Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/124

श्रीमती वैशाली वि.शंकर मडावी - Complainant(s)

Versus

द न्‍यु इंडिया अशुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर श्री.मोहन दिगंबर लिमये व इतर 2 - Opp.Party(s)

उदय क्षिरसागर

28 Apr 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/124
 
1. श्रीमती वैशाली वि.शंकर मडावी
रा.मु. खंडाळा पो. डोरली ता. नरखेड
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. द न्‍यु इंडिया अशुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर श्री.मोहन दिगंबर लिमये व इतर 2
डिव्‍हीलनल ऑफीस न. 130800,न्‍यु इंडिया सेंटर 7 वा माळा 17/ए कुपरेज रोड,मुंबई -400039
मुंबई
महाराष्‍ट्र
2. कबाल इन्‍सुरंन्‍स ब्रोकिंग सर्व्‍हीसेस लिमीटेड तर्फे श्री. संदीप विष्‍णुपंत खैरनार
स्‍मृती बिल्‍डींग,दुसरा माळा, प्‍लॉट न. 375 ,गांधीनगर नॉर्थ अंबाझरी रोड,नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
3. मा.कृषी अधिकारी, नरखेड
ता. नरखेड
नागपूर
महाराष्‍ट्र
4. मा.कृषी अधिकारी, नरखेड
ता. नरखेड
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा श्री  मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्‍यक्ष. )

(पारीत दिनांक 28 एप्रिल, 2014)

1.    तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे   कलम-12 अन्‍वये मृतक विमाधारक शेतकरी श्री शंकर सोमा मडावी याचे अपघाती मृत्‍यू संबधाने विधवा पत्‍नी या नात्‍याने व कायदेशीर वारसदार म्‍हणून शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्षा कडून विमा रक्‍कम  मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

 

2.    तक्रारकर्तीचे कथन थोडक्‍यात येणे प्रमाणे-

       तक्रारकर्ती ही मृतक विमाधारक शेतकरी श्री शंकर सोमा मडावी यांची विधवा पत्‍नी आहे. मृतक श्री शंकर सोमा मडावी यांचे मालकीची मौजा  शिंगारखेडा, तालुका नरखेड, जिल्‍हा नागपूर येथे शेती असून तिचा सर्व्‍हे            क्रं- 411 असा आहे.  ते व्‍यवसायाने शेतकरी होते आणि शेतीतील उत्‍पन्‍नावर आपले कुटूंबाचे पालनपोषण करीत होते.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्‍दपक्ष क्रं-1            दि न्‍यु इंडीया एश्‍योरन्‍स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे, महाराष्‍ट्र शासना तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड, तालुका नरखेड, जिल्‍हा नागपूर यांचे मार्फतीने शेतक-यांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड ही  शेतक-यांचे अपघात विमा दाव्‍यांची छाननी करुन विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष  क्रं-1  विमा कंपनीकडे सादर करण्‍यासाठी नियुक्‍त केलेली सल्‍लागार कंपनी आहे.

       तक्रारकर्तीचे पती श्री शंकर सोमा मडावी हे शेतात काम करीत असताना विषारी सापाने चावल्‍याने विषबाधा होऊन उपचारा दरम्‍यान दि.08.08.2012 रोजी मृत्‍यू पावले.

 

 

 

 

 

 

 

 

      तक्रारकर्तीने तिचे पती श्री शंकर सोमा मडावी यांचे मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे विरुध्‍दपक्ष  क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांचे मार्फतीने आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा प्रस्‍ताव दि.08.01.2013 रोजी सादर केला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.30.05.2013 रोजीचे पत्राव्‍दारे  विमा कंपनीस विमा दावा उशिरा प्राप्‍त झाल्‍याचे  कारण दर्शवून विमा दावा फेटाळला व तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिली. वस्‍तुतः तक्रारकर्तीस शेतकरी अपघात विमा योजनेची कल्‍पना नव्‍हती तसेच या योजनेची जाहिरात सुध्‍दा केलेली नाही. शेतकरी अपघात विमा योजनेतील अटी व शर्तीची तक्रारकर्तीस कल्‍पना नव्‍हती. विमा दाव्‍या संबधी आवश्‍यक दस्‍तऐवजांची जुळवाजुळव करण्‍यास आलेल्‍या अडचणींमुळे तक्रारकर्तीस विमा दावा सादर करण्‍यास वेळ लागला. परंतु विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्तीस विमा दावा सादर करण्‍यास का वेळ झाला याचे स्‍पष्‍टीरण सादर करण्‍यास कोणतीही संधी न देता विमा दावा फेटाळला.

      म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे शेतकरी अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्षाकडे विमा प्रस्‍ताव सादर केल्‍याचे दिनांका पासून म्‍हणजे दि.08.01.2013 पासून द.सा.द.शे.18% व्‍याजासह मिळावी तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई  रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून  रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षा कडून मिळावे अशा मागण्‍या केल्‍यात.

 

 

03.     विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचा समक्ष लेखी उत्‍तर दाखल करुन, तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केलेली   विधाने जसे तिचे मृतक पती शेतकरी होते, शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्‍यांचा विमा काढला होता या बाबी विशेषत्‍वाने नाकबुल केल्‍यात.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे सादर करताना दस्‍तऐवजाची शहानिशा न करता सादर केला.  तक्रारकर्तीचे मृतक पती यांचा शेतात काम करीत असताना          विषारी सर्प दंशाने मृत्‍यू झाल्‍याची बाब  नाकबुल केली. तक्रारकर्तीचे पतीने शेतात काम करीत असताना सरपटणारे प्राणी इत्‍यादीं पासून संरक्षणार्थ योग्‍य ती काळजी घेतली नाही आणि त्‍यामुळे सर्पदंशाने झालेल्‍या मृत्‍यूस तेच स्‍वतः जबाबदार आहेत. तक्रारकर्ती ही स्‍वच्‍छ हाताने मंचा समक्ष आलेली नाही. तक्रारकर्तीने सत्‍य वस्‍तुस्थिती मंचा समक्ष लपवून  तक्रार सादर केली आहे. तक्रारकर्तीने वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात विमा दावा दि.08.01.2013 रोजी सादर केला.

 

         वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार पॉलिसीचा कालावधी संपल्‍या नंतर म्‍हणजे दि.14 ऑगस्‍ट, 2012 नंतर 90 दिवसांचे आत म्‍हणजे दिनांक-14 नोव्‍हेंबर, 2012 पर्यंत विमा दावा सादर करणे आवश्‍यक होते परंतु तक्रारकर्तीने विमा दावा                    वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दि.08.01.2013 रोजी उशिराने सादर केला आणि त्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा हा मुदतबाहय सादर केल्‍याचे कारणावरुन फेटाळलेला आहे. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने तक्रार खारीज व्‍हावी, अशी विनंती केली.

 

 

04.     वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर दाखल केले. त्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, शेतक-यांचा विमा दावा

विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्‍यासाठी ते शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्‍यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्‍यामुळे विमा दाव्‍या संबधाने कोणतीही रक्‍कम देण्‍याची त्‍यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्‍या म्‍हणण्‍याचे समर्थनार्थ त्‍यांनी मा.महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीस प्रायव्‍हेट लिमिटेड विरुध्‍द-             श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्‍के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्‍या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्‍ये                   वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे विरुध्‍द             शेतक-यास अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्‍हणून वि.प.क्रं 3 विरुध्‍दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्‍यांनी केली आहे.

      विरुध्‍दपक्ष क्रं-2 यांनी पुढे असे नमुद केले की, मृतक विमाधारक शेतकरी श्री शंकर सोमा मडावी, गाव मु. खंडाळा, पोस्‍ट डोरली, तालुका नरखेड, जिल्‍हा नागपूर यांचा अपघाती मृत्‍यू दि.07.08.2012 रोजी झाला. सदर विमा प्रस्‍ताव हा जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर मार्फतीने   वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना दि.04.03.2013 रोजी उशिरा प्राप्‍त झाल्‍या नंतर वि.प.क्रं 2 यांनी विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे दि.08.03.2013 रोजी सादर केला. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने  त्‍यांचे दि.30.05.2013 रोजीचे पत्रान्‍वये विमा प्रस्‍ताव उशिरा प्राप्‍त झाल्‍याचे कारणावरुन नामंजूर केला व तसे वारसदारास कळविले.

