Dated the 06 Aug 2015
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
1. तक्रारदार ट्रस्टने सन-2010-2011 या कालावधीत तीन वर्षाची आंब्याची रोपे मौजे वज्रेश्वरी येथील 28 एकर जागेत लावण्याचा प्रोजेक्ट चालु केला. जानेवारी-2011 मध्ये आंब्याची रोपे लावण्याचे काम पुर्ण झाले. तक्रारदार ट्रस्टला सदर प्रोजेक्टसाठी एक करोड रुपयांचा खर्च लागला.
2. तक्रारदार ट्रस्टने सामनेवाले यांचेकडून ता.20.07.2011 ते ता.19.07.2012 या कालावधीची फायर विमा पॉलीसी घेतली. सदर पॉलीसी तक्रारदार ट्रस्टच्या बांधकामाकरीता (Civil Work) रु.50,00,000/- व 2800 आंब्यांच्या झाडाकरीता (Stock) एक करोड अशी एकूण दिड कोटी एवढया रकमेची होती. तक्रारदार ट्रस्टने सदर पॉलीसीचा प्रिमियम रु.19,854/- सामनेवाले यांचेकडे भरणा केला आहे. दुर्देवाने 27 व 28 ऑगस्ट,2011 रोजी आलेल्या पुरामध्ये सदर एरीयाचे बांधकामाचे व आंब्याच्या झाडाचे नुकसान झाले.
3. तक्रारदार ट्रस्टने वरील घटनेची माहिती तात्काळ सामनेवाले यांना दिली व त्यानंतर ता.30.08.2011 रोजी लेखी स्वरुपात दिली. तक्रारदार ट्रस्टचे ट्रस्टी आनंद पारिख यांनी सामनेवाले यांचे अधिकारी श्री.रघु नायर यांना ई-मेलव्दारे सदर घटनेची माहिती दिली व सर्व्हेअर यांची नेमणुक करण्याबाबत चौकशी केली.
4. सामनेवाले यांचे अधिका-यांनी नुकसानीचे अंदाजपत्रक पाठविण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी ता.05.09.2011 रोजीच्या पत्रान्वये नुकसानीबाबतची माहिती दिली.
5. सामनेवाले विमा कंपनीने ता.06.09.2011 रोजीच्या ई-मेलव्दारे श्री.अनिल फडके यांची सर्व्हेअर म्हणुन नेमणुक केल्याबाबत तक्रारदार ट्रस्टला कळविले.
6. सर्व्हेअर यांनी तक्रारदार ट्रस्ट यांचेकडे ता.16.04.2012 रोजीच्या ई-मेलव्दारे नुकसानीबाबतचा अहवाल दाखल केला. सर्व्हेअर यांच्या अहवालानुसार रक्कम रु.2,01,404/- बांधकामा करीता निश्चित केली व रोपाच्या नुकसानीची रक्कम रु.4,99,760/- एवढी रक्कम निश्चित केली. सामनेवाले यांनी ता.03.10.2012 रोजी पत्रान्वये बांधकामाच्या नुकसानीबाबत रु.1,72,706/- एवढया रकमेचे बील (Voucher) तक्रारदारांना पाठविले तसेच रु.13,236/- आंब्याच्या रोपांकरीता सामनेवाले यांच्याकडे भरणा केलेली रक्क्म तक्रारदारांना परत दिली.
7. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे आंब्याच्या रोपांबाबतची प्रिमियमची रक्कम परत का केली ? आंब्यांच्या रोपांच्या नुकसानीचा प्रस्तावास मान्यता का दिली नाही ? आंब्याची रोपे पुर्णपणे पुरामध्ये वाहुन गेली. त्यामुळे त्यांना वाढविण्या करीता (Nurturing Cost) झालेल्या खर्चाची रक्कम अदा का केली नाही ? सामनेवाले यांनी बांधकाम नुकसानीची रक्कम सर्व्हेअर अहवालानुसार निश्चित केलेल्या रकमेपेक्षा रु.2,000/- रुपयांनी कमी का दिली? वगैरे संदर्भात चौकशी केली परंतु सामनेवाले यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
8. तक्रारदारांनी आंब्याच्या रोपाच्या नुकसानीबाबतची रक्कम रु.13,48,008/- व बांधकाम (Civil Work) नुकसानीची सर्व्हेअर अहवालानुसार निश्चित केलेली रक्कम रु. 2,01,404/- सामनेवाले यांचेकडून मिळण्यासाठी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
9. प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले यांचे विरुध्द ता. 16/04/2014 रोजी “No Say” आदेश पारित झाला आहे. सामनेवाले यांचा पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल आहे.
10. सामनेवाले यांचे लेखी युक्तीवादानुसार पॉलीसीच्या अटी व शर्ती क्रमांक-6 (ii) नुसार नुकसानीबाबतची घटना घडल्यानंतर 12 महिन्यांनी झालेल्या नुकसानीची जबाबदारी सामनेवाले विमा कंपनीकडून वसुल करता येत नाही. या कारणास्तव तक्रारदारांची तक्रार योग्य नाही. तक्रारदार सदर विमा पॉलीसीमध्ये आंब्याची रोपे समाविष्ठ नाहीत सबब आंब्याच्या रोपाच्या नुकसानीबाबतची जबाबदारी सामनेवाले यांचेवर येत नाही.
सामनेवाले यांचे आंब्याच्या रोपा करीता स्विकारलेली प्रिमीयमची रक्कम रु.13,236/- तक्रारदारांना परत पाठवली आहे, तसेच तक्रारदारांच्या बांधकामाच्या (Civil Work) नुकसानीच्या रकमेचे व्हाऊचर रु.1,72,706/- ता.03.10.2012 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांना पाठविले आहे.
11. तक्रारीतील कागदपत्रे पाहता प्रस्तुतची तक्रार गुरुदेव सिध्द पीठ पब्लिक ट्रस्ट यांनी दाखल केली आहे. प्रस्तुत ट्रस्ट बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा,1950 अन्वये नोंदणीकृत आहे. सदर ट्रस्ट मूळतः श्री. गुरुदेव आश्रम या नांवाने नोंदणीकृत केली होती. त्यानंतर गुरुदेव सिध्दपिठ हे नांव बदलविण्यात आले.
मा. राष्ट्रीय आयोगाच्या खालील न्यायनिवाडयानुसार ट्रस्ट ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(m) अन्वये Person या संज्ञेत येत नाही. सबब ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d) अन्वये ग्राहक या संज्ञेत येत नाही.
मा. राष्ट्रीय आयोगाच्या रिव्हीजन पिटीशन क्र. 2694/2013 मध्ये दि. 16/04/2015 रोजी दिलेल्या न्यायनिवाडयामध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहेः
“A Trust unlike a company, has no legal personality thus it cannot own property for entering into contracts, sue or sued. It is the trustee who own the trust property, enter into contracts sued or are sued.”
वरील न्यायनिवाडयामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाच्या प्रतिभा प्रतिष्ठान विरुध्द अलाहाबाद बँक जूहू [(2007) CPJ 33 NC] या न्यायनिवाडयाचा संदर्भ दिला आहे. सदर न्यायनिवाडयानुसार
“Public Trust - is Not “Person” within definition of C.P. Act 1986 – Not Consumer- Not entitled to file complaint before Fora.
वरील मा. राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिवाडयानुसार तक्रारदार ट्रस्ट ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d) नुसार ग्राहक या संज्ञेत येत नाही. सबब प्रस्तुतची तक्रार मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही असे मंचाचे मत आहेः
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
“या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
आदेश
1. तक्रार क्रमांक 177/2013 फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.