जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 159/2020. तक्रार दाखल दिनांक : 26/10/2020. तक्रार निर्णय दिनांक : 30/11/2022.
कालावधी : 02 वर्षे 01 महिने 04 दिवस
जाहेदा भ्र. सत्तार पटेल, वय 53 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. अलअमीन नगर, जळकोट रोड, उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) पुष्पक मेडीकल, प्रो. विलास चोले,
विश्वकर्मा हॉस्पिटल, उदगीर, ता. उदगीर, जि.लातूर.
(2) डॉ. प्रशांत चोले, विश्वकर्मा हॉस्पिटल,
बिदर रोड, उदगीर, ता. उदगीर, जि.लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- के.व्ही. शेख
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- आर.पी. नावंदर
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, मधुमेह व रक्तदाब असल्यामुळे त्यांनी दि.5/7/2020 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडे वैद्यकीय तपासणी केली. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिलेल्या औषध चिठ्ठीनुसार विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या दुकानातून अर्धी औषधे खरेदी केली. त्यावेळी औषध खरेदी पावती देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नकार दिला. तक्रारकर्ती यांनी औषधांचे सेवन सुरु केले असता प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांच्या मुलाने औषधांची तपासणी केली असता Gepride M1 औषध मे 2020 मध्ये कालबाह्य झाल्याचे आढळले. डॉ. पटेल यांच्या सल्ल्यानुसार रक्त प्रयोगशाळेमध्ये तपासणी केली असता रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तक्रारकर्ती यांचा मुलगा फेरोज यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे दि.24/8/2020 रोजी Gepride M1 औषधाची मागणी केली असता पुन्हा कालबाळ्य औषध देण्यात आले. त्याबाबत विचारणा केली असता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी उध्दट वर्तन केले. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी त्यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी प्रत्येकी रु.5,00,000/- नुकसान भरपाई व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदन दाखल केले. ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ती किंवा त्यांचा मुलगा फिरोज यांनी विहीत औषधे खरेदी करण्यासाठी मे, जुन, जुलै व ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्या दुकानात आलेले नाहीत. त्यांचे दुकान वैद्यकीय नियम व त्या अंतर्गत लागू निर्देशावर चालते. नियमानुसार वैद्यकीय अधिका-यांच्या औषधी चिठ्ठीशिवाय औषधे विक्री किंवा वितरीत करता येत नाहीत. त्यांनी तक्रारकर्ती किंवा त्यांच्या मुलास औषधे विक्री केलेले नाहीत. तक्रारकर्ती यांनी औषधे खरेदी केल्याचा पुरावा व प्रकृती खालावल्यासंबंधी पुरावा सादर केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायद्याला अभिप्रेत बाबीनुसार 'ग्राहक' संज्ञेत येणारा व्यवहार दिसत नसल्यामुळे जिल्हा आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये तक्रार येत नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी,अशी विनंती केली.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी निवेदन दाखल केले आहे. ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, बाह्य रुग्ण विभागामध्ये तक्रारकर्ती यांच्या शरीर प्रकृतीनुसार व आजाराचे निदान करुन लेखी स्वरुपात औषधे घेण्यासाठी निर्देशीत केले. प्रस्तुत प्रकरणामध्ये विरुध्द पक्ष क्र.2 यांची काय जबाबदारी आहे, हे स्पष्ट केलेले नाही. त्यांना अनावश्यक पक्षकार केलेले आहे. अंतिमत: रु.10,00,000/- नुकसान भरपाई देण्यासह तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(4) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ती "ग्राहक" संज्ञेत येतात काय ? नाही.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- वाद-तथ्यांनुसार विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ती यांना कालबाह्य Gepride M1 औषधीची विक्री केली काय ? हा प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्ती यांनी Gepride M1 औषधी खरेदी करणे, त्याची विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्याची पावती न देणे, Gepride M1 औषध कालबाह्य असणे इ. बाबत उभयतांचे वाद-प्रतिवाद दिसून येतात. विरुध्द पक्ष क्र.1 यांचा बचाव असा की, ग्राहक संरक्षण कायद्याला अभिप्रेत बाबीनुसार 'ग्राहक' संज्ञेत येणारा व्यवहार दिसत नसल्यामुळे जिल्हा आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये तक्रार येत नाही. वादविषयाच्या अनुषंगाने औषधे खरेदीची पावती महत्वपूर्ण बाब आहे आणि ती अभिलेखावर दाखल नाही. त्यासंबंधी उभय पक्षांनी शपथपत्राद्वारे आपले निवेदन व भुमिका स्पष्ट केलेली आहे. या ठिकाणी कालबाह्य औषध विक्री केल्याचा वाद उपस्थित असल्यामुळे औषध खरेदीची पावती महत्वूपर्ण पुरावा ठरतो. वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ती यांना वादकथित औषधे कालबाह्य स्वरुपात विक्री केल्याचे सिध्द होत नाही. तक्रारकर्ती ह्या विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या "ग्राहक" नसल्यामुळे व विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि ग्राहक तक्रार नामंजूर करणे न्यायोचित आहे. तक्रारकर्ती अनुतोषास पात्र नसल्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-