 

 

 

 

 

05.     विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड, तालुका नरखेड, जिल्‍हा नागपूर यांनी मंचा समक्ष आपले लेखी निवेदन सादर केले. वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी आपले लेखी निवेदनात मृतक श्री शंकर सोमा मडावी, रा.खंडाळा, पोस्‍ट डोरली, तालुका नरखेड यांचा दि.08.08.2012 रोजी सर्पदंशाने मृत्‍यू झाल्‍या नंतर त्‍यांची विधवा पत्‍नी श्रीमती वैशाली शंकर मडावी यांनी शेतकरी अपघात विमा प्रस्‍ताव त्‍यांचे कार्यालयात दि.08.01.2013 रोजी सादर केला आणि पुढे त्‍यांनी सदर विमा प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी, नागपूर यांचेकडे दि.30.01.2013 रोजी सादर केला.

 

06        तक्रारकर्तीने निशाणी क्रं 03 वरील यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या               प्रती  सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये  शेतकरी अपघात विमा योजना शासन         निर्णय, विमा दावा प्रस्‍ताव,  वि.प. विमा कंपनीचे विमा दावा फेटाळल्‍याचे पत्र, तक्रारकर्तीचे मृतक पतीचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6-क, गाव नमुना 8-अ,  तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा,मरणान्‍वेषण प्रतिवृत्‍त, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र  इत्‍यादी प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्तीने लेखी युक्‍तीवाद सादर केला.

 

07.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने  आपले प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. लेखी युक्‍तीवाद सादर केला. तसेच वि.प.क्रं 1 विमा कंपनीने  त्‍यांचे कार्यालयास कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे कडून प्राप्‍त विमा प्रस्‍तावाचे पत्राची प्रत, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचेकडे विमा दावा सादर केल्‍याचे पत्राची प्रत, सादर केली.

 

08.    वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस तर्फे शेतकरी अपघात विमा योजना परिपत्रक,  मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत तसेच वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा नाकारल्‍याचे पत्राची प्रत अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

09.     प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे वकील श्री क्षिरसागर  आणि  वि.प. क्रं 1 विमा कंपनी तर्फे  वकील श्री लिमये यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

 

 

 

 

 

10.    तक्रारकर्ती आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी यांचे परस्‍पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्‍यात आले.

 

           मुद्दा                                 उत्‍तर

(1)    वि.प.क्रं 1 विमा कंपनीने,

       तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर

       करुन दोषपूर्ण सेवा दिली आहे काय?................... होय.

(2)    काय आदेश?.....................................................तक्रार अंशतः मंजूर.

 

::  कारण मिमांसा व निष्‍कर्ष    ::

मुद्दा क्रं-1 व 2-

11.    तक्रारकर्तीचे पती विमाधारक शेतकरी श्री सोमा शंकर मडावी यांचा  दि.08.08.2012 रोजी  शेतातील सर्पदंशामुळे मृत्‍यू झाला ही बाब प्रकरणातील पोलीस दस्‍तऐवज एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा,मरणान्‍वेषण प्रतिवृत्‍त, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र यावरुन सिध्‍द होते. शवविच्‍छेदन अहवालामध्‍ये मृत्‍यूचे कारण “Due to snake bite” असे नमुद केलेले आहे.  तसेच प्रकरणातील  मृतकाचे नावे उपलब्‍ध शेतीचे दस्‍तऐवज 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-6-ड यावरुन मृतक शेतकरी होता ही बाब सिध्‍द होते.  मृतकाचा विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फतीने शेतकरी अपघात विमा योजना सन-2011-12 कालावधी दि.15 ऑगस्‍ट, 2011 ते 14 ऑगस्‍ट, 2012 अंतर्गत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा काढला होता या बाबी प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजां वरुन सिध्‍द होतात.

12.   यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा असा आक्षेप, तक्रारकर्तीने मृतकाचा विमा दावा हा उशिराने सादर केला असल्‍याने तो मुदतबाहय कारणाने देय नसल्‍या बाबत-

         विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार त्रिपक्षीय करारा प्रमाणे तक्रारकर्तीने वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे आवश्‍यक सर्व दस्‍तऐवजांसह विमा दावा विमा पॉलिसी संपल्‍याचे म्‍हणजे दि.14.08.2012 पासून                 90 दिवसांचे आत म्‍हणजे दि.14 नोव्‍हेंबर 2012 पूर्वी सादर करावयास हवा होता. तक्रारकर्तीचे पती विमाधारक शेतकरी श्री सोमा शंकर मडावी यांचा  दि.08.08.2012 रोजी  शेतातील सर्पदंशामुळे मृत्‍यू झाला. तक्रारकर्तीने पतीचे  मृत्‍यू नंतर सर्व प्रथम विमा दावा दि.08.01.2013 रोजी                  विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी,नरखेड यांचे कार्यालयात सादर केला.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन पुणे यांना दि.30 मे, 2013 रोजी पाठविलेल्‍या पत्रात अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी  दि.18.04.2013 रोजीचे पत्रा  नुसार विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 2 कबाल

 

इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचेकडे सादर केला आणि पुढे वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे कडून वि.प.क्रं 1 विमा कंपनीस, तक्रारकर्तीचा विमा दावा दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍याचे नमुद केले आहे. वस्‍तुतः योजने नुसार वि.प.क्रं 1 विमा कंपनीस विमा प्रस्‍ताव दि.14 नोव्‍हेंबर, 2012 पर्यंत प्राप्‍त व्‍हावयास हवा होता परंतु सदर विमा प्रस्‍ताव हा दि.30.04.2013 रोजी उशिरा मिळाला असे नमुद केले.

 

 

13.     या संदर्भात मंचातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्तीचे पती विमाधारक शेतकरी श्री शंकर सोमा मडावी यांचा सर्पदंशाने दि.08.08.2012 रोजी  मृत्‍यू झाला. पतीचे मृत्‍यू नंतर तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे,  विरुध्‍दपक्ष  क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांचे कार्यालयाचे मार्फतीने आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा प्रस्‍ताव सर्वप्रथम दि.08.01.2013 रोजी सादर केला.  विरुध्‍दपक्ष क्रं-2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे उत्‍तरा नुसार जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालया मार्फतीने दि.04.03.2013 रोजी विमा प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या नंतर वि.प.क्रं 2 यांनी विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे दि.08.03.2013 रोजी सादर केला. तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन पुणे यांना दि.30 मे, 2013 रोजी पाठविलेल्‍या पत्रात वि.प.क्रं 1 विमा कंपनीस,            वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे कडून तक्रारकर्तीचा विमा दावा दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍याचे नमुद केले आहे.

 

14.     प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांच्‍या प्रतीं वरुन तक्रारकर्तीने सर्व प्रथम विमा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिका-यांकडे दि.08.01.2013 रोजी सादर केला व पुढे सदर प्रस्‍ताव  तालुका कृषी अधिकारी, नरखेड यांनी त्‍यांचे कार्यालयीन पत्र दिनांक-30/01/2013 रोजी जिल्‍हा कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात सादर केला. सदर पत्राची प्रत अभिलेखावर दाखल आहे. वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस लिमिटेड यांचे उत्‍तरामध्‍ये त्‍यांना जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांचे कार्यालया तर्फे तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव दि.04.03.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍याचे नमुद केले. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर यांचे दि.18.04.2013 रोजीचे कार्यालयीन पत्र जे त्‍यांनी वि.प.क्रं 1 विमा कंपनीस दिलेले आहे, त्‍यामध्‍ये त्‍यांनी वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे कडून त्‍यांचे कार्यालयास विमा प्रस्‍ताव दि.04.03.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍याचे नमुद केले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांनी त्‍यांचे दि.08.03.2013 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्तीचा विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे पाठविल्‍याचे व तो प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस दि.30.04.2013 रोजी प्राप्‍त झाल्‍याचे

 

 

सदर पत्राचे प्रती वरुन आणि त्‍यावरील वि.प.क्रं 1 विमा कंपनीची पोच व शिक्‍क्‍यावरुन सिध्‍द होते. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.30 मे, 2013 रोजी कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन पुणे यांना तक्रारकर्तीचा विमा दावा उशिरा प्राप्‍त झाल्‍याचे कारणा वरुन फेटाळल्‍याचे दाखल पत्राचे प्रतीवरुन सिध्‍द होते.

