जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : ४०६/२०१८. तक्रार दाखल दिनांक : १०/१२/२०१८. तक्रार निर्णय दिनांक : ०७/०७/२०२१.
कालावधी : ०२ वर्षे ०६ महिने २८ दिवस
सौ. नंदा तानाजी मगर, वय ५१ वर्षे,
व्यवसाय : नोकरी, रा. वाघोली, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(१) दी ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि., ३२१/ए/२, सोजवाल बंधू
समाज बिल्डींग, जे.एन. रोड, हॉटेल सेवन लव्हज् समोर,
पुणे – ४११ ०४२.
(२) जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., विमा सल्लागार कंपनी,
दुसरा मजला,जयका बिल्डींग, कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स,
नागपूर – ४४० ००१.
(३) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
मा. श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- नरेंद्र निळकंठराव वाघोलीकर
विरुध्द पक्ष क्र.१ यांचेकरिता विधिज्ञ :- डी.आर. कुलकर्णी (इर्लेकर)
आदेश
मा. श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(१) तक्रारकर्ती यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक शेतक-यांचा महाराष्ट्र शासनामार्फत विरुध्द पक्ष क्र.१ यांच्याकडे रु.२,००,०००/- ची विमा पॉलिसी उतरविलेली असून अपघाती मृत्यूकरिता रु.२,००,०००/- देण्याची विरुध्द पक्ष क्र.१ यांनी जोखीम स्वीकारलेली आहे.
(२) तक्रारकर्ती ह्या मयत कमलबाई भानुदास गाढवे (यापुढे ‘मयत कमलबाई’) यांच्या मुलगी आहेत. मयत कमलबाई यांच्या नांवे मौजे वरुडा, ता. जि. उस्मानाबाद येथे सर्व्हे नं. ३६६, क्षेत्र ०० हे. ६३ आर. व सर्व्हे नं. ३३४, ०० हे. ७२ आर. शेतजमीन असून त्या शेतकरी होत्या. दि. २०/१२/२०१६ रोजी मयत कमलबाई यांना तीन चाकी टमटम वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्या आणि शासकीय रुग्णालय, सोलापूर येथे वैद्यकीय उपचारादरम्यान दि.२७/१२/२०१६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यू घटनेची पोलीस ठाणे, उस्मानाबाद ग्रामीण येथे गुन्हा क्र. ४७/२०१७ अन्वये नोंद झाली. आईच्या मृत्यूनंतर कुटुंब दु:खामध्ये होते. तक्रारकर्ती यांनी विलंब माफी अर्जासह विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे दि.१५/२/२०१८ रोजी विमा दावा व इतर कागदपत्रे दाखल केली. परंतु अर्ज दाखल करण्यासाठी उशिर झाल्याच्या कारणास्तव विरुध्द पक्ष क्र.१ यांनी दि.२०/६/२०१८ रोजीच्या पत्राद्वारे विमा दावा रद्द केला. विरुध्द पक्ष क्र.१ यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.२,००,०००/- दि.२०/१२/२०१६ पासून द.सा.द.शे. १५ टक्के व्याज दराने देण्याचा आणि मानसिक त्रासाकरिता रु.५,०००/- व रु.३,०००/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष क्र.१ यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(३) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांची तक्रार चुकीच्या व अर्धवट माहितीच्या आधारीत असल्यामुळे नामंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यांचे कथन आहे की, तक्रारीतील घटनेची तारीख २०/१२/२०१६; मृत्यूची तारीख २७/१२/२०१६ व विमा प्रस्ताव दाखल केल्याची तारीख १५/२/२०१८ लक्षात घेता; तसेच विमा करारानुसार तथाकथित घटनेची अपघाती घटनेची तात्काळ माहिती विरुध्द पक्ष यांना देण्याची महत्वाची व आवश्यक अट लक्षात घेता तक्रारकर्ता यांनी त्या अटीचे उल्लंघन केलेले असून विमा कराराचा भंग केला. तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही आणि तक्रारकर्ती यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केली.
(४) तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.२ यांच्याविरुध्द आवश्यक कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द तक्रार रद्द करण्यात आलेली आहे.
(५) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.१ यांचे लेखी निवेदन व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे उपस्थित होणा-या मुद्यांचे सकारण उत्तरे त्यांच्यापुढे नमूद करुन कारणमीमांसा देत आहोत.
मुद्दे उत्तर
(१) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी तक्रारकर्ती यांना विमा रक्कम अदा
न करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? होय.
