-निकालपत्र–
(पारित व्दारा-श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
( पारित दिनांक-04 नोव्हेंबर, 2016)
01. तक्रारकर्तीने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) आणि विरुध्दपक्ष क्रं-2) ते क्रं-4) यांचे विरुध्द दोषपूर्ण वाहना संबधाने तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहते. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-1) महेन्द्रा आणि महेन्द्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निर्मित महेन्द्रा स्कॉर्पिओ MAHINDRA SCORPIO “SC-RF M2DICR BS3 2WD EX RHD GRY9SF MSLVR” या मॉडलेची कार, विरुध्दपक्ष क्रं-2) जे विरुध्दपक्ष क्रं-1) निर्माता कंपनीचे अधिकृत विक्रेता आहेत यांचे कडून खरेदी करण्यासाठी दिनांक-03/01/2013 रोजी नोंदणी केली आणि गाडीपोटी रुपये-8,47,331/- विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांचेकडे वेळोवेळी धनादेशापोटी जमा केले, ज्यात कारची किंमत, रोड टॅक्स, विमा आणि आरटीओ शुल्क इत्यादीचा समावेश आहे, गाडीची किंमत मिळाल्या बद्दल विरुध्दपक्ष क्रं-2) अधिकृत विक्रेता यांनी दिनांक-19/01/2013 रोजीची पावती निर्गमित केली. तक्रारकर्तीला गाडीची डिलेव्हरी प्रत्यक्षात दिनांक-22/01/2013 रोजी देण्यात आली. तक्रारकर्तीचे गाडीचा नोंदणी क्रं-MH-40/AC-0366, ENGINE NO.-GMC-4K-52039 & CHASIS NO.-C-2K-48169 असा आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, गाडीची किम्मत तिने स्वतः जवळून अदा केली, त्यासाठी कोणतेही कर्ज घेतले नाही. ज्यावेळी विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांचे कडून तक्रारकर्तीला गाडीची डिलेव्हरी देण्यात आली त्याच वेळी गाडीचे मीटर वाचन हे 987 कि.मी.नोंदविलेले होते, जेंव्हा की डिलेव्हरी देताना एवढया मोठया प्रमाणावर मीटर वाचन असणे आश्चर्यकारक बाब आहे, यावरुन असे दिसून येते की, तिला नविन गाडी शोरुम मधून देण्यात आलेली नसून ती वापरल्याचे स्पष्ट होते. तसेच गाडीचा ताबा देतेवेळी गाडीचे रुपटॉप अथवा हुड हे डॅमेज असून सदर गाडीला पिकअप नसल्याने ती वर्कशॉपला पाठविण्यात आली. सदर गाडीला डिलेव्हरीचे वेळी पॅचेस देखील होते. 987 किलेमीटर अंतरा संबधाने विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही, त्यांनी सदर गाडी ही चंद्रपूरवरुन आली असल्याने 987 किलोमीटर मीटर वाचन नोंदविल्या केले असल्याचे सांगितले, वस्तुतः चंद्रपूर ते नागपूर अंतर हे 150 किलोमीटर आहे तसेही नविन वाहनाची डिलेव्हरी देताना ते चालवून आणल्या जात नाही. तक्रारकर्तीने सदर वाहनाच्या एसेसरीज पोटी रुपये-2,00,000/- खर्च केले.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने सदर वाहनाची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 3) व क्रं-4) यांचेकडे केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही तसेच गाडी 987 किलोमीटर अंतर चालल्या संबधी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाही. विरुध्दपक्ष यांचे आग्रहाखातर तक्रारकर्तीने गाडीचा ताबा घेतला परंतु ताबा घेतल्या पासून गाडीमध्ये तांत्रिक दोष निर्माण होऊ लागलेत, ज्यामध्ये पिकअप नसणे, स्पीड नसणे, गाडीची स्पीड वाढविल्या नंतर इंजीन गरम होऊन बंद पडणे व त्यानंतर वाहन हळू चालणे अशाप्रकारच्या समस्या येऊ लागल्यात. सदर समस्यांचे निवारणार्थ गाडी विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेकडे नेली असता त्यांचे लक्षात आले की, इंजिन मध्ये अनेक प्रकारच्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या असून त्यात अजुनही दुरुस्तीची आवश्यकता असल्याने गाडी वर्कशॉप मध्ये दुरुस्तीसाठी नेली. दिनांक-22.04.2013 रोजी तक्रारकर्तीने गाडी विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेकडे नेली असता महिन्द्रा आणि महिन्द्रा कंपनीच्या तांत्रिक विभागाव्दारे निष्कर्ष काढण्यात आला की, सदर वाहनाचे इंजिन पूर्णपणे निकामी झाले असून इंजिन बदलविणे आवश्यक आहे व सदर गाडी ही वारन्टी पिरियेड मधील आहे असा शेरा दिनांक-22/04/2013 आणि दिनांक-04.05.2013 रोजीच्या जॉबकॉर्डवर नोंदविला.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षानीं तिला विक्री केलेल्या गाडीमध्ये उत्पादकीय दोष (Manufacturing defects) असून गाडीचे इंजिन पूर्णपणे निकामी झालेले असून गाडीमध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक समस्या आहेत. गाडीमधील तांत्रिक समस्यांची विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांना पूर्णपणे जाणीव असून देखील त्यांनी पूर्णपणे दोषपूर्ण वाहनाची विक्री करुन तिची फसवणूक केली तसेच आश्वासित केल्या प्रमाणे सेवा सुध्दा पुरविलेल्या नाहीत. तिला झालेल्या फसवणूकीमुळे मानसिक धक्का पोहचलेला आहे. विरुध्दपक्ष महिन्द्रा आणि महिन्द्रा कंपनी लिमिटेड ही एक ख्यातीप्राप्त कार उत्पादक कंपनी असूनही तिची दिशाभूल आणि फसवणूक केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांचेकडे वारंवार गाडी संबधी तक्रारी करुनही गाडी बदलवून दिली नाही, उलट तात्पुरत्या दुरुस्त्या त्यामध्ये करण्यात आल्यात. तिने नोंदणीकृत डाकेने दिनांक-04/05/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचेकडे नोटीसव्दारे तक्रार करुनही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्तीची गाडी आजही विरुध्दपक्ष क्रं-2) वाहन विक्रेता यांचे गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी उभी आहे. विरुध्दपक्षांचे दोषपूर्ण सेवेमुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून तिचे आर्थिक नुकसान सुध्दा झालेले आहे.
