जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 298/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 04/11/2022.
तक्रार दाखल दिनांक : 21/11/2022. तक्रार निर्णय दिनांक : 30/09/2024.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 26 दिवस
संभाजी दिगंबर पाटील, वय 24 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. मु. पो. डाऊळ (हि.), ता. उदगीर, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
प्रोप्रायटर, तिरुमल्ला बोअरवेल्स्,
दुधिया हनुमान मंदिरासमोर, बिदर रोड, उदगीर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, डाऊळ (हि.), ता. उदगीर येथे त्यांना गट क्र. 9/1 मध्ये 86 आर. शेतजमीन क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये कुपनलिका (बोअर-वेल) घेण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क करुन दि.4/5/2022 रोजी 255 फुट कुपनलिका खोदण्यात आली आणि त्यांच्या कुपनलिकेस चांगले पाणी लागलेले होते. कुपनलिकेसाठी 69 फुट आवरण पाईप (केसिंग पाईप) टाकण्यात आला; जो 11 फुट कमी टाकण्यात आलेला होता. कुपनलिका व आवरण पाईप इ. करिता आलेला खर्च रु.64,590/- रोख स्वरुपात विरुध्द पक्ष यांना अदा करण्यात आला.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांनी रु.40,940/- खर्च करुन विद्युत पंप व अनुषंगिक साहित्य खरेदी केले. त्यांनी कुपनलिकेमध्ये 240 फुट अंतरापर्यंत विद्युत पंप सोडला आणि पहिल्या दिवशी विद्युत पंप सुरु केला असता 8 तास पाणी आले. मात्र दुस-या दिवशी विद्युत पंप सुरु केला असता कुपनलिकेतून पाणी येत नव्हते. त्यामुळे विद्युत पंप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेर आला नाही. विरुध्द पक्ष यांनी कुपनलिकेमध्ये 11 फुट कमी आवरण पाईप बसविल्यामुळे कुपनलिकेमध्ये माती ढासळून विद्युत पंप अडकून बसला आणि केवळ पाईप व वायर केबल तुटून बाहेर आले.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांना दुसरी कुपनलिका खोदून देण्याची व विद्युत पंपाकरिता केलेला खर्च देण्याची विनंती केली असता विरुध्द पक्ष यांनी अरेरावीची भाषा केली. कुपनलिकेमध्ये 11 फुट कमी आवरण पाईप बसविल्यामुळे विद्युत पंप अडकून पडला आणि तक्रारकर्ता यांचे नुकसान झाले आहे. विरुध्द पक्ष यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे नमूद करुन कुपनलिका खोदण्यासह त्यामध्ये 70 फुट आवरण पाईप व 3 अश्वशक्तीचा विद्युत पंप बसवून देण्याचा किंवा तक्रारकर्ता यांनी कुपनलिकेसाठी केलेला खर्च व विद्युत पंपासह साहित्य खर्च एकूण रु.1,05,530/- व्याजासह देण्याचा; शेतीचे नुकसान रु.30,000/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) जिल्हा आयोगाच्या सूचनापत्राची बजावणी झाल्यानंतर विरुध्द पक्ष जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
(6) वाद-तथ्ये व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांना डाऊळ (हि.), ता. उदगीर येथे गट क्र. 9/1 मध्ये 0.86 हे. शेतजमीन क्षेत्र असल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून कुपनलिकेसाठी 255 फुट खोदकाम केल्याचे व कुपनलिकेसाठी 69 फुट आवरण पाईप खरेदी केल्याचे एकूण रु.64,590/- रकमेचे देयक अभिलेखावर दाखल आहे. कुपनलिकेमध्ये सोडण्यासाठी विद्युत पंप व त्याकरिता आवश्यक साहित्य खरेदी केल्याचे देयक अभिलेखावर दाखल आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून कुपनलिकेचे खोदकाम करुन किंवा त्याचा खर्च देण्यासह विद्युत पंपाचा खर्च देण्याबद्दल कळविलेले दिसून येते.
(7) विरुध्द पक्ष हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित आहेत. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व त्यांच्याद्वारे दाखल कागदपत्रांकरिता खंडन, प्रतिकथन व विरोधी पुरावा नाही.
