निकाल
पारीत दिनांकः- 27/04/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार हे जाबदेणार, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. चे पासधारक आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, महामंडळ प्रवाशांना ओळखपत्र जारी करते व ओळखपत्र क्रमांकानुसार पास सवलत मिळते व पासचे पैसे आगाऊ स्विकारले जाते, पास हा तिकिट स्वरुपातही मिळतो. सदर सेवेसाठी पैसे भरुन तिकिट देण्यात येते, तसेच अर्धा दिवस, पूर्ण दिवस, सात दिवस, महिन्यासाठी पासतिकिट मिळते. जाबदेणारांनी प्रवासी सेवा देण्यासाठी खाजगी बस विविध व्यावसायिकांकडून भाडेतत्वावर घेतल्या आहेत. तक्रारदार मासिक/रोजचा/आठवड्याचा/अर्धादिवसाचा पास काढून गरजेनुसार प्रवास करतात. दि. 30/11/2011 रोजी दु. 2.00 वाजता तक्रारदार राजगुरुनगर येथे आले असता दु. 2.45 वाजता बस क्र. एच-441, ड्रायव्हर क्र. एटी 107, भोसरी डेपो, यांनी हे बस आणली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरची दुपारची शिफ्ट दु. 2.00 वा. सुरु होते. बस ताब्यात घेताना, ती तपासून घेणे ही ड्रायव्हरची जबाबदारी आहे. सर्व प्रवासी बसल्यावर ड्रायव्हरने बसचे चाक पंक्चर असल्याचे सांगितले व तक्रारदारासह सर्व प्रवाशांना उतरविले. त्यानंतर राजगुरुनगर येथील कन्ट्रोलर यांनी बसचे टायर तपासले असता, बसचा कोणताही टायर पंक्चर नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून तक्रारदारांनी राजगुरुनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार केली, तेथील पी.एस.आय. यांनी एक पोलिस कॉन्स्टेबल शहानिशा व खात्री करण्याकरीता तक्रारदारांबरोबर दिला व त्यांनीही बस पंक्चर नसल्याची खात्री केली. अशाप्रकारे जाबदेणारांच्या ड्रायव्हरने कामावर असताना खोटे कारण सांगून तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास दिला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी त्यांना दुसरी बस उपलब्ध करुन दिली नाही व जो प्रवास दोन तासात पूर्ण होतो, त्यास साडेपाच तास लागले. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदारांनी पोलिस स्टेशनला ड्रायव्हरला भा.द.वि. 420 कलमाखाली अटक करण्याची मागणी केलेली आहे. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 10,000/- नुकसान भरपाईपोटी व रक्कम रु. 1000/- तक्रारीच्या खर्चापोटी मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे दाखल केले परंतु शपथपत्र दाखल केले नाही.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हे दि. 30/11/2011 रोजी राजगुरुनगर ते पुणे या बसचे दुपारी 2.45 वा.चे प्रवासी नव्हते, तक्रारदारांनी सदरच्या बसचे तिकिट घेतले होते याबद्दलचा कोणताही पुरावा त्यांनी दाखल केलेला नाही, म्हणून ते ग्राहक संरक्षण कायदा, 1986, कलम 2(ड) नुसार ‘ग्राहक’ नाहीत, म्हणून तक्रार नामंजूर करावी. जाबदेणार त्यांच्या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व आजू-बाजूच्या परिसरातील नागरिकांना प्रवाशी वाहतूकीची व्यवस्था बस संचलनाच्या माध्यमातून करते. सदरची बससेवा ही स्टेज कॅरेज पद्धतीची असून यासाठी जाबदेणार तिकिटे व निरनिराळ्या प्रकारचे पासेस प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देतात. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, परिवहन महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार्या सवलतीच्या निरनिराळ्या पासेसची योजना राबविण्यात आलेली आहे. तसेच निरनिराळ्या सवलतीच्या पासेसमध्ये अंध, अपंग, स्वातंत्र सैनिक या सारख्या सामाजिक घटकांना मोफत तसेच विद्यार्थ्यांना 50% सवलतीचा प्रवास सुविधा दिलेली आहे, ज्येष्ठ नागरिकांना देखील सवलतीचे पासेसची सुविधा दिलेली असून कोणताही आर्थिक/व्यापारी फायद्याचा उद्देश न ठेवता बस सेवा सर्व नागरिकांना उपलब्ध करुन दिलेली आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, दुपारी 2.45 वा. बस क्र. एच 441 ही ड्रायव्हर क्र. एटी 107 यांनी बस तपासून न घेता मार्गावर आणली, हे तक्रारदाराचे म्हणणे चुकीचे आहे. बस क्र. एच 441 ही सकाळी 6.00 वा. भोसरी ते राजगुरुनगर असा प्रवास सकाळपाळीतील सेवकांच्या माध्यमातून सुरु झाल्यानंतर दु. 12.55. वा. पुणे स्टेशन या स्थानकावरुन राजगुरुनगरकडे सकाळपाळीतील शेवटची ट्रीप मार्गस्थ झाली. भोसरी या ठिकाणी दु. 1.35 वा रनिंग क्रु दुपारपाळीच्या ड्युटीसाठी चेंज करण्यात आलेली होती, याचा अर्थ ही बस संचलनात असून डेपोमधून प्रथमच मार्गावर निघालेली नव्हती. दु. 1.45 च्या दरम्यान दुपारपाळीतील रनिंग बसमध्ये भोसरी येथे क्रु चेंज करुन ती बस दु. 2.45 च्या दरम्यान राजगुरुनगर येथे पोहचली, याबाबत बसचे लॉगशीट व कंडक्टर सेवकांचे वेबील दाखल केलेले आहे, त्यावर सदर गाडीचे पुढील बाजूचे ड्रायव्हर साईडचे चाक पंक्चर असल्याचा रिपोर्ट आहे. लॉगशीटच्या तपासणी शेरा कॉलमखाली चाक पंक्चर काढून देऊन रा. 9.00 वा बस मार्गस्थ केल्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कंट्रोलर यांनी सदरच्या बसला भोसरी डेपो अशी शेवटची ट्रिप लिहून दिलेली आहे आणि कंडक्टरने भोसरीपर्यंतच्या ट्रिपचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे सदरची बस दुपारी डेपोमधून बाहेर पडली हे तक्रारदाराचे म्हणणे चुकीचे आहे व बस पंक्चर झाल्याचे कागदपत्रांवरुन दिसून येते. सदरच्या बसचे कंडक्टर श्री. विठ्ठल पाटील यांनी डेपो मॅनेजर यांना सदर घटेनेबाबत दि. 27/12/2011 रोजी जबाब दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी नमुद केले आहे की, बस राजगुरुनगर ते पुणे स्टेशन अशी ट्रीप दु. 3.00 वा चे दरम्यान नेण्यापूर्वी पुढील टायरची हवा कमी झाली असल्याने त्यांनी कंट्रोलर यांच्याकडे तसा रिपोर्ट देऊन बस मार्गावर घेऊन जाणे अडचणीचे असल्याचे सांगितले. प्रवाशांनी गोंधळ सुरु केल्याने कमी हवा असताना देखील बस भोसरीच्या दिशेने मार्गस्थ केली, परंतु शिरोली येथे बसच्या पुढील टायरमधील हवा पूर्णपणे गेल्याने बस उभी करुन बसमधील प्रवाशांना मागून येणार्या बसमध्ये बसवून दिले. अशाप्रकारे जाबदेणार यांनी प्रवाशांची कोणतीही गैरसोय न करता, तसेच कोणत्याही नवीन तिकिट दराची आकारणी न करता प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था मागून येणार्या बसमध्ये करुन दिली. त्यामुळे तक्रारदारांस मानसिक व शारीरिक त्रास झाला हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदार यांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशन यथे केलेल्या तक्रारीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल यांनी बस पंक्चर नसल्याची शहानिशा करुन दिलेल्या तक्रार अर्जावर शेरा मारल्याचे तक्रारदाराचे म्हणणे चुकीचे आहे, जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, दि. 30/11/2011 रोजी तक्रारदारांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशन यथे केलेल्या तक्रार अर्जावर ठाणे अंमलदार यांनी दिवाणी स्वरुपातील तक्रार असल्याने दिवाणी दाद मागावी असे नमुद केले आहे, यामध्ये बस तपासणीचा कोणताही अहवाल अथवा पुरावा आढळून येत नाही. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये भाडेतत्वावरील बसचालकांना प्रशिक्षण देण्यात येत नसल्याचे नमुद केले आहे, याबाबत ठेकेदार यांच्याबरोबर करण्यात आलेल्या करारनाम्यामध्ये ड्रायव्हर यांच्याकडे आरटीओ लायसेन्स व प्रवाशी वाहतूकीचा बॅच तसेच आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची तरतूद नमुद केलेली आहे, त्यामुळे तक्रारदारांचे हे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदारांनी सदरच्या बसचे चाक पंक्चर नसल्याचा कुठलाही पुरावा मंचामध्ये दाखल केलेला नाही, म्हणून सदरील तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे व शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांविरुद्ध बस क्र. एच-441 चे चाक पंक्चर नसतानाही, ड्रायव्हरने ती बस पंक्चर आहे असे खोटे सांगितले, त्यामुळे त्यांना दोन तासांच्या प्रवासासाठी साडेपाच तास लागले, या करीता दाखल केलेली आहे व नुकसान भरपाई मागितलेली आहे. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी सदरच्या बसचे तिकिट घेतले होते याबद्दलचा कोणताही पुरावा त्यांनी दाखल केलेला नाही. कागदपत्रांची पाहणी केली असता असे निदर्शनास येते की, तक्रारदारांनी दि. 30/11/2011 रोजीचे 18:24:19 म्हणजे संध्याकाळ 6.24 वा. चे तिकिट, दि. 29/11/11 चा एका दिवसाचा पास व दि. 28/11/2011 रोजीचे तिकिट दाखल केलेले आहे. तक्रारदारांची तक्रार ही दि. 30/11/2011 रोजीच्या दु. 2.45 वा. च्या प्रवासाविषयी आहे व तक्रारदारांनी दाखल केलेले तिकिट हे दि. 30/11/2011 रोजीचे 18:24:19 म्हणजे संध्याकाळ 6.24 वा. चे आहे, म्हणजेच तक्रारदार ज्या बसच्या प्रवासाबद्दल तक्रार करीत आहेत, त्याचे तिकिट त्यांनी घेतले नव्हते, हे सिद्ध होते. म्हणून तक्रारदार ज्या घटनेसंबंधी जाबदेणारांविरुद्ध तक्रार करीत आहेत, त्याकरीता ते जाबदेणारांचे ‘ग्राहक’ नाहीत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी याघटनेविषयी राजगुरुनगर पोलीस स्टेशन येथेही तक्रार केल्याचे दिसून येते परंतु त्या अर्जावर ठाणे अंमलदार यांनी दिवाणी स्वरुपातील तक्रार असल्याने दिवाणी कोर्टामध्ये दाद मागावी असे नमुद केले आहे, यामध्ये बस तपासणीचा कोणताही अहवाल अथवा पुरावा आढळून येत नाही. जाबदेणारांनी सदरची बस ही खरोखरीच पंक्चर होती याबद्दल अनेक पुरावे दाखल केलेले आहेत, त्यामध्ये सदरच्या बसचे लॉगशिट, कंडक्टरचे वेबील आणि स्टार्टर पुस्तक दाखल केलेले आहे, ज्यावर सदर गाडीचे पुढील बाजूचे ड्रायव्हर साईडचे चाक पंक्चर असल्याचा रिपोर्ट नमुद आहे. तक्रारदारांचे सर्व आरोप जाबदेणारांनी कागदोपत्री पुराव्यासह खोडून काढलेले आहेत. परंतु तक्रारदारांनी एकही पुरावा दाखल केलेला नाही, की ज्यायोगे हे सिद्ध होईल की सदरची बस ही पंक्चर नव्हती. तक्रारदारांनी सदरच्या बसचे तिकिट खरेदी न करता जाबदेणारांविरुद्ध खोटी तक्रार दाखल करुन मंचाचा व जाबदेणारांचा वेळ वाया घालविला, असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 26 प्रमाणे नामंजूर करते व तक्रारदारास रक्कम रु. 5000/- दंड करते.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते
:- आदेश :-
1. तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986
कलम 26 प्रमाणे नामंजुर करण्यात येते.
2. तक्रारदारांनी दंडापोटी रक्कम रु. 5,000/- (रु. पाच
हजार फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून चार
आठवड्यांच्या आंत जाबदेणारांना द्यावी.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
(एस. के. कापसे) (अंजली देशमुख)
सदस्य अध्यक्ष