जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 194/2019. तक्रार दाखल दिनांक : 25/07/2019. तक्रार निर्णय दिनांक : 05/02/2024.
कालावधी : 04 वर्षे 06 महिने 11 दिवस
(1) श्री. आनंद तिर्थय्या स्वामी (देवणीकर),
वय : 60 वर्षे, व्यवसाय : निवृत्तीवेतरधारक.
(2) श्री. रवि आनंद स्वामी (देवणीकर), वय : 30 वर्षे,
धंदा : व्यवसाय, दोघे रा. औरंगपुरा, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
मे. मन्मथ शिवलिंग बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स तर्फे
प्रोप्रा. ज्योती भ्र. शिवप्रसाद कोरे, वय : 45 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. देगलूर रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अश्विनी पी. कुलकर्णी / गोविंद एस. नाईक
विरुध्द पक्ष :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष यांनी उदगीर नगरपालिका हद्दीमध्ये त्यांच्या ताब्यातील व मालकीच्या मा. क्र. 4-2-200/3 जुना व 4-2-210 नवीन मध्ये 'गुरु माऊली' नांवाने तीन मजली अपार्टमेंटचे बांधकाम केले. त्या अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र. 303 ज्याचे Built up क्षेत्रफळ 734 चौ. फुट / 68.21 चौ.मी. रु.19,51,000/- किंमतीस खरेदी करण्यासाठी तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष यांच्याशी ठराव केला. दि.1/2/2018 रोजी तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष यांना फ्लॅटची संपूर्ण रक्कम दिली आणि विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांच्या हक्कामध्ये फ्लॅटचे नोंदणीकृत खरेदीखत क्र. 582/2018 करुन फ्लॅटचा ताबा दिला. ताबा घेत असताना जिन्यास ग्रील नसणे, वीज जोडणी नसणे, पार्कींग सुविधा नसणे इ. त्रुटी आढळल्या. त्याबद्दल विरुध्द पक्ष यांच्याकडे विचारणा केली असता ते कामे लवकर पूर्ण करुन देण्यात येतील, अशी हमी दिली. परंतु विरुध्द पक्ष यांनी ते अर्धवट कामे पूर्ण केले नाहीत. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविले; परंतु विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने फ्लॅटमध्ये वीज जोडणी उपलब्ध करुन देण्याचा, फ्लॅटमधील जिन्यास व बाल्कनीस ग्रील बसवून देण्याचा व पार्कींग सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केली आहे. तसेच मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्च मिळावा, अशी त्यांची विनंती आहे.
(2) विरुध्द पक्ष .यांना जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले. मात्र ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(3) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार व त्यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले.
(4) तक्रारकर्ते यांच्या फ्लॅट क्र. 303 चे खरेदीखत अभिलेखावर दाखल आहे. तसेच तक्रारकर्ते यांनी पुराव्यामध्ये छायाचित्रे दाखल केले आहेत. विरुध्द पक्ष हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित असून तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार व दाखल पुराव्यांचे त्यांनी खंडन केले नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्रांना विरोधी पुरावा नाही.
(5) कागदपत्रे व वाद-तथ्यांच्या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून फ्लॅट क्र. 303 खरेदी केला, हे सिध्द होते. तक्रारकर्ते यांच्या कथनानुसार फ्लॅटचा ताबा घेत असताना जिन्यास ग्रील नसणे, वीज जोडणी नसणे, पार्कींग सुविधा नसणे इ. त्रुटी होत्या आणि ते कामे लवकर पूर्ण करुन देण्यात येतील, अशी विरुध्द पक्ष यांनी हमी दिलेली होती. पाठपुरावा केल्यानंतरही विरुध्द पक्ष यांनी त्रुटीयुक्त कामे पूर्ण केले नाहीत, हा तक्रारकर्ते यांचा मुख्य वाद आहे.
(6) खरेदीखताचे अवलोकन केले असता त्यामध्ये "सदरील मिळकतीत अंडरग्राऊंडला समाईक पार्कींगसाठी जागा सोडण्यात आलेली आहे. त्यावर लिहून घेणार यांचा वापर करण्याचा इतर फ्लॅटधारकासोबत समान हक्क असेल", असे नमूद आहे. विरुध्द पक्ष यांनी अंडरग्राऊंडला पार्कींग व्यवस्था उपलब्ध करुन दिली नाही, हे सिध्द करण्यासाठी उचित पुरावा नाही. फ्लॅटमध्ये वीज जोडणी उपलब्ध नसणे आणि फ्लॅटमधील जिन्यास व बाल्कनीस ग्रील बसविलेले नसणे याबद्दल तक्रारीची दखल घेतली असता इमारतीमध्ये पाय-या व अन्य आवश्यक ठिकाणी ग्रील बसविलेले नाहीत, असे निदर्शनास येते. मात्र तक्रारकर्ते यांना विक्री केलेल्या सदनिकेमध्ये विद्युत जोडणी देण्याचे दायित्व विरुध्द पक्ष यांनी स्वीकारले किंवा त्याकरिता रक्कम स्वीकारली, असा पुरावा नाही. उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ते यांच्या फ्लॅटच्या इमारतीचा अविभाज्य घटक व पायाभूत असणा-या जिना व बाल्कनीस ग्रील बसविले नसल्याचे सिध्द होते आणि ते कृत्य विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. त्याप्रमाणे तक्रारकर्ते अनुतोषास पात्र ठरतात, या निष्कर्षास आम्ही येत आहोत.
(7) तक्रारकर्ते यांनी मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्च मागणी केलेला आहे. नुकसान भरपाई रकमेची निश्चिती त्या–त्या परिस्थितीजन्य गृहीतकावर अवलंबून असते. असे दिसते की, तक्रारकर्ते यांना फ्लॅटच्या त्रुटीसंबंधी विरुध्द पक्ष यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ते यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो आणि तक्रारकर्ते यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मंजूर करणे न्यायोचित आहे.
(8) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना विक्री केलेल्या फ्लॅट क्र. 303 च्या इमारतीमध्ये जिना व बाल्कनीस ग्रील बसवून द्यावेत.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-