तक्रारदार स्वत:
जाबदेणारांतर्फे श्री. नागेश शिंदे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार,
** निकालपत्र **
दिनांक 01/08/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणारांमार्फत दिनांक 08/08/2011 रोजी परभणी येथे त्यांच्या मुलीकडे राख्या पाठविल्या होत्या. दिनांक 30/8/2011 पर्यन्त राख्या परभणी येथे मिळाल्या नाहीत. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या पुणे कार्यालयात दिनांक 30/8/2011 रोजी पत्र पाठवून विचारणा केली. तक्रारदारांनी दिनांक 22/09/2011 रोजी सौ. वासकर यांचे पत्र प्राप्त झाले त्यावरुन त्यांना असे समजले की दिनांक 22/9/2011 पर्यन्त सुध्दा पोहोचल्या नाही म्हणून तक्रारदारांनी दिनांक 5/10/2011 रोजी जाबदेणार यांच्या पुणे व बंगलोर शाखेस पत्र पाठविले. जाबदेणार यांच्या पुणे व बंगलोर शाखेने पत्रास उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून मानसिक त्रासापोटी रुपये 2000/-, कोर्ट फी, टायपिंग, रिक्षा वगैरे मिळून रुपये 700/- व्याजासह मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसर डी टी डी सी च्या अटी व शर्ती नुसार कुरिअर बद्यलची कुठलीही तक्रार असेल तर 30 दिवसांच्या आत जाबदेणारांकडे दयावयास पाहिजे. तक्रारदारांनी 30 दिवसात तक्रार केली नाही. तसेच इनव्हॉईस आणि राखीची किंमत याबाबतचा कुठलाही पुरावा दिला नाही. डी टी डी सी च्या अटी व शर्ती नुसार पार्सल मध्ये कुठलेही नुकसान झाले, हरवले असल्यास फक्त कमाल रुपये 100/- नुकसान भरपाईस जाबदेणार जबाबदार ठरतात. तक्रारदारांनी पार्सल साठी इन्श्युरन्स घेतला नव्हता. वरील कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र दाखल केले.
3. तक्रारदारांनी शपथपत्र दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब खोडला.
4. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांमार्फत परभणी येथे त्यांच्या मुलीकडे राख्या पाठविल्या होत्या ही बाब जाबदेणार मान्य करतात. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार जर पार्सल गहाळ झाले, हरवले तर रुपये 100/- देण्यास जाबदेणार जबाबदार ठरतात. कन्साईनमेंट नोटची मंचाने पाहणी केली. त्यावर जाबदेणार यांची वर नमुद अट दिसून येते. तक्रारदारांनी राखी पाठविण्यासाठी रुपये 50/- जाबदेणारांकडे भरल्याचे दिसून येते. परंतु कन्साईनमेंट नोट वर कन्साईनर म्हणजेच तक्रारदार यांची कुठलीही सही आढळून येत नाही. त्यामुळे जाबदेणार यांच्या अटी व शर्ती तक्रारदारांना अवगत करुन दिलेल्या नसल्यामुळे त्या अटी व शर्ती तक्रारदारांवर बंधनकारक नाहीत असे मंचाचे मत आहे. जाबदेणार यांनी कॅरिअर अॅक्ट दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी राखीपौर्णिमेच्या उद्येशाने त्यांच्या मुलीकडे राख्या पाठविल्या होत्या तो उद्येश सफल झालेला नसल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी परभणी येथे राख्या कधी प्राप्त झाल्या हे नमूद केलेले नाही. म्हणजेच जाबदेणार यांनी राख्या गहाळ केल्याचे स्पष्ट होते. कुरिअर मार्फत राख्या त्वरीत मिळण्यासाठी म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांची सेवा घेतली होती. राख्या न मिळाल्यामुळे त्वरीत राख्या मिळण्याचे तक्रारदारांचे उद्यिष्ट साध्य झाले नाही. तक्रारदारांनी त्यांच्या मुलीचे दिनांक 22/09/2011 रोजीचे पत्र मंचासमोर दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या पुणे व बंगलोर येथील शाखेस/कार्यालयास दिनांक 30/8/2011 रोजी पत्र पाठविले होते हे दाखल पत्रांवरुन दिसून येते. तक्रारदारांनी जाबदेणारांमार्फत दिनांक 08/08/2011 रोजी राख्या पाठविल्या होत्या व राख्या प्राप्त न झाल्यामुळे त्याबद्यल विचारणा करणारे पत्र जाबदेणार यांना पुणे व बंगलोर येथे दिनांक 30/8/2011 रोजी पाठविले होते. म्हणजेच राख्या पाठविल्यापासून 30 दिवसांच्या आत जाबदेणारांकडे राख्या प्राप्त न झाल्याबद्यलची तक्रार केली होती हे स्पष्ट होते. त्यामुळे 30 दिवसात तक्रारदारांनी तक्रार केली नाही हा जाबदेणार यांनी उपस्थित केलेला मुद्या मंच अमान्य करीत आहे. तक्रारदारांनी दिनांक 30/08/2011 रोजीच्या पत्रान्वये केलेल्या तक्रारीची जाबदेणार यांनी साधी दखलही घेतली नाही. यासर्वांवरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी दिसून येते. तक्रारदारांनी ज्या भावनेने राख्या पाठविल्या होत्या, राख्या न मिळाल्यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. म्हणून जाबदेणार तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 700/- देण्यास जबाबदार ठरतात.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 700/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अदा करावेत.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.