Dated the 17 Apr 2015
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
तक्रारदार हे अन्नधान्याचे ठोक विक्रेते (Wholesale for food grains) आहेत. तक्रारदार हे महाराष्ट्रातुन तसेच इतर प्रांतामधुन ज्वारी, बाजरी, डाळी, साखर वगैरे अन्न धान्य खरेदी करतात व सदर मालाचा किरकोळ (Retailer) विक्रेत्यांना पुरवठा करतात. यासाठी त्यांचेकडे चार माणसे नेहमी करीता काम करतात तसेच काही वेळा इतर माथाडी कामगारांकडून माल पोहोचविण्याचे व आणण्याचे काम केले जाते.
तक्रारदारांनी त्यांचे व्यवसायाकरीता सामनेवाले यांचेकडून मनी ट्रान्सिट इन्शुरन्स पॉलीसी ता.29.12.2006 ते ता.28.12.2007 या कालावधीची घेतली होती.
तक्रारदार ठाणे म्युनसिपल हद्दीतील 300 किरकोळ विक्रेत्यांना अन्नधान्य मालाचा पुरवठा करतात, श्री.साहिलसिंग दहानसिंग सोलंकी हे सेल्समन म्हणून तक्रारदारांकडे काम करीत होते. श्री.साहिलसिंग वेळोवेळी किरकोळ विक्रेत्यांना किती मालाचा पुरवठा करावयाचा ? याबाबतच्या ऑर्डस घेऊन येत असत तसेच त्यांचेकडून विक्री केलेल्या मालाचे पैसे रोख रक्कम स्वरुपात अथवा चेकव्दारे जमा करुन घेत असत. नेहमीप्रमाणे श्री.साहिलसिंग सेल्समन ता.19.06.2007 रोजी तक्रारदारांच्या दुकानात कामानिमित्त सकाळी-10.30 वाजता हजर झाले व 10 किरकोळ विक्रेत्यांकडून रक्क्म रु.3,50,000/- आणण्याकरीता बाहेर पडले. त्यानंतर श्री.साहिलसिंग दुकानात परत आले नाहीत. तक्रारदारांनी मोबाईलवरुन त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. श्री.साहिलसिंग यांनी रु.1,70,382/- एवढी रक्कम किरकोळ विक्रेत्यांकडून जमा केल्याचे तक्रारदारांना समजले. तसेच काही विक्रेत्यांना पावती न देता रु.5,37,337/- एवढी रक्कम त्यांचेकडून घेतल्याची माहिती मिळाली. तक्रारदारांनी साहिलसिंग यांचे घरी जाऊन शेधा घेतला, परंतु मिळून आले नाहीत. तक्रारदार यांनी अखेर ता.22.06.2007 रोजी संबंधीत पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दिली. पोलीसांनी भारतीय दंड विधान कलम-408 अन्वये श्री.साहिलसिंग यांचे विरुध्द एफआयआर दाखल केला. पोलीसांनी श्री.साहिलसिंग यांचा शोध घेतला परंतु मिळून न आल्यामुळे त्यांना फरार घोषित केले. तक्रारदारांनी सदर घटनेची माहिती सामनेवाले यांना ता.23.06.2007 रोजी दिली. सामनेवाले यांच्या सर्व्हेअर यांनी ता.28.06.2007 रोजी तक्रारदारांचे दुकानात येऊन घटनेची माहिती आवश्यक त्या कागदपत्रांसह घेतली. तक्रारदारांनी त्यांना सर्व घटनेची माहिती व व्यवसायातील Transaction संदर्भातील कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. सर्व्हेअर यांच्या अहवालानुसार नुकसानीची किंमत रु.2,84,799/- एवढी निश्चित करण्यात आली. सर्व्हेअर यांनी ता.25.02.2008 रोजी अहवाल सामनेवाले यांचेकडे दाखल केला.
सामनेवाले यांनी त्यानंतर ता.13.08.2008 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांना पुर्वीचा ऑडीट रिपार्ट व पोलीस रिपोर्ट पुन्हा पाठविण्यास सांगितले. पोलीस रिपोर्टनुसार सेल्समन फरार असल्यामुळे त्यांचेकडून मुद्देमाल जप्त केलेला नव्हता. सामनेवाले यांनी विभागीय व्यवस्थापक,ठाणे यांना ता.16.05.2008 रोजीच्या पत्रान्वये रक्कम रु.2,84,799/- पैंकी पुढील वर्षाच्या प्रिमियमची रक्कम रु.16,450/- कपात करुन तक्रारदारांना रु.2,68,349/- एवढी Final Settlement ची रक्कम देण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यानंतर सामनेवाले यांनी ता.20.10.2010 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांनी विमा प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केली नाहीत असे कळविले आहे. सामनेवाले यांनी ता.17.12.2010 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांचे त्यांच्या दुकानातील कर्मचा-यांच्या अप्रामाणिकपणामुळे निश्चितच नुकसान झाले आहे, परंतु सदरची बाब फौजदारी न्यायालयात सिध्द होणे आवश्यक आहे असे कळवले आहे. तसेच ता.20.10.2010 च्या पत्रान्वये तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे तक्रारदारांच्या विमा प्रस्तावावर कार्यवाही होऊ शकली नाही असे कळविले आहे. अदयापपर्यंत तक्रारदारांचा विमा प्रस्ताव प्रलंबीत आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सामनेवाले यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या सेल्समन यांचेवर दाखल केलेले फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबीत आहे. सेल्समन यांचे वरील आरोप फौजदारी न्यायालयात सिध्द झाल्यानंतर तक्रारदारांना विमा लाभ रक्कम देय आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार (Pre-matured) आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेली लेखी कैफीयत व दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदार यांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला असता खालील प्रमाणे बाबी स्पष्ट होतात.
अ. तक्रारदारांचा अन्नधान्य होलसेल विक्रीचा व्यवसाय असुन त्यांचेकडे सेल्समन या पदावर कार्यरत असलेल्या श्री.साहिलसिंग सोलंकी यांनी ता.19.06.2007 ते ता.22.06.2007 या कालावधीत तक्रारदारांच्या ग्राहकांकडून वसुली करुन जमा केलेली रक्कम, तक्रारदारांकडे परत जमा न करता, स्वतःचे फायदयासाठी घेऊन पळून गेल्याबाबतची फीर्याद तक्रारदार यांनी कापुरबावडी पोलीस स्टेशन यांचेकडे ता.22.06.2007 रोजी दिल्यानंतर संबंधीत पोलीस अधिका-यांनी सेल्समन श्री.साहिलसिंगचा सोलंकी यांचे विरुध्द भारतीय दंड विधान कलम-408, 420 अन्वये एफ.आय.आर. ची नोंद केली. तसेच ता.15.01.2008 रोजी फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम-173 अन्वये सेल्समन श्री.सोलंकी यांचे विरुध्द भा.द.वि. कलम-408,420 नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सेल्समन श्री.सोलंकी यांचा शोध न लागल्यामुळे त्यांना फरारी घोषीत करण्यात आल्याचे सदर अहवालानुसार दिसुन येते.
ब. सामनेवाले यांना सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सर्व्हेअरची नेमणुक केली. सर्व्हेअर अहवाल ता.25.02.2008 नुसार सेल्समन श्री.सोलंकी यांनी रु.5,37,370/- एवढी रक्कम किरकोळ विक्रेत्यांकडून जमा केल्याचे निष्पन्न झाले. यापैंकी श्री.सोलंकी यांनी तक्रारदारांच्या दुकानातुन बाहेर पडल्यानंतर पॉलीसीतील अटी व शर्तींनुसार, नियमानुसार 48 तासात जमा केलेली रक्कम रु.2,88,466/- देय असल्याचे स्पष्ट होते. सर्व्हेअर यांनी तक्रारदारांच्या नुकसानीचे मुल्य रु.2,88,468/- निश्चित केले असुन त्यापैंकी सेल्समन यांचे पगाराची रक्कम रु.3,667/- वजा करुन रु.2,84,799/- एवढी नुकसानीची रक्क्म निश्चित केल्याचे सर्व्हेअर यांच्या अहवालानुसार दिसुन येते.
