जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 54/2020. तक्रार दाखल दिनांक : 25/02/2020. तक्रार निर्णय दिनांक : 25/05/2023.
कालावधी : 03 वर्षे 03 महिने 00 दिवस
दत्तात्रय पि. बब्रुवान काळे, वय 35 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. त्रिमुर्ती नगर,
सावेवाडी, लातूर, जि. लातूर, ह.मु. महाराणा प्रताप नगर, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) रासुरे ईको मोटर्स, द्वारा : प्रो. कौशिक पि. केदार रासुरे, वय 25 वर्षे,
धंदा : व्यापार, रा. प्लॉट नं. 79, इंडस्ट्रीयल इस्टेट, उद्योग भवन, लातूर.
(2) एन.डी.एस. ईको मोटर्स, आवलहल्ली, बेंगलोर, कर्नाटक. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- टी. के. काळे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एन. एम. करडे
विरुध्द पक्ष क्र.2 :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.2 हे एन. डी. एस. लिवो ह्या दुचाकी वाहनाचे उत्पादक आहेत आणि विरुध्द पक्ष क्र.1 हे लातूर शहरातील वितरक आहेत. दि.10/12/2018 रोजी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून एन. डी. एस. लिवो हे दुचाकी वाहन खरेदी केले. दुचाकी मुल्य रु.80,499/- व नोंदणीसह विम्याकरिता रु.5,000/- असे एकूण रु.85,499/- अदा केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे दुचाकी वाहनाकरिता 'एम.एच.24 बी.सी. 7410' नोंदणी क्रमांक प्राप्त झाला.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दुचाकीचे एकदा विद्युत उर्जा संचयन (charging) केल्यानंतर किमान 50 कि.मी. दुचाकी चालेल, असे विरुध्द पक्ष क्र.2 यांनी सांगितलेले होते. तसेच दुचाकीकरिता 2 वर्षाची हमी (warranty) असल्याचे व विद्युत घटामध्ये (battery) काही अडचण आल्यास नवीन विद्युत घट दिला जाईल, असेही मान्य केले होते. तक्रारकर्ता यांनी दुचाकी चालविण्यासंबंधी सूचनांचे पालन करुन दुचाकीच्या 2 सेवा (servicing) प्राप्त करुन घेतल्या आहेत.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, डिसेंबर 2019 मध्ये दुचाकीमध्ये विद्युत उर्जा संचयन करताना संचयन प्रक्रिया बंद होऊ लागली. तसेच 2 कि.मी. चालल्यानंतर दुचाकी बंद पडू लागली. त्यामुळे दि.5/12/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे दुचाकी दुरुस्तीकरिता जमा केली. मात्र दुचाकीच्या अडचणी कायम राहिल्या आणि दुचाकी वापराविना बंद अवस्थेत उभा आहे. त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे विचारणा केली असता दुचाकीमध्ये उत्पादकीय दोष असल्याचे त्यांनी मान्य केले; मात्र विरुध्द पक्ष क्र.2 हे दुरुस्तीसंबंधी सहकार्य करीत नाहीत, असे कळविले. तक्रारकर्ता हे किराणा मालाचा व्यापार करतात आणि माल वाहतुकीसाठी दुचाकीची आवश्यकता आहे. दुचाकी नादुरुस्त असल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने दुचाकीची दुरुस्त करुन देण्याचा; दुचाकीसाठी नवीन विद्युत घट देण्याचा; आर्थिक नुकसान भरपाई रु.45,000/- देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व खर्चाकरिता रु.1,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विहीत मुदतीमध्ये लेखी निवेदनपत्र सादर न केल्यामुळे दि.16/2/2021 रोजी त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले. त्यानंतर दि.22/3/2021 रोजी लेखी निवेदनपत्र सादर करुन "विना लेखी निवेदनपत्र" आदेश रद्द करण्यासाठी अर्ज केला असता तो अर्ज नामंजूर करण्यात आल्यामुळे त्यांचे लेखी निवेदनपत्र विचारात घेतलेले नाही.
(5) विरुध्द पक्ष क्र.2 हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व त्यांनी अभिलेखावर दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून खरेदी
केलेल्या दुचाकीमध्ये दोष असल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. दि.10/12/2018 रोजी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून वादकथित एन. डी. एस. लिवो दुचाकी खरेदी केली, हे अभिलेखावर दाखल पावती क्र. 1027 वरुन निदर्शनास येते. मुख्य वादविषय असा की, डिसेंबर 2019 मध्ये दुचाकीच्या विद्युत उर्जा संचयनाची प्रक्रिया बंद होऊ लागली आणि 2 कि.मी. चालल्यानंतर दुचाकी बंद पडू लागली. दि.5/12/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे दुचाकी दुरुस्तीकरिता जमा केली; मात्र दुचाकीच्या अडचणी कायम राहिल्या आणि दुचाकी वापराविना बंद अवस्थेत उभा आहे.
(8) असे दिसते की, दुचाकीमध्ये बंद पडणारी विद्युत संचयन प्रक्रिया व हमीनुसार दुचाकी चालत नसल्याच्या अडचणीबाबत तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना सूचनापत्र पाठविलेले आहे. दुचाकीच्या Warranty Policy चे अवलोकन केले असता नवीन दुचाकीसंबंधी 2 वर्षे किंवा 30000 कि.मी. पर्यंत जे आधी घडेल त्याकरिता वॉरंटी संरक्षण दिल्याचे दिसून येते.
(9) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. विरुध्द पक्ष क्र.2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व दाखल पुरावे यांचे खंडन करण्यात प्रयत्न केलेला नाही आणि ग्राहक तक्रार, शपथपत्र व कागदोपत्री पुराव्यांकरिता विरोधी पुरावा नाही. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांच्या सूचनापत्रास उत्तर दिलेले नाही आणि दुचाकीमध्ये निर्माण दोषाचे निराकरण केलेले नाही.
(10) वादविषयाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांच्या एन. डी. एस. लिवो दुचाकीमध्ये विद्युत उर्जा संचयन प्रक्रिया बंद होणे आणि 2 कि.मी. दुचाकी चालविल्यानंतर दुचाकी बंद पडण्याचे दोष निर्माण झाले. दुचाकीमधील वादकथित दोषांकरिता जबाबदार नाहीत किंवा दुचाकीमध्ये दोष नाही, यासंबंधी पुरावा दाखल करण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याद्वारे प्रयत्न झालेला नाही. दुचाकीच्या 1 वर्ष वापरानंतर विद्युत घट अचानक अकार्यक्षम झाला आणि विद्युत घटामध्ये (battery) दोष निर्माण झाल्यामुळे दुचाकी बंद पडू लागली, हे मान्य करावे लागेल.
(11) तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर वरिष्ठ आयोगांच्या 2012 (1) CLT 99, 2011(2) CLT 186, 2010 (2) CLT 229, IV (2007) CPJ 395 (NC), 2006 (1) CPJ 401, 2010 (1) CPJ 114, 2005 (2) CPJ 781, 2010 (2) CPJ 39, 2006 (2) CPJ 188, 2009 (1) CPJ 548, 2008 (1) CPJ 151, 2007 (3) CPJ 66, 2010 (3) CPJ 105, 2006 (2) CPJ 524, 2005 (2) CPJ 670, 2006 (2) CPJ 64,2007 (1) CLT 225, 2005 (4) CPJ 12, 2006 (1) CPJ 4, 2011 (3) CPJ 97, 2009 (2) CPJ 146, 2008 (2) CPJ 189, 2012 (2) CLT 637, 2008 (4) CPR 61, 2008 (2) CPJ 174, 2011 (1) CPJ 194, 2011 (1) CPJ 347, 2008 (3) CPR 230, 2008 (2) CPJ 308, IV (2008) CPJ 131 इ. न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. त्यातील तत्व विचारात घेतले.
(12) उक्त विवेचनाअंती विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दुचाकीतील विद्युत घटासंबंधी निर्माण दोषाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. वॉरंटी कालावधीमध्ये विद्युत घटासंबंधी दोष निराकरण न करणे आणि नवीन विद्युत घट बदलून न देण्याचे कृत्य विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या सेवेमध्ये त्रुटी ठरते. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्याकडून दुचाकीसाठी नवीन विद्युत घट बदलून मिळण्यास पात्र ठरतात.
(13) तक्रारकर्ता यांनी त्यांचे किराणा दुकान असल्यामुळे मालाचे आदान-प्रदान करण्यासाठी दुचाकीचा वापर करता आला नाही आणि प्रतिमहा रु.15,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. वादकथित दुचाकी माल वाहतूक करण्यासाठी होती किंवा तसा परवाना होता, हे सिध्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे सिध्दतेअभावी उक्त अनुतोष विनंती अमान्य करणे न्यायोचित आहे.
(14) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व सूचनापत्र खर्चाकरिता रु.1,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, दुचाकीतील विद्युत घटाचा दोष निर्माण झाल्यानंतर दोष निराकरणासाठी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्ता यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चास सामोरे जावे लागले आहे. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. अशा बाबींमुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.7,000/- व सूचनापत्र खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.1,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(15) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांच्या एन. डी. एस. लिवो दुचाकीमध्ये नवीन विद्युत घट (battery) बदलून द्यावा.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक त्रासापोटी रु.7,000/- नुकसान भरपाई व सूचनापत्र खर्चाकरिता रु.1,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-