-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
( पारित दिनांक-16 मार्च, 2018)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) विमा प्रतिनिधी विरुध्द वेळेत विमा पॉलिसी कव्हरनोट न दिल्यामुळे सेवेत कमतरता ठेवली या आरोपा खाली दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा एक अभियांत्रिकी पदवीधर आहे, त्याला युनायटेड किंगडम मधील नावाजलेल्या विद्दापिठातील “Electronic Circuit Design & Manufacture” या विषयात प्राविण्य प्राप्त करावयाचे होते, त्या अभ्यासक्रमाचा कालावधी हा दिनांक-01/04/2012 ते दिनांक-31/08/2012 असा होता, त्यासाठी प्रथम त्याला स्विडन येथील लिंकोपिंग्स विद्दापिठात (LINKOPINGS UNIVERSITY) वरील अभ्यासक्रमासाठी जाणे आवश्यक होते आणि त्यासाठी कायद्दा नुसार वीजाची (Visa) आवश्यकता होती आणि वीजा (Visa) मिळविण्यासाठी प्रथम त्याला विमा कव्हर नोट प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने, विरुध्दपक्ष क्रं-2) हिला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने विमा पॉलिसी काढण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-2) प्रतिनिधीचे मार्फतीने अर्ज केला होता आणि विम्याचा आगाऊ हप्ता रुपये-23,730/- विरुध्दपक्ष क्रं-2) प्रतिनिधी हिचे जवळ जमा केला होता. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीची जीवन सुरक्षा विमा पॉलिसी घेण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारकर्त्याने दिनांक-01/09/2011 रोजी भारत सोडले व तो युनाटेड किंगडमला पोहचला आणि तेथून तो लिंकोपिंग्स विद्दापिठ, स्विडन यांचे व्दारे घेतल्या जाणा-या पूर्व परिक्षेच्या तयारीला लागला. स्विडन येथील विद्दापिठाची पूर्व परिक्षा उत्तीर्ण केल्या नंतर त्याला यु.के. मधील विद्दापिठातून “Electronic Circuit Design & Manufacture” या विषया मध्ये प्राविण्य प्राप्त करण्यासाठी निमंत्रण मिळाले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने त्याला वेळेवर विमा कव्हर नोट पुरविली नसल्याने तो वेळेवर वीजा (Visa) मिळविण्यासाठी अर्ज करु शकला नाही आणि त्यामुळे तो स्विडन येथे जाण्यासाठी आवश्यक असलेला वीजा (Visa) मिळविण्यास अपयशी ठरला. ब-याच अवधी नंतर विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने दिनांक-06/03/2012 रोजी त्याला विमा कव्हरनोट जारी केली, त्यानंतर त्याने पुन्हा स्विडन येथे राहण्यासाठी आवश्यक असलेला वीजा (Visa) मिळवण्यासाठी अर्ज केला परंतु त्याला ज्या विषयात म्हणजे“Electronic Circuit Design & Manufacture” प्राविण्य प्राप्त करावयाचे होते, तो अभ्यासक्रम दिनांक-01/04/2012 पासून सुरु झालेला होता. तक्रारकर्त्याला दिनांक-12/04/2012 रोजी व्हीजा मिळाला, त्यानंतर त्याने दुसरी उपाय योजना करुन तिकीटाची सोय करुन तो स्विडन येथील विद्दापिठात पोहचला परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे स्विडन येथील विद्दापिठात वेळेवर उपरोक्त नमुद अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याची संधी गमावून बसला. तक्रारकर्त्याला यु.के. येथे दिनांक-01/04/2012 पासून ते दिनांक-17/04/2012 पर्यंत होस्टेल येथे राहावे लागले, ज्यासाठी त्याला रुपये-3,00,000/- पेक्षा जास्त खर्च सहन करवा लागला, त्यामुळे त्याला आपला प्रकल्प वेळेवर पूर्ण करता आला नाही. तक्रारकर्त्याला लेगॉस नायजेरीया येथे 06 महिन्याच्या परिक्षा कालावधीसाठी सहाय्यक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नौकरी करण्याचे निमंत्रण सुध्दा मिळाले होते परंतु विरुध्दपक्षांच्या बेजबाबदारपणा मुळे तो आपल्या थेसिसचे काम वेळेच्या आत पूर्ण करु शकला नाही आणि त्यासाठी त्याला जास्तीचा कालावधी घ्यावा लागला आणि जवळपास दोन महिने स्विडन येथे राहावे लागले, ज्यासाठी त्याला रुपये-4,00,000/- खर्च आला त्याच प्रमाणे लेगॉस नायजेरीया येथे पण नौकरी करण्याची संधी विरुध्दपक्षांच्या बेजबाबदारपणा मुळे गमवावी लागली ज्यामुळे त्याला नौकरी पासून मिळणा-या उत्पन्नाचे रुपये-10,68,000/- चे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. जर विरुध्दपक्षानीं विमा कव्हर नोट वेळेवर जारी केली असती, तर त्याला या सर्व नुकसानीला सामारे जावे लागले नसते. ही विरुध्दपक्षाच्या सेवेतील कमतरता आहे म्हणून त्याने या तक्रारीव्दारे विरुध्दपक्षां कडून रुपये-17,68,000/- एवढया रकमेची नुकसान भरपाई मागितली असून त्याशिवाय त्याला झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मागितला आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी जबाब सादर करुन त्यांचे विरुध्द तक्रारीत केलेले सर्व आरोप नाकबुल केलेत. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने बँके कडून एकूण रुपये-11,91,000/- एवढया रकमेचे शैक्षणिक कर्ज घेतले होते आणि त्यासाठी एक रकमी विमा हप्ता रुपये-20,927/- भरुन विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी कडून “शिक्षा सुरक्षा” ही विमा पॉलिसी काढली होती, त्या विमा पॉलिसी नुसार मूळ आश्वासित विमा रक्कम (Basic Sum Assured) रुपये-11,91,000/- होती आणि विम्याचा कालावधी हा 09 वर्ष एवढा होता. तक्रारकर्त्याला त्या विमा योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आली होती, त्यानुसार त्याने ती विमा पॉलिसी घेण्यासाठी अर्ज केला होता आणि विमा अर्जाची छाननी केल्या नंतर त्याला “शिक्षा सुरक्षा” नावाची पॉलिसी दिनांक-06/03/2012 रोजी देण्यात आली होती. तक्रारकर्त्या कडून पॉलिसी संबधीची सर्वप्रथम तक्रार दिनांक-11.02.2013 रोजी म्हणजे पॉलिसी दस्तऐवज दिल्याच्या 11 महिन्या नंतर प्राप्त झाली. तक्रारकर्त्याने ज्या विमा पॉलिसीसाठी अर्ज केला होता आणि जी विमा पॉलिसी त्याला देण्यात आली होती, ती केवळ शैक्षणिक कर्जा संबधीची होती आणि त्या पॉलिसीचा तक्रारकर्त्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाशी काहीही संबध येत नव्हता, त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासा बद्दल विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. तसेच त्याला वीजा (Visa) वेळेवर मिळाला नाही त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-1)विमा कंपनी जबाबदार नाही, सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) हिला मंचाचे मार्फतीने नोटीस तामील होऊनही तिचे तर्फे कोणीही उपस्थित न झाल्याने विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्यात आली.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती तसेच तक्रारकर्त्याचे वकील आणि विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याने स्वतःची तक्रार ब-याच शब्दात व्यक्त केली आहे. परंतु त्याचे मुख्य गा-हाणे असे आहे की, विरुध्दपक्षाने त्याला वेळेवर विमा कव्हर नोट पुरविली नसल्याने त्याला विदेशात जाऊन शिक्षण घेण्या करीता वीजा (Visa) मिळविण्यासाठी वेळेवर अर्ज करता आला नाही.
07. याउलट, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे आपल्या लेखी उत्तरात या मुद्दावर मुख्य भर देण्यात आला की, तक्रारकर्त्याने ज्यासाठी विमा पॉलिसी घेतली होती, ती केवळ त्याने बँके कडून घेतलेल्या शैक्षणिक कर्जाच्या परतफेड रकमेच्या सुरक्षे संबधीची होती आणि त्या पॉलिसीचा विदेशात जाऊन शिक्षण घेण्याशी काहीही संबध नव्हता. तक्रारीतील मूळ वादातीत मुद्दा एवढाच आहे.
08. तक्रारकर्त्याने विमा प्रमाणपत्राची (Insurance Certificate) प्रत दाखल केली, ती आम्ही वाचून पाहिली असता, असे लक्षात येते की, ती पॉलिसी शैक्षणिक कर्जाच्या परतफेड रकमेच्या सुरक्षीततेसाठी घेतली होती आणि त्याचा एक रकमी विमा हप्ता रुपये-20,927/- एवढा होता. पॉलिसी अंतर्गत आश्वासित विमा रक्कम (Basic Sum Assured) रुपये-11,91,000/- एवढी होती. विमा पॉलिसीच्या शर्ती नुसार पॉलिसीच्या कालावधी मध्ये जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याचे मरणोपरांत विमा लाभ देय होणार होता, म्हणजेच शैक्षणिक कर्जाचे परतफेडीची रक्कम त्या पॉलिसी अंतर्गत विमा कंपनी भरणार होती. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याला स्विडन येथे शिक्षण घेण्यासाठी जी वास्तव्यासाठी परवानगीची गरज होती, त्या संबधीचे दस्तऐवज दाखल केले आहे, त्यानुसार जर स्विडन मध्ये वास्तव्य करुन शिक्षण घ्यावयाचे असेल तर त्या व्यक्तीला जितके दिवस स्विडन मध्ये वास्तव्य करावयाचे असेल तितक्या दिवसाची स्वतःची कॉम्प्रव्हेन्सीव्ह जीवन विमा सुरक्षा पॉलिसी काढणे आवश्यक होते म्हणजेच स्विडन मध्ये वास्तव्य करुन अभ्यास पूर्ण करण्यासाठी वीजाची (Visa) गरज होती आणि तो मिळविण्यासाठी कॉम्प्रव्हेन्सीव्ह जीवन विमा सुरक्षा पॉलिसी काढणे हा त्या अटीचा भाग होता. तक्रारकर्त्याने जी विमा पॉलिसी काढली ती केवळ त्याने बँके मधून घेतलेल्या शैक्षणिक कर्ज परतफेड रकमेच्या सुरक्षेसाठी घेतली होती आणि त्या पॉलिसी अंतर्गत कुठल्याही आरोग्य विषयक जोखीमेचा (Health Risk) समावेश नव्हता. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे सुध्दा तक्रारकर्त्याने घेतलेल्या विमा पॉलिसीचा दस्तऐवज दाखल केला आहे, त्यानुसार ती पॉलिसी शिक्षा सुरक्षा प्लॅन अंतर्गत देण्यात आली असून त्यामध्ये कर्ज खात्याचा क्रमांक नमुद आहे, कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले आणि कर्ज परतफेडीचा कालावधी या बाबी त्यामध्ये नमुद केलेल्या आहेत, त्यामुळे तक्रारकर्त्याचा जो आरोप आहे की, विरुध्दपक्षाने विलंबाने विमा कव्हर नोट दिल्यामुळे त्याला विदेशात शिक्षण घेण्यासाठी वेळेच्या आत वीजा (Visa) मिळविण्यासाठी अर्ज तो करु शकला नाही यामध्ये तथ्य दिसून येत नाही.
09. तक्रारकर्त्याने स्विडन मध्ये राहून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वीजा मिळविण्याचे दृष्टीने जीवन सुरक्षा पॉलिसीसाठी अर्ज केला होता या संबधी कुठलाही पुरावा किंवा दस्तऐवज दाखल केले नाहीत. तक्रारकर्त्याचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) विमा प्रतिनिधी हिला विम्याचा हप्ता रुपये-23,730/- दिनांक-04/08/2011 रोजी दिला होता परंतु तक्रारकर्त्याला विमा कव्हर नोट ताबडतोब देण्यात आली नाही आणि म्हणून त्या दिवसा पासून तक्रारीचे सतत करण घडत आहे. तक्रारकर्त्याच्या वकीलांच्या मते विमा करार त्याच दिवशी अस्तित्वात आला, ज्या दिवशी रुपये-23,730/- एवढया रकमेचा विमा हप्ता विरुध्दपक्ष क्रं-2) विमा प्रतिनिधी हिचे जवळ देण्यात आला होता. परंतु या युक्तीवादाशी आम्ही सहमत नाही, केवळ विमा हप्ता भरल्याने विमा करार पूर्ण होत नाही. मा. सर्वोच्च न्यायालयाने “L.I.C.-Versus-Raja Vasireddy” AIR-1984 (SC) 1014 या निवाडया मध्ये असे म्हटले आहे की, विम्याचा करार तेंव्हाच पूर्ण होतो, जेंव्हा ज्या पक्षाला विमा करारा संबधी ऑफर दिलीअसते,ती ऑफर कुठल्याही शर्तीविना त्या पक्षाने मंजूर केल्या नंतर त्याची स्विकृती ज्या व्यक्तीने ऑफर दिली आहे, त्याला कळविली जाते. त्यामुळे जरी असे गृहीत धरले की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) विमा प्रतिनिधी हिचे जवळ विमा रकमेचा हप्ता दिला होता तरी त्या तारखेला विमा करार पूर्ण झाला नव्हता, जो पर्यंत तक्रारकर्त्याचा विमा प्रस्ताव विमा कंपनीने स्विकृत केलेले नव्हता, त्यामुळे या कारणास्तव सुध्दा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला जबाबदार धरता येणार नाही.
10. वरील नमुद कारणास्तव या तक्रारीत कुठलेही तथ्य नसल्याने ती खारीज होण्यास पात्र आहे, सबब खालील प्रमाणे तक्रारीत आदेश पारीत करण्यात येतो-
::आदेश::
(01) तक्रारकर्ता श्री निरुल वल्द निहारीन्दर मसुरकर यांची, विरुध्दपक्ष क्रं-1) मे. स्टार युनियन दाई-इची जीवन विमा कंपनी लिमिटेड आणि विरुध्दपक्ष क्रं-2) श्रीमती पूजा मंथनवार यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.