क. सामनेवाले यांनी ता.17.12.2008 रोजीच्या पत्रान्वये सर्व्हेअर अहवाल प्राप्त झाल्यानंतर सेल्समन यांचेवरील आरोप न्यायालयात सिध्द झाल्यानंतरच तक्रारदारांच्या प्रस्तावावर कार्यवाही होऊ शकते असे नमुद केले आहे. त्यानंतर ता.20.10.2010 रोजीच्या पत्रान्वये तक्रारदारांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत कळविले आहे.
ड. तक्रारीतील कागदपत्रे म्हणजेच तक्रारदारांच्या विमा पॉलीसीचे अवलोकन केले असता, तक्रारदार सदर विमा पॉलीसीनुसार, नियमानुसार विमालाभ रक्कम मिळण्यास पात्र असल्याचे दिसुन येते. सामनेवाले यांचे सर्व्हेअर यांनी ता.25.02.2008 रोजी अहवाल दाखल करुन तक्रारदारांच्या नुकसानीचे मुल्य रु.2,84,799/- एवढया रकमेचे निश्चित केले आहे. तसेच फौजदारी न्यायालयाने ता.15.01.2008 रोजी फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम-173 अन्वये सेल्समन श्री.सोलंकी यांचे विरुध्द भा.द.वि.कलम-408, 420 नुसार दोषारोप पत्र दाखल करुन त्यांना फरारी घोषित केले आहे. सेल्समन फरारी असल्यामुळे त्यांचेकडून मुद्देमाल जप्त केला नाही. अशा परिस्थितीत सदर फौजदारी केसचा निकाल घोषित होईपर्यंत तक्रारदारांचा विमा प्रस्ताव सामनेवाले यांनी प्रलंबीत ठेऊन त्रुटीची सेवा दिली आहे असे मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ राष्ट्रीय आयोगाचे Original Petition 19/2005, ता.04.04.2005 रोजीचा न्याय निवाडा तसेच Original Petition 152/1997, ता.04.12.2006 रोजीचा न्याय निवाडे दाखल केलेले आहेत, ते सदर प्रकरणात लागु होतात असे मंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी फौजदारी न्यायालयाच्या ता.15.01.2008 रोजीच्या फौजदारी प्रक्रीया संहिता कलम-173 अन्वये दिलेल्या अंतिम अहवाल तसेच सर्व्हेअर अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारांना नियमानुसार विमा लाभ रक्कम अदा न करुन त्रुटीची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते. तक्रारदार यांना सदर रक्कम विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यामुळे निश्चितच मानसिक त्रास झाला व सदरची तक्रार दाखल करावी लागली. सबब सामनेवाले यांनी तक्रारदारांना सर्व्हेअर यांच्या अहवालानुसार निश्चित केलेली नुकसानीची रक्कम रु.2,84,799/- तक्रार दाखल तारखेपासुन म्हणजेच ता.27.12.2010 पासुन दरसाल दर शेकडा 9 टक्के व्याजदराने तसेच तक्रारीचा खर्च रु.10,000/- देणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.
वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-477/2010 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव प्रलंबीत ठेऊन विमालाभ रक्कम अदा न
करुन त्रुटीची सेवा दिली असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना नुकसानीची रक्कम रु.2,84,799/-
(अक्षरी रुपये दोन लाख चौ-यांशी हजार सातशे नव्हयांण्णव) तक्रार दाखल ता.27.12.10
पासुन दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याजदराने आदेश मिळाल्यापासुन 30 दिवसात
म्हणजेच ता.18.05.2015 पर्यंत दयावी. तसे न केल्यास ता.19.05.2015 पासुन दरसाल
दर शेकडा 9 टक्के व्याज दराने दयावी.
4. सामनेवाले यांना आदेश करण्यात येतो की, तक्रारदार यांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम
रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) 30 दिवसांचे आंत म्हणजेच ता.18.05.2015 पर्यात
दयावी. तसे न केल्यास ता.19.05.2015 पासुन दरसाल दर शेकडा 9 टक्के व्याज दराने
दयावी.
5. आदेशाची पुर्तता केल्याबद्दल / न केल्याबद्दल ता.03.06.2015 रोजी उभयपक्षाने शपथपत्र
दाखल करावे.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.17.04.2015
जरवा/