Dated the 17 Mar 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.म.य.मानकर...................मा.अध्यक्ष.
1. तक्रारदार यांनी त्यांच्या मोटर ट्रकला झालेल्या अपघातामुळे जे नुकसान झाले होते त्याची सामनेवाले विमा कंपनी यांनी नुकसानभरपाई करावी, त्या करीता ही तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांची लेखी कैफीयत कागदपत्रांसह दाखल केली.
2. तक्रारदार यांच्याप्रमाणे त्यांचा मालवाहतुकीचा धंदा असुन त्यांच्याकडे मोटर टँकर ज्याचा रजि.नंबर-एमएच-06-एक्यु-1479 असा आहे, तो त्यांनी सामनेवाले कंपनीकडून त्या करीता पॉलीसी क्र.-ओजी-10/1905/1803/000/14748, ता.28.01.2010 ते ता.27.01.2011 च्या कालावधी करीता घेतली होती. सदरील मोटर ट्रकचा ता.29.07.2010 रोजी पहाटे-3.00 च्या सुमारास डुमरी जि.गिरीदिन (झारखंड राज्य) येथे अपघात होऊन गाडीचे नुकसान झाले, त्याची सुचना सामनेवाले यांस देण्यास आली होती. सामनेवाले यांनी सर्व्हेअरची नेमणुक केली. सर्व्हेअर यांनी निरीक्षण करुन झालेल्या नुकसानीबद्दल त्यांचा अहवाल सामनेवाले यांस दाखल केला. तक्रारदार यांच्याप्रमाणे त्यांचे नुकसान रु.3,17,700/- चे झाले होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या वाहन चालकाच्या मोटर चालविण्याच्या परवान्यामध्ये दोष असल्यामुळे तक्रारदारास रक्कम देय नाही असे ठरविले. तक्रारदार यांच्याप्रमाणे त्यांच्या वाहन चालकाकडे अपघाताच्या वेळेस चालकाकडे मोटर चालविण्याचा परवाना होता व तो परवाना तक्रारदार यांच्यानुसार वैध व खरा होता. शिवाय त्या चालकाने त्यापुर्वी त्याचे वाहन व्यवस्थित चालविले होते, त्यामुळे त्यांचा दावा फेटाळण्याचे सामनेवाले यांचे कारण योग्य नाही. सामनेवाले यांनी नॉनस्टॅडर्ड दराने त्यांचा दावा मंजुर करणे आवश्यक होते. तक्रारदार यांच्या वाहनाचे नुकसान झाल्यामुळे सामनेवाले यांनी त्यांची भरपाई करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी नुकसानभरपाई पोटी रु.3,17,700/-, मानसिक त्रासासाठी रु.25,000/-, किरकोळ खर्च रु.2,000/- व कायदेशीर खर्चा करीता रु.7,500/- असे एकूण रक्कम रु.3,39,200/- ची मागणी केलेली आहे.
3. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीमध्ये तक्रारदार यांनी पॉलीसी काढल्याबाबतची बाब मान्य केली आहे. परंतु त्या पॉलीसीप्रमाणे रक्कम देय नाही. सामनेवाले यांच्या प्रमाणे मोटार चालक श्री.मोहम्मद सुलतान याच्याकडे बनावट मोटार चालकाचा परवाना असल्यामुळे तो वैध नव्हता व त्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन झालेले असल्याने तक्रारदार यांचा दावा फेटाळण्यात यावा.
4. उभयपक्षांनी पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व काही कागदपत्रे दाखल केली.
5. तक्रारदार यांच्यातर्फे वकील श्री.ए.बी.मोरे यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. सामनेवाले गैरहजर असल्यामुळे त्यांनी दाखल केलेला लेखी युक्तीवाद विचारात घेऊन न्याय निर्णय जाहिर करण्यात येत आहे.
6. उभयपक्षांचे प्लिडिंग्स व युक्तीवादाचा विचार करता खालील बाबी या मान्य बाबी आहेत असे म्हणता येईल.
तक्रारदार हे मालवाहु ट्रक क्रमांक-एमएच-06/एक्यु/1479 चे पंजिकृत मालक आहे. हा ट्रक सन-2006 मध्ये विकत घेण्यात आला होता. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून ट्रक करीता पॉलीसी क्रमांक-ओजी-10/1905/1803/000/14748, ता.28.01.2010 ते ता.27.01.2011 या कालावधी करीता घेतली होती. पॉलीसी अस्तित्वात असतांना सदरील ट्रकला अपघात झाला त्यावेळी वाहन चालक श्री.मोहम्मद सुलतान मोहम्मद हसन हा होता. अपघातामध्ये ट्रकचे नुकसान झाले. सामनेवाले यांनी सर्व्हेअरची नेमणुक केली होती. सर्व्हेअर यांनी अहवाल सादर करुन रु.2,40,000/- चे नुकसान झाल्याचे नमुद केले होते. तक्रारदार यांचा दावा सामनेवाले यांनी वाहन चालकाचे मोटर वाहन चालविण्याच्या परवान्यावरुन नाकारला.
7. उपरोक्त बाबींवरुन तक्रारदार यांनी पॉलीसी प्रमाणे अटी व शर्तींचे पालन केले होते का? हे पाहणे आवश्यक आहे, अभिलेखावरील कागदपत्रांप्रमाणे श्री.मोहम्मद सुलतान मोहम्मद हसन यांचा मोटर वाहन चालविण्याच्या परवान्याचा क्रमांक-एमएच-01/51490/2005 होता व तो डी.टी.ओ. मुंबई सेंट्रल यांनी जारी केला होता. परंतु सामनेवाले यांच्या सर्व्हेअर यांनी डी.टी.ओ. मुंबई सेंट्रल ताडदेव यांच्याकडून तपासा दरम्यान मोटार वाहन चालविण्याच्या परवान्याची तपासा दरम्यान माहिती घेतली असता, तो मोटार वाहन चालविण्याचा परवाना श्री.विनोद कुमार सामंता कोडगिरी यांच्या नांवे होता. यावरुन असे सिध्द होते की, श्री.मोहम्मद सुलतान मोहम्मद हसन याच्याकडे असलेले मोटार वाहन परवाना हा बनावट होता. सामनेवाले यांची ही बाब चुकीची आहे हे सिध्द करण्या करीता तक्रारदार यांच्याकडून कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा वाहन चालविण्याचा परवाना बनावट होता का ? या प्रश्नाचे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
8. वाहन चालकाकडे बनावट परवाना असतांना वाहन मालका नुकसानभरपाई मागण्यास पात्र ठरतो का ? सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादासोबत मा.सर्वोच्च न्यायालयाचे चार न्याय निवाडे दाखल केलेले आहेत.....
(अ) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., विरुध्द साहेबसिंग, (2010) 14, सुप्रिम कोर्ट केसेस पान
क्रमांक-776 मध्ये प्रकाशित
(ब) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., विरुध्द लक्ष्मी नारायण धुत (2007) 3 सुप्रिम कोर्ट केसेस
पान क्रमांक-700 मध्ये प्रकाशित
(क) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., विरुध्द दविंदरसिंग (2007) 8 सुप्रिम कोर्ट केसेस
पान क्रमांक-698 मध्ये प्रकाशित
(ड) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि., विरुध्द सुजाता अरोरा व इतर, 2013 (3)
टीएसी. पान क्रमांक-29 (एससी) मध्ये प्रकाशित
9. आम्ही सुजाता अरोराच्या तक्रारीतील परिच्छेद क्रमांक-8 खाली नमुद करीत आहोत.
8. We are also fortified in our view in the light of the two judgment of this Court
Reported in 2007 (4) SCALE 36: 2007 (2) T.A.C. 398, National Insurance
Company Ltd., V. Laxmi Narain Dhut and 2011 (5) SCALE 494: 2011 (3)
T.A.C. 12 Jawahar Singh V. Bala Jain and Other, where in it has been held,
That in case it is found that the offending vehicle was driven by driver who
Was either holding no licence or a fake licence, then it amounts to violation of
Terms and conditions of policy and in that circumstances, no liability can be
Fastened on the Insurance Company.
10. वरील न्याय निवाडयाचा अभ्यास केला असता जी कायदेशीर स्थिती स्पष्ट होते ती अशी की, जर वाहन चालकाकडे वाहन चालविण्ययाचा बनावट परवाना असेल तर वाहन मालक यांनी अटी व शर्तींची पुर्तता केली नाही असे समजण्यात यावे व त्यामुळे वाहनास अपघातामुळे झालेल्या नुकसानीबद्दल तो भरपारई मागण्यास पात्र ठरत नाही. हा कायदा लक्षात घेता या प्रश्नाचे उत्तर निसंकोचपणे नकारार्थी देत आहोत. तक्रारदार हे त्यांच्या वाहनास झालेल्या नुकसानी करीता भरपाईस पात्र नाहीत.
11. “ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
- आ दे श -
(1) तक्रार क्रमांक-342/2011 खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
(3) आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.17.03.2015
जरवा/