(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या )
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्षा विरुध्द विटा निर्मिती करणारी मशीन दोषपूर्ण पुरविल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याचा विटा बनविण्याचा व्यवसाय आहे. त्याला विटा निर्मित करणारी मशीन हवी होती. विरुध्दपक्षाचे विक्री प्रतीनिधीने त्याला प्रती तास 3000 विटा बनविणारी चांगली मशीन असल्याचे सांगितले त्यावर विश्वास ठेऊन त्याने विरुध्दपक्षा कडून दिनांक-29.09.2019 रोजी विटा निर्मिती करणारी मशीन एकूण रुपये-11,50,500/- एवढया किमतीत खरेदी केली. विरुध्दपक्षाचे ठिकाणाहून सदर मशीन लाखांदूर येथे दिनांक-02.10.2019 रोजी आणली, सदर मशीन लाखांदूर येथे आणण्यासाठी तक्रारकर्त्याला रुपये-55,000/- खर्च आला. अशाप्रकारे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. विरुध्दपक्षाने आश्वासित करुनही एका आठवडयाचे आत मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तज्ञ पाठविले नाही तर विरुध्दपक्ष मशीन विक्रेत्याचे दोन तज्ञ हे मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्या करीता उशिराने म्हणजे माहे फेब्रुवारी-2020 मध्ये त्याचे व्यवसायाचे ठिकाणी आले आणि 15 दिवस लाखांदूर येथे थांबले, दरम्यानचे काळाचा त्यांचे राहण्याचा, जेवणाचा तसेच येण्या जाण्याचा खर्च तयाने स्वतः सहन केला. विरुध्दपक्ष विक्रेत्याचे दोन्ही तज्ञांनी मशीन सुरु करण्याचा प्रयत्न केला परंतु मशीन सुरु झाली नाही त्यामुळे पुन्हा येऊ असे आश्वासन देऊन ते निघून गेले. परंतु ते दिर्घ कालावधी पर्यंत परत आले नसल्याने मशीन तशीच बंद पडून होती. त्यामुळे त्याने स्वतः विरुध्दपक्षाचे ठिकाणी जाऊन संपर्क साधला परंतु कोवीड-19 रोगाचा प्रार्दुभाव असल्याचे सांगून कोणालाही मशीन चालू करण्यासाठी पाठविले नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने पुन्हा विरुध्दपक्षाचे ठिकाणी दिनांक-08.01.2021 रोजी जाऊन बंद असलेल्या मशीन बाबत सांगितले, त्यावर विरुध्दपक्षाने पुन्हा त्याचे दोन तज्ञ त्याचे व्यवसायाचे ठिकाणी पाठविले, याही वेळेस तक्रारकर्त्याने दोन्ही तज्ञांचा 15 दिवसांचा राहण्याचा, जेवणाचा व ईतर खर्च सहन केला. दोन्ही तज्ञांनी मशीनचे सुटे भाग बदलविण्यास सुचविले, त्यानुसार त्याने स्वतः मशीनचे सुटे भाग खरेदी करण्यासाठी खर्च सहन केला व नविन सुटे भाग मशीन मध्ये बसविले परंतु मशीन मधील दोष ते दुरु करु शकले नाहीत आणि शेवट पर्यंत मशीन सुरु झाली नाही व बंद अवस्थेतच राहिली. विरुध्दपक्षाचे दोन तज्ञांचा येण्या जाण्याचा व राहण्याचा खर्च असे मिळून तक्रारकर्त्यास एकूण रुपये-1,75,000/- एवढा खर्च आला. अशाप्रकारे मागील दोन वर्षापासून मशीन खरेदी केल्या पासून बंद अवस्थेत पडून आहे. त्याने विरुध्दपक्षास दोषपूर्ण मशीन परत घेऊन त्याऐवजी नविन मशीन देण्याची विनंती केली अथवा दिलेल्या मशीन मधील दोष दुर करुन मशीन सुरु करुन देण्याची विनंती केली परंतु विरुध्दपक्षाने मशीन मधील दोष दुर करुन दिले नाही. सदर मशीन मध्ये उत्पादकीय दोष आहे. तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, विटा निर्मीती व्यवसायावरच त्याचा उददनिर्वाह असून त्याने सदर मशीन खरेदी साठी स्टेट बॅंक लाखांदूर यांचे कडून कर्ज घेतलेले असून आज पर्यंत रुपये-3,00,000/- व्याज दिले असून व्याज दयावे लागत आहे. अशाप्रकारे बंद असलेल्या मशीन मुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले तसेच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून शेवटी त्याने अधिवक्ता यांचे मार्फतीने विरुध्दपक्षाला दिनांक-31.07.2021 रोजीची नोटीस पाठवून मशीनची किम्मत, दळणवळणाचा खर्च, तज्ञांवर केलेला खर्च, बॅंकेचे व्याज यासह नुकसान भ्ररपाई देण्याची विनंती केली परंतु सदर नोटीस मिळूनही विरुध्दपक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही म्हणून शेवटी त्याने विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याव्दारे पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
1. तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी.
2. विरुध्दपक्षाने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला तसेच दोषपूर्ण सेवा दिल्याचे घोषीत करण्यात यावे.
3.अ) मशीनची मूळ किम्मत रुपये-11,50,000/- अधिक विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्त्याचे व्यवसायायाचे ठिकाणी मशीनला आणण्याचा खर्च रुपये-55,000/- अधिक विरुध्दपक्षाचे दोन तज्ञ कर्मचा-यांचा खर्च रुपये-1,75,000/- असे एकूण रुपये-13,80,000/- विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे
3-ब) विरुध्दपक्षाने उपरोक्त नमुद रुपये-13,80,000/- एवढया रकमेवर दिनांक-29.09.2019 पासून ते दिनांक-06.12.2021 पर्यंत 18 टक्के व्याज म्हणजे रुपये-7,45,000/- तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
4. दोषपूर्ण मशीन मुळे तक्रारकर्त्याच्या व्यवसायाचे उत्पन्नातील झलेले नुकसान रुपये-10,00,000/- तसेच मशीन खरेदीसाठी बॅंके कडून घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम रुपये-3,00,000/- व निकाल लागे पर्यंत वार्षिक 18 टक्के व्याज दराने रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
5. तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5,00,000/- विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे.
6. तक्रारकर्त्याने वर्कशॉप मध्ये केलेला खर्च रुपये-1,00,000/- वार्षिक 18 टक्के दराने व्याजासह विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
7. प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-50,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
8. या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. प्रस्तुत तक्रारी मध्ये जिल्हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने यामधील विरुध्दपक्षास रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली. सदर रजिस्टर पोस्टाची पावती अभिलेखावर दाखल आहे तसेच सदर जिल्हा ग्राहक आयोगाची रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस विरुध्दपक्षाला दिनांक-05 जानेवारी, 2022 रोजी मिळाल्या बाबत पोस्ट विभागाचा ट्रॅक रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे परंतु जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस तामील झाल्या नंतर विरुध्दपक्षा तर्फे कोणीही जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी उत्तर दाखल केले नाही म्हणून प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश तक्रारी मध्ये जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-11 मार्च, 2022 रोजी पारीत केला.
04. तक्रारकर्त्याची सत्यापना वरील तक्रार तसेच त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्रीमती एस.पी. अवचट यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
05. तक्रारकर्त्याची तक्रार सत्यापनावर दाखल आहे. तक्रारकर्त्याने आपले कथनाचे पुराव्यार्थ दस्तऐवजाच्या प्रती अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. यामधील विरुध्दपक्षास जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस दिनांक-05 जानेवारी, 2022 रोजी मिळूनही विरुध्दपक्षा तर्फे कोणीही जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी तक्रारकर्त्याने त्यांचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत म्हणून विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-11 मार्च, 2022 रोजी पारीत केला. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द जे तक्रारी मधून आरोप केलेले आहेत त्या संबधाने प्रकरणात दाखल दस्तऐवजी पुराव्यां वरुन सदर तक्रार ही गुणवत्तेवर (On Merit) निकाली काढण्यात येत आहे.
06 तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून विटा निर्मिती करणारी मशीन खरेदी केल्या बाबत विरुध्दपक्ष मोसवेल मशीन्स, 141-142, लक्ष्मी नगर, तिरुपती इस्टे, थिम्मासामुथीरम व्हीलेज, कांचीपुरम-631502 तामीलनाडू यांनी दिनांक-29.09.2019 रोजी निर्गमित केलेल्या बिल क्रं 124 ची प्रत पुराव्यार्थ दाखल केली. सदर बिला वरुन सदर मशीनची एकूण किम्मत रुपये-11,50,000/- असल्याची बाब सिध्द होते. तसेच विरुध्दपक्षाचे ठिकाणाहून तक्रारकर्त्याचे लाखांदूर, जिल्हा भंडारा येथील व्यवसायाचे ठिकाणी सदर मशीन आणण्यासाठी लागलेल्या ट्रान्सपोर्ट खर्चाचे दिनांक-29.09.2019 रोजीचे बिलाची प्रत पुराव्यार्थ दाखल केली. त्यावरुन सदर मशीन आणण्यासाठी तक्रारकर्त्यास रुपये-50,000/- खर्च आल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द होते. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्याला मशीन आणण्यासाठी रुपये-55,000/- खर्च आला. सदर विधान सुध्दा मान्य करण्यात येते की, ट्रान्सपोर्ट खर्चा व्यतिरिक्त एवढया लांबून मशीन आणण्यासाठी वर खर्च म्हणून रुपये-5000/- खर्च लागू शकतो.
07. तक्रारकर्त्याचा असा आरोप आहे की, विरुध्दपक्षाची मशीन त्याचे लाखांदूर येथील व्यवसायाचे ठिकाणी दिनांक-02.10.2019 रोजी आणली. विरुध्दपक्षाने कबुल करुनही एका आठवडयाचे आत मशीन सुरु करुन प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तज्ञ व्यक्ती पाठविला नाही. त्या नंतर वारंवार ई मेल व्दारे संपर्क साधला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी केलेल्या ई मेलच्या प्रती पुराव्यार्थ सादर केल्यात. त्यानंतर विरुध्दपक्षाचे दोन तज्ञ माहे फेब्रुवारी-2020 मध्ये त्याचे लाखांदूर येथील व्ययसायाचे ठिकाणी आलेत आणि पंधरा दिवस राहिलेत, त्या दोन तज्ञांचा येण्या जाण्याचा खर्च तसेच जेवण व राहण्याचा खर्च त्याने सहन केला परंतु सदर दोन्ही तज्ञां कडून मशीन सुरु झाली नाही त्यामुळे ते पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन निघून गेले. त्यानंतर तयाने विरुध्दपक्षाचे प्रत्यक्ष ठिकाणी भेट घेऊन मशीन दुरुस्त करुन देण्याची विनंती केली परंतु कोवीड-2019 रोगाचा प्रार्दुभाव असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने पुन्हा दिनांक-08.02.2021 रोजी विरुध्दपक्षाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मशीन दुरुस्त करुन देण्यास विनंती केली. माहे फेब्रुवारी, 2021 मध्ये विरुध्दपक्षाचे दोन तज्ञ त्याचे लाखांदूर येथील व्ययसायाचे ठिकाणी आलेत आणि पंधरा दिवस राहिलेत, त्या दोन तज्ञांचा येण्या जाण्याचा खर्च तसेच जेवण व राहण्याचा खर्च याही वेळेस तयाने सहन केला, त्या दोन तज्ञांनी मशीनचे काही सुटे भाग बदलविण्यास सांगितले असता तक्रारकर्त्याने ते सुटे भाग स्वखर्चाने विकत घेतलेत, परंतु असे नविन सुटे भाग बसविल्या नंतर सुध्दा मशीन सुरु झाली नाही.
08. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, विरुध्दपक्षाचे दोन तज्ञ दोनदा पंधरा पंधरा दिवसां करीता तक्रारकर्त्याचे व्यवसायाचे ठिकाणी येऊनही आणि प्रयत्न करुनही तसेच मशीनमध्ये सुटे भाग बदलवूनही मशीन सुरु झालेली नाही यावरुन ही बाब सिध्द होते की, सदर मशीन मध्ये उत्पादकीय दोष (Manufacturing Defect) आहे, याचे कारण असे आहे की, मशीन तक्रारकर्त्याचे ठिकाणी दिनांक-02.10.2019 रोजी आणल्या नंतर दुस-यांदा माहे फेबुवारी,2021 मध्ये विरुध्दपक्षाचे दोन तज्ञ आल्यानंतर तसेच सुटे भाग बदलविल्या नंतरही मशीन सुरु झाली नव्हती या संबधात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास अधिवक्ता श्री राकेश कुमार सक्सेना यांचे मार्फतीने दिनांक-31 जुलै,2021 रोजी कायदेशीर नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविल्याचे पुराव्यार्थ सदर कायदेशीर नोटीसची प्रत दाखल केली, सदर कायदेशीर नोटीसमध्ये मशीन आणल्या पासून आणि ती शेवट पर्यंत सुरु झाली नसल्या बाबत संपूर्ण विस्तृत घटनाक्रम नमुद केलेला आहे. सदर कायदेशीर नोटीस विरुध्दपक्षास मिळाल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पोच पुराव्यार्थ तक्रारकर्त्याने दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याचा असा आरोप आहे की, अशी कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर सुध्दा विरुध्दपक्षाने कोणतीही कार्यवाही केली नाही ईतकेच नव्हे तर सदर कायदेशीर नोटीसला कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्याच बरोबर जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही विरुध्दपक्षाने जिल्हा ग्राहक आयोगासमक्ष उपस्थित राहून आपली कोणतीही बाजू मांडली नाही वा तक्रारकर्त्याने केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत.
09. तक्रारकर्त्याचा असाही आरोप आहे की, त्याने सदर मशीन खरेदी करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडीया लाखांदूर, जिल्हा भंडारा यांचे कडून कर्ज घेतले होते परंतु मशीन बंद असल्याने त्याचेवर विनाकारण बॅंकेच्या व्याजाचा भुर्दड बसत आहे .याचे पुराव्यार्थ त्याने स्टेट बॅंक ऑफ इंडीया लाखांदूर,जिल्हा भंडारा येथे असलेले बॅंक खाते क्रं-00000033852368378 च्या खाते उता-याच्या दिनांक-07 जानेवारी, 2019 ते दिनांक-02 फेब्रुवारी,2019 तसेच 20 मे, 2019 ते 27 मे, 2019 या कालावधीच्या प्रती दाखल केल्यात. सदर खाते उता-यावरील व्याजाचा दर हा वार्षिक 14.75 टक्के नमुद असून तक्रारकर्त्याने सदर खात्या मधून विरुध्दपक्षास काही रकमा ट्रान्सफर केल्याची बाब सिध्द होते.
10. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून विटा निर्मिती करणारी जी मशीन रुपये-11,50,000/- मध्ये खरेदी केली आणि सदर मशीन त्याचे व्यवसायाचे ठिकाणी दिनांक-02.10.2019 रोजी आणण्या करीता ट्रान्सपोर्ट चॉर्जेस पोटी रुपये-55,000/- खर्च केला या बाबी पुराव्यानिशी सिध्द झालेल्या आहेत. तसेच सदर मशीन दुरुस्त करण्यासाठी वर्कशॉप मध्ये जो खर्च केला त्या संबधात दिनदयाल वेल्डींग इंजिनिअरींग वर्कशॉप लाखांदूर, जिल्हा भंडारा येथील दिनांक-08.05.2020 रोजीचे रुपये-48,050/- तसेच दिनांक-25.01.2021 रोजीचे रुपये-52,500/- नगदी दिल्या बाबत बिलाच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केल्यात. तक्रारकर्त्याने मशीन दुरुस्त करण्या बाबत विरुध्दपक्षाची परवानगी घेतली होती किंवा कसे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तसेच तक्रारकर्त्या तर्फे अधिवक्ता श्री राकेशकुमार सक्सेना यांनी विरुध्दपक्षास दिनांक-13 जुलै, 2021 रोजीची नोटीस पाठविली त्यामध्ये वर्कशॉप मधील केलेल्या खर्चाचा कोणताही उल्लेख केलेला नाही, त्यामुळे वर्कशॉप मधील दुरुस्ती खर्चा संबधी दिलेली देयके विचारात घेण्यायोग्य नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तसेच तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्षाचे दोन तज्ञ हे तामीलनाडू वरुन त्याचे व्यवसायाचे ठिकाणी लाखांदूर, जिल्हा भंडारा येथे दोनदा आलेत, त्यांचा येण्या जाण्याचा व जेवण खाण्याचा खर्च रुपये-1,75,000/- आला परंतु या खर्चा संबधी तक्रारकर्त्याने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
11. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, उपरोक्त नमुद घटना क्रमावरुन ही बाब सिध्द होते की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास पुरविलेल्या विटा निर्मित करणा-या मशीन मध्ये उत्पादकीय दोष (Manufacturing Defect ) आहे, याचे कारण असे आहे की, तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्षाचे दोन तज्ञ यांनी दोनदा पंधरा पंधरा दिवसा करीता त्याचे व्यवसायाचे ठिकाणी भेटी देऊनही तसेच मशीन मध्ये सुटे भाग बदलवूनही सुरु करु शकले नाही, तक्रारकर्त्याचे या विधानास विरुध्दपक्षास जिल्हा ग्राहक आयोगाचे नोटीसची सुचना मिळूनही कोणताही विरोध विरुध्दपक्षाने केलेला नाही. विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात पारीत झालेला आहे. याचाच अर्थ असा होतो की, मशीन खरेदी केल्यापासून ती काहीही चालली नाही ती तशीच आज पर्यंत दुरुस्त करुनही बंद अवस्थेत पडून आहे आणि आज जवळपास 03 वर्ष मशीन खरेदी केल्या पासून झालेली आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास कायदेशीर नोटीस पाठवूनही तसेच जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष कोणतीही तसदी घेण्यास तयार नाही असे त्याचे वागणूकी वरुन दिसून येते. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याने मशीनवर केलेला संपूर्ण खर्च वाया गेलेला असून मशीन बंद असल्यामुळे त्याचे व्यवसायाचे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच बॅंक कर्जावरील व्याज दयावे लागत आहे या बाबी पुराव्यानिशी सिध्द झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्त्यास विटा निर्मित करणारी मशीनची किम्मत रुपये-11,50,000/- मशीन खरेदी केल्याचा दिनांक-29.09.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-09 टक्के व्याज दरासह मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल. त्याच बरोबर मशीन आणण्यासाठी लागलेला ट्रान्सपोर्ट खर्च रुपये-55,000/-, विरुध्दपक्षाचे तज्ञांचा तामीळनाडू ते महाराष्ट्रात दोनदा पंधरा पंधरा दिवसा करीता येण्या जाण्याचा खर्च रुपये-20,000/- असे मिळून आलेला एकूण खर्च रुपये-75,000/- तसेच विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्याने मशीन खरेदी वर केलेल्या खर्चावर वार्षिक 09 टक्के दराने व्याज मंजूर केलेले असल्यामुळे वेगळयाने बॅंके वरील कर्जावर व्याज मंजूर करता येणार नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता श्री राजेंद्र सुंदरलाल खत्री यांची तक्रार विरुध्दपक्ष मोसवेल मशीन्स थिम्मासामुथीरम कांचीपुरम तामीलनाडू मार्फत प्रोप्रायटर/मालक (MOSWEL MACHINES, 141-142,Lakshmi Nagar, Thirupathi Estate, Thimmasamuthiram Village, Kanchipuram-631502 Tamilnadu State Through Proprietor/Owner) यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष मोसवेल मशीन्स थिम्मासामुथीरम कांचीपुरम तामीलनाडू मार्फत प्रोप्रायटर/मालक यास आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे बिल क्रं-121, बिल दिनांक-29.09.2019 अनुसार विटा निर्मिती करणारी मशीन एच.एस. कोड-8474 अन्वये विरुध्दपक्षास अदा केलेली रक्कम रुपये-11,50,000/- (अक्षरी रुपये अकरा लक्ष पन्नास हजार फक्त) तक्रारकर्त्यास अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-29.09.2019पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 09 टक्के दराने व्याज विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दयावे.
- विरुध्दपक्ष मोसवेल मशीन्स थिम्मासामुथीरम कांचीपुरम तामीलनाडू मार्फत प्रोप्रायटर/मालक यास आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्यास मशीन ट्रान्सपोर्ट साठी आलेला खर्च , विरुध्दपक्षाचे तज्ञांचा येण्या जाण्याचा खर्च, असे मिळून वर नमुद केल्या प्रमाणे रुपये-75,000/- (अक्षरी रुपये पंच्याहत्तर हजार फक्त) प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत दयावे. विहित मुदतीत रक्कम न दिल्यास सदर रक्कम रुपये-75,000/- आणि सदर रकमेवर मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 5 टक्के दराने व्याज देण्यास विरुध्दपक्ष जबाबदार राहिल.
- विरुध्दपक्ष मोसवेल मशीन्स थिम्मासामुथीरम कांचीपुरम तामीलनाडू मार्फत प्रोप्रायटर/मालक यास आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिकत्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दयाव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष मोसवेल मशीन्स थिम्मासामुथीरम कांचीपुरम तामीलनाडू मार्फत प्रोप्रायटर/मालक याने प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष मोसवेल मशीन्स थिम्मासामुथीरम कांचीपुरम तामीलनाडू मार्फत प्रोप्रायटर/मालक यास असेही आदेशित करण्यात येते की, जिल्हा ग्राहक आयोगाने अंतीम आदेशात नमुद केल्या प्रमाणे आदेशित रकमा नमुद व्याजासह तक्रारकर्त्यास अदा केल्यानंतर तक्रारकर्त्याचे व्यवसायाचे ठिकाणी असलेली मशीन आहे त्या स्थिती मध्ये विरुध्दपक्षाने स्वतः येऊन स्वखर्चाने घेऊन जावी आणि तक्रारकर्त्याने बिलामध्ये वर्णनातीत केलेली मशीन विरुध्दपक्षास परत केल्या बाबत विरुध्दपक्षा कडून लेखी पोच घ्यावी.
- तक्रारकर्त्याच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येतात.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.