तक्रारदारातर्फे अॅड. श्री पोटे हजर.
जाबदेणार क्र. 2 तर्फे प्रतिनिधी श्री. वाघमोडे हजर
जाबदेणार क्र. 1 व 3 गैरहजर (एकतर्फा)
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(29/05/2013)
प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी मोबाईल कंपनी व मोबाईलच्या विक्रेत्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार सेवेतील त्रुटी केल्यामुळे दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालील प्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे कुभारवाडा लोहगांव येथील रहिवासी असून, ते रियल इस्टेट व आयुर्वेदीक मार्केटींगचा व्यवसाय करुन त्यांची उपजिवीका करतात. त्यांनी जाबदेणार क्र. 2 यांचेकडून नोकिया कंपनीचा एन-8 हा मोबाईल रक्कम रु. 21,400/- ला खरेदी केला होता. त्यानंतर आयडीया कंपनीचे सीमकार्ड, मोबाईलचे कव्हर आणि स्क्रीन कार्ड याकरीता रक्कम रु. 1000/- खर्च केले. जाबदेणार क्र. 2 हे मोबाईलचे विक्रेते आहेत, जाबदेणार क्र. 3 हे मोबाईल कंपनीचे केअर सेंटर आहे व जाबदेणार क्र. 1 ही मोबाईल कंपनी आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेला मोबाईल दोन ते तीन दिवस व्यवस्थित चालला. त्यानंतर तीन दिवसांनी तक्रारदारांच्या मोबाईलमध्ये बिघाड निर्माण झाला, म्हणून सदरचा मोबाईल तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीकरीता दिला. सदरचा मोबाईल जाबदेणार क्र. 2 यांनी सुरु करुन दिला, परंतु 4-5 दिवसांनी तो पुन्हा नादुरुस्त झाला, त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे मोबाईल बदलून द्या
किंवा रक्कम परत करा, अशी विनंती केली. परंतु जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदार यांची विनंती धुडकावून लावली व जाबदेणार क्र. 3 यांचेकडे जाऊन सदरचा मोबाईल दुरुस्त करुन घ्या, असे सांगितले. प्रस्तुतचा मोबाईल वारंवार आपोआप बंद व्हायचा, त्याचप्रमाणे त्यावर इनकमींग कॉलचे नंबर दिसर नव्हते. सदरचा मोबाईल तक्रारदार यांनी दि. 17/11/2011 रोजी जाबदेणार क्र. 3 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिला. त्यानी सदरचा मोबाईल तक्रार दाखल करेपर्यंत दुरुस्त करुन दिला नाही. दि. 20/12/2011 रोजी नोकिया कंपनीमधून तक्रारदार यांना फोन आला व तुमचा फोन नोकिया सर्व्हिस सेंटर येथे पोहचला आहे, तो घेऊन जा, असे सांगितले. परंतु तक्रारदार हे विमानतळावर होते. तक्रारदार 22 तारखेनंतर परत पुण्यात आल्यानंतर नोकिया सेंटरमध्ये गेले असता, त्यांना फोन उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना तीन दिवसांत नवीन हँडसेट देतो आणि तोपर्यंत दुसरा चांगला हँडसेट वापरायला देतो असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या वेबसाईटवर ई-मेल पाठवून तक्रार नोंदविली. या तक्रारीस जाबदेणार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा मोबाईल दुरुस्तही करुन दिला नाही अथवा दुसरा मोबाईलही दिला नाही. तक्रारदार यांचा रियल ईस्टेट व आयुर्वेदीक मार्केटींगचा व्यवसाय आहे, या व्यवसायाकरीता तक्रारदार यांनी सदरचा मोबाईल खरेदी केला होता, परंतु त्यांना या मोबाईलचा काहीही उपयोग झाला नाही, उलट मानसिक त्रास झाला. सदरचा मोबाईल तक्रारदार यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अमेरीकन कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्याची अंमलबजावणी करता आली नाही, म्हणून त्यांचे रक्कम रु. 6,00,000/- चे नुकसान झाले. सदर करारनाम्याबाबत तक्रारदार यांनी दैनंदीन सकाळ पेपरमध्ये जाहीरात दिली होती व रक्कम
रु. 25,000/- चे पत्रके वाटली होती. तक्रारदार यांना जाबदेणार यांनी योग्य ती सेवा न दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी मोबाईलची किंमत रक्कम रु. 21,400/-, अमेरीकन कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे झालेले नुकसान रक्कम रु. 6,00,000/-, सकाळ पेपरमध्ये दिलेल्या जाहीरातीला झालेला खर्च रक्कम रु. 5,000/-, वाटलेल्या पत्रकांसाठी झालेला खर्च रक्कम रु. 25,000/-, रियल ईस्टेटच्या व्यवसायामध्ये झालेले नुकसान रक्कम रु. 4,00,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 10,000/-, या सर्व रकमा व्याजासह, अशी एकुण रक्कम रु, 11,51,544/- ची मागणी केलेली आहे.
2] जाबदेणार क्र. 1 व 3 यांना नोटीस बजवूनही ते गैरहजर राहीले, म्हणून त्यांच्याविरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश करण्यात आला. जाबदेणार क्र. 2 यांचेतर्फे या तक्रारीस लेखी कैफियत दाखल केली आणि त्यामध्ये तक्रारीतील कथने नाकारली आहेत. जाबदेणार क्र. 2 यांच्या कथनानुसार, तक्रारदार यांनी त्यांच्याकडून मोबाईल खरेदी केला, पहिले तीन दिवस सदरचा मोबाईल व्यवस्थित चालला, चौथ्या दिवशी मोबाईल नादुरुस्त झाला, म्हणून जाबदेणार क्र. 2 यांनी तज्ञ व्यक्तीकडून सदरचा मोबाईल तपासून घेतला, त्यामध्ये विषेश समस्या आढळली नाही. तक्रारदार यांनी मोबाईल व्यवस्थित न हाताळल्यामुळे मोबाईलमध्ये दोष निर्माण झाला. सदरचा मोबाईल जाबदेणार क्र. 2 यांनी दोषविरहीत करुन दिला. त्यानंतर तक्रारदार पुन्हा 4-5 दिवसांनी मोबाईलची तक्रार घेऊन आले, त्यावेळी जाबदेणार क्र. 2 यांनी मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवावा अशी
विनंती केली. कंपनीच्या नियमानुसार मोबाईल घेतल्यानंतर 24 तासांमध्ये जर त्यामध्ये बिघाड निर्माण झाला तर दुकानदार बदलून देऊ शकतो, त्यानंतर मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवावा लागतो. जाबदेणार क्र. 2 यांच्यातर्फे असे प्रतिपादन करण्यात आले की, मोबाईल विक्री पश्चात सेवा सर्व्हिस सेंटरमध्ये मिळते, ते या बाबतीत कोणताही निर्णय देऊ शकत नाहीत, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यात यावे अशी विनंती जाबदेणार क्र. 2 करतात.
3] दोन्ही पक्षकारांची लेखी कथने, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेतले असता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरचे मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालीलप्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणारांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाची सेवा दिली केली आहे का? | होय |
2 | अंतीम आदेश? | तक्रार अंशत: मंजूर |
कारणे
4] प्रस्तुतच्या प्रकरणातील शपथपत्र व कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता, असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून नोकिया कंपनीचा एन-8 हा मोबाईल दि. 20/10/2011 रोजी रक्कम रु. 21,400/- ला घेतला होता. त्यानंतर
सदरच्या मोबाईलमध्ये वारंवार बिघाड निर्माण होऊ लागला, म्हणून तक्रारदार यांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला जाबदेणार क्र. 2 यांनी सदरचा मोबाईल दुरुस्त करुन दिला, परंतु त्यानंतर मोबाईल पुन्हा नादुरुस्त झाला म्हणून सदरचा मोबाईल सेवा केंद्रामध्ये पाठविला. या प्रकरणातील तक्रारदार यांनी दाखल केलेला पत्रव्यवहार पाहता असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी कंपनीकडे सदरचा मोबाईल दुरुस्त करण्याकरीता वारंवार पाठपुरावा केला, परंतु जाबदेणार कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशा परिस्थितीमध्ये जाबदेणार यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाची सेवा दिली, हे स्पष्ट होत.
5] तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मागताना अवास्तव अशी मागणी केलेली आहे. अमेरीकन कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे झालेले नुकसान रक्कम रु. 6,00,000/-, जाहीरातीपोटी रक्कम रु. 30,000/- व रियल ईस्टेटच्या व्यवसायामध्ये झालेले नुकसान रक्कम रु. 4,00,000/-, अशी मागणी तक्रारदार यांनी केलेली आहे. या नुकसानाचा संबंध तक्रारदार यांना जाबदेणार यांच्याकडून खरेदी केलेल्या मोबाईलशी जोडता येणार नाही. तक्रारदार यांना सेवेमध्ये त्रुटीसाठी नुकसान भरपाई मागता येईल, परंतु व्यवसायामध्ये नुकसान झाले म्हणून ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार नुकसान भरपाई मागता येणार नाही. त्याचप्रमाणे तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये व्याजाबाबत कोणताही करार झालेला नव्हता, त्यामुळे तक्रारदार यांना व्याजही मागता येणार नाही. त्यामुळे तक्रारदार हे मोबाईलची किंमत रक्कम रु. 21,400/-, त्यांना जाबदेणार यांनी दिलेल्या निकृष्ट सेवेबद्दल नुकसान भरपाई रक्कम रु. 3,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. 2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1,000/- मिळण्यास पात्र आहेत. वर उल्लेख केलेले मुद्दे, निष्कर्षे आणि कारणे यांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना निकृष्ट दर्जाची
सेवा दिलेली आहे, असे जाहीर करण्यात येते.
3. जाबदेणार क्र. 1, 2 व 3 यांनी वैयक्तीक व
संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना एकुण रक्कम
रु. 27,400/- (रु. सत्तावीस हजार चारशे फक्त)
या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा
आठवडयांच्या आत द्यावेत.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्कागदपत्रे
पाठविण्यात यावी.