::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक– 30 जानेवारी, 2014) 1. तक्रारकर्त्याने त्याचे मृतक काका श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्षा कडून विमा रक्कम मिळण्यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे- तक्रारकर्ता उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतो. तक्रारकर्त्याचे मृतक काका श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके हे व्यवसायाने शेतकरी होते आणि त्यांचे मालकीची मौजा खात, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथे सर्व्हे क्रं-147 शेती आहे. शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्त्याचे काका कुटूंबाचे पालन पोषण करीत होते. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्दपक्ष क्रं-1 दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीकडे, महाराष्ट्र शासना तर्फे विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, मौदा, तालुका मौदा, जिल्हा नागपूर यांचे मार्फतीने शेतक-यांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड ही शेतक-यांचे अपघात विमा दाव्यांची छाननी करुन विमा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीकडे सादर करण्यासाठी नियुक्त केलेली सल्लागार कंपनी आहे. तक्रारकर्त्याचे काका श्री लक्ष्मीकांत रामदास राऊत हे दि.20.07.2008 रोजी शेतीला पाणी देत असताना कालव्यात पडून बुडून मृत्यू पावले.
तक्रारकर्त्याचे काका हे व्यवसायाने शेतकरी असल्याने आणि तक्रारकर्ता हा त्यांचा एकमेव वारसदार असल्याने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेची रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. तक्रारकर्त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्याचे मृतक काका श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दावा रक्कम मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिका-यांचे मार्फतीने, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे रितसर अर्ज आवश्यक त्या दस्तऐवजांसह दि.08.02.2009 रोजी सादर केला आणि वेळोवेळी विरुध्दपक्षाने मागितलेल्या दस्तऐवजांची पुर्तता केली. परंतु असे असताना विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 तर्फे अद्दाप पर्यंत तक्रारकर्त्यास शेतकरी अपघात विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्या बाबत कोणतीही सुचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली आहे. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली असून त्याव्दारे शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- विरुध्दपक्षाकडे विमा प्रस्ताव दाखल दिनांक-08.02.2009 पासून द.सा.द.शे.18% दराने व्याजासह मिळावी तसेच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 कडून मिळावे अशा मागण्या केल्यात. 03. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने मंचा समक्ष निशाणी क्रं-17 प्रमाणे लेखी उत्तर दाखल करुन, तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारकर्त्याने त्याचे मृतक काका श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे शेतकरी अपघात विमा दाव्या संबधाने दाखल प्रस्तुत तक्रारीमध्ये मृतकाचे इतर वारसदारांना समाविष्ठ केलेले नाही. तक्रारकर्ता हा एकटा प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करु शकत नाही. जमीनीच्या 7/12 चे उता-या वरुन असे आढळून येते की, मृतक विमाधारक शेतकरी श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे एकूण-06 भाऊ व आई आणि बहीण हयात आहेत. विमाधारकाचा मृत्यू कसा, केंव्हा, कोठे आणि कोणत्या अवस्थेत झाला या विषयी विस्तृत माहिती मंचा समक्ष आलेली नाही. मृतक विमाधारक शेतकरी श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचा तक्रारकर्ता हा पुतण्या असून तोच एकमेव वारस आहे हे तक्रारकर्त्याचे म्हणणे साफ खोटे