 

15.     मंचाचे मते यातील विमाधारकाचा मृत्‍यू हा दि.08.08.2012 रोजीचा आहे आणि योजनेची मुदत संपल्‍याचा दिनांक-14 ऑगस्‍ट, 2012 पासून 90 दिवसांचे आत म्‍हणजे  दि.14 नोव्‍हेंबर, 2012 पर्यंत विमा दावा सादर करावयास हवा होता असे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे म्‍हणणे आहे परंतु मृत्‍यू नंतर केवळ 03 महिन्‍यात विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह सादर करणे ही बाब विशेषतः ग्रामीण भागात प्रत्‍यक्ष व्‍यवहारात अशक्‍य आहे. तक्रारकर्तीने सर्व प्रथम विमा प्रस्‍ताव वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिका-यांकडे 08.01.2013 रोजी म्‍हणजे योजनेची मुदत संपल्‍याच्‍या केवळ 01 महिना   25 दिवस उशिराने सादर केला आहे आणि सदरचा कालावधी हा खूप मोठा आहे असे म्‍हणता येणार  नाही.

 

 

16.   या संदर्भात तक्रारकर्तीने महाराष्‍ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग शासन निर्णय क्रं शेअवि-2011/प्र.क्रं 94/11-ए मंत्रालय विस्‍तार, मुंबई -400032 दि.08 ऑगस्‍ट, 2011 रोजीचे शासन निर्णयावर आपली भिस्‍त ठेवली.

         सदर शासन निर्णयातील परिच्‍छेद क्रं 7 मध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह ज्‍या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल/प्राप्‍त होईल, त्‍या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्‍त झालेला आहे असे समजण्‍यात येईल

         तसेच सदर शासन निर्णयातील परिच्‍छेद क्रं 8 मध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

        विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह योजनेच्‍या कालावधीत कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्‍या नंतर 90 दिवसा पर्यंत तालुका कृषी अधिका-यांकडे प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक रा‍हील तसेच समर्थनीय कारणांसह 90 दिवसा नंतर

प्राप्‍त होणारे विमा प्रस्‍ताव विमा कंपनीने स्विकारावेत. प्रस्‍ताव विहित मुदतीत सादर केले नाहीत या कारणास्‍तव विमा कंपन्‍यांना प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत.

 

17.        मंचाचे मते उपरोक्‍त नमुद शासन निर्णया वरुन स्‍वयंस्‍पष्‍ट आहे की, प्रस्‍ताव दाखल करण्‍यास समर्थनीय कारण असेल तर केवळ विहित मुदतीत प्रस्‍ताव सादर केले नाही या कारणावरुन विमा कंपन्‍यांना प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विमा प्रस्‍ताव उशिरा सादर केल्‍याचे कारणा वरुन विमा दावा नाकारणे ही विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची सेवेतील त्रृटी आहे.

 

18.    या संदर्भात तक्रारकर्तीने खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपत्रावर आपली भिस्‍त ठेवली आहे. 

 

(1)                   I (2009) CPJ 147

           Hon’ble Maharashtra State Commission, Mumbai

           National Insurance Co.Ltd.-V/s- Asha Jamdar Prasad

 

        प्रस्‍तुत अपिलीय प्रकरणात आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग,महाराष्‍ट्र  मुंबई यांनी विमा दावा हा विलंबाचे कारणावरुन फेटाळण्‍यात आला परंतु विमा दावा दाखल करण्‍यास जो विलंब झालेला आहे, तो का झाला? हे विशद करण्‍याची  संधी  मृतकाचे विधवा  पत्‍नीला दिल्‍या गेलेली नाही आणि तसेही

मृतकाचे मृत्‍यूचे धक्‍क्‍यातून सावरल्‍या नंतर त्‍याचे विधवा पत्‍नीने विमा दावा सादर केल्‍याचे कारण दर्शवून विमा कंपनीचे अपिल खारीज करुन मंचाचा विमा दावा देण्‍याचा निर्णय कायम ठेवला.

 

 

(2)                               I (2013) CPJ 115

                 Hon’ble Chhattisgarh State Consumer Disputes Redressal   

            Commission Raipur

                 Ramayanvati –V/s- Oriential  Insurance Company Ltd.

