Maharashtra

Satara

CC/21/128

श्री विश्वजीत प्रकाश देसाई - Complainant(s)

Versus

मा. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या सातारा शहर उपविभाग - Opp.Party(s)

Adv. Y. V. Salunkhe

20 Jun 2024

ORDER

Consumer Disputes Redressal
Commission, Satara
 
Complaint Case No. CC/21/128
( Date of Filing : 12 Jul 2021 )
 
1. श्री विश्वजीत प्रकाश देसाई
रा. 43, अर्कशाळानगर शाहूपुरी, ता. जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मा. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या सातारा शहर उपविभाग
217, प्रतापगंज पेठ, सातारा ता. जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
2. 2. मा. अधीक्षक अभियंता, सातारा परिमंडल महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या
कृष्णानगर सातारा
सातारा
महाराष्ट्र
3. 3.मा. सहाय्यक संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडळ कार्यालय कोल्हापूर
ताराबाई पार्क, जि. कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
4. 4. मा. अध्यक्ष, अंतर्गत तक्रार निवारण कक्ष सातारा मंडळ
सातारा, ता. जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE PRESIDENT
 HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV MEMBER
 HON'BLE MS. MANISHA H. REPE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 20 Jun 2024
Final Order / Judgement

न्या य नि र्ण य

 

द्वारा मा. श्रीमती मनिषा हि. रेपे, सदस्य

 

 

1.    प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.

 

2.    तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –

      सि.स.नं. 23, गुरुवार पेठ, सातारा या मिळकतीमध्‍ये उभारलेल्‍या ठक्‍कर आर्केड या इमारतीमधील पहिल्‍या मजल्‍यावरील फ्लॅट नं.एफ-3 ही सदनिका तक्रारदार यांचे मालकी व कब्‍जेवहिवाटीची आहे.  सदर सदनिका ही मुळतः श्री शेखर श्रीपाद आपटे याचे मालकीची होती. सदर मिळकतीमध्‍ये श्री शेखर आपटे यांचे नावे 190561399038 या क्रमांकाचे वीज कनेक्‍शन होते.  तक्रारदार यांनी सदर सदनिका श्री आपटे यांचेकडून दि. 12/12/2013 रोजी खरेदी केली आहे.  सदर सदनिकेमध्‍ये तक्रारदार यांनी नवीन विज कनेक्‍शन घेण्‍याच्‍या अनुषंगाने जाबदार क्र.1 यांचे कार्यालयामध्‍ये श्री शेखर आपटे यांच्‍या वीज कनेक्‍शनबाबत थकबाकी आहे का, याबाबत चौकशी केली असता जाबदार क्र.1 यांनी अशी कोणतीही थकबाकी नसलेबाबत ना हरकत दाखला दिला आहे.  सदर दाखल्‍याचे आधारे तक्रारदार यांना दि. 4/07/2014 रोजी नवीन वीज कनेक्‍शन देण्‍यात आले असून त्‍याचा ग्राहक क्र. 19561469567 असा आहे.  तदनंतर तक्रारदार यांनी सदर कनेक्‍शन हे व्‍यावसायिक प्रकारामध्‍ये वर्ग करुन घेतले आहे.  सदर कनेक्‍शनची वीज बिले तक्रारदार नियमितपणे अदा करीत आहेत.  असे असताना जाबदार यांनी माहे डिसेंबर 2019 चे रक्‍कम रु.85,490/- इतक्‍या रकमेचे चुकीचे बिल दिले.  या बिलामध्‍ये रक्‍कम रु.74,039.85/- इतकी रक्‍कम समायोजित म्‍हणून दर्शविण्‍यात आली.  याबाबत तक्रारदारांनी जाबदार क्र.1 यांचेकडे चौकशी केली असता त्‍यांनी समायोजित रक्‍कम ही श्री शेखर श्रीपाद आपटे यांचे नावे असणा-या कनेक्‍शनची थकीत रक्‍कम असल्‍याचे सांगितले.  तदनंतर तक्रारदार यांचे अर्जाचे अनुषंगाने सहायक अभियंता (गुणनियंत्रण) सातारा शहर उपविभाग यांनी जागेची प्रत्‍यक्ष पाहणी करुन दि. 9/01/2020 रोजी अहवाल सादर केला. सदर अहवालामध्‍ये तक्रारदार यांचे नावे कोणतीही थकबाकी नसल्‍याचे नमूद केले आहे.  सदर अहवाल प्राप्‍त होवूनही जाबदार क्र.1 यांनी तक्रारदाराचे वीज बिल दुरुस्‍त करुन दिले नाही.  तदनंतर तक्रारदाराने पाठपुरावा करुनही जाबदार यांनी तक्रारदार यांचे बिल कमी करुन दिलेले नाही.  दि.19/2/2019 रोजी जाबदारांचे कर्मचारी यांनी तक्रारदारांना त्‍यांचा वीज पुरवठा खंडीत करण्‍याचे आदेश आहेत असे सांगितले.  तसेच त्‍यांनी जाबदार यांचे अधिकारी श्री शिंदे यांची भेट घेण्‍यास तक्रारदारांना सांगितले.  तक्रारदारांनी  श्री शिंदे यांची भेट घेतली असता त्‍यांनी श्री माने यांची भेट घेण्‍यास सांगितले. श्री माने यांनी तक्रारदारांना रककम रु.10,000/- भरण्‍यास सांगितले.  तक्रारदारांनी वीज पुरवठा खंडीत होईल या भितीने दि.18/02/2021 व दि.18/3/21 रोजी अनुक्रमे रु.10,000/- व रु.6,900/- इतकी रक्‍कम भरली.  परंतु तरीही जाबदारांनी थकीत बिलाची रक्‍कम कमी केली नाही.  तदनंतर तक्रारदारांनी दि. 12/03/2021 रोजी अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, सातारा मंडल, सातारा यांचेकडे अर्ज दिला.  परंतु सदर कक्षानेही जाबदार यांची कृती योग्‍य असल्‍याचा आदेश पारीत केला.  श्री शेखर आपटे यांचे कनेक्‍शनशी तक्रारदार यांचा कोणताही संबंध नसल्‍याने सदरचे कनेक्‍शनची थकबाकी तक्रारदार यांचे नावावर वर्ग करता येणार नाही.  तसेच जाबदार यांना तक्रारदारांचा वीजपुरवठाही खंडीत करता येणार नाही.  अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केल्‍यामुळे तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांनी दिलेले माहे डिसेंबर 2019 चे बिल चुकीचे असल्‍यामुळे ते रद्द करुन मिळावे, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.20,000/- जाबदारकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे. 

