जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 199/2019. तक्रार दाखल दिनांक : 05/08/2019. तक्रार निर्णय दिनांक : 06/09/2022.
कालावधी : 03 वर्षे 01 महिने 01 दिवस
श्री. राहूल राजेंद्र विहिरे, वय 38 वर्षे, व्यवसाय : वकिली,
रा. महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, बार्शी रोड, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
दी प्रोफेशनल कुरियरर्स, प्रोप्रा. शाम क्षीरसागर,
तापडिया मार्केट, दुकान क्र. 25, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. सतिश बी. मलवाडे
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- वाय.जी. जमादार
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, ते व्यवसायाने विधिज्ञ आहेत. त्यांच्या कुटुंबाने बांधलेल्या नवीन वास्तुचे दि.1/5/2019 रोजी गृहप्रवेशाचे आयोजन केलेले होते. तक्रारकर्ता यांचे मोठे बंधू श्री. रविंद्र हे शिरपूर, जि. धुळे येथे वास्तव्यास आहेत. तेथील अन्य नातेवाईकांना गृहप्रवेश कार्यक्रमास निमंत्रण द्यावयाचे असल्यामुळे तक्रारकर्ता यांनी दि.25/4/2019 रोजी विरुध्द पक्ष यांच्या कुरिअर सेवेद्वारे त्यांचे बंधू श्री. रविंद्र यांच्या पत्त्यावर पत्रिका पाठविल्या. विरुध्द पक्ष यांच्या सांगण्याप्रमाणे तीन दिवसामध्ये पत्रिका पोहोच होणे आवश्यक होते; परंतु पत्रिकांचा लिफाफा श्री. रविंद्र यांना प्राप्त झाला नाही. त्याकरिता तक्रारकर्ता व श्री. रविंद्र यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला; परंतु कुरिअर लिफाफा प्राप्त झाला नाही. निमंत्रण पत्रिकेशिवाय कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाकरिता सामोरे जावे लागले. उक्त कथनाच्या अनुषंगाने अनुचित व्यापारी पध्दत थांबविण्याचा; शुल्क रु.50/- परत करण्याचा; आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- देण्याचा; सूचनापत्र खर्च रु.1,500/- व तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) विरुध्द पक्ष हे विधिज्ञामार्फत जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले; परंतु उचित संधी देऊनही त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ता यांच्याकरिता विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकण्यात आला. विरुध्द पक्ष यांनी कुरिअर सेवेसंबंधी दि.25/4/2019 रोजी दिलेल्या पावती क्र. 350331 चे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी त्यांचे बंधू श्री. रविंद्र यांना शिरपूर येथे कुरिअर पाठविण्याची सेवा घेतल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता यांनी दि.1/5/2019 रोजी नवीन वास्तुच्या गृहप्रवेशाचा शुभ कार्यक्रम आयोजीत केल्यासंबंधी निमंत्रण पत्रिका दिसून येते. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित सेवा घेतलेली होती. तक्रारकर्ता यांचे बंधू रविंद्र यांना विरुध्द पक्ष यांच्याकडून निमंत्रण पत्रिकांचा लिफाफा प्राप्त झाला नाही आणि पत्रिकेअभावी नातेवाईक गृहप्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहिलेले नाहीत. दोषयुक्त कुरिअर सेवेसंबंधी विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्ता यांनी सूचनापत्र पाठविल्याचे दिसून येते.
(4) असे दिसते की, विरुध्द पक्ष यांनी विहीत मुदतीमध्ये लेखी निवेदनपत्र सादर केले नाही आणि त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले. तक्रारकर्ता यांच्या वादकथनांस व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांकरिता विरोधी निवेदन व पुरावा नाही. विरुध्द पक्ष यांनी ग्राहक तक्रार व कागदपत्रांचे खंडन केलेले नाही. अशा स्थितीत वाद-तथ्यांच्या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून कुरिअर सेवा घेतल्याचे सिध्द होते. कुरिअर सेवेंतर्गत लिफाफा इच्छित स्थळी म्हणजेच श्री. रविंद्र यांच्याकडे पोहोच झालेला नाही. तक्रारकर्ता यांनी पाठविलेल्या सूचनापत्रासंबंधी विरुध्द पक्ष यांनी दखल घेतलेली नाही. यावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कुरिअर सेवा देण्यामध्ये निष्काळजीपणा केला, असे अनुमान काढणे न्यायोचित आहे. विरुध्द पक्ष यांनी कुरिअर सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होत असल्यामुळे तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत आणि कुरिअर सेवेकरिता स्वीकारलेले शुल्क रु.50/- परत मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात.
(5) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व अन्य खर्चाकरिता रु.6,500/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, विरुध्द पक्ष यांच्या कुरिअर सेवेंतर्गत पाठविण्यात आलेला लिफाफा मिळविण्याकरिता तक्रारकर्ता यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच विरुध्द पक्ष यांच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. निमंत्रण पत्रिकेअभावी गृहप्रवेश कार्यक्रमास नातेवाईक अनुपस्थित राहिल्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे स्वाभाविक आहे. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कुरिअर सेवेचे शुल्क रु.50/- परत करावेत.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-