म्हणून शेवटी तिने तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे तिला नविन वाहन शोरुम मधून देण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे. तसेच तिला झालेल्या नुकसानीपोटी एकूण रुपये-18,00,000/- नुकसान भरपाई मिळावी तसेच निकामी वाहन पुरविल्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेवर वाहनाची डिलेव्हरी दिनांक-22/01/2013 पासून द.सा.द.शे.12% दराने व्याज देण्याचे आदेशित व्हावे. तिला झालेल्या मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- तसेच योग्य सेवा न पुरविल्यामुळे रुपये-35,000/- नुकसान भरपाई आणि रुपये-10,000/- तक्रारखर्च विरुध्दपक्षा कडून मिळावेत अशा मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) महेन्द्रा आणि महेन्द्रा कंपनी लिमिटेड या वाहन निर्माता कंपनी तर्फे लेखी उत्तर सादर करण्यात आले. त्यांनी तक्रार मंचा समोर चालू शकत नसल्या बाबत प्राथमिक आक्षेप घेतला. त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्तीची संपूर्ण तक्रार ही खोटी, आधारहिन असून कोणत्याही दस्तऐवजी पुराव्या अभावी दाखल केलेली आहे आणि मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंचाचे मर्यादित अधिकार क्षेत्रात तक्रार निकाली काढल्या जाऊ शकत नाही.
विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन निर्माता कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्तीचे वाहनातील इंजिन बदलवून ते डिलेव्हरीसाठी दिनांक-23 मे, 2013 पासून तयार असल्याचे तिला कळविण्यात आले होते परंतु तिने वाहनाची डिलेव्हरी घेतली नाही आणि आता नविन वाहनाची मागणी करीत आहे. विरुध्दपक्ष क्रं-1) वाहनाचे निर्माता कंपनीची ख्याती असून देशविदेशात विक्री केल्या जाते. दिनांक-19 जानेवारी, 2013 रोजी श्री नारु नरेंद्रसिंग गुरुचरणसिंह यांचे नावे “ SCORPIO M2DICR” REGISTRATION NO.-MH-40/ACO366, ENGINE NO.-GMC4K52039 & CHASSIS NO.-C2K48169” या वाहनाची INVIOCE NO.-SM/2438/12-13 अन्वये त्यांना डिलेव्हरी देण्यात आली व त्यांनी वाहनाचा ताबा घेतला, ताब्याचे वेळी सेल सर्टिफीकेट आणि अन्य दस्तऐवज पुरविण्यात आले. श्री नारु नरेंद्रसिंग गुरुचरणसिंग यांनी वाहनातील उत्पादकीय दोषा संबधाने कोणतीही तक्रार त्यांचेकडे नोंदविली नाही तसेच वाहनाचे किलोमीटर संबधाने सुध्दा तक्रार नोंदविली नाही. वाहनाचे इन्स्टालेशनचे काम दिनांक-29 जानेवारी, 2013 रोजी रुफटॉप मध्ये किरकोळ दुरुस्त्या आणि एन्टेनाची फीटींग दिनांक-24 जानेवारी, 2013 रोजी करण्यात आली. त्यानंतर दिनांक-01 मार्च, 2013 रोजी ते वाहन जनरल सर्व्हीस करता ऑईल बदलविणे, फील्टर आणि चेकअपसाठी आणण्यात आले. त्यानंतर वाहनाचे मालकाचे विनंती वरुन आणि वाहनाचे आवश्यकते नुसार वेळोवेळी सर्व्हीस करण्यात आली. विरुध्दपक्ष क्रं-2) वाहन विक्रेता यांचेकडे ते वाहन दिनांक-04/03/2013 रोजी किरकोळ दुरुस्ती करता आणण्यात आले, त्यामध्ये किरकोळ दुरुस्त्या करुन ते वाहन तक्रारकर्तीला परत करण्यात आले. त्यानंतर ते वाहन पुन्हा दिनांक-10/04/2013 रोजी ब्रेक मधील आवाजा करीता दुरुस्तीसाठी आणण्यात आले, त्यावेळी वाहनामध्ये कोणताही मोठा दोष आढळून आला नाही. दरम्यानचे काळात सदरचे वाहन हे श्री नारु नरेंद्रसिंग गुरुचरणसिंग यांचे कडून तक्रारकर्तीचे नावे हस्तांतरण करण्यात आले परंतु जॉब कॉर्ड मधील नोंदी, सर्व्हीसेस हया मूळ मालक श्री नारु नरेंद्रसिंग यांचे नावे करण्यात आल्यात. त्यानंतर तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-2) विक्रेता यांना दिनांक-22 एप्रिल, 2013 रोजी वाहन तिचे नावे हस्तांतरणा बाबत कळवून तिचे नावे जॉब कॉर्डस देण्या बाबत विनंती केली, तक्रारकर्तीचे नावे जॉब कॉर्ड हस्तांतरीत झाल्या नंतर तिने वाहन 987 किलोमीटर अंतर चालल्या बाबत सर्वप्रथम तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेकडे दिनांक-22 एप्रिल, 2013 रोजी म्हणजे विक्री पासून तीन महिन्या नंतर केली. त्याच दिवशी तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं-2 