जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 307/2022. तक्रार दाखल दिनांक : 04/11/2022. तक्रार निर्णय दिनांक : 22/05/2023.
कालावधी : 00 वर्षे 06 महिने 21 दिवस
रामराव पि. नारायणराव सुवर्णकार, वय 69 वर्षे, :- तक्रारकर्ता
व्यवसाय : शेती, रा. किनी यल्लोदेवी, ता. उदगीर, जि. लातूर.
विरुध्द
(1) महाव्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., :- विरुध्द पक्ष
विभागीय कार्यालय, भाऊसाहेब शिरोळे भवन, चौथा मजला,
पी.ए.टी. बिल्डींग, डेक्कन जिमखाना, शिवाजी नगर, पुणे - 04.
(2) व्यवस्थापक, बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकींग लि.,
बजाज हाऊस, 97, नेहरु पॅलेस, न्यू दिल्ली, 110 019.
(3) व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.,
बस स्टॅन्डसमोर, मेन रोड, लातूर.
(4) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, उदगीर, जि. लातूर.
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- आसिफ एम. के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांचेकरिता विधिज्ञ :- सुरज एस्. पाटील
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- राकेश शर्मा
विरुध्द पक्ष क्र.4 :- स्वत:
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांच्या पत्नी सिताबाई (यापुढे "मयत सिताबाई") यांचा दि.24/7/2016 रोजी अपघाती मृत्यू झाला आहे. विरुध्द पक्ष क्र.1 व 3 (यापुढे "विमा कंपनी") यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतक-यांसाठी दि.8/12/2017 ते 7/12/2018 कालावधीकरिता विमा संरक्षण दिलेले होते. विमा योजना राबविण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "बजाज कॅपिटल") हे विमा सल्लागार आहेत. विमा योजना अंमलात आणण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.4 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") यांच्यावर जबाबदारी सोपविलेली आहे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, मयत सिताबाई ह्या शेतकरी होत्या आणि मौजे किनी यल्लादेवी, ता. उदगीर येथे त्यांच्या नांवे गट क्र. 132 मध्ये एकूण क्षेत्र 83 आर. शेतजमीन होती. दि.24/7/2016 रोजी सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झाला. विमा योजनेसंबंधी माहिती प्राप्त झाल्यानंतर दि.16/10/2020 रोजी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा प्रस्ताव व कागदपत्रे दाखल केले. विमा कंपनी व बजाज कॅपिटल यांनी प्रस्तावासंबंधी काढलेल्या त्रुटींची पूर्तता तक्रारकर्ता यांनी केली. मात्र विमा कंपनीने विमा दावा प्रलंबीत ठेवून सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उक्त कथनांच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.2,00,000/-, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- व्याजासह देण्याचा विमा कंपनी, बजाज कॅपिटल व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथनांचे खंडन करुन अमान्य केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांच्या पत्नी दि.24/7/2016 रोजी अपघाती मृत्यू पावल्याचे व सप्टेंबर 2020 मध्ये विमा प्रस्ताव दाखल केल्याचे नमूद केल्यामुळे ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे. तसेच अद्यापपर्यंत तक्रारकर्ता यांचा विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल झालेला नाही. विमा कंपनीकडे विमा प्रस्ताव प्रलंबीत नसल्यामुळे सेवेमध्ये त्रुटी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शेवटी, ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आली.
(4) बजाज कॅपिटल यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांच्या कथनानुसार विमा योजनेच्या अंमलबजवणीमध्ये त्यांची जबाबदारी मर्यादीत आहे आणि विमा दावा रक्कम देण्यासंबंधी विमा कंपनीस सर्वाधिकार आहे. तक्रारकर्ता यांच्या विमा दाव्यासंबंधी माहिती नाही आणि ग्राहक तक्रार अपरिपक्व आहे. विमा रक्कम देण्याकरिता त्यांची जबाबदारी नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी विनंती केली आहे.
(5) तालुका कृषि अधिकारी यांनी विमा योजनेंतर्गत तक्रारदार यांनी त्यांच्या कार्यालयाकडे विमा प्रस्ताव सादर केला नाही, असे नमूद केले.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय (विमा कंपनीने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा कंपनीद्वारे महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांना विमा संरक्षण देण्यात आले, ही मान्यस्थिती आहे. मौजे किनी यल्लादेवी, ता. उदगीर येथील भुमापन क्रमांक व उपविभाग 132 चे अवलोकन केले असता मयत सिताबाई यांच्या नांवे 0.83 शेतजमीन असल्याचे निदर्शनास येते. त्या अनुषंगाने मयत सिताबाई शेतकरी असल्याचे स्पष्ट होते. मृत्यू प्रमाणपत्र पाहता मयत सिताबाई यांचा दि.24/7/2016 रोजी मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. मयत सिताबाई यांना सर्पदंश झाल्यामुळे ह्दय बंद पडून मृत्यू झाल्यासंबंधी डॉ. आर.एन. लखोटीया, कोमल हॉस्पिटल, उदगीर यांनी प्रमाणपत्र दिलेले दिसून येते.
(8) तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार तालुका कृषि अधिका-यांकडे त्यांनी विमा प्रस्ताव दाखल केला आणि विमा कंपनी व बजाज कॅपिटल यांच्याद्वारे सुचविलेल्या त्रुटींची पूर्तता केली असतानाही विमा दावा प्रलंबीत ठेवलेला आहे. उलटपक्षी, विमा कंपनी, बजाज कॅपिटल व तालुका कृषि अधिकारी यांच्या प्रतिवादानुसार तक्रारकर्ता यांचा विमा प्रस्ताव त्यांच्याकडे दाखल झालेला नाही.
(9) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, सप्टेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न केला असता तो स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे विमा प्रस्ताव डाकेद्वारे तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर तालुका कृषि अधिकारी यांच्या सूचनेनुसार दि.16/10/2020 रोजी त्यांच्याकडे परिपूर्ण विमा प्रस्ताव दाखल केला. उलटपक्षी, तालुका कृषि अधिकारी, बजाज कॅपिटल व विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा प्रस्ताव त्यांच्याकडे प्राप्त झाला नाही, असे नमूद केले. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.16/10/2020 रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने विमा प्रस्ताव स्वीकारल्याची शिक्का स्वाक्षरीत पोहोच दिल्याचे दिसून येते. विमा संविदा व शासन निर्णयाचे अवलोकन केले असता विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर 90 दिवसानंतर प्राप्त दावे समर्थनिय कारणास्तव स्वीकरता येऊ शकतात.
(10) मयत सिताबाई यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला असून तो अपघाती असल्याचे सिध्द होते. मयत सिताबाई यांच्या मृत्यूपश्चात तक्रारकर्ता यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा सादर केलेला आहे. विमा दावा प्राप्त झाला नाही, याच्या सिध्दतेसाठी तालुका कृषि अधिकारी, बजाज कॅपिटल व विमा कंपनी यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणा-या विमा दाव्यासंबंधी नोंद घेतल्या जाणा-या आवक नोंदवही किंवा अन्य आवश्यक अभिलेख दाखल केलेला नाही. निर्विवादपणे, प्रस्तुत ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांची विमा दाव्यासंबंधीत कागदपत्रे विमा कंपनीस प्राप्त झालेले आहेत. विमा योजनेचा सामाजिक व परोपकारी उद्देश व हेतुचा विचार केला असता ग्राहक तक्रारीसोबत प्राप्त कागदपत्रांच्या आधारे मयत सिताबाई यांच्या विमा दाव्यासंबंधी विचार करणे आवश्यक होते. तक्रारकर्ता हे विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र असताना विमा कंपनीने त्यांच्या विमा दाव्यासंबंधी अनुचित दृष्टीकोन ठेवल्याचे दिसून येतो आणि विमा कंपनीचे ते कृत्य सेवेमध्ये त्रुटी ठरते. आमच्या मते, तक्रारकर्ता रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र आहेत. तक्रारकर्ता यांना विमा रक्कम न दिल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आणि त्यांना त्रासास सामोरे जावे लागले. त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई रु.5,000/- व तक्रार खर्च रु.3,000/- मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 3 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.2,00,000/- विमा रक्कम द्यावी.
ग्राहक तक्रार क्र. 307/2022.
तसेच, उक्त रक्कम आदेश तारखेपासून 45 दिवसाच्या आत न दिल्यास आदेश तारखेपासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देय राहील.
(3) विरुध्द पक्ष क्र. 1 व 3 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र. 1 व 3 विमा कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-