अॅड एस. आर. बोराडे तक्रारदारांतर्फे
अॅड एम. एम. कोठारी जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- *-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 18/नोव्हेंबर/2013
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने जाबदेणार संस्था व त्यांचे पदाधिकारी यांचे विरुध्द सेवेतील त्रुटी संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
1. तक्रारदार हे डेक्कन जिमखाना, पुणे 411 004 येथील रहिवासी असून जाबदेणार संस्था ही शैक्षणिक संस्था आहे. सदर शैक्षणिक संस्था ही व्यवस्थापना संबंधीचे शिक्षण प्रदान करते. तक्रारदार यांनी नागपूर विद्यापीठाची B.E. E &T.C पदवी प्राप्त केलेली असून त्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घ्यावयाचे होते. वर्तमान पत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार त्यांनी जाबदेणार यांच्याकडे संपर्क साधला. जाबदेणार यांच्या माहितीनुसार त्यांच्यातर्फे MS विद्यापीठ, तामीळनाडू या संस्थेशी संलग्न, पूर्णवेळ पदवीत्तोर एम.बी.ए परीक्षेचे शिक्षण दिले जाईल असे सांगण्यात आले होते. जाबदेणार क्र 1 हे संस्थेचे डीन असून जाबदेणार क्र 2 हे उपप्राचार्य आहेत. जाबदेणार क्र 3 हे व्यवस्थापकीय प्रमुख आहेत. तर जाबदेणार क्र 4 व 5 हे समुपदेशक आहेत. जाबदेणार यांची संस्था IIPM School of Business & Economy या नावाने डेक्कन जिमखाना, पुणे येथे चालविली जाते. जाबदेणारांतर्फे त्यांची संस्था ही UGC मान्यताप्राप्त असून MS विद्यापीठ, तामीळनाडू यांच्याशी संलग्न आहे असे सांगण्यात आले होते. यासर्व बाबींचा विचार करुन तक्रारदार यांनी जाबदेणार यांचे माहितीपत्रक रुपये 1000/- देऊन घेतले. सदर माहितीपत्रकातील माहिती भरुन जाबदेणार यांच्याकडे व्यवस्थापनातील पूर्णवेळ पदव्यूत्तर शिक्षणासाठी त्यांनी प्रवेश घेतला. दिनांक 16/8/2010 रोजी मुलाखत घेण्यात येऊन एम.बी.ए पदवी देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. तक्रारदारांकडून सन 2010 ते 2012 या शैक्षणिक वर्षाकरिता दोन हप्त्यात रुपये 2,36,000/- एवढी फी घेण्यात आली. त्यानंतर दिनांक 14/2/2011 रोजी जाबदेणार क्र 5 यांनी विद्यापिठाकडून घेतल्या जाणा-या सत्र परिक्षेसाठी रुपये 3350/- फी घेतली व सदरची फी तक्रारदार यांच्याकडून भरुन घेतली. तथापि, तक्रारदार यांना प्रवेश पत्रिका दिली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार यांना जाबदेणार संस्थे संदर्भात शंका आली. त्यांनी चौकशी केली असता जाबदेणार संस्था ही MS विद्यापीठ, तामीळनाडू यांच्याशी संलग्न नाही असे आढळून आले. त्याचप्रमाणे जाबदेणार हे पूर्णवेळ पदव्युत्तर व्यवस्थापनाची पदवी देणार नाही असे आढळून आले. अशा प्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांचे नुकसान केले म्हणून तक्रारदारांनी तक्रार केली. त्यावेळी जाबदेणार यांनी रुपये 2,35,000/- पैकी रुपये 1,06,000/- तक्रारदार यांना परत केले. जाबदेणार यांनी जी सेवा दिली होती ती उचीत दर्जाची नव्हती. त्यामुळे तक्रारदार यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करुन रुपये 1,30,000/- फी परतावा, मानसिक व शारिरीक त्रासासाठी रुपये 3,00,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
2. प्रस्तुत प्रकरणात जाबदेणार क्र 1 ते 5 यांनी समक्ष हजर राहून तक्रारीला लेखी उत्तर दाखल केले आहे. त्यांनी आपल्या लेखी जबाबामध्ये तक्रारीत संपूर्ण मजकूर नाकारला आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार त्यांना फी चा परतावा मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी दाखल केलेली आहे. तक्रारदार यांना जाबदेणार यांच्याबद्यल कोणतीही तक्रार नाही असे लिहून दिलेले आहे. अशा परिस्थितीत जाबदेणार यांचे विरुध्द ही तक्रार चालण्यास पात्र नाही. तक्रारदारां सोबत ज्या इतर विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या होत्या त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे जाबदेणार संस्थेतूनच शिक्षण चालू आहे. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे जाबदेणार यांनी कोणतेही आश्वासन दिलेले नव्हते व आश्वासनाचा भंगही केलेला नाही. जाबदेणार यांच्या संस्थेत शिक्षण घेणा-या ब-याच विद्यार्थ्यांना नोकरी लागलेली आहे. तक्रारदारांची तक्रार खोटी असून ती फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणारांतर्फे करण्यात आली.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, लेखी म्हणणे व युक्तीवाद यांचा विचार करुन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी सदोष सेवा देऊन तक्रारदारांचे नुकसान केले आहे काय | होय |
2 | अंतिम आदेश काय | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
4. या प्रकरणातील कागदपत्रे व शपथपत्र यांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या संस्थेत पूर्णवेळ पदव्युत्तर व्यवस्थापन शास्त्राची पदवी मिळेल या भरवशावर प्रवेश घेतलेला होता. तसा उल्लेख जाबदेणार यांच्या माहितीपत्रकात दिसून येतो. त्यात एम.बी.ए ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून दिली जाईल असे कबूल केले होते. या प्रशिक्षणा अंतर्गत एकूण चार परिक्षा विद्यार्थ्यांना दयावयाच्या होत्या. त्यापैकी एकात स्पेशलायझेशन मिळणार होते. परंतू ज्यावेळी तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या संस्थेत प्रवेश घेतला त्यावेळी त्यांचा भ्रमनिरास झाला. तक्रारदार यांना पूर्णवेळ पदव्यूत्तर व्यवस्थापन शाखेची पदवी देण्यास जाबदेणार पात्र नाहीत असे आढळून आले. त्याप्रमाणे जाबदेणार यांनी आपल्या माहितीपत्रकात बदल केला. अशा प्रकारे जाबदेणार यांनी माहिती पत्रकात दाखविल्या प्रमाणे प्रशिक्षण न देता तक्रारदार यांची केवळ फसवणूक केली नाही तर अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंबही केला. माहितीपत्रकात एक माहिती देऊन दुस-या कारणासाठी फी घेणे ही सदोष सेवा आहे. ही परिस्थिती जर जाबदेणार यांना मान्य नसती तर त्यांनी तक्रारदार यांना अंशत: फी परत केली नसती. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची दिशाभूल करुन त्याचप्रमाणे अधिकची फी वसूल केली आहे. सदरची बाब ही सदोष सेवेत येते. त्यामुळे जाबदेणार हे तक्रारदार यांनी जमा केलेले अतिरिक्त शुल्क परत देण्यास बांधील आहेत. त्याचप्रमाणे जाबदेणार यांच्या चूकीच्या मार्गदर्शनामुळे तक्रारदार यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले यासाठी देखील जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदार यांना जो मानसिक व शारिरीक त्रास झाला, कोर्ट खर्च करावा लागला त्यासाठी देखील जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात.
5. जाबदेणार यांच्या कथनानुसार तक्रारदार यांनी अंशत: फी परत घेतल्यानंतर सहा महिन्यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार संस्थेविरुध्द कोणतीही तक्रार नाही असे लिहून दिलेले होते. त्यामुळे ही तक्रार चालू शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्याकडून संस्थेने हमीपत्र लिहून घेतले म्हणजे त्या विद्यार्थ्याने, तक्रारदाराने, तक्रार सोडून दिली असे म्हणता येणार नाही. या प्रकरणात जाबदेणार संस्था व तक्रारदार यातील संबंध विचारात घेतले असता तक्रारदार यांनी जर हमीपत्र लिहून दिले नसते तर त्यांना कोणताही फी परतावा जाबदेणार संस्थेनी दिला नसता हे स्पष्ट आहे. जाबदेणार क्र 1 ही संस्था असून त्यातील इतर जाबदेणार हे पदाधिकारी आहेत. त्यांना या प्रकरणात व्यक्तीश: जबाबदार धरता येणार नाही. तथापि ते जाबदेणार क्र 1 चे पदाधिकारी म्हणून त्यांचेवर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी येते.
6. वर उल्लेख केलेल्या कारणांवरुन असे स्पष्ट होते की जाबदेणार यांनी अनुचित व्यापारी प्रथा त्याचप्रमाणे सदोष सेवा दिलेली आहे. दोन्ही कारणांमुळे तक्रारदारांचे नुकसान केलेले आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना उरलेली फी ची रक्कम रुपये 1,30,000/- परत करावी, अनुचित व्यापारी प्रथेसाठी रुपये 10,000/-, शारिरीक व मानसिक त्रासासाठी रुपये 10,000/-, शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले म्हणून रुपये 20,000/- व या प्रकरणाचा खर्च म्हणून रुपये 5000/- दयावेत असा आदेश केला तर तो न्यायोचित होईल. सबब त्याप्रमाणे निष्कर्ष काढण्यात येत असून खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार क्र 1 ते 5 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या
अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे व सदोष सेवा दिलेली आहे असे जाहिर करण्यात येत आहे.
[3] जाबदेणार क्र 1 ते 5 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या
तक्रारदारांना उरलेली फी ची रक्कम रुपये 1,30,000/-, अनुचित व्यापारी प्रथेसाठी नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/-, शारिरीक व मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/-, शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले म्हणून रुपये 20,000/- व या प्रकरणाचा खर्च म्हणून रुपये 5000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[4] जाबदेणार क्र 1 ते 5 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या
वर आदेशित नमूद रक्कम मुदतीत परत न केल्यास संपूर्ण रकमेवर 9 टक्के द.सा.द.शे दराने आदेशाच्या दिनांकापासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यन्त दयावी.
[5] उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक-18/11/2013