जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 169/2019. तक्रार दाखल दिनांक : 11/07/2019. तक्रार निर्णय दिनांक : 05/09/2022.
कालावधी : 03 वर्षे 01 महिने 25 दिवस
कामीनाबाई भ्र. भिमराव सूर्यवंशी, वय 50 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. लिंबाळा, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) महाव्यवस्थापक, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
विभागीय कार्यालय नं. 3, 321/ए/2, जवाहरलाल नेहरु रोड,
ओसवाल बंधु समाज बिल्डींग, दुसरा माळा, पुणे -411 042.
(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि., दुसरा मजला,
जयका बिल्डींग, कमर्शिअल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001.
(3) व्यवस्थापक, दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि.,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर.
(4) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, निलंगा, ता.निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- जे.पी. चिताडे
विरुध्द पक्ष क्र.4 स्वत: / प्रतिनिधी
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतक-यांचा विरुध्द पक्ष क्र.1 (विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे दि.8/12/2017 ते 7/12/2018 कालावधीकरिता विमा उतरविण्यात आलेला होता. विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जयका इन्शुरन्स") हे विमा सल्लागार आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.4 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") हे विमा योजनेची अंमलबजावणी करतात.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, त्यांचे पती भिमराव किसन सूर्यवंशी (यापुढे "मयत भिमराव") हे शेतकरी होते आणि त्यांच्या नांवे मौजे लिंबाळा, ता. निलंगा, जि. लातूर येथे गट क्र. 41/ब मध्ये एकूण क्षेत्र 1 हे. 41 आर. शेतजमीन होती. दि. 3/8/2018 रोजी अज्ञात वाहनाने मयत भिमराव यांना धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन वैद्यकीय उपचारादरम्यान दि.21/5/2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलीस ठाणे, कासार शिरशी, ता. निलंगा येथे घटनेची आकस्मित क्र. 23/2018 प्रमाणे नोंद करण्यात आली.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, मयत भिमराव हे शेतकरी होते आणि विमा योजनेनुसार ते लाभार्थी होते. तक्रारकर्ती ह्या वारस असल्यामुळे विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे दि.20/10/2018 रोजी आवश्यक कागदपत्रे सादर केली. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याद्वारे विमा दावा प्रस्ताव जयका इन्शुरन्स यांच्याकडे पाठविण्यात आला. विमा कंपनी व जयका इन्शुरन्स यांच्याद्वारे निर्देशीत त्रुटींची पूर्तता करण्यात आली. परंतु त्यांचा विमा प्रस्ताव प्रलंबीत ठेवलेला असून सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.2,00,000/- अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज दराने देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.7,000/- देण्याचा विमा कंपनी, जयका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केलेले असून पुराव्याद्वारे सिध्द करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. विमा कंपनीचे कथन असे की, वादकारण उदभवलेले नसताना जिल्हा आयोगामध्ये ग्राहक तक्रार दाखल करण्यात आलेली असून त्यांनी तक्रारकर्ती यांना अकार्यक्षम सेवा पुरविलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.
(5) जयका इन्शुरन्सद्वारे लेखी निवेदनपत्र सादर केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(6) तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांचे असे निवेदन आहे की, मयत भिमराव यांचा प्रस्ताव दि.20/10/2018 रोजी प्राप्त झाला आणि दि.31/10/2018 रोजी तो जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी काढलेल्या त्रुटींची तक्रारकर्ती यांच्याकडून पूर्तता करुन घेतली. प्रस्तुत विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबीत आहे.
(7) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ती यांच्याकरिता विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी होय (विमा कंपनीने)
केल्याचे सिध्द होते ?
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने अनुतोष आहे काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- अभिलेखावर दाखल शासन निर्णय व त्रिपक्षीय विमा संविदालेखाचे अवलोकन केले असता महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांना विमा कंपनीने गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत दि.8/12/2017 ते 7/12/2018 कालावधीकरिता अपघाती विमा संरक्षण दिलेले होते, असे दिसते. अभिलेखावर दाखल 7/12 उता-यानुसार गाव : लिंबाळा, ता. निलंगा, जि. लातूर येथील गट क्रमांक व उपविभाग : 41/ब मध्ये मयत भिमराव हे भोगवाटदार असून त्यांचे नांवे 1.41 हे. क्षेत्र असल्याचे निदर्शनास येते. त्या अनुषंगाने मयत भिमराव हे शेतकरी होते आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेकरिता लाभार्थी असल्याचे स्पष्ट होते. पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता मयत भिमराव यांचा रस्ता अपघातामध्ये डोक्यास मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते.
(9) उभयतांच्या वाद-प्रतिवाद व कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत भिमराव यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा व कागदपत्रे दाखल केले, हे विवादीत नाही. त्यानंतर तालुका कृषि अधिका-यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्या मार्फत जयका इन्शुरन्स यांच्याकडे विमा दावा प्रस्ताव सादर केला, हे विवादीत नाही. जयका इन्शुरन्सच्या दि. 11/12/2018 रोजीच्या पत्रानुसार विमा प्रस्तावातील त्रुटीच्या अनुषंगाने तक्रारकर्ती यांच्याकडे 6-क, प्रथम माहिती अहवाल व मरणोत्तर पंचनाम्याची मागणी करण्यात आली आणि तक्रारकर्ता यांनी त्रुटीयुक्त कागदपत्रांची पूर्तता केली, असे दिसून येते. त्यानंतर जयका इन्शुरन्सद्वारे दि.23/1/2019 रोजीच्या पत्राद्वारे 6-क कागदपत्रांची मागणी केलेली दिसून येते. त्याचीही तक्रारकर्ती यांनी पूर्तता केल्यासंबंधी पत्रव्यवहार दिसून येतो.
(10) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनी व जयका इन्शुरन्स यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यांच्या वतीने तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीकरिता विरोधी निवेदन व पुरावा नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने ग्राहक तक्रारीतील निवेदने अमान्य केलेले आहेत. तालुका कृषि अधिका-यांचे निवेदन व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार तक्रारकर्ती यांनी विमा दाव्याच्या अनुषंगाने आवश्यक व त्रुटीयुक्त कागदपत्रांची पूर्तता केलेली दिसून येते.
(11) सकृतदर्शनी, मयत भिमराव यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसून येते. मयत भिमराव हे शेतकरी होते. त्यांच्या मृत्यूपश्चात विमा रक्कम मिळण्याकरिता दावा सादर केलेला आहे. जयका इन्शुरन्सद्वारे विमा दाव्यासंबंधी काढलेल्या त्रुटींची पूर्तता तक्रारकर्ती यांनी केलेली आहे. असे दिसते की, विमा कंपनीने तक्रारकर्ती यांच्या विमा दाव्याचा निर्णय घेण्याकरिता आवश्यक कार्यवाही केलेली नाही. तक्रारकर्ती यांचा विमा दावा का व कोणत्या कारणास्तव प्रलंबीत आहे, याचे स्पष्टीकरण नाही. विमा योजनेचा उद्देश, त्यामागील सामाजिक व परोपकारी हेतू पाहता विमा कंपनीने मयत भिमराव यांच्या विमा दाव्यासंबंधी दुर्लक्ष केलेले आहे. पुराव्यांनुसार तक्रारकर्ती ह्या मयत भिमराव यांच्या विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरिता पात्र असल्याचे सिध्द होते. अशा स्थितीत विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दाव्याचा निर्णय न घेऊन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ती रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र ठरतात.
(12) तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांनी अभिलेखावर मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने ‘लताबाई रावसाहेब देशमुख /विरुध्द/ महाराष्ट्र शासन व इतर-2’, रिट पिटीशन नं.10185/2015, तसेच मा. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने ‘भागुबाई देविदास जावळे /विरुध्द/ महाराष्ट्र शासन व इतर’, रिट पिटीशन नं.2420/2018 मध्ये दि.27/11/2018 रोजी दिलेल्या निवाड्याचा संदर्भ सादर केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य आयोगाच्या औरंगाबाद खंडपिठाने "ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ श्रीमती गंगुबाई विष्णू शिंदे", प्रथम अपिल क्र. 1126/2019, निर्णय दि.5/10/2021; "ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ श्रीमती गयाबाई अप्पासाहेब जाधव", प्रथम अपिल क्र. 158/2020, निर्णय दि.24/11/2021; "न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. /विरुध्द/ श्रीमती सोजरबाई रामचंद्र दहीगल", प्रथम अपिल क्र. 1095/2019, निर्णय दि.30/11/2021; "न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि. /विरुध्द/ किसन बाबुराव काकडे", प्रथम अपिल क्र. 345/2018, निर्णय दि.17/12/2021 या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. त्यामध्ये नमूद न्यायिक तत्वे विचारात घेतली.
(13) विमा रकमेवर व्याज मिळण्याकरिता तक्रारकर्ती यांची विनंती पाहता तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याज देण्याचा आदेश करणे न्यायोचित ठरेल. तक्रारकर्ती यांनी शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु. 7,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, विमा दावा निर्णयीत न केल्यामुळे तक्रारकर्ती यांना विमा रक्कम प्राप्त झालेली नाही आणि त्यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत आणि तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(14) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 व 3 विमा कंपनीने उक्त रु.2,00,000/- रकमेवर दि. 11/7/2019 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे. (3) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 3 विमा कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-