आहे. सातबारा उतारा व अन्य दस्तऐवजां वरुन मृतक विमाधारकाचे भाऊ, बहीण, आई हे सर्व हयात आहेत म्हणून तक्रारकर्ता हा एकमेव वारस म्हणून दावा टाकू शकत नाही म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. प्रस्तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार विहित मुदतीत दाखल केलेली नाही कारण तक्रारकर्त्याचे काकाचा मृत्यू दि.20.07.2008 रोजी झाला आणि तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.11.11.2009 ला दावा फेटाळल्या बाबत अगोदरच कळविलेले आहे. फक्त वकीलांचे नोटीसचे आधारावर प्रस्तुत तक्रार विहित कालावधीत आहे असे ग्राहय धरल्या जाऊ शकत नाही. तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील मागण्या मंजूर होण्यास पात्र नाहीत. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, विमा हा दि.28 जुलै, 2008 रोजीचे त्रिपक्षीय करारानाम्या नुसार अस्तित्वात आला आहे आणि पॉलिसीचा कालावधी हा दि.15.08.2008 ते 14.08.2009 असा आहे. त्रिपक्षीय करारा नुसार विम्या संबधाने कोणताही वाद उदभवल्यास सदर वादासाठी मुंबई न्यायमंचातच तक्रार करता येईल अशी अट घालण्यात आली होती, त्यामुळे प्रस्तुत मंचा समक्ष तक्रार चालू शकत नाही. तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची, मुदतबाहय असल्याने ती खारीज व्हावी, अशी विनंती वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्यात आली. 04. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांनी त्यांचे लेखी उत्तर निशाणी क्रं-13 प्रमाणे दाखल केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, शेतक-यांचा विमा दावा विमा कंपनीकडे छाननी करुन पाठविण्यासाठी ते शासनाला विनामोबदला मदत करतात, यासाठी त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. त्यामुळे विमा दाव्या संबधाने कोणतीही रक्कम देण्याची त्यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्या म्हणण्याचे समर्थनार्थ त्यांनी मा.महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रायव्हेट लिमिटेड –विरुध्द- श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्ये वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांचे विरुध्द शेतक-यास अपघात विमा दाव्याची रक्कम देण्याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्हणून वि.प.क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. 05. विरुध्दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, मौदा, तालुका मौदा, जिल्हा नागपूर यांनी निशाणी क्रं 11 प्रमाणे निवेदन दाखल केले असून त्यामध्ये नमुद केले की, प्रस्तुत तक्रार ही सन-2007-2008 या वर्षाशी संबधित असून, या वर्षामध्ये शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ही महसूल विभागा मार्फतीने राबविण्यात येत होती आणि संबधित तहसिलदार हे विमा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस यांचे मार्फतीने संबधित विमा कंपनीकडे पाठवित होते. कृषी विभागा मार्फत फक्त प्रचार व प्रसिध्दी आणि वरीष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणे एवढेच कार्य केल्या जात होते. त्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा प्रस्तावच त्यांचे कार्यालयात सादर झालेला नाही, तर तो विमा प्रस्ताव तहसिलदार, मौदा यांचे कार्यालयास सादर केलेला आहे. त्या संदर्भात तक्रारकर्त्याने तहसिलदार, मौदा यांचे कडे माहितीचे अधिकारात दि.26.02.13 रोजी केलेल्या अर्जाची प्रत ते सादर करीत आहेत. कबाल इन्शुरन्स कंपनी कडून प्राप्त यादी नुसार प्रस्तुत विमा दाव्या संबधाने प्रकरण क्रं-2009/001607 अपघात दि.20.07.2008 दर्शविलेला असून शेरा रकान्यात-8-अ चा मूळ दाखला, व्हिसेरा रिपोर्ट आणि मृतकाचे नावावर जमीन झाल्याचा फेरफार व राशनकॉर्डची झेरॉक्स नसल्यामुळे विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केला होता. तक्रारकर्त्याचा विमा दावा हा वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचेशी संबधीत नसल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी विनंती वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी केली. 06 तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय, विमा दावा प्रस्ताव, तक्रारकर्त्याने तहसिलदार यांचेकडे माहिती अधिकारात केलेला अर्ज, तक्रारकर्त्याने ठाणेदार मौदा यांना मागितलेल्या पोलीस दस्तऐवजासाठीचा अर्ज, तक्रारकर्त्याचे काकाचे मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारकर्त्याचे काकाचा मृत्यू बाबत प्राथमिक अहवाल, तक्रारकर्त्याचे काकाचे शेताचा 7/12 उतारा, गाव नमुना-8-अ, तक्रारकर्त्याचे काकाचे शेताचे फेरफारपत्रक, अधिकार अभिलेख पंजी, गाव नमुना-6-क अशा दस्तऐवजांचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्त्याने दि.26/11/2013 रोजी प्रकरणात शपथपत्र दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्याने दि.26.11.2013 रोजी दस्तऐवजाचे यादी नुसार तहसिलदार मौदा यांचे नायब तहसिलदार यांना दिलेले पत्र, तहसिलदार मौदा यांचे तक्रारकर्त्यास दिलेले पत्र, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दाखल
केलेला विमा प्रस्ताव, तलाठी खात यांचे प्रमाणपत्र, मृतक श्री लक्ष्मीकांत रामटेके यांचे राशन कॉर्डची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात. तक्रारकर्त्याने नि.क्रं 16 वरील यादी नुसार तक्रारकर्त्याचे काका लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे मृत्यू बाबत आकस्मीक मृत्यू खबर, इन्क्वेस्ट पंचनामा व घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट आणि काकाचे मृत्यू प्रमाणपत्र अशा प्रती सादर केल्यात. 07. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले. अन्य दस्तऐवज सादर केले नाहीत. लेखी युक्तीवाद सादर केला. 08. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस तर्फे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 09. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी मौदा यांनी तक्रारकर्त्याचा विमा योजने संबधीचे शासन निर्णय प्रत, जिल्हा कृषी अधिक्षक यांनी तक्रारकर्त्यास दस्तऐवजांची पुर्तता करण्या संबधाने दिलेले पत्र, कबाल इन्शुरन्स कंपनी, नागपूर यांनी सन-2007-2008 मध्ये तयार केलेली विमा दाव्या संबधाने शेतकरी निहाय यादी, कबाल इन्शुरन्स नागपूर यांनी दस्तऐवजाची पुर्तता करण्या बाबत तहसिलदार व तक्रारकर्ता यांना पाठविले पत्र, तहसिलदार मौदा यांचेकडे तक्रारकर्त्याने माहितीचे अधिकारात दाखल केलेला अर्ज अशा दस्तऐवजांच्या प्रती सादर केल्यात. 10. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री क्षिरसागर आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री चौधरी, वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स तर्फे प्रतिनिधी श्री संदीप खैरनार आणि वि.प.क्रं 3 तालुका कृषी अधिकारी तर्फे प्रतिनिधी श्री दिक्षीत सहायक अधिक्षक यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. 11. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी यांचे परस्पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ घेण्यात आले. मुद्दा उत्तर (1) तक्रारकर्ता मृतक शेतक-याचा वारस म्हणून वि.प.क्रं 1 कडून विमा लाभ मिळण्यास पात्र आहे काय? ................................................ नाही. (2) वि.प.ने त.क.ला न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय?............................................... विचार करण्याची आवश्यकता नाही. (3) तक्रारदार मागणी प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय?................................ विचार करण्याची आवश्यकता नाही. (4) काय आदेश?.......................................................तक्रार खारीज :: कारण मिमांसा व निष्कर्ष :: मुद्दा क्रं-1 ते 4- 12. तक्रारदार श्री रोशन धनराज रामटेके याने, त्याचे मृतक काका श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांच्या अपघाती निधना बद्दल त्यांचा वारस म्हणून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडून विमा दावा मिळावा म्हणून प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
13. मृतक श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे मालकीची मौजा खात, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथे सर्व्हे क्रं-147 ही शेती होती. या बाबत तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्रं 7 प्रमाणे शेतीचे 7/12 उता-याची प्रत सादर केली आहे, त्यात तक्रारकर्त्याचे आजोबा श्री रामदास रामटेके यांचे मृत्यू नंतर त्यांचे वारस म्हणून सर्वश्री-मारोती, धनराज, गोकुलदास, देवदास, लक्ष्मीकांत व सुभाष ही मुले व इतर वारसांची नावे नोंदविलेली आहेत. त्यामुळे मृतक श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके हे शेतकरी होते ही बाब सिध्द होते. तक्रारकर्त्याचे काका श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके हे दि.20.07.2008 रोजी शेतीला पाणी देत असताना कालव्यात पडून बुडून मृत्यू झाला हे
दर्शविण्यासाठी तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्रं 6 प्रमाणे गुन्हयाच्या घटनेचा प्राथमिक अहवाल दाखल केला आहे. सदर अपघाती मृत्यू संबधाने मर्ग क्रं-39/08 कलम-174 फौजदारी प्रक्रिया संहिते प्रमाणे दाखल झाला होता. तसेच मृत्यूचा दाखला दस्तऐवज क्रं 5 वर दाखल केलेला आहे. त्यामुळे श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचा कालव्यात पडल्याने बुडून दि.20.07.2008 रोजी मृत्यू झाला असे प्रथम दर्शनी दिसून येते.
14. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे, मृतक श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके हे मृत्यूचे वेळी अविवाहीत होते, त्यामुळे, मृतकास पत्नी किंवा मुले, मुली वारसदार नव्हते. मृतक शेतकरी श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांनी मृत्यू पूर्वी तक्रारकर्ता श्री रोशन रामटेके याचे नावाने मृत्यूपत्र करुन दिले होते व त्यावरुन श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे मृत्यू नंतर वारसदार म्हणून तक्रारकर्त्याचे नाव फेरफार नोंदवहित वारसदार म्हणून नोंदविण्यात आले होते. परंतु तक्रारकर्त्याने अशा मृत्यूपत्राची प्रत प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचा समक्ष सादर केलेली नाही. 15. तक्रारकर्त्याचे उपरोक्त म्हणण्याचे संदर्भाने मंचाने फेरफार नोंदवही दस्तऐवज क्रं-9 चे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे मृतक शेतकरी श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे मृत्यू नंतर वारस म्हणून तक्रारकर्ता श्री रोशन धनराज रामटेके याचे नाव नोंदविल्याचे अभिलेखावरुन दिसून येत नाही. मृतक श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके हे अविवाहित असल्यामुळे त्यांना मुले, मुली, पत्नी नाही असे शपथपत्र फेरफाराचे नोंदीचे वेळी देण्यात आले होते व त्यावरुन फेरफार घेण्यात आला असे दिसून येते.
16. दस्तऐवज क्रं-11 प्रमाणे गाव नमुना-6-क, वारसा प्रमाणपत्राची नोंदवही यामध्ये देखील तक्रारकर्ता श्री रोशन धनराज रामटेके याचे नावाची त्याचे दि.07.05.2009 रोजी मयत झालेले वडील श्री धनराज रामदास रामटेके यांचे नावा समोर कायदेशीर वारस म्हणून इतर वारसान बरोबर नोंद झालेली आहे परंतु त्यात देखील तक्रारकर्ता श्री रोशन धनराज रामटेके याचे नाव, मृतक विमाधारक शेतकरी श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे नावा समोर कायदेशीर वारस म्हणून स्तंभ क्रं-5 मध्ये दर्शविलेले नाही.
17. वरील सर्व दस्तऐवजां वरुन तक्रारकर्ता श्री रोशन धनराज रामटेके हा मृतक विमाधारक शेतकरी श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचा कायदेशीर वारस असल्याबाबत सिध्द होत नाही. म्हणून मृतक शेतकरी श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे अपघाती मृत्यू संबधाने कायदेशीर वारस म्हणून शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्यास तक्रारकर्ता श्री रोशन धनराज रामटेके पात्र ठरीत नाही. 18. वरील कारंणामुळे मुद्दा क्रं 1 वरील निष्कर्ष नकारार्थी नोंदविलेला आहे. वरील विवेचना प्रमाणे मृतक श्री लक्ष्मीकांत रामदास रामटेके यांचे अपघाती मृत्यूमुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभ मिळण्यास कायदेशीर वारसदार असल्याचे तक्रारकर्ता श्री रोशन धनराज रामटेके याने सिध्द न केल्यामुळे इतर मुद्दांवर कोणताही विचार करण्याची आवश्यकता नाही. म्हणून मुद्दा क्रं 2 व 3 वरील निष्कर्ष त्या प्रमाणे नोंदविलेले आहेत. 19. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |