न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
जाबदार क्र.2 हे हिरो मोटो कॉर्प लि. चे कराड येथील अधिकृत डिलर आहेत व जाबदार क्र.1 हे जाबदार क्र.2 यांचे वडूज येथील सबडीलर आहेत. तसेच जाबदार क्र.2 हे हिरो कंपनीच्या गाडयांचे अधिकृत सर्व्हिसिंग सेंटर चालवितात. तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून दि. 19/8/2014 रोजी हिरो प्लेझर ही स्कूटर खरेदी केली असून तिचा रजि.नं. एमएच-11-बीएस-5901 आहे. तक्रारदार यांचे वाहनास दि. 26/2/2020 रोजी अपघात झाला. सदर अपघातामध्ये वाहनाचे बरेच नुकसान झाले. म्हणून तक्रारदार यांनी सदरचे वाहन जाबदार क्र.1 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिले. तदनंतर जाबदार क्र.1 यांनी सदरचे वाहन हे जाबदार क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिले. दरम्यानचे काळात कोरोना संसर्गाची साथ सुरु झाल्यामुळे भारत सरकारने टाळेबंदी जाहीर केली. सदरची टाळेबंदी उठल्यानंतर तक्रारदार यांनी जाबदारांकडे गाडी दुरुस्तीबाबत चौकशी केली असता जाबदार यांनी गाडी दुरुस्त झाली नाही, दुरुस्त झाल्यावर कळवितो, असे जाबदारांनी सांगितले. तदनंतर दि. 6/8/2020 रोजी जाबदार क्र.1 यांनी तक्रारदार यांना फोन करुन गाडी तयार आहे, घेवून जा असे सांगितले. तक्रारदारांनी दुरुस्तीची रक्कम रु.29,993/- भरुन गाडी ताब्यात घेतली. तदनंतर तक्रारदारांनी गाडी चालविली असता गाडी पुन्हा बंद पडली. त्यावेळी गाडी योग्यरित्या दुरुस्ती केली नाही, असे तक्रारदाराच्या लक्षात आले. सदरची बाब तक्रारदारांनी जाबदार यांना सांगितली असता जाबदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून तक्रारदारांनी, जाबदार यांनी दिलेले दुरुस्तीचे टॅक्स इन्व्हॉइस चेक केले असता, त्यामध्ये तफावत आढळून आली. तक्रारदार यांनी सदर गाडीचे फोर्क आऊट काढण्याकरिता जाबदार यांना रक्कम रु.1,600/- पूर्वीच अदा केले होते व त्यानुसार तक्रारदार यांनी दत्ता बाळ गॅरेज, कोल्हापूर यांचेकडून दि. 2/7/2020 रोजी फोर्क आऊट काढून घेतलेले होते. तसेच तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून गाडी ताब्यात घेतेवेळी दि. 6/08/2020 रोजी रक्कम रु.1,550/- वेगळे अदा करुन जाबदार यांचेकडून हेल्मेट घेतलेले होते व त्याची रक्कम रु. 1,550/- तक्रारदार यांनी अदा केली होती. अशी परिस्थिती असताना देखील जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.25,993/- स्वीकारलेली आहे. या रकमेमध्ये जाबदार यांनी 8 हेल्मेटचे रु.5319.44 लावलेले आहेत तसेच फोर्क आऊटचे रु.1,600/- व इतरही न केलेल्या कामाचे बिल लावलेले आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून 8 हेल्मेट घेतलेले नाहीत. तक्रारदार यांनी फोर्क आऊटचे रु.1,600/- व एक हेल्मेटचे रु.1,550/- टॅक्स इन्व्हॉइसची रक्कम सोडून अदा केलेले आहेत. तरी देखील जाबदार यांनी सदर रक्कम तक्रारदार यांच्या टॅक्स इन्व्हॉइसमध्ये लावलेली आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदाराकडून अतिरिक्त रक्कम लाटलेली आहे. तरीही गाडी व्यवस्थित दुरुस्त केलेली नाही व सदरची गाडी अजूनही बंद अवस्थेत आहे. अशा प्रकारे जाबदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे तसेच सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांना दि.15/2/22021 रोजी नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीसीस जाबदार क्र.1 यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. जाबदार क्र.2 यांनी सदर नोटीसीस दि. 27/2/2021 रोजी खोटया आशयाचे उत्तर पाठवून रक्कम देण्यास नकार दिला आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून रक्कम रु.32,143/- मिळावी, सदर रकमेवर दि.6/08/2020 पासून द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मिळावे, शारिरिक त्रासापोटी रु.2,00,000/- व अर्जाचा खर्च रु.50,000/- जाबदारांकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदार यांनी एरिया मॅनेजर हिरो मोटो कॉर्प यांना दिलेले पत्र, तक्रारदाराचे उपचाराची कागदपत्रे, जाबदार क्र.2 यांनी दिलेले टॅक्स इन्व्हॉईस, तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेल्या नोटीसची प्रत, सदर नोटीसीस जाबदार क्र.2 यांनी दिलेले उत्तर, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेले शपथपत्र हेच पुरावा शपथपत्र म्हणून वाचणेत यावे अशी पुरसीस दाखल केली आहे.
4. जाबदार क्र.1 व 2 यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत तसेच त्यांनी आपले म्हणणेही दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र.1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करणेत आला.
5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार बँकेने तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. अंशत: |
3 | तक्रारदार जाबदार बँकेकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. अंशत: |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
6. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, जाबदार क्र.2 हे हिरो मोटो कॉर्प लि. चे कराड येथील अधिकृत डिलर आहेत व जाबदार क्र.1 हे जाबदार क्र.2 यांचे वडूज येथील सबडीलर आहेत. तसेच जाबदार क्र.2 हे हिरो कंपनीच्या गाडयांचे अधिकृत सर्व्हिसिंग सेंटर चालवितात. तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून दि. 19/8/2014 रोजी हिरो प्लेझर ही स्कूटर खरेदी केली असून तिचा रजि.नं. एमएच-11-बीएस-5901 आहे. तक्रारदार यांचे वाहनास दि. 26/2/2020 रोजी अपघात झाला. सदर अपघातामध्ये वाहनाचे बरेच नुकसान झाले. म्हणून तक्रारदार यांनी सदरचे वाहन जाबदार क्र.1 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिले. तदनंतर जाबदार क्र.1 यांनी सदरचे वाहन हे जाबदार क्र.2 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिले. तक्रारदारांनी सदर दुरुस्तीपोटीची रक्कम रु.29,993/- जाबदार क्र.2 यांना अदा केले आहेत. सदर दुरुस्तीचे टॅक्स इन्व्हॉईस तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेले आहे. तक्रारदाराची सदरची कथने जाबदार यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदार यांनी सदर गाडीचे फोर्क आऊट काढण्याकरिता जाबदार यांना रक्कम रु.1,600/- पूर्वीच अदा केले होते व त्यानुसार तक्रारदार यांनी दत्ता बाळ गॅरेज, कोल्हापूर यांचेकडून दि. 2/7/2020 रोजी फोर्क आऊट काढून घेतलेले होते. तसेच तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडून गाडी ताब्यात घेतेवेळी दि. 6/08/2020 रोजी रक्कम रु.1,550/- वेगळे अदा करुन जाबदार यांचेकडून हेल्मेट घेतलेले होते व त्याची रक्कम रु. 1,550/- तक्रारदार यांनी अदा केली होती. अशी परिस्थिती असताना देखील जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.25,993/- स्वीकारलेली आहे. या रकमेमध्ये जाबदार यांनी 8 हेल्मेटचे रु.5319.44 लावलेले आहेत तसेच फोर्क आऊटचे रु.1,600/- व इतरही न केलेल्या कामाचे बिल लावलेले आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून 8 हेल्मेट घेतलेले नाहीत. तक्रारदार यांनी फोर्क आऊटचे रु.1,600/- व एक हेल्मेटचे रु.1,550/- टॅक्स इन्व्हॉइसची रक्कम सोडून अदा केलेले आहेत. तरी देखील जाबदार यांनी सदर रक्कम तक्रारदार यांच्या टॅक्स इन्व्हॉइसमध्ये लावलेली आहे अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
8. तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांना गाडी दुरुस्तीपोटी रु.24,443/- दिल्याचे त्यांनी मे. आयोगात दाखल केलेल्या यादीतील अ.क्र.4 च्या टॅक्स इन्व्हॉइसवरुन दिसून येते. तसेच प्लेझर चेस आऊटचे रु.1,600/- बिल दिल्याचे व हेल्मेट खरेदीचे रु.1,550/- दिल्याचे कागदयादीतील अ.क्र.5 व अ.क्र. 30 व 31 अन्वये दिसून येते. तसेच तक्रारदारांनी कागदयादीसोबत जोडलेल्या अ.क्र. 9 मधील नोटीस उत्तरात जाबदारांनी आऊट हा चेसीसचा काढण्यात आल्याचे व चेसीस आऊट व फोर्क ही दोन्ही कामे वेगळी असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तक्रारदारांकडून 8 हेल्मेटचे रु.5319.44 जाबदार क्र.2 यांनी जास्त घेतल्याचे दिसून येते.
9. तक्रारदारांनी दत्ता बाळा गॅरेज, कोल्हापूर येथून चेसीस आऊटचे काम करुन घेतल्याचे त्यांच्या बिलावरुन दिसून येते. तसेच टॅक्स इन्व्हॉईस मधील अ.क्र. 5 चे अवलोकन करता फोर्कचे काम केल्याचे बिल जाबदारांनी लावल्याचे दिसून येते. ही दोन्ही कामे वेगवेगळी असल्याने जाबदार क्र.2 यांनी दोन वेळा एकाच कामाचे बिल घेतल्याचे दिसून येत नाही. जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांनी त्यांना पाठविलेल्या नोटीस उत्तरात हेल्मेटची जादा घेतलेली रक्कम परत करण्याची तयारी दाखविली. परंतु जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांना चुकीचे बिल देवून व जास्त घेतलेले हेल्मेटचे पैसे वेळेत व त्वरित परत न करुन तक्रारदाराना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे असे या आयोगाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
10. तक्रारदार यांनी जाबदार यांनी 40 पार्टस गाडीला बसविल्याचे टॅक्स इन्व्हॉईस मे. आयोगात दाखल केले आहे. परंतु या बसविलेल्या पार्टसमधील नेमके कोणते पार्ट्स खराब झाल्याने गाडी बंद अवस्थेत आहे याबद्दल कोणताही खुलासा अथवा तज्ञांचा अहवाल याकामी तक्रारदाराने दाखल केलेला नाही. तसेच जाबदार क्र.2 यांनी हे पार्ट्स बसविलेले नाहीत अशी तक्रारदारांची तक्रार नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या मागणीप्रमाणे रु. 32,143/- त्यांना देणेचा आदेश करता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. फक्त 8 हेल्मेटचे रु.5319.44 जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांकडून जादा घेतल्याचे तक्रारदारांनी दाखल केलेल्या टॅक्स इन्व्हॉईस वरुन दिसून येते.
मुद्दा क्र.3
11. सबब, तक्रारदार हे जाबदार क्र.2 यांचेकडून 8 हेल्मेटपोटी जादा घेतलेली रक्कम रु.5319.44 परत मिळण्यास पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर तक्रारदार हे टॅक्स इन्व्हॉइसची तारीख 05/08/2020 पासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत. तसेच नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- जाबदार क्र.2 यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारास आठ हेल्मेटपोटी जादा घेतलेली रक्कम रु.5319.44 परत करावी. तसेच सदर रकमेवर दि. 05/08/2020 पासून संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.5,000/- अदा करावी.
- जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारास तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.