Maharashtra

Latur

CC/37/2023

महादेव रमाकांत नलवाडे - Complainant(s)

Versus

प्रो. प्रा. तन्वी अ‍ॅग्रो एजंसी - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. के. जवळकर

26 Sep 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/37/2023
( Date of Filing : 06 Feb 2023 )
 
1. महादेव रमाकांत नलवाडे
लातूर
...........Complainant(s)
Versus
1. प्रो. प्रा. तन्वी अ‍ॅग्रो एजंसी
लातूर
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MS. Vaishali M. Borade MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 26 Sep 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 37/2023.                                 तक्रार नोंदणी दिनांक : 06/02/2023.

                                                                                         तक्रार दाखल दिनांक : 14/02/2023.                                                                                       तक्रार निर्णय दिनांक : 26/09/2024.

                                                                                        कालावधी :  01 वर्षे 07 महिने 20 दिवस

 

महादेव रमाकांत नलावडे, वय 40 वर्षे,

व्यवसाय : शेती, रा. चांडेश्वर, ता. जि. लातूर.                                             :-          तक्रारकर्ता

 

                        विरुध्द

 

(1) प्रोप्रायटर, तन्वी ॲग्रो एजन्सी, रा. बोरी, पो. बोरी, ता. जि. लातूर.

(2) व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.), जे एस सिड्स ॲन्ड ॲग्रोटेक,

     विठ्ठल मंदीर रोड, खांडवा, मध्यप्रदेश - 450 001.                              :-          विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :-  श्री. अनिल के. जवळकर

विरुध्द पक्ष :-  अनुपस्थित / एकतर्फा

 

आदेश 

 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांची मौजे चांडेश्वर येथे गट क्र. 157 मध्ये 4 हेक्टर 33 आर. शेतजमीन आहे. त्या क्षेत्रामध्ये सोयाबीन पीक घेण्यासाठी तक्रारकर्ता यांनी दि.28/5/2022 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याद्वारे उत्पादीत सोयाबीन बियाणे ज्याचे प्रतिपिशवी रु.3,500/- मुल्य असणा-या एकूण 6 पिशव्या रु.21,000/- किंमतीस खरेदी केल्या. त्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 यांनी त्यांना संगणीकृत देयक क्र. एस/आरटी/22-23/27 दिले आहे. शेतजमिनीची मशागत करुन व ओलावा असताना बुरशीनाशक लावून व खताचा वापर करुन 2 हेक्टर 40 आर. क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे बियाण्याची पेरणी केली. परंतु 8 ते 10 दिवसानंतर 3 पिशव्यातील बियाण्याची उगवण अत्यंत तुरळक आढळून आली. त्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 यांना कळविले आणि त्यांच्या सूचनेनुसार तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती, लातूर यांच्याकडे तक्रार नोंदविली. दि.25/7/2022 रोजी तालुका तक्रार निवारण समितीने तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये पीक पाहणी करुन अहवाल दिला आणि 9 टक्के बियाण्याची उगवण झाल्याचे व बियाण्यातील दोषामुळे कमी उगवण क्षमता असल्याचे नमूद केले. अशाप्रकारे, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी त्यांना निकृष्ठ दर्जाचे सोयाबीन बियाणे विक्री व पुरवठा केलेले आहे.

(2)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, शेतजमिनीची मशागत व पेरणीकरिता प्रतिएकर रु.6,500/- खर्च आलेला आहे. तक्रारकर्ता यांना प्रतिएकर 12 क्विंटल उत्पन्न अपेक्षीत होते आणि रु.5,100/- दरानुसार 1 हेक्टर 20 आर. क्षेत्रामध्ये 36 क्विंटलकरिता रु.1,83,600/- चे उत्पन्न मिळाले असते. त्यामधून रु.19,500/- खर्च वजा जाता रु.1,64,100/- चे निव्वळ नुकसान सहन करावे लागले. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी नुकसान भरपाई देण्याकरिता दखल घेतलेली नाही.

(3)       उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.1,64,100/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.

(4)       तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर 7/12 उतार, 8-अ उतारा, बियाणे खरेदी पावती, पंचनामा, पत्रव्यवहार, बाजास समितीचे पत्र, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना विधिज्ञांमार्फत पाठविलेले सूचनापत्र इ. कागदपत्रे दाखल केले आहेत.

(5)       विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु ते जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.

(6)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच तक्रारकर्ता यांच्या विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकला.

 

(7)       अभिलेखावर दाखल 7/12 उता-याचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचे नांवे मौजे चांडेश्वर, ता. जि. लातूर येथे गट क्रमांक व उपविभाग 157 मध्ये 4.33 हेक्टर शेतजमीन क्षेत्र असल्याचे निदर्शनास येते. पावतीचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून दि.28/5/2022 रोजी SOYABEEN 726 T/F 25 Kg J S Seeds बियाण्याच्या 6 पिशव्या प्रत्येकी रु.3,500/- प्रमाणे खरेदी केल्याचे दिसून येते. बियाण्याची उगवण न झाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी गट विकास अधिकारी व तालुका कृषि अधिकारी, लातूर यांना लेखी पत्र देऊन पाहणी करण्याबद्दल विनंती केल्याचे दिसून येते. त्यानुसार तालुका तक्रार निवारण समितीने क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा केलेला आहे आणि तो अहवाल अभिलेखावर दाखल आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी नुकसान भरपाई न दिल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत त्यांना सूचनापत्र पाठविल्याचे दिसून येते.

(8)       सूचनापत्र प्राप्त झालेले असताना विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिलेले आहेत. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व त्यांच्याद्वारे दाखल कागदपत्रांकरिता खंडन, प्रतिकथन व प्रतिपुरावा नाही.

(9)       असे दिसते की, बियाणे उवगण न झाल्याबद्दल तक्रारकर्ता यांच्या अर्जानंतर तालुका तक्रार निवारण समितीने स्थळ पाहणी करुन क्षेत्रीय भेट अहवाल व पंचनामा तयार केलेला आहे. अहवालामध्ये नमूद निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे दिसून येतात. 

            "श्री. महादेव रमाकांत नलावडे, रा. चांडेश्वर, ता. जि. लातूर यांच्या चांडेश्वर येथील शेतावर सोयाबीन उगवणीसंदर्भात तपासणी करण्यात आली. 2.40 हे. क्षेत्रावरील 1.20 क्षेत्रावरील सोयाबीन बियाण्याची उगवण 09.00% (नऊ) आढळून आली. मातीमध्ये बियाण्याला बुरशी लागून कुजलेले दिसून आले. प्राथमिक निरीक्षणावरुन सदरील 03 बॅग सोयाबीन बियाण्याची कमी उगवण बियाण्यातील दोषामुळे असल्याचे दिसून आले."

(10)     ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 38 (2) (सी) अन्वये ज्‍यावेळी वस्‍तुमध्‍ये दोष असल्‍याची आयोगाकडे तक्रार प्राप्‍त होते, त्‍यावेळी दोषयुक्‍त वस्‍तू उचित प्रयोगशाळेकडे परिक्षणासाठी पाठविण्‍याची तरतूद आहे.  निर्विवादपणे, विरुध्द पक्ष क्र.1 हे वादकथित सोयाबीन बियाण्याचे विक्रेते व विरुध्द पक्ष क्र.2 हे उत्‍पादक आहेत. हे सत्य आहे की, तक्रारकर्ता यांनी वादकथित सोयाबीन बियाण्याचा नमुना उचित प्रयोगशाळेद्वारे तपासणीस पाठविण्याकरिता जिल्‍हा आयोगाकडे सादर केलेला नाही. असे असले तरी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या 'मे. नॅशनल सिडस् कार्पोरेशन लि. /विरुध्द/ एम. मधुसुदन रेड्डी', सिव्हील अपील नं. 7543/2004, निर्णय दि. 16/1/2012 न्यायनिर्णयातील प्रस्थापित न्यायिक तत्वानुसार असे दायित्व बियाणे उत्पादक / विक्रेता यांच्यावर येते. मात्र, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वादकथित सोयाबीन बियाण्‍यासंदर्भात तक्रार प्राप्‍त झाल्‍यानंतर संबंधीत लॉटचा बियाणे नमुना तात्‍काळ प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविलेला नाही आणि विरुध्द पक्ष क्र.2 यांनी वादकथित बियाणे दोषयुक्त नव्हते, हे सिध्द करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

(11)     तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवालाचे अवलोकन केले असता अहवालावर उपविभागीय कृषि अधिकारी, लातूर; शास्त्रज्ञ, कृषि विद्यापिठाचे प्रतिनिधी; कृषि अधिकारी, पं.स.; महाबीज अकोला यांचे प्रतिनिधी, विक्रेता प्रतिनिधी व तक्रारकर्ता यांच्या स्‍वाक्ष-या दिसून येतात. बियाण्यासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यानंतर क्षेत्रीय पंचनामा व अहवाल तयार करण्यासाठी शासकीय स्तरावर तालुका तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. आमच्‍या मते, तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समिती शासकीय यंत्रणेद्वारे नियंत्रीत आहे आणि समितीमध्‍ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व अधिकारी वर्गाचा समावेश आहे. त्‍यामुळे उचित पुराव्याअभावी तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीचा अहवाल नाकारता येणार नाही.  

(12)     तक्रारकर्ता हे व्यवसायाने शेतकरी आहेत. सोयाबीन बियाण्याची मशागत, पेरणी, हाताळणी इ. करताना तक्रारकर्ता यांची त्रुटी झालेली असावी, असा पुरावा नाही. वाद-तथ्ये व पुरावे पाहता सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता कमी होण्याकरिता केवळ बियाण्यातील दोष कारणीभूत आहे, हाच निष्कर्ष निघतो. असे दिसते की, तक्रारकर्ता यांच्या सोयाबीन पिकाची उगवणक्षमता 9 टक्के असून असे अत्यल्प उगवणशक्ती असणारे पीक तक्रारकर्ता यांना पुढे नियमीत ठेवले नसावे; किंबहुना ते व्यवहारीकदृष्टया उचित नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांचे संपूर्ण 3 एकर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, या अनुमानास आम्ही येत आहोत आणि सोयाबीन पिकापासून उत्पन्नाच्या नुकसानीकरिता भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात.

(13)     तक्रारकर्ता यांनी प्रतिएकर 12 क्विंटल उत्पन्न अपेक्षीत असल्यामुळे रु.5,100/- दरानुसार 1 हेक्टर 20 आर. क्षेत्रामध्ये 36 क्विंटलकरिता रु.1,83,600/- चे उत्पन्न मिळाले असते आणि रु.19,500/- खर्च वजा जाता रु.1,64,100/- चे निव्वळ नुकसान झाल्याचे नमूद केले. आमच्या मते, सोयाबीन पिकाचे अपेक्षीत उत्पन्न किंवा उत्पादन किती निघू शकते ? याबद्दल अनेक घटक आधारभूत असतात. चांगले सोयाबीन पीक जोपासल्यानंतर सरासरी एकरी 8 ते 12 क्विंटल उत्पादन येत असल्याचे निदर्शनास येते. अहवालामध्ये तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीचा प्रकार "मध्यम" नमूद केला आहे. त्यामुळे योग्य विचाराअंती व तर्काच्या आधारे तक्रारकर्ता यांना सोयाबीनचे प्रतिएकर 10 क्विंटल झाले असते, या निष्कर्षाप्रत येणे न्यायोचित आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनासंबंधी कृषि उत्पन्न बाजार समिती, लातूर यांचे दरपत्रक दाखल केले आहेत. त्यानुसार दि.8/10/2022 रोजी प्रतिक्विंटल किमान रु.5,281/-,  किमान रु.4,700/-  व सर्वसाधारण र.5,100/- दर नमूद आहे. हे सत्य आहे की, सोयाबीनच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार होत असतो. खरीप हंगाम 2022 मध्ये सरासरी रु.5,000/- दर दिसून येतो.  तथ्ये व पुरावे पाहता तक्रारकर्ता यांना 1 हे. 20 आर. म्हणजेच 3 एकर क्षेत्रामध्ये रु.1,50,000/- चे उत्पन्न मिळाले असते, असे गृहीत धरुन त्यामधून तक्रारकर्ता यांनी नमूद केल्यानुसार रु.19,500/- खर्च वजावट करता रु.1,30,500/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत.

(14)     तक्रारकर्ता यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- रकमेच्या अनुतोष मागणीची दखल घेतली असता नुकसान भरपाईची रक्‍कम निश्चित करताना त्या–त्‍या परिस्थितीनुसार गृहीतकांचा आधार घ्यावा लागतो. असे दिसते की, तक्रारकर्ता यांच्या सोयाबीन पिकाची उगवण कमी झाल्यामुळे शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी नुकसान भरपाई न दिल्याच्या कारणास्तव त्यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, प्रकरण शुल्‍क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे. योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.7,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.

(15)     विरुध्द पक्ष क्र.1 हे वादकथित सोयाबीन बियाण्याचे विक्रेते आहेत. बियाण्यातील दोषामध्ये विरुध्द पक्ष क्र.1 यांचे दायित्व सिध्द होण्याकरिता उचित पुरावा नसल्यामुळे त्यांच्याविरुध्द आदेश नाहीत.  उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.     

(2) विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ता यांना रु.1,30,500/- नुकसान भरपाई द्यावी.

(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता यांना आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत उक्त नुकसान भरपाईची रक्कम अदा न केल्यास आदेश तारखेपासून संपूर्ण रक्‍कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज देय राहील.

(4) विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.7,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- द्यावा.

(5) विरुध्‍द पक्ष क्र. 2 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

(श्रीमती वैशाली म. बोराडे)                                                                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                                                                                  अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Vaishali M. Borade]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.