निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार ही यशवंत सुभाष होपळे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती मयत यशवंत सुभाष होपळे यांचा दिनांक 23/07/2013 रोजी शेताला कामासाठी गेले असतांना काम अटोपून परत गावाकडे येत असतेवेळेस त्यांच्या नेहमीच्या रस्त्यातील नदीला पूर आल्याने ते इतर मार्गाने पांदन रस्त्याने गावाकडे येत असतांना दिगांबर कहाळेकर यांच्या शेताचे कुंपण व बाजुस ग्रा.पं. कहाळा बु. ची वाटर सप्लायची मोटार वायर तसेच एम.एस.ई.बी. चा मोठा पोल होता. सदर पोलच्या तनावास अर्जदाराचे पतीचा हात लागल्याने विदयुत शॉक लागून त्यांचा अपघाती मृत्यु झाला. पोलीस स्टेशन कुंटूर ता. नायगांव जि. नांदेड यांनी अपघाती मृत्युची नोंद क्र. 17/2013 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे घेवून घटनास्थळ पंचनामा केला व साक्षीदारांचे बयाण घेतले. अर्जदाराचे पती व्यवसायाने शेतकरी होते. त्यांच्या नावे मौजे कहाळा बु. ता. नायगांव जि. नांदेड येथे गट नं. 259 मध्ये 00 हे 56 आर शेतजमीन आहे. त्या जमिनीचे ते मालक व ताबेदार होते.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार पतीच्या मृत्युपश्चात अर्जदार हिने विमा रक्कम मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, नायगांव यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 07/10/2013 रोजी अर्ज केला. तालुका कृषी अधिकारी, नायगांव यांनी गैरअर्जदार 3 मार्फत विमा कंपनीस अर्जदाराचा विमा प्रस्ताव पाठवला. विमा कंपनी यांनी दिनांक 15/03/2014 रोजीचे पत्राद्वारे कळविले की, ‘वरील दाव्यासंबंधी कागदपत्राच्या पूर्ततेसाठी/ खुलाशासाठी विनंतीपत्र दिनांक. 14/01/2014 आणि दिनांक. 03/03/2014 रोजी पाठविण्यात आलेली होती तरी ही कागदपत्रे/ खुलासा विमा कंपनीस प्राप्त झालेला नाही. शेतकरी योजनेप्रमाणे दावा दाखल करण्याची मुदत 22/12/2013 पर्यंत होती परंतू त्यानंतरही विमा कंपनीने पुरेसा कालावधी देवूनही आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्यामुळे नाइलाजास्तव दावा बंद करण्यात येत आहे’. असे कळवून अर्जदाराचा विमा प्रस्ताव बेकायदेशीररित्या फेटाळून सेवेत त्रुटी दिली आहे. त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार 2 विमा कंपनी यांच्याकडून विमा रक्कम रु. 1,00,000/- दिनांक 07/10/2013 पासून 12 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी अर्जदार यांनी तक्रारीद्वारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे.
गैरअर्जदार क्र. 1 तालुका कृषी अधिकारी, नायगांव यांच्या विरुध्द जिल्हा ग्राहक मंचासमोर अन्य तक्रारीही प्रलंबित आहेत. त्यांना नोटीस तामील झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, नायगांव यांनी सर्व प्रकरणात एकत्रित लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबातील कथन थोडक्यात पुढील प्रमाणे आहे. शेतक-यांनी अपघात विमा योजनेचा प्रस्ताव सादर केलेले होते. त्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आले. त्यानंतर त्रुटीमुळे काही प्रस्ताव परत आलेले होते. सदरील प्रस्ताव त्या त्यावेळी त्रुटीची पूर्तता करुन परत सादर करण्यात आलेले आहेत. परंतू अर्जदाराने सदरचा प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता विमा कंपनीने वेळोवेळी कळवून देखील केलेली नसल्यामुळे अर्जदाराचा विमा दावा विमा कंपनीने बंद करण्यात येत आहे असे कळविले आहे. त्यानुसार अर्जदार यांना कळविलेले आहे.
4. गैरअर्जदार 2 यांना नोटीस तामील झाल्यानंतर त्यांच्यावतीने †ò›ü. अविनाश कदम यांनी वकीलपत्र दाखल केलेले आहे. अनेक संधी देऊनही गैरअर्जदार क्र. 2 यांनी लेखी जबाब दाखल न केल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांचेविरुध्द नोसेचा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार 3 डेक्कन इन्शुरन्स †òन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
5. अर्जदाराचे सदरील प्रकरणामध्ये गैरअर्जदार क्र. 3 यांची व्यवहारातील भुमिका मर्यादीत आहे. महाराष्ट्र शासन, गैरअर्जदार क्र. 3 व विमा कंपनी यांचेत त्रीपक्षीय करार झालेला असून सदरील करारामध्ये नमुद केलेली मध्यस्थाची भुमिका गैरअर्जदार पार पारीत असतात. गैरअर्जदार क्र. 3 यांचे काम हे फक्त करारातील तरतुदीनुसार दावे स्विकारणे, त्यांची छाननी करणे, त्रुटी असल्यास त्याचा पाठपुरावा करुन पुर्तता करणे व ताबडतोब दावे विमा कंपनीस पाठविणे एवढेच आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 यांना जबाबदार धरण्यात येऊ नये.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार हिने तक्रारीसोबत दाखल केलेल्या 7/12 चा उता-यावरुन अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी असल्याचे निदर्शनास येते. तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा अपघाती झालेला असल्याचे निदर्शनास येते. पतीच्या मृत्युपश्चात अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार विमा रक्कम मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केलेला होता. तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव सदर योजनेनुसार विमा कंपनीकडे पाठवलेला असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार 2 फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांना प्रस्ताव मिळाल्यानंतरही विमा कंपनीने दिनांक 15.03.2014 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव बंद केलेला आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा दावा बंद करतांना कागदपत्राच्या पुर्ततेसाठी दिनांक 14.01.2014 व दिनांक 03.03.2014 रोजी पत्र दिलेले होते. परंतु कागदपत्राच्या पुर्ततेसंदर्भात खुलासा प्राप्त न झाल्याने दावा बंद केलेला आहे असे कारण दिलेले आहे. अर्जदार यांनी दिनांक 03.03.2014 रोजीचे पत्र उशीराने मिळालेले असल्याने दिनांक 13.03.2014 रोजी त्रुटीची पुर्ततासाठी गैरअर्जदार यांना पत्र दिलेले आहे. तसेच तालुका कृषि अधिकारी यांनी अर्जदारास दिलेल्या दिनांक 03.05.2014 रोजीच्या पत्रातही अर्जदाराने त्रुटीची पुर्तता दिनांक 13.03.2014 रोजी केलेली असल्याचे नमुद केलेले आहे. सदरील पुर्ततेची कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनी यांना मिळणेपुर्वीच विमा कंपनीने अर्जदाराचा दावा बंद केलेला आहे. यावरुन विमा कंपनीने अर्जदारास संधी न देताच अर्जदाराचा दावा बंद केलेला असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्र. 3 डेक्कन इंशुरन्स कंपनी यांनी अर्जदारास विमा कंपनीने पाठविलेल्या कागदपत्रांच्या पुर्ततेसंदर्भातील पत्र दाखल केलेले आहेत. त्यानुसार विमा कंपनीस 6-क दाखला, साक्षांकीत केलेल्या प्रथम माहिती अहवाल व संपूर्ण शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता होती. अर्जदाराने वरील सर्व कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत. सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदार ही योजनेची लाभार्थी असल्याचे स्पष्ट होते.
महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना ही शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर त्याच्या कुटूंबियांना येणा-या अडचणीवर मात करण्यासाठी सुरु केलेली आहे. असे असतांना विमा कंपनी ही सदरील प्रस्ताव अत्यंत निष्काळजीपणाने हाताळीत असल्याचे दिसून येते त्यामुळे विमा कंपनीने अर्जदाराचा प्रस्ताव हा चुकीच्या कारणामुळे नाकारलेला असल्याचे सिध्द होते. वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनी यांनी अर्जदार रक्कम रु. 1,00,000/- दिनांक 15.03.2014 दावा बंद केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत अदा करावेत.
4. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले
जाईल.
>
जाईल.