(8) तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद असा की, विरुध्द पक्ष यांनी कुपनलिका खोदल्यानंतर आवश्यक खोलीपर्यंत आवरण पाईप न बसविल्यामुळे कुपनलिकेमध्ये माती पडून चिखल झाला आणि पाणी येण्याचे बंद होऊन तक्रारकर्ता यांनी बसविलेला विद्युत पंप अडकून पडला. पाठपुरावा करुनही विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. कुपनलिकेचा लाभ तक्रारकर्ता यांना मिळू शकला नाही आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
(9) वाद-तथ्ये, विधिज्ञांचा युक्तिवाद व अभिलेखावर कागदपत्रांची दखल घेतली असता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये कुपनलिकेचे खोदकाम करुन त्या कुपनलिकेमध्ये 69 फुट आवरण पाईप बसविल्याचे मान्य करावे लागेल. किसान मशिनरी स्टोअर्स, उदगीर यांचे दि.13/5/2022 रोजीचे देयक पाहता तक्रारकर्ता यांनी विद्युत पंप व अनुषंगिक अन्य साहित्य खरेदी केल्याचे मान्य करावे लागते. विद्युत पंप अडकल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविल्याचे दिसून येते. असे दिसते की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्यातर्फे विधिज्ञांनी पाठविलेले सूचनापत्र स्वीकारले नाही किंवा जिल्हा आयोगाचे सूचनापत्र स्वीकारलेले नाही. स्पष्ट अर्थाने, तक्रारकर्ता यांच्या कुपनलिकेमध्ये निर्माण झालेल्या दोषाची विरुध्द पक्ष यांना माहिती होती, हाच निष्कर्ष निघतो. वादाच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या कुपनलिकेमध्ये बसविण्यात आलेले आवरण पाईप योग्य व आवश्यक लांबीचे होते, हे सिध्द करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तथ्ये व कागदपत्रे पाहता तक्रारकर्ता यांच्या कुपनलिकेमध्ये अपुरे आवरण पाईप बसविल्यामुळे माती पडून पाणी बंद झाले आणि विद्युत पंप बाहेर काढताना अडकून पडला, हेच संयुक्तिक अनुमान निघते. उक्त विवेचनाअंती विरुध्द पक्ष यांनी कुपनलिकेमध्ये अपु-या लांबीचा आवरण पाईप बसविल्यामुळे कुपनलिका कायमस्वरुपी बंद पडल्याचे व विद्युत पंप अडकून पडल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केली आणि तक्रारकर्ता यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(10) तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 39 अंतर्गत अनुतोष मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारकर्ती यांच्या अनुतोष मागणीनुसार कुपनलिका खोदण्यासह त्यामध्ये 70 फुट आवरण पाईप व 3 अश्वशक्तीचा विद्युत पंप बसवून देण्याचा किंवा तक्रारकर्ता यांनी कुपनलिकेसाठी केलेला खर्च व विद्युत पंपासह साहित्य खर्च एकूण रु.1,05,440/- व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करणे न्यायोचित राहील, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(11) कुपनलिका बंद पडल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी रु.30,000/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे. हे सत्य आहे की, तक्रारकर्ता यांनी पिकांना पाणी देण्यासाठी कुपनलिका घेतलेली होती आणि कुपनलिकेमध्ये विद्युत पंप बसविलेला होता. तक्रारकर्ता यांच्याकडे विद्युत जोडणी असल्याचा पुरावा नाही. पुराव्याअभावी नुकसान भरपाईची गणणा करणे शक्य नसले तरी सर्वसाधारण अनुमानाच्या आधारे व योय विचाराअंती रु.20,000/- नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षास आम्ही येत आहोत.
(12) तक्रारकर्ता यांनी शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.20,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. अशाप्रकारे नुकसान भरपाई निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित झाले पाहिजेत. कुपनलिका बंद पडून त्यामध्ये विद्युत पंप अडकून पडल्यानंतर त्याचे योग्य निराकरण न झाल्यामुळे व पाठपुरावा करुनही विरुध्द पक्ष यांनी दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. शिवाय, कायदेशीर कार्यवाहीकरिता सूचनापत्र पाठविणे, विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. उक्त स्थिती पाहता, तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मंजूर करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) (अ) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या शेतजमीन क्षेत्रामध्ये त्यांच्याद्वारे निर्देशीत ठिकाणी 8 इंच कुपनलिका 255 फुटापर्यंत खोदून त्यामध्ये 70 फुट केसिंग बसवून द्यावा. तसेच, त्यामध्ये 3 अश्वशक्ती विद्युत पंप सर्व साहित्यासह बसवून द्यावा.
अथवा
(ब) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कुपनलिका खोदण्यासाठी करावा लागलेला खर्च रु.64,590/- व विद्युत पंपासह अनुषंगिक साहित्याचा खर्च रु.40,850/- याप्रमाणे एकूण रु.1,05,440/- दि.4/5/2022 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने द्यावेत.
(3) विरुध्द पक्ष यांनी उक्त आदेश (2) (अ) ची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत न केल्यास आदेश क्र. 2 (ब) प्रमाणे तक्रारकर्ता यांना रक्कम अदा करणे बंधनकारक राहील.
(4) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना पिकाच्या नुकसान भरपाई रु.20,000/-; शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-