(२) तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
(३) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
(६) मुद्दा क्र. 1 व 2 :- शेतकरी जनता अपघात विमा योजनेनुसार राज्यातील शेतक-यांना विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अपघाती मृत्यू व अपंगत्व याकरिता विमा संरक्षण दिलेले होते, ही बाब वादास्पद नाही.
(७) मयत कमलबाई यांच्या नांवे असणा-या ७/१२ उता-याचे अवलोकन केले असता त्या शेतकरी होत्या, ही बाब निदर्शनास येते. अभिलेखावर दाखल असणा-या मयत खबर जबाब, पहिली खबर, घटनास्थळ पंचनामा, मरनोत्तर पंचनामा, दोषारोप व शवचिकित्सा अहवालाचे अवलोकन केले असता रस्ता अपघातामध्ये डोक्यास इजा झाल्यामुळे मयत कमलबाई यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते.
(८) मयत कमलबाई यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे दि.१५/२/२०१८ रोजी विमा दावा दाखल केला, ही बाब विवादीत नाही. विरुध्द पक्ष क्र.१ यांचे दि.२०/६/२०१८ रोजीचे पत्र पाहता दावा सूचना दि.२८/२/२०१८ वाढीव मुदतीनंतर आल्यामुळे दावा रद्द केल्याचे कळविलेले आहे. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांच्यातर्फे युक्तिवाद आहे की, विमा करारानुसार तथाकथित घटनेची अपघाती घटनेची तात्काळ माहिती विरुध्द पक्ष यांना देण्याची महत्वाची व आवश्यक अट लक्षात घेता तक्रारकर्ता यांनी त्या अटीचे उल्लंघन केलेले असून विमा कराराचा भंग केला आणि विमा दावा रद्द करुन त्यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही
(९) वास्तविक तक्रारकर्ती यांनी विमा कराराचे उल्लंघन केल्याचे सिध्द करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.१ यांनी आवश्यक व उचित पुरावा दाखल केलेला नाही. उलटपक्षी विरुध्द पक्ष क्र.१ यांच्या दि.२०/६/२०१८ रोजीच्या पत्रामध्ये दावा सूचना देण्याची वाढीव मुदत दि.२८/२/२०१८ पर्यंत असल्याचे नमूद आहे. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती यांनी दि.१५/२/२०१८ रोजी विरुध्द पक्ष क्र.३ यांच्याकडे विमा दावा सादर केल्याचे दिसून येते आणि ती मान्यस्थिती आहे. यावरुन तक्रारकर्ती यांनी मुदतीमध्ये विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा दावा सादर केला होता, हे सिध्द होते.
(१०) शेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात उदा. रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, विजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश व वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही अपघातामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस अशा प्रकारच्या अपघातांमुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे अशा अपघातग्रस्त शेतक-यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण देण्यामागे असणारा परोपकारी हेतू व त्यामागील सामाजिक बांधीलकी निदर्शनास येते.
(११) विरुध्द पक्ष क्र.१ यांनी अयोग्य व अनुचित कारणास्तव तक्रारकर्ती यांचा विमा दावा रद्द केलेला असून विमा रकमेचा लाभ नाकारुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. तक्रारकर्ती ह्या विमा रक्कम रु.२,००,०००/- मिळण्यास पात्र आहेत. विमा दावा अयोग्य व अनुचित कारणास्तव रद्द केल्यामुळे विमा दावा रद्द केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.२०/६/२०१८ पासून विमा रकमेवर द.सा.द.शे. ८ टक्के व्याज मिळण्याकरिता तक्रारकर्ती पात्र ठरतात.
(१२) तक्रारकर्ती यांना योग्यवेळी विमा रक्कम प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागता, ही बाब अमान्य करता येणार नाही. तसेच तक्रारकर्ती यांना जिल्हा आयोगापुढे ग्राहक तक्रार दाखल करणे भाग पडले आणि त्यांना खर्च करावा लागला. त्या सर्वांचा विचार करुन तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता एकत्रितरित्या रु.५,०००/- मंजूर करणे न्याय्य वाटते. मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारकर्ती यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(२) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.२,००,०००/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच रु.२,००,०००/- रकमेवर दि.२०/६/२०१८ पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. ८ टक्के दराने व्याज द्यावे.
(३) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास व तक्रार खर्चाकरिता रु.५,०००/- द्यावेत.
(४) विरुध्द पक्ष क्र.१ विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून ४५ दिवसाच्या आत करावी.
(श्री. मुकुंद भगवान सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद (महाराष्ट्र)
-०-