::निकालपत्र:: (पारीत व्दारा – श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक– 06 मे, 2014 ) 1. तक्रारकर्तीने, तिचा मृतक मुलगा तेजराव गळहाट याचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्षा कडून विमा रक्कम मिळणेसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे- तक्रारकर्तीचा मुलगा तेजराव नत्थुजी गळहाट याच नावाने मौजा चिंचोली, तालुका काटोल, जिल्हा नागपूर येथे शेती असून त्याचा सर्व्हे क्रं 42 व 98 असून क्षेत्र एकूण आराजी 6.99 हेक्टर आर आहे. पैकी शेत सर्व्हे क्रं 42 ही शेती वारस म्हणून त्याचे वाटयास आली होती तर शेत सर्व्हे क्रं 98 हे स्वकष्ठार्जीत मालमत्ता म्हणून संपादीत केली होती. तक्रारकर्तीचा मुलगा तेजराव हा स्वतः शेतीची वहिती करीत होता. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विमा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून उतरविला होता. महाराष्ट्र शासन तर्फे तहसिलदार यांचे मार्फतीने संबधित शेतक-याचा विमा क्लेम हा, विरुध्दपक्ष क्रं-2 यांचे कार्यालयात पाठविल्या जातो व वि.प.क्रं 2 चे मार्फतीने प्रस्तावाची छाननी करुन पुढे तो विमा प्रस्ताव, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर करण्यात येतो. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, दि.17.12.2007 रोजी सकाळी 6.30 वाजताचे सुमारास तिचा मुलगा तेजराव गळहाट व त्याचे वडील नत्थुजी गळहाट हे अमरावती येथे जाण्या करीता जुनापानी बस स्टॉप जवळ बसची वाट पाहत असता उभे असताना एका ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रक चालवून तेजराव आणि नत्थुजी गळहाट यांना जोरदारधडक मारली. सदर अपघातात दोघांचे डोक्यास आणि पायास गंभिर दुखापत होऊन दोघेही घटनास्थळावरच मरण पावले. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन कोंढाळी यांनी घेतली व तसे दस्तऐवज तक्रारकर्तीस देण्यात आले. तिचे मृतक पती श्री नत्थु गळहाट यांचे त्याच घटनेतील अपघाती मृत्यू संबधीचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मंजूर करुन तक्रारकर्तीस विमा दाव्याची रक्कम दिलेली आहे परंतु मुलगा तेजराव गळहाट याचे विमा दाव्या संबधाने मात्र दस्तऐवजांची पुर्तता केली नाही या कारणास्तव विमा दावा नामंजूर केला. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा मुलगा तेजराव गळहाट याचे अपघाती मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम मिळावी म्हणून तहसिलदार, काटोल यांना सुचना दिली असता त्यांनी क्लेम फॉर्म देऊन आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता करण्यास सुचित केले, त्यानुसार तक्रारकर्तीने शेतीचे दस्तऐवज व अपघाता संबधी पोलीस विभागा तर्फे प्राप्त दस्तऐवजांसह क्लेम फॉर्म तहसिलदार काटोल यांचे कार्यालयात सादर केला. त्यानुसार तहसिलदार काटोल यांनी दि.24.01.2008 रोजीचे पत्राव्दारे तक्रारकर्तीचा विमा दावा फॉर्म आवश्यक दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 2 चे कार्यालयात पाठविला. शासनाचे परिपत्रका नुसार प्रपत्र ड मधील मागणी दस्तऐवज दावा प्रपत्रा सोबत जोडले होते. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे मुलाचे विमा दाव्या संबधाने दि.28.01.2008 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस तर्फे तक्रारकर्तीस काही दस्तऐवजांची पुर्तता करण्यास सांगितले. तहसिलदार, काटोल यांनी दि.07.08.2008 रोजीचे पत्र तक्रारकर्तीस देऊन विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस यांचे छापील फॉर्म नुसार अनुक्रमांक-04 ते 12 व 17 नंबर वरील दस्तऐवज साक्षांकीत करुन व्दिप्रतीत कार्यालयात सादर करण्याचे कळविले होते. तक्रारकर्तीने सदरचे दस्तऐवज तहसिलदार यांचे कार्यालयात वेळीच जमा केले होते व तहसिलदार यांचे कार्यालयाने दि.14.08.2008 रोजीचे पत्रान्वये विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे कार्यालयात कागदपत्रे पाठविली होती.. अशाप्रकारे तक्रारकर्तीने वेळोवेळी मागणी नुसार दस्तऐवजांची पुर्तता केलेली आहे. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने मुलाचे विमा दाव्या संबधाने आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता केली असतानाही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.27.11.2008 रोजीचे पत्रान्वये मृतक विमाधारकाचे मृत्यू पूर्वीचा शेतीचा फेरफार व इतर कागदपत्रांची 07 दिवसांचे आत पुर्तता करण्यास सुचित केले. वस्तुतः तक्रारकर्तीने मृतकाचा मृत्यूपूर्वीचा फेरफार तहसिलदार काटोल यांचे मार्फतीने यापूर्वीच पुरविला होता. तरी सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनी वारंवार कागदपत्रांची मागणी करीत आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दि.12.05.2009 रोजीचे पत्रान्वये आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता वेळेचे आत न केल्याने तक्रारकर्तीचा विमा दावा अस्विकृत करुन फाईल बंद करण्यात आल्याचे कळविले. म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्तीचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- अपघात दिनांका पासून द.सा.द.शे.15% दराने व्याजासह मिळावी, तसेच मानसिक, शारिरीक त्रास व आर्थिक नुकसानी पोटी रुपये-20,000/- आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून मिळावे इत्यादी मागण्या केल्यात. 3. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचा तर्फे यातील विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना स्वतंत्ररित्या नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. सदर न्यायमंचाची नोटीस संबधित वि.प.क्रं 1 व 2 यांना प्राप्त झाल्या बद्दल रजिस्टर पोच अभिलेखावर दाखल आहेत. 4. विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी तर्फे श्री अरुणकुमार रामनायक जैस्वार यांचे प्रतिज्ञालेखावरील उत्तर न्यायमंचा समक्ष सादर करण्यात आले. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीचा मुलगा तेजराव नत्थुजी गळहाट हा शेतकरी होता, त्याचे मालकी हक्का संबधाने सातबारा उता-यामध्ये नोंद होती या बाबी नाकबुल केल्यात. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 चे मागणी नुसार वेळोवेळी आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता केली होती हे विधान नाकबुल केले. तक्रारकर्तीने मागणी केलेल्या दस्तऐवजांची विहित मुदतीचे आत पुर्तता न केल्यामुळे विमा दावा फेटाळल्या बद्दल दि.12.05.2009 रोजीचे पत्राव्दारे तक्रारकर्तीस कळविण्यात आले होते. त्यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही. तक्रारकर्ती मागणी प्रमाणे कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाही. तक्रारकर्तीने विलंबाने विमा दावा दाखल केला. अपघात झाल्या पासून किंवा दावा फेटाळल्या पासून दोन वर्षाचे आत तक्रारकर्तीने दावा दाखल करणे आवश्यक आहे, त्यामुळे मुदतीचे कारणा वरुन तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 5. विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स कंपनी तर्फे प्रतिज्ञालेखावरील उत्तर न्यायमंचा समक्ष सादर केले. त्यांनी लेखी उत्तरामध्ये ते केवळ मध्यस्थ सल्लागार म्हणून शासन आणि विमा कंपनी यांचे मध्ये कार्य करतात व शासनास विना मोबदला सहाय्य करीत असल्याने तक्रारकर्ती या त्यांच्या ग्राहक होऊ शकत नाहीत त्यामुळे विमा दाव्या संबधाने कोणतीही रक्कम देण्याची त्यांची कोणतीही कायदेशीर जबाबदारी नाही. आपल्या म्हणण्याचे समर्थनार्थ त्यांनी मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग खंडपिठ औरंगाबाद यांनी प्रथम अपिल क्रं-1114/2008 विभाग प्रमूख कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रायव्हेट लिमिटेड –विरुध्द- श्रीमती सुशिला भीमराव सोनटक्के या प्रकरणात दि.16.03.2009 रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रत दाखल केली आहे. सदर आदेशा मध्ये वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस लिमिटेड यांचे विरुध्द शेतक-यास अपघात विमा दाव्याची रक्कम देण्याची कोणतीही जबाबदारी येत नाही असे नमुद केलेले आहे. म्हणून वि.प.क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. संबधित तहसिलदार यांचे कडून प्राप्त विमा प्रस्तावाची, योग्य ती छाननी करुन, तसेच आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन, विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे मंजूरीसाठी ते पाठवितात. मृतक श्री तेजराव नत्थुजी गळहाट, रा.मुक्काम पोस्ट खुर्सापार (हेटी) तालुका काटोल, जिल्हा नागपूर यांचा अपघात दि.17.12.2007 रोजी झाला. सदरील विमा प्रस्ताव हा तहसिल कार्यालय, काटोल मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस, नागपूर यांचे कार्यालयास दि.24.01.2008 रोजी प्राप्त झाल्या नंतर त्यांनी सदर विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे दि.22.08.2008 रोजी सादर केला. वि.प.क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने त्यांचे दि.12.05.2009 रोजीचे पत्रान्वये दावा नामंजूर केल्याचे वारसदारांना कळविण्यात आले. त्यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने वि.प.क्रं 2 यांना मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली. 6. तक्रारकर्तीने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती सादर केल्यात, ज्यामध्ये तहसिलदार काटोल कार्यालया तर्फे सादर केलेल्या विमा दाव्याचे पत्र, विमा दावा प्रस्ताव, गाव नमुना 7/12, फेरफारपत्रक, गाव नमुना-6क, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, तहसिलदार यांचा पत्रव्यवहार, वि.प.क्रं 1 विमा कंपनीची पत्रे, ओळखपत्र, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे पत्र, कायदेशीर नोटीस पोस्टाची पावती व पोच पावती इत्यादी प्रतीचा समावेश आहे. तसेच पुरसिस सादर करुन तक्रारीलाच प्रतीउत्तर व लेखी युक्तीवाद समजावा असे कळविले. 7. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर सादर केले व लेखी युक्तीवाद सादर केला. तसेच पुरसिसव्दारे लेखी उत्तराच मौखीक युक्तीवाद समजावा असे कळविले. 8. वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस तर्फे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 9. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्ती तर्फे वकील श्री आर.व्ही.चौधरी आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री एम.ए. चौधरी यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. 10. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी आणि वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे लेखी उत्तर आणि प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज व त.क. व वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे- :: निष्कर्ष :: 11. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तरा नुसार मृतक तेजराव गळहाट याचे नावाने मृत्यूचे वेळी शेती होती ही बाब नाकबुल असल्या बाबत. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, प्रकरणातील सन-2004-05 च्या उपलब्ध गाव नमुना 7/12 चे उता-यावरुन मृतक श्री तेजराव नत्थुजी गळहाट याचे नावाने गट क्रं 42 मौजे चिंचोली, तालुका काटोल येथे शेती होती. प्रकरणातील फेरफार पत्रकाचे नोंदी वरुन मृतक श्री तेजराव नत्थुजी गळहाट याने श्री सुखदेव माधो ढोबळे यांचे कडून शेती विकत घेतल्या बाबत फेरफार नोंद क्रं 698 फेरफार मंजूरीचा दिनांक-27.07.2005 दिसून येते. फेरफार नोंदवही वरुन आपसी वाटणीपत्राव्दारे मृतक तेजराम नत्थुजी गळहाट तर्फे अपाक आई झिंगुबाई हिचे नावाने मौजा चिचोली, तालुका काटोल, जिल्हा नागपूर येथील जुना सर्व्हे नं.38 नविन 42 एकूण क्षेत्र 5.96 पैकी 1.96 हेक्टर आर ची फेरफार नोंद दि.23.04.1993 रोजी मंजूर झाल्याचे दिसून येते. फेरफार नोंदवही वरुन मौजा चिचोली, तालुका काटोल, जिल्हा नागपूर खातेदार मृतक तेजराव नत्थुजी गळहाट, रा. खुर्सापार हेटी हा दि.17.12.2007 रोजी मरण पावला असून व तो अविवाहीत असल्याने त्याची वारसदार आई झिंगुबाई नत्थुजी गळहाट ही वारस आढळल्या बाबत फरेफार नोंद दि.24.12.2007 रोजी मंजूर केल्याचे दिसून येते. वरील सर्व दस्तऐवजा वरुन मृतक तेजराव नत्थुजी गळहाट हा मृत्यूचे पूर्वी पासूनच शेतकरी होता आणि तो अविवाहीत असल्याने त्याचे मृत्यू नंतर त्याची आई श्रीमती झिंगुबाई गळहाट ही मृतकाची कायदेशीर वारसदार असल्या बद्दल स्पष्ट होते. 12. मृतक श्री तेजराव गळहाट याचे अपघाती मृत्यू बाबत- प्रकरणातील उपलब्ध पोलीस दस्तऐवज एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, आणि डॉक्टरांचे शवविच्छेदन अहवाल यावरुन मृतक श्री तेजराम नत्थुजी गळहाट याचा मौजा जुनापानी बस स्टॉप जवळ, तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे उभा असताना ट्रक क्रमांक-एम.एच.-04 डीडी-3013 चे चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जबर धडक देऊन त्यामध्ये अपघाताने मृत्यू दि.17.12.2007 रोजी झाल्याचे दिसून येते. मेडीकल कॉलेज नागपूर तर्फे जारी शव विच्छेदन अहवाला वरुन मृतक श्री तेजराव याचे मृत्यूचे कारण “Injury to vital organs” असे नमुद केलेले आहे. थोडक्यात मृतकाचा मृत्यू हा योजनेचे कालावधीत अपघाताने झाल्याची बाब सिध्द होते.
13. महाराष्ट्र शासन निर्णय दि.24 ऑगस्ट, 2007 अन्वये दि.15 ऑगस्ट, 2007 ते 14 ऑगस्ट, 2008 या कालावधीमध्ये शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वीत असून विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे (“वि.प.क्रं 1” म्हणजे ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी असे समजण्यात यावे) पुणे,नाशिक, अमरावती व नागपूर या कार्यक्षेत्रातील शेतक-यांचा विमा सदर कालावधीत उतरविल्याचे दिसून येते. थोडक्यात मृतकाचा विमा सदरचे कालावधीत काढलेला होता ही बाब स्वयंस्पष्ट होते. 14. तक्रारकर्तीचा मुलगा मृतक तेजराव गळहाट याचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दावा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह तहसिलदार काटोल यांचे कार्यालयीन पत्र दि.24.01.2008 रोजीचे पत्रान्वये विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस नागपूर यांचेकडे पाठविल्याचे दाखल पत्राचे प्रतीवरुन दिसून येते. 15. प्रकरणातील दाखल विमा प्रस्तावाचे प्रतीं वरुन विमा प्रस्तावा सोबत मृतकाचे नावे शेती असल्या बद्दल पटवारी प्रमाणपत्र, गावनमुना 7/12, फेरफार नोंदीचे दस्तऐवज, गाव नमुना 6 क, एफआयआर, मरणान्वेषण इतिवृत्त, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी दस्तऐवजांच्या प्रती जोडण्यात आल्याचे दिसून येते. 16. विरुध्दपक्ष क्रं-2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे मागणी नुसार तहसिलदार काटोल यांचे कडून दस्तऐवजांची पुर्तता केल्या बाबत- विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे दि.28.01.2008 रोजीचे तहसिलदार काटोल यांना दिलेल्या पत्रावरुन, ज्याची प्रत तक्रारकर्तीस दिल्याचे दिसून येते, सदर पत्रामध्ये 7/12 मूळ उतारा, 8-अ दाखला मूळ प्रत, 6-क दाखला मूळ प्रत, मृत्यू दाखला मूळ प्रत, वयाचा पुरावा साक्षांकित प्रत, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, प्रथम माहिती अहवाल, मृत्यू विश्लेषण अहवाल, मृतक तेजराव गळहाटचे नावे शेती असलेला फेरफार इत्यादी दस्तऐवजांची मागणी केल्याचे दाखल पत्राचे प्रतीवरुन दिसून येते. त्यावरुन तहसिलदार काटोल यांनी तक्रारकर्तीस त्यांचे कार्यालयीन पत्र दि.07.08.2008 अन्वये मूत्यू दाखला, वयाचा पुरावा, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, प्रथम माहिती अहवाल, मृत्यू विश्लेषण अहवाल इत्यादी दस्तऐवजांची मागणी करुन सदर मूळ दस्तऐवज तहसिल कार्यालयात दि.11.08.2008 पर्यंत पुरविण्यास सुचित केले. तसेच सदर पत्राची प्रत तलाठी खुर्सापार हेटी, तालुका काटोल यांना दिली असून त्यामध्ये मृतकाचे नावे असलेला 7/12 मूळ उतारा, 8-अ दाखला मूळ प्रत, 6-क दाखला मूळ प्रत, फेरफार इत्यादी दस्तऐवज पुरविण्यास सूचित केले असल्याचे दिसून येते. प्रकरणातील उपलब्ध तहसिलदार काटोल यांचे दि.14.08.2008 रोजीचे कार्यालयीन पत्राचे प्रतीवरुन असे दिसून येते की, तहसिलदार काटोल यांनी मृतक श्री तेजराव नत्थुजी गळहाट याचे विमा दाव्या संबधाने 7/12, 8-अ, शाळा सोडल्याचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र तसेच पोलीस विभागाचे दस्तऐवज साक्षांकीत करुन विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस, नागपूर यांचेकडे पाठविल्याचे दाखल पत्राचे प्रतीवरुन दिसून येते. प्रकरणातील उपलब्ध विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने दि.27.11.2008 रोजी तक्रारकर्तीस दिलेल्या पत्राचे प्रतीवरुन मृतक तेजराव गळहाट याचे विमा दाव्या संबधाने मृतकाचा मृत्यू पूर्वीचा शेती बाबतचा फेरफार व इतर कागदपत्रे मूळ प्रतीत पत्र मिळाल्या पासून 07 दिवसात पाठविण्या बद्दल सुचित केल्याचे दिसून येते. सदर पत्राची प्रत विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस नागपूर यांना पाठविल्याचे आणि तहसिलदार काटोल यांचे नाव खोडल्याचे दिसून येते. तहसिलदार काटोल यांनी त्यांचे दि.14.08.2008 रोजीचे कार्यालयीन पत्रा सोबत मृतक श्री तेजराव नत्थुजी गळहाट याचे विमा दाव्या संबधाने 7/12, 8-अ, शाळा सोडल्याचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र तसेच पोलीस विभागाचे दस्तऐवज साक्षांकीत करुन विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस, नागपूर यांचेकडे पाठवून पुर्तता केल्याची बाब दाखल पत्राचे प्रती वरुन सिध्द होते.
17. तक्रारकर्तीने विहित मुदतीत मागणी नुसार दस्तऐवज न पुरविल्याने विमा दावा नामंजूर केल्या बाबत- विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दि.12.05.2009 रोजीचे पत्र जे तक्रारकर्तीचे नावे दिलेले आहे त्यामध्ये मृतक तेजराव गळहाट याचा विमा दावा विमा कंपनीचे पत्र दि.27.11.2008 व 29.09.2009 अनुसार दाव्यासाठी आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता वेळेत न केल्यामुळे विमा दावा अस्विकृत करुन फाईल बंद करण्यात येत असल्या बद्दल कळविले आहे. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, तहसिलदार काटोल यांनी त्यांचे दि.14.08.2008 रोजीचे कार्यालयीन पत्रा सोबत वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस नागपूर यांचे दि.28.01.2008 चे पत्राचे संदर्भात मृतक श्री तेजराव नत्थुजी गळहाट याचे विमा दाव्या संबधाने 7/12, 8-अ, शाळा सोडल्याचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र तसेच पोलीस विभागाचे दस्तऐवज साक्षांकीत करुन विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस, नागपूर यांचेकडे पाठवून पुर्तता केल्याची बाब दाखल पत्राचे प्रती वरुन सिध्द होते. विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट सर्व्हीसेस यांनी दाखल केलेल्या उत्तरा वरुन त्यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा हा दि.22.08.2008 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला असता वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.12.05.2009 रोजीचे पत्रान्वये नाकारला असल्याचे नमुद केले. तहसिलदार काटोल यांनी दि.14.08.2008 रोजीचे कार्यालयीन पत्राव्दारे वि.प.क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचे मागणी नुसार दस्तऐवजांची पुर्तता केल्या नंतर वि.प.क्रं 2 यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा हा दि.22.08.2008 रोजी वि.प.क्रं 1 विमा कंपनीकडे आवश्यक दस्तऐवजांसह सादर केला. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा आक्षेप की, त्यांना मृतकाचा मृत्यू पूर्वीचे शेती बाबतचा फेरफार दस्तऐवज मिळाला नाही या आक्षेपात काहीही तथ्य दिसून येत नाही. 18. विरुध्दपक्ष क्रं-1 विमा कंपनीचा आक्षेप असा आहे की, तक्रारकर्तीचा विमा दावा हा दि.12.05.2009 रोजी फेटाळल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार दावा फेटाळल्या पासून दोन वर्षाचे आत तक्रारकर्तीने तक्रार मंचा समक्ष दाखल करणे आवश्यक आहे, त्यामुळे मुदतीचे कारणा वरुन तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दि.02.07.2013 रोजी दाखल केलेली आहे. या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्यांचे दिनांक-12.05.2009 रोजीचे पत्रा नुसार तक्रारकर्तीस तिचा मुलगा तेजराव नत्थुजी गळहाट याचे मृत्यू संबधाने विमा कंपनीचे पत्र दि.27.11.2008 व 29.01.2009 नुसार दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता वेळेत न केल्याने विमा दावा अस्विकृत करण्यात आल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्तीने मंचा समक्ष तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब माफ व्हावा यासाठी विलंब माफीचा स्वतंत्र अर्ज प्रतिज्ञालेखासह मंचा समक्ष सादर केला, त्यावरुन विलंब माफीचे अर्जा संबधाने किरकोळ प्रकरण क्रं-एम.ए.13/13 नोंदविण्यात आले. तक्रारकर्तीने विलंब माफीचे अर्जामध्ये तक्रारकर्तीने तिचा मृतक मुलगा तेजराव नत्थुजी गळहाट याचे विमा दावा संबधाने मृतकाचे मृत्यू पूर्वीचा फेरफार तहसिलदार काटोल यांचे मार्फतीने पुरविलेला होता तरी सुध्दा विरुध्दपक्ष विमा कंपनी पुन्हा तीच कागदपत्रे मागणी करुन तक्रारकर्तीस त्रास देत होते. विरुध्दपक्ष विमा कंपनीने चुकीचा पत्रव्यवहार करुन अनावश्यक दस्तऐवजांची मागणी केली. तक्रारकर्तीचे पतीचा सुध्दा याच अपघातात मृत्यू झालेला आहे व तिचे पतींचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मंजूर करुन विमा रक्कम तक्रारकर्तीस अदा केलेली आहे. तक्रारकर्ती ही ग्रामीण भागात राहणारी अशिक्षीत विधवा स्त्री आहे, मुलाचे अपघाता नंतर तिचे कुटूंबात कोणीही पुरुष व्यक्ती राहिलेला नाही. अशास्थितीत तिला योग्य मार्गदर्शन मिळालेले नाही. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र दि.13.12.2010 अनुसार तिला दि.07.01.2011 रोजी बचत भवन सभागृह जिल्हाधिकारी, नागपूर येथे आयोजित शिबिरात आवश्यक दस्तऐवज घेऊन येण्यास कळविले, त्यानुसार तक्रारकर्तीने आवश्यक दस्तऐवज पुरविलेत तेंव्हा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी विमा दावा रक्कम लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन दिले होते व सदरचे आश्वासनावर आजपर्यंत ती विसंबून होती. तक्रारकर्तीने आपले म्हणण्याचे कथनार्थ तक्रारी सोबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे दि.13.12.2010 रोजीचे पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने झालेला विलंब माफ होण्यास विनंती केली आहे. मंचाने किरकोळ प्रकरण एम.ए.13/13 मध्ये दि.16 नोव्हेंबर, 2013 रोजीचे आदेशान्वये तक्रारकर्तीचा विलंब माफीचा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे तक्रार दाखल विलंबा बाबतचे आक्षेपात कोणतेही तथ्य दिसून येत नाही. 19. उपरोक्त नमुद परिस्थितीत तक्रारकर्ती तिचा मृतक मुलगा तेजराव नत्थुजी गळहाट याचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम रुपये-1,00,000/- तक्रार दाखल दिनांक- 02.07.2013 पासून द.सा.द.शे.9%दराने व्याजासह तसेच शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 यांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात येते. 20. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, मंच, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे- ::आदेश:: तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी तर्फे मंडलीय प्रबंधक, मंडलीय कार्यालय नागपूर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. विरुध्दपक्ष क्रं 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस नागपूर यांना प्रस्तुत तक्रारीतुन मुक्त करण्यात येते. (1) विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्यात येते की,तक्रारकर्तीस तिचे मुलाचे अपघाती मृत्यू संबधाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रुपये-1,00,000/-(अक्षरीरुपये एक लक्ष फक्त ) दिनांक-02.07.2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह द्दावी. (2) तक्रारकर्तीस झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीस द्दावेत. (3) विरुध्दपक्ष क्रं- 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांना सदर तक्रारीतून मुक्त करण्यात येते. (4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. (5) निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |