निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार ही मयत व्यंकटराव बाबजी ताटे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती मयत व्यंकटराव बाबजी ताटे यांचा दिनांक 25/08/2013 रोजी त्यांच्या गावातील मंदीराच्या बांधकामाचे सिमेंटचे ऑडर देण्यासाठी मिस्त्री नामदेव पवळे यांच्या मोटर सायकलवर पाठीमागे बसून नायगांवकडे जात असतांना, नायगांव ते नांदेड रोडवरील अमृत ढाब्या समोरुन नायगांवकडे जात असतांना समोरुन येणा-या टेम्पोच्या चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो हयगयी व निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून अर्जदाराच्या पतीच्या मोटार सायकलला धडक दिल्याने अर्जदाराचे पती सदर अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना विलाजाकामी आधार हॉस्पीटल नांदेड येथे शरीक केले असता उपचार चालू असतांना त्यांचा अपघाती मृत्यु झाला. पोलीस स्टेशन नायगांव यांनी गुन्हा क्र. 66/2013 कलम 279, 304(अ) आय.पी.सी. प्रमाणे नोंदवून घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराचे पती व्यवसायाने शेतकरी होते. त्यांच्या नावे मौजे टाकळगांव ता. नायगांव जि. नांदेड येथे गट नं. 48 मध्ये 00 हे 27 आर शेतजमीन आहे. त्या जमिनीचे ते मालक व ताबेदार होते.
3. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार पतीच्या मृत्युपश्चात अर्जदार हिने विमा रक्कम मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, नायगांव यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 16/11/2013 रोजी अर्ज केला. तालुका कृषी अधिकारी, नायगांव यांनी गैरअर्जदार 3 मार्फत विमा कंपनीस अर्जदाराचा विमा प्रस्ताव पाठवला. दिनांक 28/03/2014 रोजी विमा कंपनीस प्रस्ताव प्राप्त झाला. विमा कंपनी यांनी दिनांक 29/03/2014 रोजीचे पत्राद्वारे कळविले की, दाव्यासंबंधात आपण पाठवलेली कागदपत्रे मिळाली. शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे दावा दाखल करण्याची मुद्दत दिनांक 29/01/2014 पर्यंत होती परंतू तुमचा दावा आम्हाला दिनांक 28/02/2014 रोजी मिळालेला आहे. सदरील दावा योजनेच्या मुदतीनंतर पाठवण्यात आलेला असल्यामुळे हा दावा आमची कंपनी ग्राहय धरु शकत नाही तरी तुमचा दावा फेटाळण्यात येत आहे, असे कारण सांगून अर्जदाराचा विमा दावा विमा कंपनीने नाकारलेला आहे. त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार 2 विमा कंपनी यांच्याकडून विमा रक्कम रु. 1,00,000/- दिनांक 29/03/2014 पासून 12 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी अर्जदार यांनी तक्रारीद्वारे केलेली आहे.
4. गैरअर्जदार 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे.
गैरअर्जदार क्र. 1 तालुका कृषी अधिकारी, नायगांव यांच्या विरुध्द जिल्हा ग्राहक मंचासमोर अन्य तक्रारीही प्रलंबित आहेत. त्यांना नोटीस तामील झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, नायगांव यांनी सर्व प्रकरणात एकत्रित लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबातील कथन थोडक्यात पुढील प्रमाणे आहे. शेतक-यांनी अपघात विमा योजनेचा प्रस्ताव सादर केलेले होते. त्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आले. त्यानंतर त्रुटीमुळे काही प्रस्ताव परत आलेले होते. सदरील प्रस्ताव त्या त्यावेळी त्रुटीची पूर्तता करुन परत सादर करण्यात आलेले आहेत. परंतू अर्जदाराने सदरचा प्रस्ताव उशीरा सादर केल्यामुळे सदरचा दावा विमा कंपनीने नामंजूर करुन परत पाठवलेला आहे. त्यानुसार अर्जदार यांना कळविलेले आहे.
5. गैरअर्जदार 2 यांना नोटीस तामील झाल्यानंतर त्यांच्यावतीने †ò›ü.अविनाश कदम यांनी दिनांक 22/12/2014 रोजी वकीलपत्र दाखल केले. परंतू अनेक संधी देवूनही लेखी जबाब दाखल केलेला नाही त्यामुळे दिनांक 13/01/2015 रोजी गैरअर्जदार यांच्याविरुध्द नो-सेचा आदेश पारीत करण्यात आला.
