक्रारदाराने सदर विमा पॉलिसीवर कर्ज घेतलेले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराची विमा हप्त्याची रककम तात्काळ विमा कंपनीस पाठविणे आवश्यक आहे परंतु सामनेवाले क्र.1 यांनी रक्कम पाठविली नाही. हप्ते न मिळाल्याबाबत सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना कळविले नाही व पत्र देऊन हप्त्याची मागणी केलेली नाही. सामनेवाले क्र.2 यांनी सेवेत कसूर केलेला आहे. तक्रारदाराचा विमा हप्ता भरण्यास झालेला विलंब हा सामनेवाले क्र.1 व 2 यांच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. तक्रारदाराचे विमा हप्ते भरण्यास झालेला विलंब व व्याजास सामनेवाले क्र.1 व 2 हे संयूक्तरित्या जबाबदार आहेत. तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांचे पगारातून कपात केलेले विमा हप्ते व त्यावरील व्याज मिळून होणारी रककम तात्काळ सामनेवाले क्र.2 यांचेकडे जमा करण्याचे आदेश व्हावेत. तसेच पुढील विमा हप्त्याची पगारातून कपात केलेली रक्कम सामनेवाले क्र.2 कडे जमा करण्यात यावे. तसेच नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- तसेच सेवेतील त्रूटी बददल रु.5,000/- मिळावेत तसेच तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळावा.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.13 अन्वये आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार हे नौकरदार असल्यामुळे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. या मंचाला सदर तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. त्यांचेकडे नौकरीस होते व त्यांचे विम्याचे हप्ते ते पगारातून कपात करीत होते हे मान्य आहे.सामनेवाले क्र.2 यांनी विमा हप्त्या बददल कधीही त्यांना पत्र दिले नाही. पंधरा ते सोळा हप्ते कपात करुन वर्ग केले नाही हे म्हणणे खोटे आहे. विमा पॉलिसीचे हप्ते मे महिन्यात भरु हे म्हणणे खोटे आहे. पॉलिसीवर कर्ज घेतल्या बाबत त्यांना माहीती नाही व त्यांची परवानगी तक्रारदार यांनी कधीही घेतली नाही. तक्रारदार यांनी शासनास सदर तक्रारीमध्ये पक्षकार केलेले नाही. सदर कार्यालय हे शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानावर चालते. शासनाकडून निधी कमी पडत असल्यामुळे कर्मचा-याचे वेतन वेळेवर होत नाही त्यामुळे दि.29.3.2012 रोजी त्याबाबत नोटीस बोर्डावर सूचना लावली आहे. विमा पॉलिसीचे हप्ते दि.1.4.2012 पासून सामनेवाले क्र.1 हे कपात करणार नाही व फे्बूवारी 2011 ते मार्च 2012 पर्यत कपात केलेले हप्ते तक्रारदार यांना परतावा देण्यात येतील. त्यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराचे विमा हप्ते सामनेवाले क्र.2 कडे जमा केलेले नाहीत. सामनेवाले क्र.1 यांनी सेवेत कसूर केलेला नाही. विमा हप्ता रु.837/- प्रमाणे 14 हप्त्याची रक्कम रु.11,704/- तक्रारदाराचे एस.बी.एच. येथील पगार खात्यावर शासनाकडून निधी प्राप्त होताच तात्काळ जमा केलेले आहेत. त्यामुळे कपात करुन रक्कम सामनेवाले क्र.2 कडे जमा करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदाराची तक्रार खोटी असून ती खर्चासह खारीज करावी.
सामनेवाले क्र.2 हे हजर झाले व त्यांनी नि.11 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 कडून तीन विमा पॉलिसी घेतली आहे सदर पॉलिसीचे विवरण व मुदत खालील नमुद केलेल्या तक्त्यामध्ये आहेत.
1 | Policy Number | 981803073 | 981803104 | 980329230 |
2 | Date of commencement | 28.3.2000 | 28.3.2000 | 22.01.1992 |
3 | Sum assured | Rs.1,00,000/- | Rs.50,000/- | Rs/25.000/- |
4 | Premium | Rs.467/- | Rs.284/- | Rs.85/- |
5 | Plan-Term | 121-20 | 75/20 | 14025 |
6 | Type-Mode | SSS-Mly | SSS-Mly | SSS-Mly |
7 | First unpaid premium | 02/2011 | 02/2011 | 02/2011 |
सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, तक्रारदारास सामनेवाले क्र.1 हे विमा हप्ता कपात करत आहे किंवा नाही त्याबाबत माहीती नाही. तक्रारदाराचे फेब्रूवारी 2011 पासूनचे विमा हप्ते रक्कम प्राप्त झाले नाही त्यामुळे सदर पॉलिसीच्या शर्ती व अटी नुसार विमा हप्त्याची रक्कम न भरल्यामुळे पॉलिसी संपूष्टात येण्यासारखी आहे. SSS या पॉलिसीच्या योजनेनुसार तक्रारदाराच्या पगारातून विमा हप्ता कपात करुन सामनेवाले क्र.2 कडे जमा करण्याची जबाबदारी ही सामनेवाले क्र.1 ची आहे. सामनेवाले क्र.1 यांनी विमा हप्त्याची रककम ही सामनेवाले क्र.2 कडे जमा केली नाही. सब, सामनेवाले क्र.2 यांनी सेवा देण्यात कसूर केला असे म्हणता येणार नाही. पॉलिसी घेणारा यांनी पॉलिसीच्या विमा हप्त्याची रक्क्म वेळोवेळी भरणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही स्मरणपत्र पाठवण्यासाठी सामनेवाले क्र.2 त्यासाठी जबाबदार नाही. सबब, सामनेवाले क्र.2 यांनी सेवा देण्यात कसूर केला आहे असे म्हणता येणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी पुराव्याकामी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या रोजनाम्यावरुन असे निदर्शनास आले की, तक्रारदार व सामनेवाले यांच्या वकिलांना युक्तीवादासाठी ब-याच संधी देऊनही युक्तीवाद केला नाही. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराच्या पगारातून विमा हप्ते
कपात करुन सदर विमा हप्ते सामनेवाले क्र.2 यांच्याकडे
जमा न करुन सेवा देण्यात त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार
यांनी सिध्द केली काय ? होय.
2. तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार व सामनेवाले यांच्या वकिलांना ब-याच संधी देऊनही युक्तीवाद केला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेले जवाब व कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार हा सामनेवाले क्र 1 यांच्याकडे कायमस्वरुपी नौकरीस आहे ही बाब सामनेवाले क्र 1 यांना मान्य आहे. तक्रारदाराच्या पगारातून सामनेवाले क्र 1 हे विमा हप्ता कपात करुन सामनेवाले क्र 2 कडे वर्ग करत होते ही बाब सामनेवाले क्र 1 यांना मान्य आहे. तक्रारदारांनी सामनेवाले क्र 2 कडून पॉलिसी नं. 981803073, 981803104 व 980329230 हया क्रमांकानुसार तीन पॉलिसी घेतल्या होत्या ही बाब सामनेवाले क्र 2 यांना मान्य आहे. सदर विमा पॉलिसीचे विमा हप्ते सामनेवाले क्र 1 हे तक्रारदाराच्या पगारातून कपात करुन सामनेवाले क्र 2 कडे सदर रक्कम वर्ग करत होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पॉलिसीचे अवलोकन केले. सदर पॉलिसी मध्ये नमूद केल्याप्रमाणे फ्रेबूवारी 2011 पासून तक्रारीत नमूद केलेल्या पॉलिसीयमध्ये विमा हप्ता भरलेला नाही असे निदर्शनास येते. सामनेवाले क्र1 यांनी सदरील विमा हप्ते तक्रारदाराच्या पगारातून कपात करुन सामनेवाले क्र 2 यांच्याकडे भरण्याची जबाबदारी घेतली आहे असे असताना सुध्दा सामनेवाले क्र 1 हे विमा हप्ता सामनेवाले क्र 2 कडे जमा न केल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार हे आपल्या भविष्यात आपल्याला रक्क्म मिळावी या हेतूने स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेण्यासाठी विमा पॉलिसी घेतात. सामनेवाले क्र 2 यांचे जवाबाचे अवलोकन केले. सामनेवाले क्र 1 यांनी आपल्या लेखी कैफियतीमध्ये सामनेवाले क्र 1 यांनी दि.29.3.2012 रोजी जा.