जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 123/2020. तक्रार दाखल दिनांक : 15/09/2020. तक्रार निर्णय दिनांक : 03/08/2022.
कालावधी : 01 वर्षे 10 महिने 19 दिवस
प्रकाश भोजुसिंग राठोड, वय 58 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. इसावासयम अपार्टमेंट, पहिला मजला, सौभाग्य नगर,
शिवाजी नगर शाळेच्या पुढे, साई धाम रोड, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) पोस्ट मास्टर, गांधी चौक पोस्ट ऑफीस, गांधी चौक पोलीस स्टेशनजवळ, लातूर.
(2) अधीक्षक, भारतीय डाक विभाग, डाकघर, उस्मानाबाद - 413 501.
(3) विभागीय व्यवस्थापक, पोस्टल लाईफ इन्शुरन्स,
महाराष्ट्र सर्कल, मुंबई - 400 001. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.व्ही. देशपांडे
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या विकास अधिका-यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी डाक विभागाचे पी.एल.आय. विमापत्र घेतले होते आणि त्याचा क्रमांक : एम.एच. 461143 सी.एस. आहे. विमापत्र दि.9/3/2009 ते 9/3/2020 कालावधीकरिता देण्यात आले आणि प्रतिमहा रु.1,034/- प्रमाणे 130 हप्ते भरण्याचे होते. तक्रारकर्ता यांना अडचणींमुळे नियमीत हप्ते भरता आले नाहीत आणि त्यांनी 30 हप्त्यांचा भरणा केला. अडचणीमुळे तक्रारकर्ता यांनी मुदतपूर्व विमापत्राच्या हप्त्यांची मागणी केली असता किमान 36 हप्ते भरणा न केल्यामुळे रक्कम परत करता येत नाही, असे सांगण्यात आले. उक्त वादकथनांच्या अनुषंगाने रु.31,020/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.15,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी विमापत्राकरिता ऑगस्ट 2011 पर्यंत केवळ 30 हप्त्यांचा भरणा केला. विमापत्राचे अभ्यर्पण करण्यासाठी दि.19/10/2015 रोजी तक्रारकर्ता यांनी विनंती केली असता किमान 36 हप्त्यांचा भरणा न केल्यामुळे विमापत्राचे अभ्यर्पण करता येत नाही, असे सांगण्यात आले. तसेच दि.11/5/2020 रोजी पुनश्च: सादर केलेल्या दाव्याच्या अनुषंगानेही तक्रारकर्ता यांची मागणी मान्य करता येत नसल्याचे कळविले. त्यांचे पुढे कथन असे की, डाक जीवन विमा नियम, 2011 च्या नियम 5 (37) व विमापत्रानुसार विमापत्र स्वीकारल्याच्या तारखेपासून हप्त्यांचे किमान 36 हप्ते न भरल्यास विमापत्र अवैध ठरविण्यात येते. तक्रारकर्ता यांची मागणी स्वीकारार्ह नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ता यांच्याकरिता विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी वादकथित विमापत्र घेतल्याचे विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. तक्रारकर्ता यांनी विमापत्राकरिता 30 हप्ते भरणा केले, ही बाब अविवादीत आहे. तक्रारकर्ता यांनी विमापत्राचे अभ्यर्पण करण्यासाठी दावा सादर केला, हे अविवादीत आहे. विमापत्राच्या अभ्यर्पणाची तक्रारकर्ता यांची विनंती विरुध्द पक्ष यांनी अमान्य केली, हे अविवादीत आहे.
(5) वादविषयाच्या अनुषंगाने विमापत्राचे अवलोकन केले असता संविदेच्या अटीमध्ये क्रमांक 14 असे आहे की, 14. SURRENDER VALUE : Santosh Policy which has been in force for at least 3 years can be surrendered for payment, on reduced sum assured upto the date for which premium have been paid. However, no bonus is admissible before completion of five years of policy. S.V. amount is least compated to premiums paidup and also meagre as per duration of the policy. तसेच कायदेशीर तरतुदीनुसार 3 वर्षाच्या कालावधीच्या आत देय असणारे हप्ते भरणा झाले नसल्यास विमापत्र शुन्यवत ठरते.
(6) निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांनी 30 हप्ते भरणा केलेले आहेत. विमापत्राच्या अटीनुसार किमान 3 वर्षे म्हणजेच 36 प्रतिमहा हप्त्यांचा भरणा होणे आवश्यक आहे. विमापत्र हे विमाधारक व विमा निगम यांच्यातील संविदालेख असून त्यामध्ये नमूद अटी व शर्ती उभय पक्षांवर बंधनकारक असतात. अभिलेखावर दाखल कागदपत्रांनुसार तक्रारकर्ता यांनी विमापत्राचे किमान 36 हप्ते भरणा केलेले नाहीत, हे स्पष्ट आहे. आमच्या मते, तक्रारकर्ता यांनी किमान 36 प्रतिमहा हप्त्यांचा भरणा केलेला नाही आणि त्यामुळे विमापत्राचे अभ्यर्पण लाभ मिळण्यास पात्र नाहीत. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना अभ्यर्पण लाभ अमान्य करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत. मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-