(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक-01 ऑक्टोंबर, 2021)
01. तक्रारकर्ता हा पिरॅमीड गॅस एजन्सीचा प्रोप्रायटर असून त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी, शाखा भंडारा यांचे कडून विमाकृत वाहनास अपघात झाल्याने दुरुस्तीच्या खर्चाची रक्कम मिळावी व इतर अनुषंगीक मागण्यांसाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा पिरॅमीड गॅस एजन्सीचा प्रोप्रायटर असून त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून त्याचे बुलेरो पिकअप वाहन क्रं-एम.एच.-36- ए.ए.-0188 ची विमा पॉलिसी काढली असून सदर विमा पॉलिसीचा क्रमांक-281303/31/17/63/00002198 असा असून विम्याचा कालावधी हा दिनांक-28.06.2018 पासून ते दिनांक-27.06.2019 चे मध्यरात्री पर्यंत वैध आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी मध्ये विमा पॉलिसीपोटी प्रिमीयम म्हणून दिनांक-26.06.2018 रोजी रुपये-10,600/- भरले होते. वाहनास अपघात झाल्यास रुपये-7,50,000/- पर्यंत विमा राशी देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष विमा कंपनीने स्विकारली होती.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-24.11.2018 रोजी सदर विमाकृत वाहन मेंढा गराडा ते श्रीनगर जाणा-या डांबरी रस्त्यावर उजव्या बाजुला पलटी मारल्याने अपघात झाला. सदर अपघाताची सूचना त्याने त्वरीत विरुध्दपक्ष विमा कंपनीचे व्यवस्थापकांना दिली. अपघातामुळे क्षतीग्रस्त वाहनाची त्याने दुरुस्ती केली. सदर दुरुस्तीपोटी त्याला रुपये-2,81,304/- एवढा खर्च आल्याने त्याने दुरुस्ती बिलांसह विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालया विमा दावा दिनांक-25.02.2019 रोजी दाखल करुन विम्याचे रकमेची मागणी केली. विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिनांक-17.05.2019 रोजीचे पत्राव्दारे तक्रारकर्त्याचा विमा दावा हा त्याचे वाहनचालका कडे अपघाताचे वेळी एल.एम.व्ही. परवाना असल्याने आणि मालवाहू गाडीचा परवाना नसल्याचे कारणा वरुन नाकारला. या कारणास्तव विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारल्याने ही त्यांचे सेवेतील त्रटी आहे, त्यामुळे त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याला विमाकृत वाहनाचे दुरुस्तीसाठी आलेला खर्च रुपये-2,81,304/- तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बाबत नुकसान भरपाई रुपये-50,000/- आणि सेवेतील त्रटी बाबत भरपाई म्हणून रुपये-1,00,000/- असे मिळून एकूण रक्कम रुपये-4,31,304/- एवढया रकमेची मागणी विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून तो करीत आहे. म्हणून त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे खालील प्रकारे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिनांक-17.05.2019 रोजीचे पत्रान्वये त्याचा विमा दावा चुकीचे कारण असल्याचा निर्वाळा देऊन त्याचा विमा दावा मंजूर करण्यात यावा.
- तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल तसेच सेवेतील त्रटी बाबत वर नमुद केल्या प्रमाणे एकूण रक्कम रुपये-4,31,304/- तक्रारीचे निकाला पासून एक महिन्याचे आत विरुध्दपक्ष विमा कंपनीने देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी उत्तर जिल्हा आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये अभिलेखाशी संबधित भागास वेगळे उत्तर देण्याची गरज नसल्याचे नमुद केले. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीने विरुध्द केलेले आरोप नामंजूर केलेत. आपले खास बयाना मध्ये विरुध्दपक्ष विमा कंपनीने नमुद केले की, अपघात दिनांक-24.11.2018 रोजी विमाकृत महिंद्र बोलेरो पिक वाहन नोंदणी क्रं-एम.एच.-36-एए-0188 चा चालक श्री राजेश लांजेवार याचे जवळ वाहन परवाना क्रं-एच.एच.-3620160001680 हा LMV-NT असा होता आणि परवाना फक्त लाईट मोटर व्हेईकल चालविण्यासाठीच वैध आहे आणि सदरहू महिंद्र बोलेरो पिकअप वाहन नोंदणी क्रं-एम.एच.-36-एए-0188 हे ट्रान्सपोर्ट व्हेईकल आहे. सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्स 1989 चे कलम-3 चे “Violation of Driver Clause” अंतर्गत वैध वाहन परवाना असल्या शिवाय वाहन चालक कोणतेही वाहन चालवू शकत नाही. हया बाबत विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यांचे दिनांक-17.05.2019 रोजीचे पत्रा व्दारे सुचीत केलेले आहे. अपघाती घटनेच्या वेळी विमाकृत वाहन चालका जवळ ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालविण्याचा वैध परवाना नसल्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचे अधिन राहून तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केलेला आहे. ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालविताना वाहन चालका जवळ घटनेच्या वेळी LMV-TR असा परवाना असावयास हवा होता परंतु अपघाती घटनेच्या वेळी वाहन चालका जवळ LMV-NT असा वाहन चालक परवाना होता म्हणजेच अपघाती घटनेच्या वेळी वाहन चालका जवळ ट्रान्सोर्ट व्हेईकल चालविण्याचा परवाना नव्हता. सबब तक्रारकर्त्याचा विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने रुल-3 सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्स-1989 चे तसेच विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचे अधिन राहून नामंजूर केलेला आहे, यात त्यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही करीता विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती विमा कपंनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्तर तसेच दाखल दस्तऐवज याचे अवलोकन जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे करण्यात आले. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्रीमती वडनेरकर तर विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील कु. दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष न्याय निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहन दुरुस्ती साठी आलेल्या खर्चा संबधात केलेला विमा दावा नामंजूर करुन विरुध्दपक्ष विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
02 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
-कारणे व मिमांसा-
मुद्दा क्रं 1 व 2
05. तक्रारकर्त्याचे विमाकृत महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन नोंदणी क्रं-एम.एच.-36/एए-0188 तसेच सदर वाहनाची विमा पॉलिसी क्रं-281303311810002689, विम्याचा कालावधी दिनांक-28.06.2018 पासून ते दिनांक-27.06.2019 चे मध्यरात्री पर्यंत या सर्व बाबी बद्दल उभय पक्षां मध्ये कोणताही विवाद नाही. तसेच दिनांक-24.11.2018 रोजी सदर विमाकृत महिन्द्रा बोलेरो पिकअप वाहन हे मेंढा गराडा ते श्रीनगर जाणा-या डांबरी रस्तयावर उजव्या बाजूला पलटी मारल्याने अपघात झाला होता ही बाब सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनीला मान्य आहे.
06. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा विवादीत मुद्दा असा आहे की, अपघात दिनांक-24.11.2018 रोजी विमाकृत वाहनाचा चालक श्री राकेश लांजेवार याचे कडे चालक परवाना क्रं-एम.एच.-3620160001680 हा LMV-NT लाईट मोटर व्हेईकल चालविण्यासाठीच वैध होता आणि विमाकृत वाहन महिंद्रा बोलेरो पिकअप क्रं-एम.एच.-36-एए-0188 हे ट्रान्सपोर्ट व्हेईकल आहे, त्या अंतर्गत वैध वाहन चालक परवाना असल्या शिवाय चालक कोणतेही व्हेईकल चालवू शकत नाही, हया बाबत विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्यास दिनांक-17.05.2019 रोजीचे पत्राव्दारे सुचित केलेले आहे. अपघाती घटनेच्या वेळी विमाकृत वाहनहे ट्रान्सपोर्ट वाहन असल्याने वाहन चालका जवळ LMV-TR असा परवाना असावयास हवा होता परंतु घटनेच्या वेळी वाहन चालका जवळ LMV-NT परवाना होता म्हणजेच घटनेच्या वेळी वाहन चालका जवळ ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालविण्याचा परवाना नव्हता त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने सेंट्रल मोटर व्हेईकल्स रुल्स 1989 रुल-3 आणि विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचे अधिन राहून तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केल्याने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
विरुध्दपक्ष विमा कंपनीने मोटर व्हेईकल्स अॅक्टचे कलम-3 चा दस्तऐवज दाखल केला त्यामध्ये असे नमुद केलेले आहे की-
Section 3 of MV Act states that no person shall drive a motor vehicle in any public place unless he holds an effective driving license issued to him, authorizing him to drive the vehicle and no person shall so drive a transport vehicle (other than a motor cab or motor cycle) hired for his own use or rented under any scheme.
07. आम्ही तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहनास अपघात झाला त्यावेळी विमाकृत वाहन चालविणारा वाहन चालक श्री राकेश लांजेवार यांचे वाहन चालक
परवान्याच्या प्रतीची पाहणी केली असता सदर वाहन परवाना हा LMV म्हणून दिलेला असून तो दिनांक-02.03.2016 ते दिनांक-01.03.2036 (NT) वैध आहे. वाहन चालक परवान्या मध्ये LMV NT DESCRIPTION मध्ये LMV –NT-CAR असे नमुद आहे. LMV-TR DESCRIPTION LMV-TRANSPORT असे नमुद आहे.
08. जिल्हा ग्राहक आयोगाचे मते अपघाती घटनेच्या वेळी तक्रारकर्त्याचे विमाकृत वाहन चालका जवळ वाहन चालविण्याचा LMV NT असा परवाना होता. विमाकृत वाहन हे ट्रान्सपोर्ट वाहन असल्याने LMV-TR अशा प्रकारचा परवाना नव्हता. आम्ही पोलीस स्टेशन कारधा यांनी केलेल्या घटनास्थळ पंचनाम्याचे वाचन केले असता त्यामध्ये वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने सिलेंडर भरलेले वाहन रोडखाली पलटी झाल्याचे वाहन चालक सांगत आहे असे नमुद आहे. वाहन चालवित असताना अचानक वाहनाचे ब्रेक फेल झाल्यामुळे सदर अपघात घडलेला आहे, विमाकृत वाहन चालकाचे निष्काळजीपणा मुळे वा अकार्यक्षमतेमुळे सदर अपघात घडलेला नाही. विमाकृत वाहन चालविण्यास सदर वाहन चालक असमर्थ होता त्यामुळे अपघात झाला असे म्हणता येणार नाही. अपघाती घटना घडली त्यावेळेस विमाकृत वाहनावरील चालक श्री राकेश लांजेवार याचे जवळ वैध वाहन चालक परवाना होता परंतु त्याचे जवळ ट्रान्सपोर्ट वाहन चालक परवाना नव्हता. परंतु या एवढया एकाच कारणास्तव तक्रारकर्त्याचा विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने नामंजूर केला.
09. तक्रारकर्त्याचे वकीलांनी मा. सर्वोच्च न्यायालयाचे खालील निवाडयावर आपली भिस्त ठेवली-
Hon’ble Supreme Court of India- 2018 (2) Mh.L.J.- “SANT LAL –VERSUS-RAJESH”
Driver having licence to drive light motor vehicle can drive a transport vehicle of LMV class- There is no necessity to obtain separate endorsement to drive transport vehicle of light motor vehicle class.
सदर निवाडया प्रमाणे वाहन चालका जवळ लाईट मोटर व्हेईकल (LMV) चालविण्याचा परवाना होता. लाईट मोटर व्हेईकल म्हणजे मोटर सायकल, स्कुटर, कार, जीप अशी हलक्या दर्जाची वाहने चालविण्याचा परवाना होता परंतु त्याने ट्रॅक्टर चालविताना त्याला ट्राली जोडून माल वाहून नेला होता, सदर वाहन परवान्यावर ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालविण्याचा शेरा (Remark) नव्हता त्यामुळे मोटर वाहन अपघात दावा प्राधिकरण (Motor Accident Claim Tribunal-MACT) यांनी विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झालेला असल्यामुळे विमा कंपनीला वाहनाचे मालका कडून विम्याची दिलेली रक्कम परत वसुल करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यावर मा. सर्वोच्च न्यायालयाने वाहन चालका जवळ लाईट मोटर व्हेईकल चालविण्याचा परवाना होता आणि तो लाईट मोटर व्हेईकल वर्गवारी मध्ये ट्रान्सपोर्ट व्हेईकल चालवू शकतो त्यासाठी स्वतंत्र एन्डार्समेंटची गरज नसल्याचे नमुद केले. ट्रॅक्टरला जोडलेली ट्राली हे वाहन लाईट मोटर व्हेईकल या कॅटेगिरीतील ट्रान्सपोर्ट व्हेईकल असल्याने विमा कंपनीला वाहन मालका कडून विमा दाव्यापोटी दिलेली रक्कम वसुल करण्याचा अधिकार नसल्याचे मा.सर्वोच्च न्यायालयाने निवाडया मध्ये स्पष्ट केलेले आहे.
हातातील प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा लागू होतो असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. हातातील प्रकरणात वाहन चालका जवळ ट्रान्सपोर्ट चालक परवाना नव्हता तर एल.एम.व्ही. लाईट वाहन चालक परवाना होता आणि त्यामुळे विमाकृत वाहनास अपघात झाला असे म्हणता येणार नाही कारण पोलीसांचे पंचनाम्या मध्ये स्पष्टपणे नमुद केले आहे की, वाहन चालकाचे बयाना प्रमाणे अपघाताचे वेळी विमाकृत वाहनाचे ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याचे कडेला विमाकृत वाहन उलटल्याने अपघात झाला. या प्रकरणात वाहनचालका जवळ वाहन चालविण्याचा परवानाच नव्हता किंवा तो अप्रशिक्षीत वाहन चालक होता किंवा त्याने वेगाने निष्काळजीपणाने वाहन चालविल्यामुळे अपघात झाला होता अशा कोणत्याही बाबी जिल्हा ग्राहक आयोगा समोर आलेलया नाहीत. वाहनाचे ब्रेक अचानक फेल होणे या मध्ये वाहन चालकाचा कोणताही निष्काळजीपणा दिसून येत नाही आणि त्यामुळे केवळ एल.एम.व्ही. ट्रान्सपोर्ट (LMV-TR) परवाना नसल्याचे कारणा मुळे तक्रारकर्त्याचा विमाकृत वाहनाचे दुरुस्ती संबधीचा केलेला विमा दावा नामंजूर करण्याची कृती म्हणजे विरुध्दपक्ष विमा कंपनीने दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर “होकारार्थी” नोंदवित आहोत.
10. मुद्दा क्रं 1 चे उत्तर “होकारार्थी” नोंदविल्याने मुद्दा क्रं 2 अनुसार तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
11. तक्रारकर्त्याने विमाकृत वाहन क्षतीग्रस्त झाल्या नंतर त्याचे दुरुस्तीची बिले अभिलेखावर दाखल केलेली आहेत, त्याचे विवरण खालील प्रमाणे -
Sl.No. | Shop Name | Invoice No. | Bill Date | Amount. |
1 | Sharda Stores &TyresBhandara | GTCR 577 | 01-11-2018 | 7300/- |
2 | Sharda Stores &TyresBhandara | GTCR 700 | 10-12-2018 | 13,600/- |
3 | New Apna Motor Repairing Works Bhandara | 11106 | | 8960/- |
4 | Jain Automobiles Bhandara | 693 | 10-12-2018 | 4194/- |
5 | New Apna Motor Repairing Works Bhandar | 1167 | | 2630/- |
6 | N.S. Batteries Inverters & UPS Bhandara | 846 | 23-01-2019 | 350/- |
7 | Mehta Auto Parts Bhandara | 3072 | 07-02-2019 | 4750/- |
8 | Vehicle Toing Charges | | | 5350/- |
9 | Painting & General Repairing | | | 6850/- |
10 | Kanta Fabrication & Body Works Bhandara | | | 111310/- |
11 | Kanta Fabrication & Body Works Bhandara | | | 69300 |
| | Total Expdt. | | 234594/- |
12. तक्रारकर्त्याने त्याचे क्षतीग्रस्त वाहनास आलेला एकूण खर्च रुपये-2,81,304/- एवढा हिशोबात धरलेला आहे परंतु प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्याने विमाकृत क्षतीग्रस्त वाहन दुरुस्ती संबधाने ज्या विविध बिलांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत त्यावरुन तक्रारकर्त्याने चुकीची एकूण दुरुस्तीची रक्कम हिशोबात घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या बिलांचे प्रतीवरुन क्षतीग्रस्त विमाकृत वाहनास आलेला एकूण खर्च रुपये-2,34,594/- असल्याचे दिसून येते आणि तेवढा खर्च जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे हिशोबात घेण्यात येतो.
13. सर्वसाधारण व्यवहारात असे दिसून येते की, विमाकृत वाहन असल्याने जास्तीची दुरुस्ती करण्या कडे विमाधारकाचा कल असतो. क्षतीग्रस्त वाहनाची पाहणी विरुध्दपक्ष विमा कंपनीचे अधिकारी यांनी केली असे तक्रारीत कुठेही नमुद नाही. त्याच बरोबर विमाकृत वाहनास अपघात झाल्या बद्दल तक्रारकर्त्याने तक्रारीत त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे अधिकारी यांना अपघाताची सुचना दिली होती परंतु अशी लेखी सुचना दिली होती या बद्दल कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत उभय पक्षकारांचा विचार करता तक्रारकर्त्यास एकूण आलेल्या खर्चाच्या 50 टक्के रक्कम मंजूर करणे योग्य व न्यायोचीत होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्यास विमाकृत वाहनास आलेला एकूण खर्च रुपये-2,34,594/- असून त्याचे 50 टक्के रक्कम रुपये-1,17,297/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्याच बरोबर तक्रारकर्त्याला
झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ता मे. पिरॅमीड इंडेन गॅस एजन्सी तर्फे- प्रोप्रायटर मनिष भूपेंद्र खारा यांची विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे शाखा व्यवस्थापक, भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे शाखा व्यवस्थापक, भंडारा यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास त्याचे अपघातामुळे क्षतीग्रस्त झालेले विमाकृत वाहन महिंद्रा बुलेरो पिकअप क्रं-एम.एच.-36-ए.ए.-0188 यास आलेल्या दुरुस्तीखर्चा पोटी विमा रक्कम रुपये-1,17,297/- (अक्षरी रुपये एक लक्ष सतरा हजार दोनशे सत्याण्णऊ फक्त) तक्रारकर्त्यास अदा करावी आणि सदर रकमेवर तक्रार पंजीबध्द दिनांक-12.12.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्के दराने व्याज तक्रारकर्त्याला दयावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे शाखा व्यवस्थापक, भंडारा यांनी तक्रारकर्त्याला दयाव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष नॅशनल इन्शुरन्स कंपनी तर्फे शाखा व्यवस्थापक, भंडारा यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणितप्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.