क्र.बीन 4/कावि/आस्था-2/2012 कार्यालय नगर परिषद बीड यांनी जाहीर सुचना नोटीस बोर्डावर लावली होती. त्यानुसार सामनेवाले क्र 1 यांच्या कार्यालयात काम करणारे कामगार यांना सुचित केले होते की दि.1.4.2012 पासून सामनेवाले क्र 1 हे विमा पॉलिसीचे हप्ते कपात करणार नाही असे नमूद केले आहे. सदर बाब सिध्द करण्यासाठी सामनेवाले क्र 1 यांनी कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. तसेच दि.29.03.2012 रोजीच्या जाहीर सुचनेची प्रत सुध्दा मंचासमोर दाखल केली नाही. सामनेवाले क्र 1 यांनी घेतलेला बचाव हा स्विकार्य नाही. सामनेवाले क्र 1 यांनी दाखल केलेले अर्जदाराच्या खातेवर विम्याचे कपात केलेले हप्ते जमा केल्याची प्रत यांचे अवलोकन केले असे निदर्शनास येते की, प्रतिमाह 836 प्रमाणे 14 महिन्याचे एकूण रु.11,704/- जमा केले. परंतु सदर दस्त मध्ये काहीही स्पष्टीकरण नाही किंवा त्या बाबतीत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे दाखल केलेले दस्त हे विश्वासनीय नाही. तक्रारदार हे विश्वास ठेऊन स्वतःच्या भविष्याकरिता आपल्या दैनदिन मिळकती पासून काही रक्कम जमा करुन विमा पॉलिसी काढून योग्य वेळी योग्य हितासाठी सदर रक्कम जमा करतो. जेणेकरुन त्यांचा लाभ तक्रारदारास घेता यावा. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदाराच्या पगारातून विमा हप्ता कपात करुन सामनेवाले क्र 2 कडे जमा करण्याची हमी घेतली आहे. परंतु सामनेवाले क्र 1 यांनी एकदा हमी घेतल्यानंतर दूस-या कोणत्याही कारणास्तव तक्रारदाराची विमा हप्त्याची रक्कम सामनेवाले क्र 2 कडे जमा करण्याकरिता टाळाटाळ करता येत नाही. सामनेवाले क्र 1 चे कृत्य हे बेकायदेशीर आहे. यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदाराचे विमा हप्ते कपात करुन सामनेवाले क्र 2 कडे जमा न केल्याने तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांचे विमा हप्ते पगारातून कपात करुन सामनेवाले क्र 2 कडे जमा करण्याची सामनेवाले क्र 1 ची जबाबदारी असल्यामुळे सामनेवाले क्र 2 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार हा तक्रारीतील मागणी मिळण्यास पात्र आहे. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदाराच्या पगारातून कपात केलेली विमा हप्त्याची थकीत रक्कम सामनेवाले क्र 2 कडे व्याजासह जमा करावी व तक्रारदाराच्या पॉलिसीच्या कालावधी पर्यत पुढील विमा हप्ता रक्कम तक्रारदाराच्या पगारातून कपात करुन वेळोवेळी सामनेवाले क्र 2 कडे जमा करावेत. सबब, तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार
यांच्या पगारातून कपात केलेले थकीत विमा हप्ते
व्याजासह सामनेवाले क्र 2 कडे निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे
आंत जमा करावेत.
- सामनेवाले क्र 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी यापूढे
तक्रारदाराच्या पगारातून कपात होणारी विमा हप्त्याची रक्कम
योग्य रितीने सामनेवाले क्र 2 कडे वेळोवेळी जमा करावी.
- सामनेवाले क्र 1 यांना आदेश देण्यात येतो की, सदर विमा हप्ताची
थकीत रक्कम व यापुढे पगारातून कपात होणारी विमा रक्कम
सामनेवाले क्र 2 कडे जमा न केल्यास त्यामुळे तक्रारदारास
होणा-या नुकसान भरपाईस सामनेवाले क्र 1 हे सर्वस्वी जबाबदार
राहतील.
- सामनेवाले क्र 1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना
झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2000/- व
तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- दयावेत.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मजुंषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड