तक्रारदार स्वत: व द्वारा- P.O.A.
जाबदेणार स्वत:
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार,
**निकालपत्र **
दिनांक 12/जुलै/2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून सदनिका विकत घेतली. सदनिका विकत घेतेवेळी जाबदेणारांनी तक्रारदारांकडून रुपये 50,000/- डिपॉझिट म्हणून घेतले होते. उभय पक्षकारात करारनामा क्र 9463-2005 झाला. करार नाम्यातील पॅरा क्र.17, पान नं 18 मध्ये पुढील प्रमाणे नमूद केलेले आहे- “The purchaser / s shall be entitled to demand interest as prevailing fix deposit rates on the said deposit” जाबदेणार यांनी व्याजाची रक्कम अद्यापपर्यन्त दिली नाही. तक्रारदारांनी मंचामध्ये तक्रार क्र. पीडीएफ/119/08 दाखल केली होती. त्यात करारनाम्याचे पान आहे. जाबदेणार यांनी श्री. दिलीप आर पाठक यांना दिनांक 4/10/2007 पत्रान्वये 12 टक्के व्याजदराने व्याजाची रक्कम मिळेल व ही रक्कम श्री. पाठक व तक्रारदारांनाच मिळेल असे नमूद केले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार यांना पत्र लिहीले परंतु जाबदेणार यांनी त्यास उत्तर दिले नाही. व्याजाची रक्कमही दिली नाही. तक्रारदार दिनांक 10/3/2012 रोजी भेटले व व्याजाच्या रकमेची मागणी केली. परंतु जाबदेणार यांनी त्यास नकार दिला. ऑक्टोबर 2007 पर्यन्त 54 महिन्यांसाठी व्याजाची रक्कम रुपये 27,000/- होते. ही रक्कम दिली नसल्यामुळे चक्रवाढ दराने रुपये 35,122/- होतात. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून चक्रवाढ व्याजाची रक्कम रुपये 35,122/- मागतात. नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- मागतात. तसेच सोसायटी कडे डिपॉझिट हॅन्ड ओव्हर करेपर्यन्त दरमहा रुपये 500/- मागतात. तक्रारदारांनी कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी सोसायटी डिपॉझिट पोटी रुपये 50,000/- भरल्याची पावती दाखवावी अशी जाबदेणार मागणी करतात. सोसायटी सिक्युरिटी डिपॉझिटपोटी रुपये 50,000/- घेण्यात आले होते. त्यावरील व्याजाचा उपयोग सोसायटीच्या खर्चासाठी करावयाचा होता. तक्रारदार श्री. वेद प्रकाश खरबंदा हे जाबदेणार यांच्या कंपनीत कन्स्ट्रक्शन इंजिनिअर म्हणून कामाला होते. तक्रारदारांनी खोटा करारनामा बनवून त्यामध्ये रुपये 50,000/- डिपॉझिट वर व्याजाची रक्कम सदनिका धारकांना मिळेल असे लिहीले आहे. तसेच तक्रारदारांनी दाखल केलेले दिनांक 4/10/2007 चे श्री. पाठक यांना लिहीलेले पत्र खोटे आहे. त्यामध्ये काही वाक्य हाताने लिहीलेले आहे. ते जाबदेणार यांना मान्य नाही. तक्रारदार जेष्ठ नागरिक असल्यामुळे खोटे कागदपत्र बनवून त्याचा गैरफायदा घेतात. त्यांनी मंचामध्ये तक्रार क्र. पीडीएफ/119/08 दाखल केली होती. तक्रारीचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने लागला. त्यानंतर तक्रारदार व जाबदेणार यांच्यात तडजोड सुध्दा झालेली आहे. ऑक्टोबर 2007 ते 2011 ही व्याजाची रक्कम मिळणेसाठी तक्रारदारांनी पुर्वीच्याच तक्रारीमध्ये उल्लेख करावयास हवा होता. तसा उल्लेख पुर्वीच्याच तक्रारीमध्ये तक्रारदारांना करता आला असता, परंतु त्यांनी तो केलेला नाही. तक्रार क्र. पीडीएफ/119/08 मधील मंचाच्या आदेशानुसार तक्रारदारांना ऑक्युपेशन सर्टिफिकीट, ताबा दिलेला आहे, सर्व रक्कमही देण्यात आलेली आहे. तक्रारदार प्रस्तुत तक्रारीद्वारे नवीन कल्पनेने जाबदेणारांकडून रक्कम काढून घेऊ इच्छितात. म्हणून तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी कागदपत्रे विशेषत: ऑक्युपेशन सर्टिफिकीट, दिनांक 4/10/2007 चे पत्र व ब-याच सदनिकाधारकांच्या करारनाम्यातील पृष्ठे दाखल केली आहेत. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार जाबदेणारांकडे रुपये 50,000/- डिपॉझिट ठेवले होते त्यावरील व्याज मिळणेसाठी दाखल केली आहे. मंचाने करारनाम्याची पाहणी केली, क्लॉज नं 17 ची पाहणी केली. त्या क्लॉज मध्ये “ Payment of Taxes, Cesses, maintenance charges etc.” असे नमुद केले आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी रुपये 50,000/- डिपॉझिट केले होते त्यावर व्याज मिळण्यास पात्र आहे असे नमुद केले आहे. “The purchaser/s shall be entitled to demand interest as prevailing fix deposit rates on the said deposit”. परंतु जाबदेणार यांचे त्यास असे उत्तर आहे की तो क्लॉज त्यांनी डॉक्युमेंट फोर्ज करुन केलेला आहे. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार त्यांच्याकडे कन्स्ट्रक्शन इंजिनिअर म्हणून कामाला होते. जाबदेणार अशा प्रकारचा क्लॉज करारामध्ये लिहीत नाहीत. त्याबद्यलचे अनेक करारनाम्यांचे क्लॉजेस जाबदेणार यांनी मंचासमोर दाखल केलेले आहेत. सन 2005 मधील हवेली रजिस्ट्रार ऑफिस मधील करारनामा नोंदणी क्र. 9463/18/39/2005 तक्रारदारांचा करारनामा क्रमांक आहे. जाबदेणार यांनी त्याच हवेली रजिस्ट्रार ऑफिस मधील जाबदेणार यांनी दुस-या व्यक्तींबरोबर केलेले करारनामे क्र. 9073/18/41/2005,2072/18/41/2006, 580/19/39/2006, 581/19/39/2006 इ .इ. च्या प्रती दाखल केल्या आहेत. परंतु जाबदेणार यांनी दाखल केलेल्या वर नमुद करारनाम्यांमध्ये The purchaser/s shall not be entitled to demand any interest on the said deposit. ”. असे नमुद केले आहे. याव्यतिरिक्त वर नमुद करारनाम्यांमधील क्लॉजच्या वरील व खालील ओळी सारख्याच आहेत. तसेच मेंटेनन्सपोटी डिपॉझिट घेण्यात आल्याचेही क्लॉज नं 17 मध्ये नमुद करण्यात आलेले आहे. यावरुन जाबदेणार म्हणतात त्याप्रमाणे तक्रारदारांनीच हे खोटे कागदपत्रे तयार केलेले दिसून येते. एवढेच नाही तर तक्रारदारांनी दिनांक 4/10/2007 चे जाबदेणार यांनी श्री. दिलीप आर. पाठक यांना लिहीलेले पत्र दाखल केले आहे. तक्रारदारांनी त्या पत्रात “with interest @ 12 %” असे हाताने लिहीलेले आहे. जाबदेणार यांनी देखील दिनांक 4/10/2007 चे श्री. दिलीप आर. पाठक यांना लिहीलेले पत्र दाखल केले आहे परंतु त्यामध्ये हाताने लिहीलेला मजकुर आढळून येत नाही. म्हणजेच तक्रारदारांनी ही पावती देखील खोटी बनवली आहे. हया पत्रामध्ये जाबदेणार यांनी रुपये 50,000/- ही रक्कम नापरतावा होती व मेंटेनन्स डिपॉझिट पोटी होती. सोसायटी सदस्यांकडे हॅन्ड ओव्हर झाल्यानंतर डिपॉझिटची रक्कम सोसायटीकडे वर्ग करण्यात येणार होती असेही त्या पत्रामध्ये नमुद करण्यात आलेले आहे. करारात उल्लेख केल्याप्रमाणे रुपये 50,000/- हे मेन्टेनन्स पोटी घेण्यात आलेले होते. या रकमेवरील व्याज सदनिका धारकांना मिळणार नव्हते. असे असतांनाही या रकमेवरील व्याज मिळण्यासाठी तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी मंचासमोर तक्रार क्र.पीडीएफ/119/2008 दिनांक 2/5/2008 रोजी दाखल केली होती. त्या तक्रारीमध्ये या डिपॉझिटच्या रकमेचा उल्लेख केलेला दिसून येत नाही. या संदर्भात तक्रारदारांनी तक्रार क्र.119/08 मध्ये कुठलीही मागणी केलेली नाही. तक्रारदार यासंदर्भात तेव्हाही तक्रार करु शकत होते. शिवाय तक्रारदारांनी रुपये 50,000/- जाबदेणारांकडे भरल्याचा पुरावाही मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी तक्रारी सोबत जिजामाता महिला सहकारी बँक लि., पुणे यांची श्री. वेद प्रकाश खरबंदा यांच्या नावे असलेली रुपये 30,000/- ची मुदतठेव पावती दाखल केली आहे. या पावतीवर व्याजदर द.सा.द.शे 12 टक्के नमूद करण्यात आलेला आहे. युक्तीवादाच्या वेळी पावतीबद्यल विचारले असता ही पावती दाखविण्यात आली. तसेच जिजामाता महिला सहकारी बँक लि. यांची श्रीमती मनिषा वेदप्रकाश खरबंदा यांच्या नावे असलेली रुपये 54,211/- ची मुदतठेव पावती दाखविण्यात आली. परंतु या पावत्यांचा व जाबदेणार यांचा काय संबंध आहे हे तक्रारदारांना स्पष्ट करता आले नाही. त्यामुळे या दोन्ही पावत्या मंच विचारात घेत नाही. या पावत्यांवरुन तक्रारदारांनी रुपये 50,000/- मेन्टेनन्स पोटी जाबदेणारांकडे भरले होते हे स्पष्ट होत नाही. म्हणून पुराव्या अभावी, वरील विवेवचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
[2] खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.