जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 136/2020. तक्रार दाखल दिनांक : 23/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 29/08/2022.
कालावधी : 01 वर्षे 11 महिने 06 दिवस
लक्ष्मण पि. ग्यानोबा नारायणपुरे, वय 46 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. गणेशवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) प्रोप्रा. / व्यवस्थापक, तनवी ॲग्रो एजन्सी,
बोरी, मु. पो. बोरी, ता. जि. लातूर.
(2) व्यवस्थापक / संचालक, मांजरा सिडस् प्रा. लि.,
वैशाली वेअर हाऊस, बी-24, अतिरिक्त एम.आय.डी.सी.,
किर्त ऑईलजवळ, हरंगुळ (बु.), ता. जि. लातूर.
(3) तालुका कृषी अधिकारी तथा तालुकास्तरीय तक्रार निवारण
समिती, पंचायत समिती, शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.बी. मलवाडे
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- फिरोज एच. शेख
विरुध्द पक्ष क्र.3 :- स्वत: / प्रतिनिधी
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, मौजे गणेशवाडी, ता. शिरुर अनंतपाळ येथील त्यांच्या गट क्र. 174, क्षेत्र 0 हे. 92 आर. शेतजमिनीमध्ये सन 2020 च्या खरीप हंगामात सोयाबीन पीक घेण्याकरिता त्यांनी दि.18/6/2020 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.2 यांचे "सोयाबीन 158", लॉट क्र. 05451 बियाण्याची एक पिशवी रु.2,500/- प्रतिफल देऊन खरेदी केली. योग्य पाऊस व मशागतीनंतर दि.24/6/2020 रोजी बियाण्याची पेरणी केली असता उगवण न झाल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडे तक्रार केली असता पिकाची पाहणी करुन पंचनामा तयार केला. परंतु पंचनाम्यामध्ये खाडाखोड करण्यात आलेली आहे. उक्त कथनाच्या अनुषंगाने रु.60,000/- नुकसान भरपाई देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.1,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 यांना रु.20,000/- दंड आकारण्याची विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. तक्रारकर्ता यांना वादकथित बियाणे विक्री केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी 2 ते 3 इंच खोलीवर बियाणे पेरणी केले. त्यामुळे पेरणी केलेल्या बियाण्यास योग्य प्रमाणात ओलावा, खतांची मात्रा, तपमान इ. मिळाले नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी पंचनामा करण्यापूर्वी त्यांना सूचनापत्र पाठविलेले नाही आणि पंचनामा करताना ते अनुपस्थित होते. त्यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी विहीत मुदतीमध्ये लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(4) विरुध्द पक्ष क्र.3 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी ग्राहक तक्रारीतील मजकुर सिध्द करणे आवश्यक आहे. ते पुढे असे कथन करतात की, बियाण्याची उगवण न झाल्याबाबत तक्रारकर्ता यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीसमोर तक्रारकर्ता व अन्य साक्षीदारासमक्ष उपस्थित होते. त्यानंतर भेटीचा अहवाल व पंचनामा तयार करण्यात आला. तक्रारकर्ता यांनी पेरणी तारीख दि.2/7/2020 सांगितल्यामुळे पंचनाम्यामध्ये त्या तारखेचा उल्लेख करण्यात आला. परंतु त्यानंतर पेरणी तारीख दि.24/6/2020 सांगितल्यामुळे पहिली नमूद तारीख खोडून दुसरी तारीख लिहिण्यात आली. तक्रारकर्ता यांनी दुबार पेरणीची तारीख दि.1/7/2020 सांगितली आणि त्याचा उल्लेख पंचनाम्यामध्ये करण्यात आला. भेटीचा अहवाल व पंचनामा वाचल्यानंतर तक्रारकर्ता व अन्य साक्षीदारांनी त्यावर स्वाक्ष-या केल्या. दुबार पेरणी केल्यामुळे अगोदर पेरणी केलेल्या बियाण्याच्या उगवणीबाबत निष्कर्ष काढता येत नसल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. दोष नसताना त्यांना पक्षकार केलेले आहे आणि त्यांच्याविरुध्द ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना विक्री केलेले वादकथित
सोयाबीन बियाणे दोषयुक्त असल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून वादकथित सोयाबीन बियाणे खरेदी केले, ही मान्य स्थिती आहे. प्रामुख्याने, वादकथित सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर त्याची उगवण झाली नाही, हा तक्रारकर्ता यांचा मुख्य वाद आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी 2 ते 3 इंच खोलीवर बियाणे पेरणी केले आणि पेरणी केलेल्या बियाण्यास योग्य प्रमाणात ओलावा, खतांची मात्रा, तपमान इ. मिळालेले नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही आणि त्यांच्याद्वारे तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीस व पुराव्यास खंडन करणारे विरोधी लेखी निवेदन व पुरावा नाही.
(7) बियाण्याच्या उगवणशक्तीबद्दल तक्रारकर्ता यांच्या तक्रारीनंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, लातूर यांनी क्षेत्रीय भेट देऊन अहवाल व पंचनामा तयार केलेला आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये "दुबार पेरणी केल्यामुळे अगोदर पेरणी केलेल्या बियाणे उगवणीबाबत निष्कर्ष काढता येत नाही.", असा निष्कर्ष नोंदविलेला दिसून येतो. विशेषत: तक्रारकर्ता यांनी समितीच्या अहवाल व पंचनाम्यास आक्षेप घेतलेला असून त्यामध्ये खाडाखोड असल्याचे व त्यांच्या को-या अहवाल व पंचनाम्यावर स्वाक्ष-या घेतल्याचे नमूद केले.
(8) निर्विवादपणे, तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती शासकीय यंत्रणेद्वारे नियंत्रीत आहे आणि समितीमध्ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व अधिकारी वर्गाचा समावेश आहे. अहवालावर समिती सदस्यांसह तक्रारकर्ता व अन्य 2 साक्षीदार व्यक्तींच्या स्वाक्ष-या आहेत. तक्रारकर्ता यांनी को-या अहवालावर स्वाक्षरी केली, असे त्यांचे कथन असताना व अहवाल अमान्य असताना त्यांनी संबंधीत समितीच्या वरिष्ठांकडे तक्रार केलेली नाही. शिवाय, ज्या अन्य 2 साक्षीदारांनी को-या अहवालावर स्वाक्षरी केलेल्या असल्यास त्यांचे प्रतिज्ञापत्रे दाखल नाहीत. शासकीय यंत्रणेद्वारे गठीत समितीच्या अहवालावर व समितीच्या कार्यपध्दतीवर शंका असल्यास संबंधीत समिती सदस्यांचा उलटतपास घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. अशा स्थितीत तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने तयार केलेला अहवाल अमान्य करण्याचे कोणतेही कारण दिसून येत नाही.
(9) तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या अहवाल व पंचनाम्यामध्ये विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विक्री केलेल्या सोयाबीन बियाण्याचा उल्लेख नमूद आहे. मात्र त्याच बियाण्याची उगवण झालेली नाही आणि तेच बियाणे दोषयुक्त होते, हे सिध्द होण्याकरिता उचित व आवश्यक पुरावा नाही. वाद-तथ्ये व संबध्द तथ्याच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांना विक्री केलेले वादकथित सोयाबीन बियाणे दोषयुक्त असल्याचे सिध्द होत नाही आणि त्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-