विक्रेता यांचेकडे वाहनाचे लो-पिक-अप संबधाने तक्रार केली असता तपासणीअंती वाहनाचे इंजिन बदलविण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले व त्यासाठी काही वेळ देण्याची विनंती केली. तक्रारकर्तीचे असुविधे संबधाने तिला दिनांक-26 एप्रिल, 2013 रोजी पर्यायी वाहन म्हणून टॅक्सी पुरविण्यात आली. विरुध्दपक्ष क्रं-2) ते क्रं-4) हे सातत्याने तक्रारकर्तीचे संपर्कात होते. तक्रारकर्तीने सर्वप्रथम दिनांक-04 मे, 2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन निर्माता कंपनी विरुध्द वाहना संबधाने दोषारोप केलेत, तक्रारकर्ती चुकीचे दोषारोप करुन नविन वाहन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) ते क्रं-4) यांनी वाहनाचे इंजिन बदलवून ते डिलेव्हरीसाठी दिनांक-23 मे, 2013 रोजी तयार ठेवले तसेच तक्रारकर्तीला रुपये-50,000/- नुकसान भरपाई देण्याचे सुध्दा मान्य केले व तसे तिला विरुध्दपक्ष क्रं-2) वाहन विक्रेता यांनी दिनांक-23मे, 2013 रोजी दुरध्वनीव्दारे अणि दिनांक-24 मे, 2013 रोजीचे ई मेल व्दारे कळवून तिला पर्यायी सुविधा म्हणून पुरविण्यात आलेली टॅक्सी परत करण्याची विनंती केली. विरुध्दपक्ष क्रं 2 ते क्रं 4 हे सातत्याने तक्रारकर्तीचे संपर्कात होते असे असुनही तक्रारकर्तीने दिनांक-14 मे, 2013 रोजीचे पत्रान्वये विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांचे विरोधात खोटे आरोप केलेले आहेत तिचा एकमेव उद्देश्य हा नविन वाहन मिळविण्याचा आहे. विरुध्दपक्षांनी तक्रारकर्तीला वेळोवेळी ई मेल व्दारे वाहन घेऊन जाण्याची विनंती केली परंतु तिने त्याकडे र्दुलक्ष्य केले, सदर ई मेलच्या प्रती ते सोबत सादर करीत आहेत. विरुध्दपक्ष क्रं-3) यांनी तक्रारकर्तीला दिनांक-04 मे, 2013 रोजीचे पत्र पाठवून वाहन घेऊन जाण्यास सुचित केले तसेच वाहन सुस्थितीत असल्या बाबत कळविले. तक्रारकर्ती आणि विरुध्दपक्ष यांच्यामध्ये वाहन खरेदी संबधी प्रत्यक्ष्य करार झालेला नाही. मूळ वाहनाचे मालक श्री नारु नरेंद्रसिंग गुरुचरणसिंग यांनी वाहनाचे किलोमीटर संबधाने वाहनाचा ताबा घेताना वा पुढे वाहन नादुरुस्ती संबधाने त्यांचेकडे तक्रार केलेली नाही. तक्रारकर्तीचा प्रत्यक्ष्य संबध त्यांचेशी दिनांक-22 एप्रिल, 2013 रोजीचे तिचे पत्रान्वये आला, ज्या पत्राव्दारे तिने वाहन विकत घेतल्याचे कळविले. वाहन वॉरन्टी पिरिएड मध्ये असल्याने त्यांनी तक्रारकर्तीचे तक्रारीला वेळोवेळी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही वा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारकर्तीला पुरविलेल्या टॅक्सीने तिने दुर दुर अंतरावर प्रवास केलेला आहे. त्यांचे वाहना मध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही. वाहनाचे हिस्टरी मध्ये ते वाहन डिलेव्हरी देते वेळी 987 किलोमीटर चालल्या बाबत कुठेही नमुद नाही. तक्रारकर्तीची तक्रार ही खोटी व चुकीची असल्याने ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन निर्माता यांनी केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) प्रोव्हिएन्शियल ऑटोमोबाईल्स वाहनाचे विक्रेता तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) जनरल मॅनेजर सर्व्हीस, प्रोव्हिएन्शियल ऑटोमोबाईल्स आणि विरुध्दपक्ष क्रं-4) जनरल मॅनेजर, सेल्स प्रोव्हिएन्शियल ऑटोमोबाईल्स यांनी एकत्रित लेखी उत्तर सादर केले. त्यांचे उत्तरा नुसार वाहन वापरा करीता पूर्णपणे तयार असताना व त्यात कोणतेही दोष नसताना विनाकारण ही तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) ते क्रं-4) यांनी वेळोवेळी तक्रारकर्तीच्या तक्रारींचे निराकरण केलेले आहे व पोच घेतली आहे, तक्रारकर्तीने जॉब कॉर्डवर सुध्दा लिहून दिलेले अहे. दुरुस्ती नंतर वाहनात दोष असल्या बाबत तक्रार केलेली नाही तसेच वाहनात दोष असल्या बाबत पुरावा सादर केलेला नाही. तक्रारकर्तीने प्रत्यक्ष्य एसयुव्ही कार त्यांचेकडून घेतलेली नाही तर ती कार सतविंदरसिंग यांचे नावे घेण्यासाठी दिनांक-11/01/2013 रोजी रुपये-1,50,000/- अणि त्यानंतर दिनांक-17/01/2013 रोजी रुपये-1,79,000/- आणि दिनांक-18/01/2013 रोजी रुपये-4,87,718/- सतविंदरसिंग यांचे नावे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांचेकडे रकमा जमा करण्यात आल्यात. परंतु दिनांक-18/01/2013 रोजी सतविंदर सिंग यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांना पत्र देऊन कळविले की, त्यांना रहिवासी प्रमाणपत्राचा प्रॉब्लेम असल्याने त्यांनी विकत घेतलेले वाहन श्री नरेंद्रसिंग गुरुचरणसिंग नारु यांचे नावे ट्रॉन्सफर करीत आहे व त्यांनी जमा केलेली संपूर्ण रक्कम श्री नारु नरेंद्रसिंग यांचे नावे जमा करण्यात यावी व त्या संबधाने श्री नारु यांचेशी संबधीत दस्तऐवज सुध्दा विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे जमा केले, यावरुन तक्रारकर्तीने वाहनाची नोंदणी केल्याचे विधान सर्वस्वी खोटे असल्याचे दिसून येते. वाहनाचे संपूर्ण दस्तऐवज हे श्री नारु नरेंद्रसिंग यांचे नावानेच देण्यात आलेत. डिलेव्हरी चालान सुध्दा दिनांक-19/01/2013 रोजी श्री नरेंद्रसिंग नारु यांचे नावाने तयार करण्यात आली असून वाहनाची डिलेव्हरी सुध्दा दिनांक-22/01/2013 रोजी श्री नारु नरेंद्रसिंग यांना देण्यात आली आहे. वाहनाची डिलेव्हरी तक्रारकर्तीला देण्यात आलेली नाही त्यामुळे डिलेव्हरीचे वेळी वाहन 987 किलोमीटर चालले असल्याची बाब चुकीची आहे. गाडीचा ताबा देते वेळी गाडीचे रुफ टॉप अथवा हुड हे डॅमेज होते हे म्हणणे खोटे आहे. गाडीची डिलेव्हरी देताना तक्रारकर्तीशी त्यांचा कोणताच संबध आलेला नाही. दिनांक-24/01/2013 रोजी गाडी सर्व्हीस करण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे आणण्यात आली त्यादिवशी त्यावर अँटीना फीट करण्यात आला व मायनर डेटींग पेंटींग करण्यात आले, त्यावेळी गाडी ही फक्त 55 किलोमीटर चालविण्यात आली होती व तसे जॉब कॉर्डवर सुध्दा नमुद करण्यात आले आहे. तसेच दिनांक-29/01/2013 रोजी पुन्हा होम इन्स्टॉलेशन फीड बॅक फॉर्म हा गाडी विकत घेणा-याने श्री नारु नरेंद्रसिंग यांनी भरुन सही सुध्दा करुन दिलेली आहे व त्यावर सुध्दा कोणतीही तक्रार असल्या बद्दल नमुद केलेले नाही. दिनांक-01/03/2013 रोजी तसेच दिनांक-04/03/2013 रोजी गाडी दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे श्री नारु नरेंद्रसिंग यांनीच आणली व काम केल्या नंतर गाडी परत करण्यात आली. तक्रारकर्तीने गाडी दिनांक-11/03/2013 रोजी श्री नारु नरेंद्रसिंग यांचे कडून विकत घेतल्याचे आरटीओ नागपूर यांनी दिलेल्या रजिस्ट्रेशन पर्टीक्युलर वरुन निदर्शनास येते. परंतु ही बाब विरुध्दपक्ष क्रं 2 यांना कळविलेली नाही. दिनांक-09/04/2013 रोजी वाहनाचे ब्रेक मध्ये आवाज होत असल्याने तसेच दिनांक-10/04/2013 रोजी सुध्दा तोच प्रॉब्लेम आल्यामुळे कोणतेही शुल्क न घेता वाहनाचे ब्रेक पॅड बदलवून देण्यात आले. दिनांक-22/04/2013 रोजी तक्रारकर्तीने पहिल्यांदा गाडी पिकअप घेत नाही या बाबत तक्रार केली, त्यावेळी गाडी 7856 किलोमीटर चालली होती व दिनांक-04/05/2013 रोजी महिन्द्रा आणि महिन्द्रा यांचे टेक्नेशियनने गाडीचे इंजिन बदलविण्या बाबत मान्यता दिली व त्याप्रमाणे दिनांक-24/04/2013 रोजी गाडी दुरुस्ती करीता विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे जमा करण्यात आली. दिनांक-25/05/2013 रोजी गाडीची डिलेव्हरी घेण्यास ई मॅसेज देण्यात आला, परंतु तक्रारकर्तीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. गाडीमध्ये पिकअप नव्हता हे म्हणणे खोटे आहे. तसेच गाडीचे डिलेव्हरीचे वेळी पॅचेस होते हे म्हणणे सुध्दा खोटे आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांनी वाहन चंद्रपूर वरुन आणल्यामुळे गाडीचे मायलेज 987 किलोमीटर दाखविण्यात आल्याचे तक्रारकर्तीला सांगितल्याची बाब खोटी असल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीचा वाहनाचे डिलेव्हरीचे वेळी कोणताही प्रत्यक्ष्य संबध विरुध्दपक्षाशी आलेला नाही वा तसा कोणताही पुरावा दाखल नाही त्यामुळे तक्रारकर्तीने केलेली विधाने ही निरर्थक आहेत. वाहनाचे इंजिन गरम येऊन ते बंद पडत होते हे म्हणणे सुध्दा खोटे आहे. दिनांक-22/04/2013 रोजीच्या जॉब कॉर्डवर सदर इंजिन पूर्णपणे निकामी झाले असून ते बदलविणे आवश्यक असल्याचे ठरविण्यात आले व त्या बद्दल कारवाई सुध्दा करण्यात आली ही बाब त्यांना मान्य आहे. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षा विरुध्द केलेली अन्य संपूर्ण विपरीत विधाने अमान्य करुन तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 ते 4 यांचे तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्तीची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन निर्माता यांचे लेखी उत्तर तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) वाहन विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं-3 व क्रं 4 अनुक्रमे सर्व्हीस आणि सेल्स सेंटर यांचे एकत्रित लेखी उत्तर तसेच उभय पक्षां तर्फे दाखल दस्तऐवजाच्या प्रती, तक्रारकर्तीचा लेखी युक्तीवाद आणि विरुध्दपक्ष क्रं 1 आणि क्रं-2 ते 4 यांचा लेखी युक्तीवाद आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्षां तर्फे सर्वप्रथम प्राथमिक आक्षेप घेण्यात आला की, तक्रारकर्तीने वादातीत वाहन हे त्यांचे कडून प्रत्यक्ष्यरित्या विकत घेतलेले नाही तर ते वाहन श्री नारु नरेंद्रसिंग यांनी विकत घेतलेले आहे आणि वाहनाचे संपूर्ण दस्तऐवज हे श्री नारु नरेंद्रसिंग यांचे नावानेच देण्यात आलेत. डिलेव्हरी चालान सुध्दा दिनांक-19/01/2013 रोजी श्री नारु नरेंद्रसिंग यांचे नावाने तयार करण्यात आली असून वाहनाची डिलेव्हरी सुध्दा दिनांक-22/01/2013 रोजी श्री नारु नरेंद्रसिंग यांना देण्यात आली आहे. वाहनाची डिलेव्हरी तक्रारकर्तीला देण्यात आलेली नाही त्यामुळे तक्रारकर्तीचे म्हणण्या नुसार वाहन डिलेव्हरीचे वेळी वाहन 987 किलोमीटर अंतर चालले असल्याची बाब खोटी व चुकीची आहे. दिनांक-24/01/2013 रोजी गाडी सर्व्हीस करण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 2) विक्रेता यांचेकडे आणण्यात आली त्यादिवशी त्यावर अँटीना फीट करण्यात आला व मायनर डेटींग पेंटींग करण्यात आले, त्यावेळी गाडी ही फक्त 55 किलोमीटर चालविण्यात आली होती व तसे जॉब कॉर्डवर नमुद सुध्दा करण्यात आले आहे. तसेच दिनांक-29/01/2013 रोजी पुन्हा होम इन्स्टॉलेशन फीड बॅक फॉर्म हा गाडी विकत घेणा-याने श्री नारु नरेंद्रसिंग यांनी भरुन सही सुध्दा करुन दिलेली आहे व त्यावर सुध्दा कोणतीही तक्रार असल्या बद्दल नमुद केलेले नाही. दिनांक-01/03/2013 रोजी तसेच दिनांक-04/03/2013 रोजी गाडी दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे श्री नारु नरेंद्रसिंग यांनीच आणली व काम केल्या नंतर गाडी परत करण्यात आली. तक्रारकर्तीने गाडी दिनांक-11/03/2013 रोजी श्री नारु नरेंद्रसिंग यांचे कडून विकत घेतल्याचे आरटीओ नागपूर यांनी दिलेल्या रजिस्ट्रेशन पर्टीक्युलर वरुन निदर्शनास आले. दिनांक-09/04/2013 रोजी वाहनाचे ब्रेक मध्ये आवाज होत असल्याने तसेच दिनांक-10/04/2013 रोजी सुध्दा तोच प्रॉब्लेम आल्यामुळे कोणतेही शुल्क न घेता वाहनाचे ब्रेक पॅड बदलवून देण्यात आले. दिनांक-22/04/2013 रोजी तक्रारकर्तीने पहिल्यांदा गाडी पिकअप घेत नाही या बाबत तक्रार केली, त्यावेळी गाडी 7856 किलोमीटर चालली होती व दिनांक-04/05/2013 रोजी महिन्द्रा आणि महिन्द्रा यांचे टेक्नेशियनने गाडीचे इंजिन बदलविण्या बाबत मान्यता दिली व त्याप्रमाणे दिनांक-24/04/2013 रोजी गाडी दुरुस्ती करीता विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे जमा करण्यात आली. दिनांक-25/05/2013 रोजी गाडीची डिलेव्हरी घेण्यास ई मॅसेज देण्यात आला. परंतु तक्रारकर्तीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. गाडीमध्ये पिकअप नव्हता हे म्हणणे खोटे आहे. तसेच गाडीचे डिलेव्हरीचे वेळी पॅचेस होते हे म्हणणे सुध्दा खोटे आहे. विरुध्दपक्षाचे म्हणण्या नुसार तक्रारकर्तीने गाडी दिनांक-11/03/2013 रोजी श्री नारु नरेंद्रसिंग यांचे कडून विकत घेतल्याचे आरटीओ नागपूर यांनी दिलेल्या रजिस्ट्रेशन पर्टीक्युलर वरुन निदर्शनास आले. तक्रारकर्तीने सर्वप्रथम तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) यांचेकडे दिनांक-22 एप्रिल, 2013 रोजी म्हणजे विक्री पासून तीन महिन्या नंतर वाहनाचे लो-पिक-अप संबधाने केली असता तपासणीअंती वाहनाचे इंजिन बदलविण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले व त्यासाठी काही वेळ देण्याची विनंती केली. तक्रारकर्तीचे असुविधे संबधाने तिला दिनांक-26 एप्रिल, 2013 रोजी पर्यायी वाहन म्हणून टॅक्सी पुरविण्यात आली. दिनांक-04/05/2013 रोजी महिन्द्रा आणि महिन्द्रा कंपनीचे टेक्नेशियनने गाडीचे इंजिन बदलविण्या बाबत मान्यता दिली व त्याप्रमाणे दिनांक-24/04/2013 रोजी गाडी दुरुस्ती करीता विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे जमा करण्यात आली. दिनांक-25/05/2013 रोजी गाडीची डिलेव्हरी घेण्यास ई मॅसेज देण्यात आला परंतु पुढे तक्रारकर्तीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) ते क्रं-4) यांनी वाहनाचे इंजिन बदलवून ते डिलेव्हरीसाठी दिनांक-23 मे, 2013 रोजी तयार ठेवले तसेच तक्रारकर्तीला रुपये-50,000/- नुकसान भरपाई देण्याचे सुध्दा मान्य केले व तसे तिला विरुध्दपक्ष क्रं-2) वाहन विक्रेता यांनी दिनांक-23मे, 2013 रोजी दुरध्वनीव्दारे आणि दिनांक-24 मे, 2013 रोजीचे ईमेलव्दारे कळवून तिला पर्यायी सुविधा म्हणून पुरविण्यात आलेली टॅक्सी परत करण्याची विनंती केली परंतु प्रतिसाद मिळालेला नाही. थोडक्यात विरुध्दपक्षाचे उत्तरा नुसार तक्रारकर्तीने प्रत्यक्ष्यात त्यांचे कडून वाहन विकत घेतलेले नसतानाही, जेंव्हा वाहन तिचे नावे आरटीओ अभिलेखात हस्तांतरीत झाले त्यानंतर तिचे तक्रारी नुसार वाहनातील इंजिन बदलवून दिले व रुपये-50,000/- नुकसान भरपाई देण्याची सुध्दा तयारी दर्शविली.
07. मंचाचे मते, वाहनाची डिलेव्हरी दिनांक-22/01/2013 रोजी श्री नरेंद्रसिंग नारु यांना देण्यात आली आणि त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-2) ते क्रं-4) यांनी वाहनाचे इंजिन बदलवून ते डिलेव्हरीसाठी दिनांक-23 मे, 2013 रोजी तयार ठेवले. वाहन कोणी विकत घेतले हा येथे महत्वाचा प्रश्न नाही कारण विरुध्दपक्षाचेच म्हणण्या नुसार आरटीओचे अभिलेखात वाहनाची मालकी ही तक्रारकर्तीचे नावे हस्तांतरीत झालेली आहे आणि त्यामुळे मंचाचे मते ती विरुध्दपक्षाची लाभधारी ग्राहक (Beneficiary Consumer) आहे. दिनांक-22 जानेवारी, 2013 रोजी डिलेव्हरीने दिलेल्या वाहनात पुढे दिनांक-23 मे, 2013 रोजी इंजिन नादुरुस्त असल्याने ते बदलविण्याची परिस्थिती निर्माण होते. विरुध्दपक्ष क्रं-2 ते 4 यांचेच लेखी उत्तरा नुसार दिनांक-01/03/2013 रोजी तसेच दिनांक-04/03/2013 रोजी गाडी दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्रं 2 यांचेकडे श्री नरेंद्रसिंग यांनीच आणली व काम केल्या नंतर गाडी परत करण्यात आली. दिनांक-09/04/2013 रोजी वाहनाचे ब्रेक मध्ये आवाज होत असल्याने तसेच दिनांक-10/04/2013 रोजी सुध्दा तोच प्रॉब्लेम आल्यामुळे कोणतेही शुल्क न घेता वाहनाचे ब्रेक पॅड बदलवून देण्यात आले. दिनांक-04/05/2013 रोजी महिन्द्रा आणि महिन्द्रा यांचे टेक्नेशियनने गाडीचे इंजिन बदलविण्या बाबत जॉब कॉर्डवर “As per MLM technical observation Engine replacement under warranty is in progress and awaiting for Engine for replacement” असा शेरा नमुद केलेला आहे. वाहन विक्री केल्या नंतर केवळ चार ते पाच महिन्यात वाहनाचे इंजिन बदलविण्याची वेळ येते यावरुन त्या वाहनामध्ये उत्पादकीय दोष असल्याची (Manufacturing defects) बाब सिध्द होते. विरुध्दपक्षास याची जाणीव होती की, त्यांनी विक्री केलेल्या वाहनात उत्पादकीय दोष आहे म्हणून त्यांनी तक्रारकर्तीस पर्यायी सुविधा म्हणून टॅक्सी पुरविली तसेच रुपये-50,000/- नुकसान भरपाई देण्याची तयारी सुध्दा दर्शविली ही बाब त्यांचेच उत्तरा वरुन सिध्द होते.