 

           उपरोक्‍त नमुद प्रकरणातील विमा क्‍लेम हा ग्रुप जनता पर्सनल अक्‍सीडेंट पॉलिसी अंतर्गत मृत्‍यू दाव्‍या संबधीचा आहे. विमा क्‍लेम हा घटना घडल्‍या पासून पंधरा दिवसाचे आत करणे आवश्‍यक होते. परंतु तो सादर करण्‍यासाठी 03 वर्षाचा उशिर झाल्‍यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात आली होती म्‍हणून अपिल करण्‍यात आले होते. अपिलीय आदेशात मा.आयोगाने सदर तक्रारकर्ती ही अशिक्षीत स्‍त्री असून, पॉलिसीचे अस्तित्‍वा बद्दल तिला कल्‍पना नव्‍हती. तक्रारकर्तीचे मृतक पती ज्‍या ठिकाणी नौकरीस होते तेथील मालकाने पॉलिसी बद्दल माहिती देणे

बंधनकारक होते असे नमुद केलेले आहे.

 

       आमचे समोरील प्रस्‍तुत तक्रार प्रकरणात उपरोक्‍त नमुद मा.आयोगाचा सदर निर्णय तंतोतंत लागू पडतो. कारण आमचे समोरील प्रकरणातील स्‍त्री एक

 

 

ग्रामीण भागातील रहिवाशी आहे. तक्रारकर्तीचे पतीचा दि.08.08.2012 रोजी अपघाती मृत्‍यू झाल्‍यामुळे काही दिवस पतीचे निधनाने ती अतिशय व्‍यथीत होती. महाराष्‍ट्र शासना तर्फे संबधित मृतकाचा शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढला होता याची तिला कल्‍पना नव्‍हती. तसेच पॉलिसीतील अटी व शर्तीचीं सुध्‍दा तिला कल्‍पना नव्‍हती. पतीचे मृत्‍यूचे घटने मधून  सावरल्‍या नंतर तक्रारकर्तीस शेतकरी अपघात  विमा  योजनेची  माहिती  मिळाली. कागदपत्रांची माहिती घेणे, त्‍याची जुळवाजुळव करणे, खेडयातून तालुक्‍याच्‍या ठिकाणी जाणे अशा अनेक अडचणींनां तक्रारकर्तीला सामोरे जावे लागले आणि विमा दाव्‍यासाठी आवश्‍यक दस्‍तऐवज मिळवावे लागले.  त्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा विहित मुदतीत म्‍हणजे विमा पॉलिसी संपल्‍या पासून 90 दिवसाचे आत सादर न केल्‍याचे कारणा वरुन, विमा दावा फेटाळण्‍याची विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची कृती अयोग्‍य असल्‍याचे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

19.    उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता, तक्रारकर्ती ही              मृतक विमाधारकाची  विधवा  पत्‍नी  आणि  कायदेशीर वारसदार या नात्‍याने

शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम  रुपये-1,00,000/-

त्‍यावर विमा प्रस्‍ताव नाकारल्‍याचे दिनांका पासून म्‍हणजे दि.30.05.2013 पासून द.सा.द.शे.9% दराने व्‍याज यासह मिळण्‍यास पात्र आहे. तसेच विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनी कडून शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल           रुपये-5000/- आणि आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-5000/- मिळण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 व 3 यांना विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याच्‍या जबाबदारीतून मुक्‍त करण्‍यात येते. म्‍हणून मुद्दा क्रं 1 व 2 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविलेले असून मंचा तर्फे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

                 

             ::आदेश::

तक्रारकर्तीची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात

येते.

1)    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी  

      तक्रारकर्तीस तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी

      व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम रुपये-1,00,000/-

      (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त ) दिनांक-30.05.2013 पासून रकमेच्‍या

      प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9%  दराने व्‍याजासह द्दावी.

 

 

 

 

2)    तक्रारकर्तीस झालेल्‍या  शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल

      रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचे खर्चा

      बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) वि.प.क्रं 1 विमा

      कंपनीने तक्रारकर्तीस द्दावेत.

3)    विरुध्‍दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

4)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर

      निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)    निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व  पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

      देण्‍यात यावी.

             

                        

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.