-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
( पारित दिनांक-16 ऑगस्ट, 2016)
01. मा.राज्य ग्राहक आयोग खंडपिठ, नागपूर यांच्या समोरील अपिल क्रं-ए-07/288 मध्ये पारीत दिनांक-16/04/2015 रोजीचे अपिलीय आदेशान्वये या तक्रारीत अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर यांनीण् पारीत केलेला निकाल रद्द करुन तक्रार पुन्हा मंचाकडे नव्याने फेरचौकशीसाठी पाठविण्यात आली.
तक्रार नव्याने फेर चौकशीसाठी पाठविताना मा.राज्य ग्राहक आयोगाने आपल्या आदेशामध्ये असे नमुद केले की, या प्रकरणात काही वादातीत मुद्दे असून ज्यावर स्वंयस्पष्ट असा पुरावा समोर आलेला नाही आणि योग्य त्या पुराव्याचे अभावी ही तक्रार गुणवत्तेवर निकाली काढणे शक्य नाही, म्हणून ही तक्रार मंचाकडे नव्याने फेरचौकशीसाठी पाठवून व दोन्ही पक्षांना नव्याने योग्य तो पुरावा दाखल करण्याची संधी देऊन त्यामध्ये योग्य तो निकाल पारीत व्हावा. पुढे जाण्यापूर्वी या तक्रारीतील वस्तुस्थिती थोडक्यात नमुद करीत आहोत-
02. तक्रारीची थोडक्यात वस्तुस्थिती खालील प्रमाणे-
ही तक्रार अचरज टॉवर अपार्टमेंट असोसिएशनच्या अध्यक्षानीं विरुध्दपक्ष क्रं-1) नागपूर महानगरपालिका, विरुध्दपक्ष क्रं-2) झोनल अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, नागपूर महानगरपालिका आणि विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी यांचे विरुध्द तक्रारकर्ता असोसिएशनच्या नावे अवास्तव पाणी बिल देण्या संबधीची आहे.
अचरज टॉवर ही ईमारत विरुध्दपक्ष क्रं-3) ने बांधली असून त्यामध्ये तक्रारकर्ता असोसिएशनचे सभासदानीं सदनीका विकत घेतलेल्या आहेत, त्या ईमारतीला विरुध्दपक्ष क्रं-3) ने पाण्याचे एक कनेक्शन दिलेले आहे, ज्याचा मीटर क्रं-1251527 असून ग्राहक क्रं-080335 आणि इन्डेक्स क्रं-60/11190 असा आहे. तक्रारकर्ता असोसिएशन तर्फे त्या मीटर वरील पाण्याची देयके नियमितपणे विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात भरण्यात येत होती. जानेवारी-2004 मध्ये विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागा तर्फे तक्रारकर्ता असोसिएशनला तोंडी कळविण्यात आले की, त्यांच्या पिण्याचे पाण्याचे कनेक्शन तक्रारकर्ता असोसिएशनच्या नावे झालेले नसून ते करुन घेण्यास तक्रारकर्ता असोसिएशनने सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून प्रती फ्लॅट रुपये-600/- या प्रमाणे रकमेचा भरणा विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागाकडे करावा परंतु त्या संबधाने लेखी डिमांड नोट देण्यात आलेली नव्हती.
विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी याचे कडे पूर्वी पासून म्हणजे सन-1967 साला पासून ज्या जागेवर सदर ईमारत उभी आहे, त्या ठिकाणी असेलेल्या जिनाघरात 02 पाण्याचे कनेक्शन्स होते. ईमारत बांधते वेळी विरुध्दपक्ष क्रं-3 ने त्यापैकी एक पाण्याचे कनेक्शन तक्रारकर्ता असोसिएशनला दिले. जेंव्हा विरुध्दपक्ष क्रं-3) जव्हेरी याने त्याचे जुने घर पाडले त्यानंतर तो तक्रारकर्ता असासिएशनचे सभासद राहत असलेल्या अचरज टॉवर्स या ईमारती मधील एका फ्लॅटमध्ये राहायला आला, त्यावेळी त्याने त्याचे दुसरे पाण्याचे कनेक्शन ज्याचा ग्राहक क्रं-080346, मीटर क्रं-83991 आणि इन्डेक्स क्रं-60/11160 असा आहे हा तक्रारकर्ता असोसिएशनच्या ईमारतीतील “Sump” मध्ये जोडला व ही बाब विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागाला त्याने कळविली. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी याने त्या मीटर वरील बिलांचा भरणा करणे बंद केले आणि त्यावर विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागाने आक्षेप न घेता त्या मीटरचे बिल विरुध्दपक्ष क्रं-3) जव्हेरी याच्या आजीचे नावे जारी करीत राहिले.
विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागा तर्फे दिनांक-24/03/2004 ला तक्रारकर्ता असोसिएशन कडे पाण्याच्या मीटरचे थकीत बिल रुपये-15,744/- चे पाठविण्यात आले, जे तक्रारकर्ता असोसिएशनने भरले. परंतु त्या बिला सोबत आणखी एक रुपये-19,230/- रकमेचे बिल, जे कनेक्शन विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरीचे होते, ते पाठविण्यात आले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) नागपूर महानगरपालिके
तर्फे स्वतःहून विरुध्दपक्ष क्रं-3) जव्हेरी याचे पाण्याचे कनेक्शन वरील थकीत बिल तक्रारकर्ता असासिएशनच्या सभासदांचे नावे लावले आणि त्यासाठी तक्रारकर्ता असोसिएशन कडून कुठलाही अर्ज घेण्यात आला नाही. ज्यावेळी तक्रारकर्ता असोसिएशनव्दारे यावर आक्षेप घेण्यात आला आणि विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरीला ते बिल भरण्यास सांगण्यात आले तेंव्हा त्याने दिनांक-25/06/2004 रोजी पत्र पाठवून तक्रारकर्ता असोसिएशनला कळविले की, त्यांनी ते बिल 03 दिवसात भरावे, अन्यथा त्यांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येईल. या बद्दल तक्रारकर्ता असोसिएशनने, विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागाडे हरकत घेतली परंतु त्याच फायदा झाला नाही. विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी याने त्यानंतर तक्रारकर्ता असोसिएशनच्या “Sump” मध्ये दिलेले दोन्ही पाण्याचे कनेक्शन्स दिनांक-07.07.2004 रोजी बंद केले आणि सदनीकेत राहणा-या असोसिएशनच्या सभासदानां पाण्या पासून वंचित केले.
सबब या तक्रारीव्दारे तक्रारकर्ता असोसिएशन तर्फे अशी विनंती करण्यात आली की, विरुध्दपक्ष हे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करीत आहेत असे घोषीत करावे तसेच खंडीत पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करावा आणि मीटर कनेक्शन तक्रारकर्ता असोसिएशनचे नावे करुन त्यानंतर योग्य देयके देण्यात यावीत. याशिवाय झालेल्या त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारखर्च मिळावा अशा मागण्या केल्यात.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) क्रं-2) आणि क्रं-3) यांना मंचाचे मार्फतीने नोटीस पाठविली असता त्यांनी उपस्थित होऊन आप-आपले लेखी जबाब दाखल केलेत.
04. विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-2) अनुक्रमे नागपूर महानगर पालिका आणि तिचे पाणी पुरवठा विभागाव्दारे संयुक्तीक लेखी जबाबात असे नमुद करण्यात आले आहे की, तेथे 02 पाण्याचे कनेक्शन्स होते, जे श्रीमती ए.पी.जव्हेरी, जी विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी याची आई आहे, तिचे नावे होते आणि त्यांचा अनुक्रमे इन्डेक्स क्रं-60/11190 आणि क्रं-60/11160 असा होता आणि नंतर ते दोन्ही कनेक्शन्स तक्रारकर्ता असोसिएशनचे नावे दिनांक-01/03/2002 ला ट्रॉन्सफर करण्यात आले. वरील दोन्ही पाण्याचे कनेक्शन्सव्दारे पाणी पुरवठा हा तक्रारकर्ता असोसिएशनच्या ईमारती मधील Sump” मध्ये दिल्या जातो व ते पाणी ईमारतीतील 35 सदनीकाधारक वापरतात. त्यांनी दिलेली पाणी वापराची देयके ही योग्य व कायदेशीर आहेत. सदनीकाधारकानीं विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागाला पत्र देऊन पाण्याचे दोन्ही कनेक्शन्स हे तक्रारकर्ता असोसिएशनच्या नावे लावण्यासाठी अर्ज केला होता व
त्यात असे नमुद केले होते की, सर्व सदनीकाधारक पाण्याचा पिण्यासाठी व इतर घरगुती कामासाठी पाण्याचा वापर करतात. विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागाकडून देयकांची तपासणी (Verification) केल्या नंतर बिल तारखे नुसार प्रत्यक्ष्य पाणी वापराचे वाचना प्रमाणे (As Per Reading) सुधारीत (Revised) तयार करण्यात आले व त्या प्रमाणे बिलाची एकूण रक्कम ही रुपये-22,691/- एवढी येते. तक्रारकर्ता असोसिएशनला ते बिल भरण्यास सांगण्यात आले, अन्यथा पाणी पुरवठा खंडीत करण्याची सुचना सुध्दा दिली परंतु बिल न भरल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागा तर्फे दिनांक-07/07/2004 रोजी पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. आता तक्रारकर्ता असोसिएशनला पाणी पुरवठा सुरळीत करावयाचा असेल तर प्रथम त्यांनी थकीत बिलाची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. याशिवाय विरुध्दपक्ष क्रं-1) ला सिटी ऑफ नागपूर कॉर्पोरेशन एक्टचे कलम-384 नुसार तक्रार दाखल करण्यापूर्वी नोटीस दिली नाही. वरील नमुद सर्व कारणास्तव तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तर्फे करण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी याने आपले लेखी जबाबात असे नमुद केले की, तक्रारकर्ता असोसिएशन ही त्यांची ग्राहक नाही. सदनीकेचे ताबे त्यांच्या मालकांना दिल्या नंतर त्या सर्वांनी मिळून एक असोसिएशन तयार केली, ज्याचा तो पण एक सभासद आहे. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) नागपूर महानगरपालिका आणि तिचे पाणी पुरवठा विभागाची आहे. त्याने हे मान्य केले की, त्याचे मार्फतीने पाण्याचे एक कनेक्शन ज्याचा ग्राहक क्रमांक-080335 आणि इंडेक्स क्रं-60/11190 असा आहे, तो तक्रारकर्ता असोसिएशनच्या नावे ट्रॉन्सफर करण्यात आला. त्याचेकडे दुसरे पाण्याचे कनेक्शन ज्याचा इन्डेक्स क्रं-60/11160 आहे, जो त्याचेकडे होता, तो सुध्दा नंतर तक्रारकर्ता असोसिएशनचे नावे ट्रॉन्सफर करण्यात आला होता. ते दोन्ही पाण्याचे कनेक्शन्स वैयक्तिक नावाने सन-1996 पासून होते व ते तक्रारकर्ता असोसिएशनचे नावे लावून घेण्यास तक्रारकर्ता असोसिएशन तर्फे कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत. परंतु त्या नंतर दिनांक-01/03/2002 ला दोन्ही पाण्याचे कनेक्शन्स तक्रारकर्ता असोसिएशनच्या नावे ट्रॉन्सफर करण्यात आले. त्याने हे नाकबुल केले की, पाण्याचे एकच कनेक्शन तक्रारकर्ता असोसिएशनला दिले होते. तक्रारीतील त्याचे विरुध्द असलेला इतर मजकूर नाकबुल करुन तक्रार खारीज व्हावी अशी विनंती केली.
06. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-1) क्रं-2) आणि क्रं-3) यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला तसेच अभिलेखावर दाखल असलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
07. पुढे जाण्यापूर्वी हे सांगणे जरुरीचे ठरेल की, या तक्रारीत नव्याने पुरावे दाखल करुन घेऊन निकाल देण्यासाठी ज्या कारणामुळे ही तक्रार मा.राज्य आयोग, खंडपीठ नागपूर यांचे अपिलीय आदेशान्वये मंचा कडे पुन्हा फेरचौकशीसाठी पाठविण्यात आली ते असे की, मा.राज्य ग्राहक आयोगाला त्यांनी दिलेल्या निवाडयातील काही मुद्दांवर स्पष्ट पुरावा दिसून आला नाही व त्यामुळे तक्रारीतील वादा संबधी स्पष्ट अशी कल्पना आली नाही. परंतु मंचात तक्रार पुन्हा नव्याने फेर चौकशीसाठी आल्या नंतरही दोन्ही पक्षांनी कुठलाही नविन पुरावा मंचा समोर सादर केला नाही. तक्रारीतील अभिलेखावर जे काही दस्तऐवज पूर्वी पासून होते त्याच आधारे दोन्ही पक्षांनी आप-आपला युक्तीवाद मंचा समोर केला.
08. तक्रारकर्ता असोसिएशनची मुख्य तक्रार अशी आहे की, विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी याने दोन पाण्याचे कनेक्शन्स पैकी, एक पाण्याचे कनेक्शन त्याचे जवळ ठेवले आणि काही कालावधी नंतर तक्रारकर्ता असोसिएशनची परवानगी न घेता दुसरे पाण्याचे कनेक्शन सुध्दा तक्रारकर्ता असोसिएशनचे सभासद राहत असलेल्या ईमारतीतील “Sump” मध्ये जोडले परंतु त्या पाण्याचा वापर मात्र तो स्वतः करीत आहे. विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी याने दुस-या पाण्याच्या कनेक्शनचे बिलाचे पैसे भरणे बंद केले, परिणामतः तक्रारकर्ता असोसिएशनला थकीत रकमेचे पाण्याचे बिल देण्यात आले.
09. विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-2) महानगर पालिका आणि तिचे पाणी पुरवठा विभागाचे म्हणण्या नुसार पाण्याचे दोन्ही कनेक्शन्स तक्रारकर्ता असोसिएशनचे नावे करण्यात आले होते परंतु दोन्ही कनेक्शन्स वैयक्तिक नावाने (श्रीमती ए.पी.जव्हेरी यांचे नावे) असल्याने तक्रारकर्ता असोसिएशनला वारंवार सुचना देण्यात येत होती की, त्यांनी ते कनेक्शन त्यांचे नावे करवून घ्यावे, नंतर सन-2002 साली पाण्याचे दोन्ही कनेक्शन्स तक्रारकर्ता असोसिएशनचे नावाने ट्रॉन्सफर झालेत.
10. तक्रारकर्ता असोसिएशनचा वादाचा मुद्दा हा एकच पाण्याचे कनेक्शन संबधी असून त्याचा इन्डेक्स क्रं-60/11160 असा आहे. तक्रारकर्ता असोसिएशनने असे कुठेही नमुद केलेले नाही की, हे पाण्याचे कनेक्शन त्यांचे नावे केंव्हा लावण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं-3) जव्हेरी याने आपल्या लेखी जबाबा सोबत एका अर्जाची प्रत (Annexure-“A”) लावली आहे, जो अर्ज तक्रारकर्ता असोसिएशन तर्फे विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला पाण्याचे दोन्ही कनेक्शन्स ज्यांचे इन्डेक्स क्रं-60/11160 आणि इन्डेक्स क्रं-60/11190 असे आहेत, त्यांचे नावे ट्रॉन्सफर करण्यासाठी दिला होता, या अर्जावर विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागातर्फे उत्तर देण्यात आले (Annexure-“B”) व तक्रारकर्ता असोसिएशनला सुचित करण्यात आले होते की, त्यांनी कनेक्शन्स त्यांचे नावे लावून घेण्यास काही रक्कम भरावी. या विरुध्दपक्ष क्रं-2) पाणी पुरवठा विभागाच्या उत्तरा वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ता असोसिएशनने दोन्ही पाण्याचे कनेक्शन्स स्वतःचे नावे ट्रॉन्सफर करुन घेण्यासाठी दिनांक-28/02/2002 ला अर्ज केला होता. तसेच ही पण वस्तुस्थिती आहे की, तक्रारकर्ता असोसिएशन तर्फे डिमांड नुसार पैसे पण भरण्यात आले होते. या सर्व उपलब्ध दस्तऐवजी पुराव्या वरुन विरुध्दपक्ष क्रं-3) गौरव जव्हेरी याच्या म्हणण्याला पुष्टी मिळते की, पाण्याचे दोन्ही कनेक्शन्स तक्रारकर्ता असोसिएशनचे नावे सन-2002 मध्ये ट्रॉन्सफर झाले होते.
11. त्याशिवाय घटनास्थळाची तपासणी कमीश्नरा मार्फत या प्रकरणात पूर्वीच झालेली आहे आणि कमीश्नर अहवाला नुसार वादातीत पाण्याचे कनेक्शनचा मीटर क्रं-01251499 असून तो तात्पुरता बंद करण्यात आला होता. परंतु तक्रारकर्ता असोसिएशनच्या म्हणण्या नुसार वादातीत मीटरचा क्रं-83991 (इन्डेक्स क्रं-60/11160) असा आहे. यावरुन मीटरच्या क्रमांका संबधाने तक्रारकर्ता असोसिएशनचा काही संभ्रम (Confusion) झाल्याचे दिसून येते. वादातीत बिल रुपये-21,230/- तक्रारकर्ता असोसिएशनला सन-2004 साली मिळाले. वादातीत पाण्याचे मीटर तक्रारकर्ता असोसिएशनचे नावे सन-2002 मध्ये लावण्यात आले, याचाच अर्थ असा आहे की, वादातीत बिलाची रक्कम ही तक्रारकर्ता असोसिएशनने वापरलेल्या पाण्याच्या वापरा संबधीची आहे आणि म्हणून तक्रारकर्ता असोसिएशन त्या बिलाची रक्कम भरण्यास जबाबदार आहे. तक्रारकर्ता असोसिएशनने मंचा पासून महत्वाची बाब लपवून ठेवली की, त्यांनी वादातीत मीटर क्रं-60/11160 त्यांच्या नावे लावून घेण्यास अर्ज दिला होता आणि डिमांड प्रमाणे रक्कम पण भरली होती, सबब तक्रारकर्ता असोसिएशनने मंचा पासून महत्वाची बाब लपवून ठेवल्याचे दिसते.
12. वर उल्लेखित करणां वरुन असे म्हणता येणार नाही की, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) अनुक्रमे नागपूर महानगरपालिका नागपूर आणि तिचे पाणी पुरवठा विभागाने कुठलेही सबळ कारण नसताना जास्तीचे पाण्याचे बिल तक्रारकर्ता असोसिएशनचे नावे दिले व अशाप्रकारे अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला. एकंदरीत या प्रकरणा मध्ये आम्हाला ग्राहक वाद निर्माण होण्याचे कारण दिसून येत नाही आणि त्यामुळे ही तक्रार मंजूर होण्यास पात्र नाही, त्यावरुन आम्ही तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्ता अचराज टॉवर अपार्टमेंट असोसिएशन तर्फे अध्यक्ष श्री गोपाल झामनदास वंजानी यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1) आयुक्त, नागपूर महानगरपालिका नागपूर आणि इतर-2) यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.