08. विरुध्दपक्षाने पुरविलेल्या नविन वाहनात सुरुवातीचेच वॉरन्टी पिरियेडचे काळात एकदम एवढया मोठया प्रमाणावर तांत्रिक दोष उदभवल्याने तक्रारकर्तीचा विरुध्दपक्षा वरील विश्वास डळमळीत झाला आणि तिच्यामध्ये असुरक्षिततेची भावना (Feeling insecure) निर्माण होणे साहजिकच आहे आणि विरुध्दपक्षाचे म्हणण्या नुसार त्यांनी इंजिन बदलवून दिलेले आहे व तसे तक्रारकर्तीला कळविलेले असतानाही तिने दुरुस्त वाहन परत घेण्या बाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही पंरतु विरुध्दपक्षाने एवढया मोठया प्रमाणात तिला अंधारात ठेऊन उत्पादकीय दोष असलेले इंजीन बसलेले वाहन पुरविलेले असल्याने व नंतर विरुध्दपक्षांचेच म्हणण्या नुसार त्यांनी ते इंजिन बदलवून दिलेले आहे या विरुध्दपक्षांचे म्हणण्यावर म्हणण्यावर तिने का बरे विश्वास ठेऊन वाहन आपल्या ताब्यात घ्यावे. विरुध्दपक्षाचे एकंदरीत व्यवहारा वरुन तसेच जॉब कॉर्डस वरील नोंदी वरुन तक्रारकर्तीला पुरविण्यात आलेल्या वाहनात वॉरन्टी पिरियेडचे काळातच उत्पादकीय दोष (Manufacturing defects) असल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. विरुध्दपक्षांचेच म्हणण्या नुसार आरटीओ अभिलेखा नुसार तक्रारकर्तीचे नावे वाहनाची मालकी झालेली आहे आणि त्यामुळे वाहना संबधाने विरुध्दपक्ष क्रं-(1) वाहन निर्माता कंपनी कडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ती ही “लाभधारी ग्राहक” (Beneficiary consumer आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सन-2013 पासून ते आजतागायत म्हणजे सन-2016 संपे पर्यंतच्या कालावधी पर्यंत तक्रारकर्तीला तिचे न्यायहक्कासाठी विरुध्दपक्षानीं ताटकळत ठेवल्याने तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-25,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं-(1) वाहन निर्माता कंपनीने अदा करावेत. या संपूर्ण प्रकरणा मध्ये जी काही जबाबदारी येते ती विरुध्दपक्ष क्रं-1) महिन्द्रा आणि महिन्द्रा लिमिटेड या कार निर्माता कंपनीवर येते कारण तक्रारकर्तीला विक्री केलेली कार ही मूळातच त्यामध्ये उत्पादकीय दोष (Manufacturing defects) असलेली कार आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) ते क्रं-(4) विक्रेता यांचे मार्फतीने वादातील कार विक्री केल्या गेल्याने विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन निर्माता कंपनी कडून आदेशाची अंमलबजावणी विरुध्दपक्ष क्रं-(2) ते क्रं-(4) विक्रेता यांचे मार्फतीने होईल यासाठी विरुध्दपक्ष विरुध्दपक्ष क्रं-(2) ते क्रं-(4) विक्रेता यांना औपचारिकरित्या (Formally) या प्रकरणात जबाबदार धरण्यात येते.
09. आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ हे मंच खालील नमुद मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांवर आपली भिस्त ठेवीत आहे.