 

3.    तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत सदनिका खरेदीबाबतचा इंडेक्‍स-2 चा उतारा, जाबदार यांनी दिलेला ना हरकत दाखला, माहे डिसेंबर 2019 चे वीज देयक, जाबदार क्र.1 व तक्रारदार यांचेमध्‍ये झालेला पत्रव्‍यवहार, जाबदार क्र.4 यांचेकडे तक्रारदारांनी केलेला अर्ज, जाबदार क्र.4 यांनी पारीत केलेला आदेश, तक्रारदारांनी माहिती अधिकाराखाली मागविलेली माहिती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. 

 

4.    जाबदार यांनी याकामी हजर होवून म्हणणे व कागदयादीसोबत तक्रारदार यांचे वीज कनेक्‍शनची सी.पी.एल. दाखल केले आहे.  तसेच पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे.

 

5.    जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कथने परिच्छेदनिहाय नाकारली आहेत.  तक्रारदार हे आपली जबाबदारी टाळू पहात आहे.  ते स्‍वच्‍छ हाताने आयोगासमोर आलेले नाहीत.  ठक्‍कर आर्केड ही इमारत कमर्शियल असून त्‍यामध्‍ये मूळ मालक आपटे यांनी दोन विद्युत कनेक्‍शन घेतली होती.  त्‍यातील एक रहिवास व एक कमर्शियल होते.  ती अनुक्रमे 190561399038 व 190560208654 अशी होती.  तक्रारदार यांनी सदरची इमारत हॉल खरेदी केल्‍यानंतर ग्राहक नं. 190561399038 या वीज कनेक्‍शनबाबत थकबाकी आहे का, याबाबत जाबदार यांचेकडे चौकशी केली होती.  त्‍यावेळी सदर विद्युत कनेक्‍शनवर थकबाकी नसलेचा ना हरकत दाखला जाबदार यांनी तक्रारदार यांना दिला होता.  तक्रारदारांनी सदर‍ची मिळकत खरेदी केलेनंतर तक्रारदार यांना ग्राहक क्र.19056146967 ने कनेक्‍शन दिले होते.  आपटे यांना दिलेले दुसरे विद्युत कनेक्‍शन 190560208654 हे विद्युत बिल थकविल्‍यामुळे बंद केले होते.  जरी तक्रारदार यांनी दि.12/12/2013 रोजी सदर इमारत खरेदी केली असली तरी प्रत्‍यक्षात विद्युत कनेक्‍शन हे दि. 4/07/2014 रोजी घेतले होते.  त्‍यामुळे दि. 12/12/2013 पासून तक्रारदार हे ग्राहक क्र. 190560208654 या विद्युत कनेक्‍शनचा वापर करीत होते.  त्‍यामुळे सदर थकीत बिल भरण्‍याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर येते.  त्‍यामुळे सदरची थकबाकी ही ग्राहक क्र. 190560208654 वर वर्ग करण्‍यात आली.  सदरची बिलाची रक्‍कम रु. 77,605/- ही बरोबर आहे.  कायद्यानेच जाबदार यांना तक्रारदार यांच्‍याकडून त्‍याच इमारतीमधील दुस-या बंद विद्युत कनेक्‍शन वरील थकीत रक्‍कम वसुल करण्‍याचा अधिकार आहे.  प्रत्‍यक्षात तक्रारदार यांनीच वीज वापर केला आहे.  तक्रारदार हे  वीजेचा वापर व्‍यावसायीक कारणासाठी करीत असलेने तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत.  तसेच तक्रारदारांनी श्री शेखर आपटे यांना याकामी पक्षकार केलेले नाही.  सबब, तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.

 

6.    तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, तसेच जाबदार यांनी दाखल केलेले म्हणणे, शपथपत्र, कागदपत्रे तसेच उभय पक्षांचा युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात. 

 

.क्र.

मुद्दे

उत्तरे

1

तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

जाबदार यांनी तक्रारदारांना दुषित व त्रुटीयुक्‍त सेवा दिली आहे काय ?

होय.

3

जाबदारांनी माहे डिसेंबर 2019 च्‍या वीज देयकामध्‍ये तक्रारदार यांच्‍या ग्राहक क्र. 19056146967 वर वर्ग केलेली ग्राहक क्र. 190560208654 वरीलदर्शविलेली थकबाकी रक्‍कम योग्‍य आहे काय ?

नाही.

 

4

तक्रारदार यांचे माहे डिसेंबर 2019 मधील दर्शविलेली थकबाकी रक्‍कम रु.77,605/- रद्द होणेस पात्र आहे काय ?

होय.

5

तक्रारदार जाबदार कंपनीकडून मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे काय ?

होय.

6

अंतिम आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

     

                                   

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र.1

 

7.    तक्रारदार यांचे कथनानुसार, गुरुवार पेठ, सातारा येथील सि.स.नं. 23 मधील ठक्‍कर आर्केड या इमारतीमधील पहिल्‍या मजल्‍यावरील फ्लॅट नं.एफ-3 ही तक्रारदार यांचे मालकी व कब्‍जेवहिवाटीची आहे.  सदर सदनिका तक्रारदार यांनी दि. 12/12/2013 रोजी श्री शेखर श्रीपाद आपटे यांचेकडून खरेदी केलेली आहे ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या सूची क्र. 2 च्‍या प्रतीवरुन स्‍पष्‍ट होत आहे.  सदर सदनिकेमध्‍ये तक्रारदार यांनी दि. 4/07/2014 रोजी नवीन विद्युत कनेक्‍शन जाबदार यांचेकडून घेतलेले असून त्‍याचा ग्राहक क्र. 19561469567 असा आहे.  सदरील बाब जाबदार यांना मान्‍य आहे.  त्‍यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा पुरवठादार असे नाते निर्माण होत असल्‍यामुळे तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे ही बाब सिध्‍द होत असल्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

8.    तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही जाबदार यांचेविरुध्‍द जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.3 यांच्‍या अहवालाप्रमाणे माहे डिसेंबर 2019 रोजीच्या वीज देयकामध्‍ये तक्रारदार यांच्‍या विद्युत कनेक्‍शन ग्राहक क्र. 19561469567 वर वर्ग केलेली ग्राहक क्र. 190560208654 वरील तथाकथित थकबाकी रु.77,605/- (अक्षरी रुपये सत्‍त्‍याहत्‍तर हजार सहाशे पाच फक्‍त) ही चुकीची असल्‍यामुळे रद्द करुन मागितलेली आहे.

 

9.    तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सि.स.नं. 23, गुरुवार पेठ, सातारा या मिळकतीमधील ठक्‍कर आर्केड या इमारतीमधील पहिल्‍या मजल्‍यावरील सदनिका एफ-3 ही मूलतः श्री शेखर श्रीपाद आपटे यांचे मालकी कब्‍जेवहिवाटीची होती.  सदर सदनिकेमध्‍ये श्री शेखर आपटे यांचे नांवे 190561399038 या क्रमांकाचे वीज कनेक्‍शन होते. तक्रारदार यांनी दि. 12/12/2013 रोजी सदर सदनिका श्री शेखर आपटे यांचेकडून खरेदी केल्‍यानंतर सदर सदनिकेमध्‍ये नवीन विद्युत कनेक्‍शन घेण्‍याच्‍या अनुषंगाने मूळ मालक शेखर आपटे यांच्‍या नावावरील विद्युत कनेक्‍शन 190561399038 बाबत काही थकबाकी आहे का, याबाबत जाबदार क्र.1 यांचेकडे दि. 13/12/2013 रोजी विचारणा केली. त्‍यानंतर दि. 13/12/13 रोजी जाबदार क्र.1 यांनी सदनिका क्र. एफ-3 चे मूळ मालक शेखर आपटे यांच्‍या नावे असलेल्‍या ग्राहक क्र. 190561399038 वर कोणत्‍याही प्रकारची थकबाकी व इतर काही रक्‍कम थकीत नसल्‍याबाबत व तक्रारदार यांना त्‍यामुळे नवीन वीज कनेक्‍शन जोडणी देणेबाबत हरकत नसल्‍याचा नाहरकत दाखला दिला.  तक्रारदाराने दाखल केलेल्‍या सदरील दाखल्याचे अवलोकन केले असता, सदनिका क्र.एफ-3 चे मूळ मालक शेखर आपटे यांचे नावे असलेल्‍या ग्राहक क्र. 190561399038 वर कोणतीही थकबाकी व इतर कोणतेही देयक थकबाकी नसल्‍याचे व त्‍यामुळे जाबदार क्र.1 यांनी तक्रारदार यांचे सदनिका क्र.एफ-3 मध्‍ये नवीन कनेक्‍शन देण्‍यास हरकत नसल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.  तसेच तक्रारदारांना जाबदार यांनी ग्राहक क्र. 19561469567 चे नवीन कनेक्‍शन सदर सदनिकेसाठी दिल्‍याचे तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या सदनिका एफ-3 च्‍या माहे 2019 च्‍या वीज देयकावरुन सिध्‍द होते.

     