6. गैरअर्जदार 3 डेक्कन इन्शुरन्स †òन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांचा लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
7. अर्जदाराचे सदरील प्रकरणामध्ये गैरअर्जदार क्र. 3 यांची व्यवहारातील भुमिका मर्यादीत आहे. महाराष्ट्र शासन, गैरअर्जदार क्र. 3 व विमा कंपनी यांचेत त्रीपक्षीय करार झालेला असून सदरील करारामध्ये नमुद केलेली मध्यस्थाची भुमिका गैरअर्जदार पार पारीत असतात. गैरअर्जदार क्र. 3 यांचे काम हे फक्त करारातील तरतुदीनुसार दावे स्विकारणे, त्यांची छाननी करणे, त्रुटी असल्यास त्याचा पाठपुरावा करुन पुर्तता करणे व ताबडतोब दावे विमा कंपनीस पाठविणे एवढेच आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 यांना जबाबदार धरण्यात येऊ नये.
8. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
7. अर्जदार हिने तक्रारीसोबत दाखल केलेल्या 7/12 चा उता-यावरुन अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी असल्याचे निदर्शनास येते. तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन अर्जदाराच्या पतीचा मृत्यु हा अपघाती झालेला असल्याचे निदर्शनास येते. पतीच्या मृत्युपश्चात अर्जदाराने महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार विमा रक्कम मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विमा प्रस्ताव दाखल केलेला होता. तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा विमा प्रस्ताव सदर योजनेनुसार विमा कंपनीकडे पाठवलेला असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार 2 फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांना प्रस्ताव मिळाल्यानंतरही विमा कंपनीने दिनांक 29/03/2014 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव फेटाळलेला आहे. गैरअर्जदार 2 विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव फेटाळत असतांना दिलेले कारण असे आहे की, विमा कंपनीस दयाव्या संबंधाची सर्व कागदपत्रे मिळालेली असून शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे दावा दाखल करावयाची मुदत ही दिनांक 29/01/2014 पर्यंत होती परंतू तुमचा दावा आम्हाला दिनांक 28/03/2014 रोजी मिळालेला आहे त्यामुळे नमूद केलेल्या कालावधीनंतर प्रस्ताव पाठवलेला असल्याने सदरील दावा कंपनी ग्राहय धरु शकत नाही या कारणामुळे अर्जदाराचा प्रस्ताव दिनांक 29/03/2014 रोजी विमा कंपनीने फेटाळलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ज्यादिवशी दावा दाखल केला त्याच दिवशी विमा कंपनीला दावा मिळाला असे गृहीत धरण्यात यावे अशी सुचना दिलेली असतांनाही विमा कंपनीने सदरील दावा विहीत कालावधीत मिळालेला नसल्याचे चुकीचे कारण दाखवून फेटाळलेला आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांच्या लेखी जबाबाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार 3 यांनीही विमा कंपनीला विनंती केली आहे की, त्यांनी दावे उशीरा मिळाले या कारणास्तव नाकारु नये. त्यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार विमा दावा तालुका कृषी अधिकारी यांना ज्या दिनांकास प्राप्त होईल त्याच दिनांकास विमा कंपनीस दावा प्राप्त झाला असे समजण्यात येईल असे पत्रही विमा कंपनीला दिनांक 13/05/2014 रोजी पाठवलेले आहे, असे असतांनाही गैरअर्जदार 2 विमा कंपनी यांनी अर्जदाराचा प्रस्ताव दिनांक 28/03/2014 रोजी प्राप्त झाल्यानंतर लगेच दुस-या दिवशी म्हणजेच दिनांक 29/03/2014 रोजी कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांची छाननी, पडताळणी किंवा पाहणी न करता अत्यंत त्वरेने अर्जदाराच्या प्रस्तावावर निर्णय घेतलेला असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजना ही शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर त्याच्या कुटूंबियांना येणा-या अडचणीवर मात करण्यासाठी सुरु केलेली आहे. असे असतांना विमा कंपनी ही सदरील प्रस्ताव अत्यंत निष्काळजीपणाने हाताळीत असल्याचे दिसून येते त्यामुळे विमा कंपनीने अर्जदाराचा प्रस्ताव हा चुकीच्या कारणामुळे नाकारलेला असल्याचे सिध्द होते.
वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनी यांनी अर्जदार रक्कम रु. 1,00,000/- दिनांक 29.03.2014 दावा नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत अदा करावेत.
4. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले
जाईल.