(1) “M/S.ANBROS MOTORS PRIVATE LIMITED-VERSUS-DR. RICHA GOEL AND ANOTHER” REVISION PETITION NO. 1141 OF 2005 (NC) Order Dated-01/10/2009
(2) “C.N. ANANTHARAM v. M/S. FIAT INDIA LTD. AND ORS. ETC.” Special Leave Petition (C) Nos.21178-21180 of 2009) NOVEMBER 24, 2010 (2010) 15 (ADDL.) S.C.R. 619
उपरोक्त नमुद मा.राष्ट्रीय ग्राहक आयोग आणि मा.सर्वोच्च न्यायालयाचे निवाडयां मध्ये संबधित ग्राहकानां देऊ केलेल्या कार मध्ये सुरुवातीचे काळातच अनेक तांत्रिक दोष उदभवल्याने व ते दुरुस्त होण्यापलीकडील असल्याने त्यामध्ये उत्पादकीय दोष असल्याचा निर्वाळा देऊन संबधित ग्राहकानां कार निर्माता कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केलेले आहे आणि आमच्या समोरील तक्रारीमध्ये उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे तंतोतंत लागू पडतात.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची विरुध्दपक्ष क्रं-(1) महेन्द्रा आणि महेन्द्रा लिमिटेड तर्फे अध्यक्ष या वाहन निर्माता कंपनी विरुध्दची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(2) ते क्रं-(4) प्रोव्हिन्शियल ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर अनुक्रमे प्राधिकृत विक्री अधिकारी, जनरल मॅनेजर, सर्व्हीस आणि जनरल मॅनेजर, सेल्स यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-(1) वाहन निर्माता कंपनी महेन्द्रा आणि महेन्द्रा लिमिटेड यांचे कडून मंचाचे आदेशाचे अनुपालन होईल एवढया मुद्दा पुरते त्यांना सदर प्रकरणात औपचारिकरित्या (Formally) जबाबदार धरण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन निर्माता कंपनीस आदेशित करण्यात येते की, त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-(2) ते क्रं-(4) वाहन विक्रेता यांचे मार्फतीने दिनांक-19/01/2013 रोजीचे टॅक्स इन्व्हाईस प्रमाणे व त्यामध्ये वर्णनातीत वाहन प्रथम मालक श्री नारु नरेंद्रसिंग गुरुचरणसिंग यांचे नावे विक्री केलेले आणि त्यानंतर तक्रारकर्तीचे नावे आरटीओ अभिलेखा प्रमाणे हस्तांतरीत झालेले महेन्द्रा स्कॉर्पिओ MAHINDRA SCORPIO “SC-RF M2DICR BS3 2WD EX RHD GRY9SF MSLVR” या मॉडेलचे वाहन ज्याचा सिरीएल क्रं-C2K48169, ENGINE NO.GMC4K52039 या वाहनात वॉरन्टी पिरियेड मध्येच उत्पादकीय दोष (Manufacturing defects) असल्याची बाब सिध्द झाल्याने पूर्वीचेच इनव्हाईसस मध्ये दर्शविल्या प्रमाणे त्याच मॉडेलची दोषरहित नविन कार कोणताही अतिरिक्त मोबदला वा शुल्क न स्विकारता संपूर्ण दस्तऐवजांसह तक्रारकर्तीस परत करावी व त्याच मॉडेलची नविन कार संपूर्ण दस्तऐवजांसह मिळाल्या बाबत तक्रारकर्तीची लेखी पोच घ्यावी. अशा नविन पुरविलेल्या कारवर विरुध्दपक्षानीं नव्याने वॉरन्टीसह संपूर्ण दस्तऐवज तक्रारकर्तीस पुरवावेत. तक्रारकर्तीने दोषपूर्ण कार विकत घेताना बिला प्रमाणे ज्या असेसरीज विरुध्दपक्ष क्रं-(2) विक्रेता यांचे कडून विकत घेतल्यात, त्या असेसरीज काढून नविन कारमध्ये लावण्यात याव्यात. तक्रारकर्तीची दोषपूर्ण कार ही सध्या विरुध्दपक्ष क्रं-(2) विक्रेता यांचे गॅरेज मध्येच असल्याने ती कार तक्रारकर्तीने विरुध्दपक्षानां परत करण्याचे आदेशित करण्याचे प्रयोजन नाही तथापि विरुध्दपक्ष क्रं-(1) निर्माता कंपनीने मंचाचे आदेशाचे अनुपालन झाल्यावर ती दोषपूर्ण कार विरुध्दपक्ष क्रं-(2) विक्रेता यांचे कडून परत घ्यावी. विरुध्दपक्षांचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण कार दुरुस्तीचे कालावधीत तिचे उपयोगासाठी पर्यायी वाहन म्हणून टॅक्सी पुरविलेली आहे, ती टॅक्सी तक्रारकर्तीने परत केली नसल्यास मंचाचे आदेशाचे अनुपालन झाल्या नंतर तक्रारकर्तीने ती टॅक्सी विरुध्दपक्ष क्रं-(2) विक्रेता यांना परत करावी व ती मिळाल्या बाबत लेखी पोच विरुध्दपक्ष क्रं-(2) विक्रेता यांचे कडून घ्यावी.
(04) तक्रारकर्तीस झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25000/-(अक्षरी रुपये पंचविस हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1) महिन्द्रा आणि महिन्द्रा प्रायव्हेट लिमिटेड या वाहन निर्माता कंपनीने तक्रारकर्तीस द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) महिन्द्रा आणि महिन्द्रा प्रायव्हेट लिमिटेड या वाहन निर्माता कंपनी तर्फे संबधितांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्दपक्ष क्रं-(2) ते क्रं-(4) वाहन विक्रेता प्रोव्हीएन्शियल ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अनुक्रमे विक्री अधिकारी, जनरल मॅनेजर, सर्व्हीस आणि जनरल मॅनेजर, सेल्स यांनी मंचाचे आदेशाचे अनुपालन त्यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-1) महिन्द्रा आणि महिन्द्रा प्रायव्हेट लिमिटेड या वाहन निर्माता कंपनी यांचे कडून होईल असे पहावे.
(06) तक्रारकर्तीच्या अन्य मागण्या या पुराव्या अभावी नामंजूर करण्यात येत आहेत.
(07) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.