10.   तक्रारदार यांच्‍या कथनानुसार, तक्रारदार यांना कोणतीही पूर्वसूचना अगर नोटीस न देता सदनिका एफ-3 चे वी वापराबाबत ग्राहक क्र. 19561469567 वर माहे डिसेंबर 2019 चे वीज देयकामध्‍ये थकबाकी रक्‍कम रु. 77,605/- चुकीची दर्शविलेली आहे.  तक्रारदार यांच्‍या कथनानुसार, ग्राहक क्र. 19561469567 वर दर्शविलेली समायोजित रक्‍कम ही सि.स.नं. 23 मधील ठक्‍कर आर्केडमधील सदनिका एफ-3 वरील शेखर आपटे यांचे नावे असणा-या ग्राहक क्र. 190560208654 वरील थकीत असून सदर ग्राहक क्र. 190560208654  हा कायमस्‍वरुपी बंद असल्‍यामुळे त्‍याची थकीत रक्‍कम तक्रारदार यांचे वीज कनेक्‍शन ग्राहक क्र.19561469567 वर वर्ग करण्‍यात आलेली आहे असे जाबदारांनी तक्रारदारांना सांगितले.  सबब, जाबदारांनी तक्रारदारांचे ग्राहक क्र. 19561469567 वर ग्राहक क्र. 190560208654 वरील वर्ग केलेली थकबाकी रक्‍कम योग्‍य  आहे अगर नाही हे ठरविण्‍यासाठी सदनिका एफ-3 मधील ग्राहक क्र. 190560208654 वरील विद्युत कनेक्‍शन मूळ मालक शेखर आपटे यांचे नांवे होते की नाही हे पाहणे अत्‍यंत गरजेचे आहे असे या आयोगाचे मत आहे.  जाबदाराचे कथनानुसार, सदनिका एफ-3 चे मूळ मालक शेखर आपटे यांचे नावे दोन विद्युत कनेक्‍शन हाती.  त्‍यातील एक कनेक्‍शन शेखर आपटे यांनी रहिवासाकरिता व दुसरे व्‍यावसायिक कारणासाठी घेतलेले होते.  रहिवास कारणासाठी घेतलेल्‍या विद्युत कनेक्‍शनचा ग्राहक क्र. 190561399038 होता व व व्‍यावसायिक कारणाकरिता घेतलेल्‍या विद्युत कनेक्‍शनचा ग्राहक क्र. 190560208654 होता.  तसेच एफ-3 ही सदनिका नसून कमर्शियल आहे.  जाबदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता जाबदार यांनी सदनिका एफ-3 चे मूळ मालक शेखर आपटे यांचे विद्युत कनेक्‍शन ग्राहक क्र. 190561399038 व्‍यतिरिक्‍त ग्राहक क्र. 190560208654 चे व्‍यावसायिक दुसरे कनेक्‍शन होते ही बाब कुठेही शाबीत केलेली नाही.  तसेच सदनिका क्र.एफ-3 ही सदनिका नसून व्‍यावसायिक हॉल आहे ही बाब कागदोपत्री पुराव्‍याचे आधारे शाबीत केलेली नाही.  जाबदारांनी शेखर आपटे यांनी ग्राहक क्र. 190560208654 चे विद्युत कनेक्‍शन किती साली घेतले हे दर्शविणारा कोणताही कागदोपत्री पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. जाबदारांनी तक्रारदारांना माहिती अधिकाराखाली दिलेल्‍या माहितीमध्‍ये शेखर आपटे यांचे नावे ग्राहक क्र. 190561399038 व 190560208654 अशी दोन कनेक्‍शन असून दोन्‍ही कनेक्‍शन्‍सचा विद्युत पुरवठा दि.1/10/2010 असल्‍याचे नमूद केले आहे.  परंतु सदर कनेक्‍शनच्‍या कागदपत्रांचा व मूळ मालक शेखर आपटे यांच्‍या मागणी अर्जाचा आढळ झालेला नाही असे माहिती दिलेल्‍या पत्रामध्‍ये नमूद केले आहे.  त्‍यामुळे जाबदार यांनी सदरील दोन्‍ही कनेक्‍शनची माहिती कागदपत्रांच्‍या आढळ होत नसताना कशाचे आधारे दिली हे स्‍पष्‍ट केले नसल्‍यामुळे सदरील माहितीच्‍या आधारे शेखर आपटे यांच्‍या नावाने ग्राहक क्र. 190561399038 व 190560208654 ही कनेक्‍शन होती ही बाब सिध्‍द होत नाही.  तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता सदनिका एफ-3 चे मूळ मालक शेखर आपटे यांनी जाबदार क्र.1 यांना दिलेल्‍या दि. 18/2/2020 च्‍या पत्रामध्‍ये ग्राहक क्र. 190560208654 चे विद्युत कनेक्‍शन हे त्‍याचे नावे नसल्‍याबाबत नमूद केले आहे.  सहायक अभियंता, गुणनियंत्रण विभाग, सातारा शहर उपविभाग यांनी सदनिका एफ-3 येथे जावून विद्युत कनेक्‍शनची पाहणी केल्‍यानंतर दि. 9/1/2020 रोजी दिलेल्‍या अहवालामध्‍ये स्‍थळपाहणीचे दरम्‍यान शेखर आपटे यांचे नावाचे ग्राहक क्र. 190560208654 चे व्‍यावसायिक कनेक्‍शन दिसून आले असे नमूद केलेले नाही तसेच सदरील सदनिका ही सदनिका नसून व्‍यावसायिक हॉल असल्‍याचे प्रत्‍यक्ष पाहणीत आढळून आले असे नमूद केलेले नाही.   तसेच प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी अहवालामध्‍ये संबंधीत ठिकाणी पूर्वमालक शेखर आपटे यांचे फक्‍त ग्राहक क्र. 190561399038 हे विद्युत कनुक्‍शन होते असे नमूद केले आहे.  सबब, वरील विवेचनावरुन ग्राहक क्र. 190560208654 हे विद्युत कनेक्‍शन मूळ मालक यांचे नांवे होते ही बाब जाबदार यांनी सिध्‍द केलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  त्‍यामुळे जाबदार यांनी बेकायदेशीररित्‍या तक्रारदार यांच्‍या ग्राहक क्र. 19561469567 च्‍या माहे डिसेंबर 2019 च्‍या वीज देयकामध्‍ये तथाकथित ग्राहक क्र. 190560208654 वरील थकबाकी वर्ग करुन मनमानीपणे चुकीचे थकबाकी वीज देयक तक्रारदार यांना अदा करुन दूषित व त्रुटीयुक्‍त सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.

 

मुद्दा क्र.3

 

11.   तक्रारदार यांचे कथनानुसार, जाबदार यांनी तक्रारदार यांचे ग्राहक क्र. 19561469567 वरील माहे डिसेंबर 2019 च्‍या वीज देयकामध्‍ये ग्राहक क्र. 190560208654 वरील थकबाकीची रक्‍कम रु.77,605/- ही रक्‍कम वर्ग करुन चुकीचे बिल दिले आहे.  त्‍यामुळे ते रद्द होणेस पात्र आहे.  जाबदार यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी मूळ मालक शेखर आपटे यांचेकडून दि.12/12/2013 रोजी सदनिका खरेदी केली असली तरी सदरील सदनिकेमध्‍ये तक्रारदार यांचे नावे नवीन कनेक्‍शन ग्राहक क्र. 19561469567 हे दि. 4/07/2013 रोजी तक्रारदार यांना मिळाले आहे.  त्‍यामुळे दि.12/12/2013 पासून ते 4/07/2013 पर्यंत तक्रारदार हे ग्राहक क्र. 190560208654 वरील विद्यु‍त कनेक्‍शनचा वापर करीत होते.  त्‍यामुळे सदरील थकबाकीची रक्‍कम भरण्‍याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर येते.

 

12.   तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडल कार्यालय, कोल्‍हापूर यांनी दि. 4/4/2019 रोजी अतिरिक्‍त अभियंता, सातारा शहर यांना पाठविलेल्‍या पत्रामध्‍ये केवळ श्री शेखर आपटे यांचे नांवे ग्राहक क्र. 190560208654 वर थकबाकी रक्‍कम रु.77,605/- असल्‍याचे नमूद केले आहे.  परंतु सदर पत्रामध्‍ये सदरची थकबाकी कोणत्‍या मिळकती संदर्भांत व कोणत्‍या कालावधीची आहे हे स्‍पष्‍टपणे नमूद केलेले नाही.  तसेच जाबदार यांनी सदनिका एफ-3 तक्रारदार यांनी खरेदी केल्‍यापासून म्‍हणजे दि.12/12/2013 रोजीपासून दि.4/07/2014 पर्यंत ग्राहक क्र. 190560208654 च्‍या विद्युत कनेक्‍शनवरुन विद्युत पुरवठा घेतलेला आहे हे दर्शविणारे सदर कालावधीमधील ग्राहक क्र. 190560208654 चे विद्युत पुरवठा देयक व त्‍यासंदर्भातील सी.पी.एल. दाखल केलेले नाही.  जाबदारांनी ग्राहक क्र. 190560208654 संदर्भातील एप्रिल 2017 ते सप्‍टेंबर 2021 या कालावधीमधील सी.पी.एल. दाखल केले आहे.  सदरील सी.पी.एल. मूळ मालक शेखर आपटे यांचे नांवे ग्राहक क्र. 190560208654 वर रक्‍कम रु. 77,605/- ची थकबाकी दि. 12/12/2013 ते 4/07/2014 पर्यंतची आहे ही बाब कुठेही सिध्‍द होत नाही असे आयोगाचे मत आहे.  जाबदार यांचे कथनानुसार दि.29 मे 2017 रोजी ग्राहक क्र. 190560208654 चे विद्युत कनेक्‍शन बंद करण्‍यात आले आहे. परंतु जाबदारांनी मूळ मालक शेखर आपटे यांच्‍या नावचे दि. 1/10/2010 पासून ते दि. 29/5/2017 पर्यंतच्‍या कालावधीचे कोणतेही वीज देयक अभिलेखावर दाखल केलेले नाही. सबब, जाबदारांनी तथाकथित ग्राहक क्र. 190560208654 वर शेखर आपटे यांचे नांवे रक्‍कम रु.77,605/- इतकी थकबाकी रक्‍कम होती ही बाब सिध्‍द केली नसल्‍यामुळे जाबदारांनी तक्रारदार यांचे नावे माहे डिसेंबर 2019 चे ग्राहक क्र. 19561469567 मधील वीज देयकामध्‍ये ग्राहक क्र. 190560208654 वरील तथाकथित थकबाकी रक्‍कम बेकायदेशीररित्‍या वर्ग करुन चुकीचे वीज देयक दिलेले असल्‍यामुळे सदचे वीज देयक रद्द होण्‍यास पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  तसेच सदरील थकबाकी वर्ग करण्‍याचा कोणताही अधिकार जाबदारांना नाही असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

13.   जाबदारांनी वीज लोकपाल, मुंबई यांचेकडील पुनर्निरिक्षण अर्ज क्र. 2/21 मधील दि.31/5/2021 रोजी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयाची प्रत दाखल केली आहे.  सदर निर्णयाचे अवलोकन करता सदर निवाडयामधील बाबी व प्रस्‍तुत तक्रारीमधील बाबी हया भिन्‍न असून सदर न्‍यायनिर्णयामधील निकष व निष्‍कर्ष या तक्रारीस गैरलागू आहेत असे या आयोगाचे मत आहे. जाबदारांनी विद्युत कनेक्‍शन ग्राहक क्र. 190560208654 हे मूळ मालक शेखर आपटे यांचे नावे दि. 1/1/2010 ते दि. 29/5/2017 पर्यंत होते व त्‍यावर दि. 12/12/13 ते 4/7/2014 अखेर रक्‍कम रु.77,605/- इतकी थकबाकीची रक्‍कम होती ही बाब कागदोपत्री सिध्‍द केली नसल्‍यामुळे सदर न्‍यायनिर्णयातील निष्‍कर्षाप्रमाणे जाबदारांना तक्रारदार यांचे ग्राहक क्र. 19561469567 वरील विद्युत कनेक्‍शनवर थकबाकी वर्ग करण्‍याचा अधिकार नाही असे या आयोगाचे मत आहे.

 

मुद्दा क्र.4

 

14.   तक्रारदार यांच्‍या कथनानुसार तक्रारदार यांना कोणतीही पूर्वसूचना अगर नोटीस न देता सदर सदनिकेच्‍या ग्राहक क्र. 19561469567 वीज वापराबाबत माहे डिसेंबर 2019 या वीज देयकामध्‍ये जाबदार यांनी ग्राहक क्र. 190560208654 वरील तथाकथित थकबाकी रक्‍कम रु. 77,605/- वर्ग करुन चुकीचे बिल दिले.  जाबदारांनी ग्राहक क्र.54 चे विद्युत कनेक्‍शन मूळ मालक शेखर आपटे यांचे नावे होते व त्‍यावर रक्‍कम रु.77,605/- इतकी थकबाकी दि.12/12/2013 ते दि.4/07/2014 मधील कालावधीची थकीत होती ही बाब अभिलेखावर दाखल असलेल्‍या कागदपत्रांवरुन कुठेही सिध्‍द केलेली नाही.  त्‍यामुळे जाबदारांना सदरील तथाकथित थकबाकी तक्रारदारांचे नावे असलेल्‍या ग्राहक क्र. 19561469567 वर वर्ग करण्‍याचा कोणताही अधिकार नाही असे या आयोगाचे मत आहे.  त्‍यामुळे जाबदारांनी माहे डिसेंबर 2019 मधील वीज देयकामध्‍ये तक्रारदारांच्या ग्राहक क्र. 19561469567 च्‍या विद्युत कनेक्‍शनवर वर्ग केलेली ग्राहक क्र. 190560208654 वरील थकबाकी रक्‍कम रु. 77,605/- ही बेकायदेशीर आहे व ती रद्द होणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.4 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.   

 

मुद्दा क्र.5

 

15.   जाबदार यांनी तक्रारदारास चुकीचे वीज देयक दिल्‍यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला व त्‍याला आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला.  या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.   सबब आदेश.

आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
  2. जाबदार यांनी तक्रारदारास दिलेल्‍या माहे डिसेंबर 2019 चे वीज देयकातील थकबाकीची रक्‍कम रु.77,605/- रद्दबातल करण्‍यात येते.
  3. जाबदार यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
  4. सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
  5. जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
  6. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क देण्यात याव्यात.

 

 
 
[HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV]
MEMBER
 
 
[HON'BLE MS. MANISHA H. REPE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.