::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक– 15 फेब्रुवारी, 2014) 1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये तिचा मुलगा मृतक विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे याचे अपघाती मृत्यू संबधाने आई या नात्याने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्षा कडून विमा रक्कम मिळण्यासाठी दाखल केली आहे. मंचा समक्ष तक्रार चालू असतानाचे काळात तक्रारकर्तीचा मृत्यू ग्राम पंचायत चाचेर, पंचायत समिती मौदा, जिल्हा नागपूर यांचे मृत्यू प्रमाणपत्रा नुसार दि.24.08.2013 रोजी झालेला असल्याने मंचाचे दि.25.10.2013 रोजीचे आदेशान्वये तक्रारकर्तीचे कायदेशीर वारसदार म्हणून तक्रारदार क्रं 1 ते 3 यांना प्रस्तुत तक्रारीमध्ये समाविष्ठ केलेले आहे.
2. तक्रारकर्तीचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे- तक्रारकर्ती ही मौजा चाचेर, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून तिचा मुलगा मृतक श्री निलेश शिवाजी खडसे याचे मालकीची
मौजा चाचेर, तालुका मौदा जिल्हा नागपूर येथे सर्व्हे नं. 857/2 ही शेत जमीन आहे. श्री निलेश शिवाजी खडसे हा व्यवसायाने शेतकरी होता व सदर शेतीतील उत्पन्नावर तो कुटूंबाचे पालनपोषण करीत होता. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं-1 दि न्यु इंडीया एश्युरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे, महाराष्ट्र शासना तर्फे विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, मौदा, तालुका मौदा, जिल्हा नागपूर यांचे मार्फतीने शेतक-यांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड ही शेतक-यांचे अपघात विमा दाव्यांची छाननी करुन विमा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे सादर करण्यासाठी नियुक्त केलेली सल्लागार कंपनी आहे. तक्रारकर्तीचा मुलगा श्री निलेश शिवाजी खडसे हा दि.19.11.2011 रोजी कन्हान गावी रस्त्यावर उभा असताना ट्रकने धडक दिल्याने जख्मी होऊन जागीच मृत्यू पावला. तक्रारकर्तीने तिचा मुलगा श्री निलेश शिवाजी खडसे याचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे दि.09.05.2012 रोजी, विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिका-या मार्फत विमा प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावा सोबत आवश्यक सर्व दस्तऐवज जोडले असताना देखील विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.27.05.2013 रोजीचे पत्राव्दारे गाव नमुना-6-ड पुरविला नसल्याचे कारण दर्शवून विमा दावा फेटाळला व तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिली. म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली असून त्याव्दारे शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षाकडे विमा प्रस्ताव दाखल दिनांक-09.05.2012 पासून द.सा.द.शे.18% दराने व्याजासह मिळावी तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षा कडून मिळावे अशा मागण्या केल्यात. 03. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचा समक्ष दि.08.01.2014 रोजी लेखी उत्तर दाखल करुन, तक्रारीस सक्त विरोध केला आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 च्या मार्फतीने तक्रारकर्तीचा विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह सादर केल्याची बाब मान्य आहे तसेच विमाप्रस्ताव दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस मिळाल्याची बाब त्यांना मान्य आहे. विमा दाव्या संबधीचे प्रस्तावाची छाननी केली असता विमा दाव्या संबधाने आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता तक्रारकर्तीने
केली नसल्याचे आढळून आले. त्यावरुन वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.26.12.2012 रोजी पत्र कृषी आयुक्त कार्यालयास पाठवून त्याव्दारे फॉर्म-6-ड ची मागणी केली. परंतु कृषी आयुक्त कार्यालयाने दस्तऐवजाची पुर्तता केली नसल्याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने कृषी आयुक्त कार्यालयास दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्वये विमा दावा नामंजूर केल्या बाबत कळविले. तक्रारकर्तीस वारवांर सुचित करुन सुध्दा तक्रारकर्तीने दस्तऐवजाची पुर्तता केली नसल्याने विमा दावा नामंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, त्रिपक्षीय करारा प्रमाणे तक्रारकर्तीने वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे आवश्यक सर्व दस्तऐवजांसह विमा दावा दि.14 नोव्हेंबर 2012 पूर्वी सादर करावयास हवा होता. तक्रारकर्तीचे म्हणण्या नुसार तिने सर्व दस्तऐवज सादर केले त्या संबधाने तिने पुराव्या दाखल दस्तऐवज/पोच सादर करावी. तक्रारकर्तीने विहित मुदतीत दस्तऐवजाची पुर्तता केली नाही, त्यामुळे सदरचा विमा दावा मुदतबाहय असल्याने चालू शकत नाही. म्हणून वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजूर केला ही त्यांची कृती कायदेशीर आहे. विमा कंपनीकडून सेवेत कोणताही न्युनतापूर्ण व्यवहार घडला नसल्याने तक्रार खारीज करावी, अशी विनंती वि.प.क्रं 1 विमा कंपनीने केली. 04. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांनी त्यांचे लेखी उत्तर निशाणी क्रं11 प्रमाणे दाखल केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, शेतक-यांचा विमा दावा विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्यासाठी ते शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्यामुळे विमा दाव्या संबधाने कोणतीही रक्कम देण्याची त्यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्या म्हणण्याचे समर्थनार्थ त्यांनी मा.महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रायव्हेट लिमिटेड –विरुध्द- श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्ये वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांचे विरुध्द शेतक-यास अपघात विमा दाव्याची रक्कम देण्याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्हणून वि.प.क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे, गाव चाचेर,तालुका मौदा, जिल्हा नागपूर याचा अपघाती मृत्यू दि.19.11.2011 रोजी झाला. त्याचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दावा प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर मार्फत वि.प.क्रं 2 कबाल नागपूर कार्यालयास दि.06.11.2012 रोजी प्राप्त झाला. सदर विमा प्रस्ताव पुढे त्यांनी वि.प.क्रं 1 न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीला पाठविला असता सदर विमा प्रस्ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्वये आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता न झाल्याचे कारणावरुन नामंजूर केला व तसे वारसदारास कळविले. 05. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मौदा यांनी नि.क्रं 10 अनुसार लेखी उत्तर न्यायमंचा समक्ष दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं 3 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये सदर तक्रार सन-2011-12 मधील असून मृतक विमाधारक शेतक-याचा मृत्यू दि.19.11.2011 रोजीचा आहे. मृतक विमाधारकाचे अपघाती मृत्यू संबधाने विमा प्रस्ताव वि.प.क्रं 3 कार्यालयाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचेकडे दि.21.05.2012 रोजी सादर केला व पुढे सदर विमा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी दि.05.11.2012 रोजी कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड, नागपूर यांचेकडे सादर केला. विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड, नागपूर यांचे पत्र क्रं-NAG/37/ज.अ.पि.यो./11-12 नागपूर दि.30.07.2012 अन्वये तक्रारकर्त्या कडून 6-ड ची मागणी करण्यात आली होती व तक्रारकर्त्या कडून दि.20.08.2012 रोजी प्राप्त होताच वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मौदा कार्यालयाने त्यांचेकडील पत्र जावक क्रं-1152/2012 दि.21.08.2012 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचेकडे सादर केले व पुढे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी दि.05.11.2012 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस लिमिटेड, नागपूर यांचेकडे सादर केले. वि.प.क्रं 3 यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडलेले आहे त्यामुळे त्यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही म्हणून त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, मौदा यांनी केली. 06 तक्रारकर्तीने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय, वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळल्याचे पत्र, विमा दावा प्रस्ताव, तक्रारकर्तीचे मृतक मुलाचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6-क, गाव नमुना-6-ड, फेरफार पत्रक, गावनमुना-8-अ, ग्राम पंचायत चाचेर यांचे वारसान प्रमाणपत्र, तक्रारकर्तीचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधाने एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा,इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र इत्यादीचा समावेश आहे. मंचा समक्ष दि.25.10.2013 रोजी, तक्रारकर्तीचा प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष चालू असताना दि.24.08.2013 रोजी मृत्यू झाल्याने तक्रारकर्तीचे वारसास तक्रारीत समाविष्ठ करण्या बाबत श्री चक्रधर शिवजी खडसे यांचे शपथपत्र दाखल करण्यात आले. त.क.चे वतीने श्री विनोद शिवाजी खडसे यांनी मंचा समक्ष दि.20.01.2014 रोजी शपथपत्र दाखल केले. तक्रारकर्तीचे वतीने लेखी युक्तीवाद सादर करण्यात आला. 07. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही दस्तऐवज सादर केले नाहीत. 08. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस तर्फे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा फेटाळल्याचे पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 09. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र जा.क्रं-ता.क.अ./शे.ज.अ.वि.-1152 दि.21.08.2012 अन्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचेकडे मौजा चाचेर येथील मृतक विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे याचे अपघाती मृत्यू विमा दाव्या संबधाने वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस यांचे मागणी नुसार नमुना-6-ड ची प्रत सादर केली व त्या पत्राची प्रत दाखल केली. तसेच सोबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र जा.क्रं-जि.अ.कृ.अ./सा.क.-1/शे.ज.अ.वि./6125/12, दि.05.11.2012 अन्वये मृतक विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे याचे विमा दाव्या संबधाने दस्तऐवजाची पुर्तता यादी नुसार नमुना 6-ड ची प्रत विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस नागपूर तर्फे श्री संदिप खैरनार, विभागीय प्रमुख राहणार नागपूर यांना सादर केल्या बाबतचे पत्राची प्रत सादर केली. तसेच यादीची प्रत दाखल केली. 10. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री क्षिरसागर आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री पाळधीकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 11. तक्रारकर्ती आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी यांचे परस्पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्यात आले. मुद्दा उत्तर (1) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?................... होय. (2) काय आदेश?......................................................तक्रार अंशतः मंजूर. :: कारण मिमांसा व निष्कर्ष :: मुद्दा क्रं-1 व 2- 12. तक्रारकर्तीचा मुलगा विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे याचा दि.19.11.2011 रोजी कन्हान गावी रस्त्यावर उभा असताना ट्रकने धडक दिल्याने जख्मी होऊन मृत्यू झाला. तक्रारकर्तीने तिचा मुलगा श्री निलेश शिवाजी खडसे याचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे दि.09.05.2012 रोजी, विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिका-या मार्फत विमा प्रस्ताव सादर केला. तक्रारकर्तीने विमा प्रस्तावा सोबत तिचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधाने शपथपत्र, तक्रारकर्तीचे मृतक मुलाचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6-क, फेरफार पत्रक, गाव नमुना-8-अ, ग्राम पंचायत चाचेर, पंचायत समिती मौदा, जिल्हा नागपूर यांचे वारसान प्रमाणपत्र तसेच पोलीस दस्तऐवज ज्यामध्ये एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र सादर केलेले आहेत, ही बाब विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने (“विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनी" म्हणजे दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्हीजनल मॅनेजर, डिव्हीजनल ऑफीस मुंबई असे समजण्यात यावे) नाकारलेली नाही. 13. प्रकरणातील उपलब्ध एफ.आय.आर. व घटनास्थळ पंचनाम्या वरुन मृतक विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे याचा दि.19.11.2011 रोजी कन्हान येथे रस्त्यावर उभा असताना समोरुन येणा-या ट्रक क्रं-एम.एच.-40/3866 चे चालकाने ट्रक वेगात चालवून मृतकास धडक मारल्याने जागीच मृत्यू झाल्याचे नमुद आहे. वैद्दकीय अधिकारी, कामठी, जिल्हा नागपूर यांचे दि.19.11.2011 रोजीचे शवविच्छेदन अहवालामध्ये सुध्दा मृतकाचा मृत्यू हा अपघातामुळे डोक्यास लागलेल्या दुखापतीमुळे झाल्याचे नमुद आहे. थोडक्यात मृतक विमाधारकाचा विमा, विम्याचे कालावधीत त्याचा झालेला अपघाती मृत्यू या बाबी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस मान्य आहेत व त्या संबधाने विवाद नाही.
14. प्रस्तुत प्रकरणामधील विवाद अत्यंत संक्षीप्त स्वरुपाचा आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 3 मार्फतीने विमा दावा आवश्यक दस्तऐवजांसह सादर केला व तो त्यांना प्राप्त झाल्याची बाब मान्य आहे. परंतु विमा दाव्या संबधी प्रस्तावाची छाननी केली असता त्या संबधाने आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता तक्रारकर्तीने केली नसल्याचे आढळून आले. त्यावरुन वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.26.12.2012 रोजी पत्र कृषी आयुक्त कार्यालयास पाठवून त्याव्दारे फॉर्म-6-ड ची मागणी विमा दावा निश्चीतीसाठी केली. परंतु अशी विनंती करुनही कृषी आयुक्त कार्यालयाने दस्तऐवजाची पुर्तता केली नसल्याने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने कृषी आयुक्त कार्यालय पुणे यांना दि.27.05.2013 रोजीचे पत्रान्वये विमा दावा नामंजूर केल्या बाबत कळविले. 15. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी मौदा, तालुका मौदा, जिल्हा नागपूर यांनी त्यांचे लेखी उत्तरामध्ये त्यांनी कार्यालयीन पत्र जा.क्रं-ता.क.अ./शे.ज.अ.वि.-1152 दि.21.08.2012 अन्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचेकडे मृतक विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे याचे अपघाती मृत्यू विमा दाव्या संबधाने वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस यांचे मागणी नुसार नमुना-6-ड ची प्रत सादर केल्याचे नमुद केले व आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ संदर्भित पत्राची प्रत लेखी उत्तरा सोबत दाखल केली. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयीन पत्र जा.क्रं-जि.अ.कृ.अ./सा.क.-1/शे.ज.अ.वि./6125/12, दि.05.11.2012 अन्वये
मृतक विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे याचे अपघाती मृत्यू विमा दाव्या संबधाने पुर्तता यादी नुसार नमुना 6-ड ची प्रत विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस नागपूर तर्फे श्री संदिप खैरनार, विभागीय प्रमुख राहणार नागपूर यांना सादर केल्याचे नमुद केले. आपले म्हणण्याचे पुष्टर्थ्य वि.प.क्रं 3 यांनी संदर्भित पत्राची प्रत तसेच यादीची प्रत दाखल केली. विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, मौदा हे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत व त्यांनी आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर मंचा समक्ष सादर केलेले आहे. त्यांचे तर्फे तक्रारकर्तीचा मृतक मुलगा विमाधारक शेतकरी श्री निलेश शिवाजी खडसे याचे शेतीची नमुना-6-ड ची प्रत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचेकडे सादर करण्यात आली व पुढे ती प्रत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय नागपूर मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस नागपूर यांचेकडे दि.05.11.2012 रोजी सादर करण्यात आल्याची बाब दाखल पत्रव्यवहाराच्या प्रतीवरुन सिध्द होते. या संदर्भात विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये काहीही भाष्य केलेले नाही. 16. उपरोक्त नमुद वस्तुस्थिती असताना विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्यांना विमा दाव्याचे निश्चीती संबधाने सहाय्य/मदत करणा-या विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस यांचेकडे त्यांना पाहिजे असलेल्या दस्तऐवजा संबधाने कोणतीही विचारणा न करता वा तक्रारकर्तीशी त्या संबधाने कोणताही पत्रव्यवहार न करता मृतक विमाधारक श्री निलेश शिवाजी खडसे याचा फॉर्म-6-ड सादर न केल्याचे कारणावरुन विमा दावा नामंजूर केल्या बाबत कृषी आयुक्त, महाराष्ट्र शासन, पुणे यांना त्यांचे दि.27 मे, 2013 रोजीचे पत्रान्वये कळविले. सदर पत्राची प्रत सुध्दा तक्रारकर्तीस दिली नसल्याचे त्यावरुन दिसून येते. विमाधारक श्री निलेश शिवाजी खडसे याचे अपघाती मृत्यू संबधीचा विमा दावा वि.प.क्रं 1 विमा कंपनीने नामंजूर करुन तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. 17. सन-2011-12 या वर्षासाठी शेतकरी अपघात विमा योजना ही दि.15 ऑगस्ट, 2011 ते 14 ऑगस्ट, 2012 या 01 वर्षाचे कालावधीसाठी
होती. प्रकरणातील उपलब्ध शेती /पोलीस विभागाचे दस्तऐवजां वरुन मृतक विमाधारक श्री निलेश शिवाजी खडसे हा शेतकरी होता व त्याचा विमा कालावधीत दि.19.11.2011 रोजी अपघाती मृत्यू झाल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. त्यामुळे मृतकाचे वारसदार म्हणून तक्रारकर्ती आई या नात्याने विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र होती परंतु मंचा समक्ष तक्रार चालू असताना तक्रारकर्ती श्रीमती सुशिला वि.शिवाजी खडसे हिचा मृत्यू ग्राम पंचायत चाचेर, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर यांचे मृत्यू प्रमाणपत्रा नुसार दि.24.08.2013 रोजी झालेला असल्याने मंचाचे दि.25.10.2013 रोजीचे आदेशान्वये तक्रारकर्ती श्रीमती सुशिला वि.शिवाजी खडसे हिचे मृत्यूने तिचे कायदेशीर वारसदार म्हणून तिची मुले सर्वश्री चक्रधर शिवाजी खडसे, दिगंबर शिवाजी खडसे आणि विनोद शिवाजी खडसे यांना प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार म्हणून समाविष्ठ केलेले असल्याने मृतकाचे विमा दाव्याची रक्कम मिळण्यास सदर वारसदार तक्रारदार क्रं 1 ते 3 हे वि.प.क्रं-1 विमा कंपनी कडून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई आणि त्यावर विमा प्रस्ताव नाकारल्याचे दिनांका पासून म्हणजे दि.27.05.2013 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याज यासह मिळण्यास पात्र आहेत. या शिवाय विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा दस्तऐवज नमुना-6-ड ची पुर्तता तक्रारकर्तीने करुनही व त्या संबधाने तक्रारकर्तीशी वा विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी नमुना-6-ड सादर केल्या बाबत कोणतीही शहानिशा न करता वा पत्रव्यवहार न करता विमा दावा नामंजूर केला. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीस निश्चीतच शारीरीक व मानसिक त्रास झाल्याची बाब सिध्द होत असल्यामुळे तक्रारकर्ते क्रं 1 ते 3 हे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- मिळण्यास पात्र आहेत. म्हणून मुद्दा क्रं 1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविलेले असून मंचा तर्फे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: तक्रारदार क्रं-1 ते 3 यांची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते. 1) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार क्रं-1 ते 3 यांना अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त ) दिनांक-27.05.2013 पासून रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह द्दावी. 2) तक्रारदार क्रं-1 ते 3 यांना शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारदारानां द्दावेत. 3) विरुध्दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्यात येते. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |