जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 293/2018. तक्रार दाखल दिनांक : 03/11/2018. तक्रार निर्णय दिनांक : 07/10/2022.
कालावधी : 03 वर्षे 11 महिने 04 दिवस
रुकीयाबी भ्र. महेबूब शेख, वय 50 वर्षे, व्यवसाय : घरकाम
व शेती, रा. मुशीराबाद, पोस्ट : बोरी, ता. व जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय,
शि. अनंतपाळ, तालुका : शि. अनंतपाळ, जिल्हा : लातूर.
(2) जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
कार्यालय, लातूर, तालुका व जिल्हा : लातूर.
(3) शाखाधिकारी, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लिमिटेड,
ऑफीस : दुसरा मजला, जयका बिल्डींग, कमर्शियल रोड,
सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001.
(वि.प. क्र.1 ते 3 विरुध्द तक्रार रद्द करण्यात आलेली आहे.)
(4) विभागीय व्यवस्थापक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
विभागीय कार्यालय, 3, 321/ए/2, ओसवाल बंधू समाज बिल्डींग,
जे.एन. रोड, हॉटेल सेवन लव्ह्जसमोर, पुणे - 411 042.
(5) शाखाधिकारी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, शाखा कार्यालय,
लोखंडे कॉम्प्लेक्स, सिंध टॉकीजसमोर, लातूर, ता. व जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- अनिता पी. मेखले
विरुध्द पक्ष क्र.5 यांचेकरिता विधिज्ञ :- काशिनाथ जी. देशपांडे (साताळकर)
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पती महेबुब राजोद्दीन शेख (यापुढे "मयत महेबुब") यांचा दि.10/6/2017 रोजी रस्ता अपघातामध्ये मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाने सन 2016-2017 करिता प्रत्येक शेतक-यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली होती. त्यानुसार विमा कालावधीमध्ये शेतक-याचा मृत्यू झाल्यास रु.2,00,000/- देय आहेत. मयत महेबूब यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्यामार्फत विरुध्द पक्ष क्र.4 (यापुढे विरुध्द पक्ष क्र.4 व 5 "विमा कंपनी") यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर विमा कंपनीने त्यांचा विमा दावा प्रलंबीत ठेवला आणि सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली. त्या अनुषंगाने रु.2,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(2) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद मजकुर पुराव्याद्वारे सिध्द होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यांचे कथन असे की, पोलीस कागदपत्रे तेलगू भाषेमध्ये असल्यामुळे योग्य भाषांतर असण्यासह त्यासोबत भाषांतरकाराचे शपथपत्र असले पाहिजे. विमा कंपनीने दि.10/11/2017 व 28/3/2018 रोजीच्या पत्राद्वारे कागदपत्रांची मागणी केलेली होती. परंतु ते कागदपत्रे विमा दाव्यासोबत जोडल्याचे तक्रारकर्ती यांचे कथन चूक आहे. तक्रारकर्ती यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार त्यांनी आवश्यक कागदपत्रे दाखल केले नाहीत, असे आढळून आले. विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार विमा दावा निर्णयीत करण्यासाठी ते कागदपत्रे आवश्यक आहेत आणि त्याशिवाय विमा दाव्याचा निर्णय घेता येत नाही. तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला नाही किंवा बंद केलेला नसताना प्रस्तुत ग्राहक तक्रार अपरिपक्व ठरते. तक्रारकर्ती यांनी दि.28/3/2018 रोजीच्या पत्रातील अनुक्रमांक 8, 9, 10, 12 व भाषांतरीत कागदपत्रांची पूर्तता केल्यास विमा दावा निर्णयासाठी घेऊन रक्कम देण्यात येईल. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(3) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विमा कंपनीतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- विमा कंपनीतर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात आली, हे विवादीत नाही. विमा कंपनीचा प्रतिवाद असा की, त्यांनी तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला नाही किंवा बंद केलेला नसताना प्रस्तुत ग्राहक तक्रार अपरिपक्व ठरते. तक्रारकर्ती यांनी दि.28/3/2018 रोजीच्या पत्रातील अनुक्रमांक 8, 9, 10, 12 व भाषांतरीत कागदपत्रांची पूर्तता केल्यास दाव्याचा निर्णय व रकमेकरिता विमा दावा विचारात घेण्यात येईल. उलटपक्षी, तक्रारकर्ती यांचे कथन असे की, त्यांच्याद्वारे संचिका सादर करताना पूर्ण कागदपत्रे जोडल्याची सत्यता न पाहता विमा कंपनीने दि.10/11/2017 व 28/3/2018 रोजीच्या पत्रान्वये कागदपत्रांची मागणी केलेली आहे. असे दिसते की, कागदपत्रांची पूर्तता झाल्यास दाव्याचा निर्णय घेण्याकरिता विमा कंपनीने तयारी दर्शविलेली आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसंबंधी विमा कंपनीचे दि.28/3/2018 रोजीचे पत्र तक्रारकर्ती यांनी अभिलेखावर दाखल केले आहे. त्या पत्रातील अ.क्र. 8 हे पोलीस अधिका-यांनी साक्षांकीत केलेला प्रथम माहिती अहवाल, अ.क्र. 9 हे पोलीस अधिका-यांनी साक्षांकीत केलेला घटनास्थळ पंचनामा, अ.क्र. 10 हे पोलीस अधिका-यांनी साक्षांकीत केलेला मरणोत्तर / इन्क्वेस्ट पंचनामा व अ.क्र. 12 हे शवचिकित्सा अहवालामध्ये व्हिसेरा राखून ठेवल्याचे नमूद असल्यास पोलीस अधिकारी / वैद्यकीय अधिकारी यांनी साक्षांकीत केलेला व्हिसेरा रिपोर्ट असे कागदपत्रे दिसून येतात. तक्रारकर्ता यांनी आपल्या तक्रारीसोबत प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल व अन्य कागदपत्रे दाखल केलेले आहेत. ते तेलगू भाषेतील कागदपत्रे मराठी भाषेमध्ये भाषांतरीत केल्यासंबंधी ॲड. सुचेता नारायणराव काब्दे यांच्या शपथपत्राची छायाप्रत सादर केलेली आहे. शवचिकित्सा अहवालामध्ये व्हिसेरा राखून ठेवल्याचे दिसून येत नाही. निर्विवादपणे, हे सर्व कागदपत्रे विमा कंपनीस प्रस्तुत ग्राहक तकारीसोबत सुध्दा प्राप्त झालेले आहेत. विमा कंपनीच्या कथनाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे आवश्यक व भाषांतरीत कागदपत्रांची पूर्तता झालेली दिसून येते.
(5) प्रस्तुत प्रकरण सुनावणीसाठी असताना दि.7/12/2021 रोजी विमा कंपनीतर्फे पुरसीस सादर करण्यात आली आणि तक्रारकर्ती यांच्या खात्यामध्ये दावा रक्कम जमा केल्याचे नमूद केले. त्याबाबत तपशील सादर करण्यासाठी तक्रारकर्ती यांना निर्देशीत केले; परंतु त्या अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे न्यायाच्या दृष्टीने विमा कंपनीने दावा रक्कम तक्रारकर्ती यांच्या खात्यामध्ये जमा केल्यासंबंधी तपशील / कागदपत्रे सादर करण्याचे दि.21/7/2022 रोजी आदेश करण्यात आले. त्या अनुषंगाने विमा कंपनीतर्फे दि.29/9/2022 रोजी कागदपत्रे सादर करण्यात आले. कागदपत्रांचे अवलोकन केले असता विमा कंपनीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा पॉलिसीअंतर्गत विमा दाव्यासंबंधी दि.24/1/2019 रोजी तक्रारकर्ती यांच्या खात्यावर एन.इ.एफ.टी. प्रणालीद्वारे रु.2,00,000/- वर्ग केल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रकरण जिल्हा आयोगापुढे प्रलंबीत असताना तक्रारकर्ती यांना विमा कंपनीकडून रु.2,00,000/- प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. विमा कंपनीकडून वर्ग केलेल्या रकमेबाबत तक्रारकर्ती यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि त्या सातत्याने अनुपस्थित आहेत. अशा स्थितीत, तक्रारकर्ती यांना वादकथित विमा रकमेची प्राप्ती झालेली असल्याचे अनुमान काढण्यात येते. उक्त विवेचनाअंती विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि तक्रारकर्ती अनुतोषास पात्र नाहीत. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-