निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार मुद्रिकाबाई भ्र. धनाजी जाधव ही मयत धनाजी तुकारासम जाधव यांची पत्नी असून ती कुडली,ता. देगलूर,जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे.
दिनांक 26.09.2010 अर्जदाराचे पतीचा उदगीर ते देगलूर रोडवर टाकळी पुलाजवळ टाकळी शिवारात ट्रॅक्टर कमांक एमएच 26/6120 ची धडक लागून अपघाती मृत्यु झाला. या प्रकरण पोलीस पाटील वाडवना लातूर यांनी कलम 279,304(अ) अन्वये गुन्हा क्रमांक 51/2010 प्रमाणे ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदविला व घटनास्थळ पंचनामा केला.
अर्जदाराचे पती मयत मयत धनाजी जाधव हा व्यवसायाने शेतकरी होता,त्याचे नावाने मौजे हानेगांव,तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 525 मध्ये 1 हेक्टर 20 आर एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता. म्हणून अर्जदार ही महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेची विमा रक्कम मिळणेस पात्र आहे. महाराष्ट्र शासनाच्या सदर पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 15.08.2010 ते 14.08.2011 असा आहे.
अर्जदाराने त्यांचे पतीचे मृत्यु पश्चात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी, देगलूर यांचेकडे क्लेम फॉर्म दाखल केला व विमा रक्कम देण्याची विनंती केली. तसेच गैरअर्जदार क्र. 2 ते 4 यांना वेळोवेळी विनंती केली. शेवटी दिनांक 04.02.2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास दिनांक 05.03.2014 च्या पत्रान्वये व्हीसेरा रिपार्टची मागणी केली व दिनांक 28.10.2014 रोजी विमा रक्कम देण्यास नकार दिला. गैरअर्जदार यांनी असे करुन सेवेत त्रुटी दिली आहे. म्हणुन अर्जदार यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यात येऊन विम्याची रक्कम रु.1,00,000/- प्रस्ताव मिळाल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह दिनांक 26.09.2010 पासून रक्कम वसूल होईपर्यंत गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यास दिनांक 03.08.2012 रोजीच्या पत्राव्दारे व्हीसेरा रिपोर्टची मागणी केली. त्याप्रमाणे दिनांक 09.08.2012 रोजी अर्जदारास पत्र पाठवून व्हीसेरा रिपोर्ट त्वरीत सादर करावयास सांगितले होते. अर्जदार यांनी पोलीस स्टेशन वडवणा तालुका उदगीर यांचेकडून व्हीसेरा रिपोर्ट प्राप्त नसल्याचे प्रमाणपत्र उदगीर येथून फॅक्सने या कार्यालयास पाठविला. तो अहवाल जिल्हा कृषी अधिकारी,नांदेड यांना पत्र क्र. 1782 सह पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 17.02.2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविल्यानंतर सदर प्रकरणाची ऑनलाईन चौकशी केली असता सदर प्रकरण दावा रद्य केल्याचे समजले. गैरअर्जदाराने अर्जदारास पत्र क्र. 260/2014, दिनांक 18.03.2014 रोजीच्या पत्राव्दारे कळविण्यात आले.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. प्रस्तुत प्रकरणातील कागदपत्रे गैरअर्जदार यांचेकडे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांचेकडूयन प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी त्याची पडताळणी करुन दि.न्यु इंडिया एश्योरन्स कं.लि. या संबंधीत विमा कंपनीकडे पाठविली. या कंपनीने संबंधीत अर्जदाराकडून दिनांक 22.03.2012 रोजीच्या पत्राव्दारे व्हीसेरा रिपोर्ट ची मागणी केली. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांना या तक्रारीतुन मुक्त करण्यात यावे अशी विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
6. अर्जदाराचा अर्ज अपरिपक्व आहे त्यामुळे गैरअर्जदार यांनी निष्काळजी केली व सेवेत त्रुटी दिली हे म्हणणे निराधार व खोटे आहे. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी दिनांक 22.03.2012 रोजीचे पत्र पाठवून मयत धनाजी जाधव यांचा दावा संदर्भात व्हीसेरा रिपोर्ट ताबडतोब पाठविण्यास अर्जदारास विनंती केली होती. परंतु अर्जदाराने त्याची पुर्तता न करता वकीलामार्फत नुकसान भरपाईची मागणी केली. सदरील नोटीसीचे उत्तर देऊन व्हीसेरा रिपोर्ट सादर करण्यास सांगितले होते. परंतु अद्यापही सदर कागदपत्रे सादर केलेले नाही. म्हणून विमा रक्कम देण्यास टाळाटाळ केली हे अर्जदाराचे म्हणणे खोटे व निरारधार आहे. अर्जदाराचा तक्रार अर्ज खोटा,चुकीचा कल्पोकल्पीत आहे म्हणुन खर्चासह खारीज करण्यात यावा.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
8. अर्जदार यांचे पती मयत धनाजी जाधव हा शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या सातबारा उता-यावरुन स्पष्ट होते. अर्जदाराचे मयत पती हा शेतकरी या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता. अर्जदाराचे पतीचा मृत्यु दिनांक 26.09.2010 रोजी ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे अपघाती झाला होता हे अर्जदाराने दाखल केलेल्या पोलीस पेपर्सवरुन स्पष्ट होते. पोस्टमॉर्टेमचे अवलोकन केले असता त्यात अर्जदाराचा पतीचा मृत्यु शरीरावर अनेक जखमा होऊन रक्तस्त्रावाने झालेला आहे असे स्पष्ट लिहिलेले आहे. तसेच व्हीसेरा analysis साठी preserve केल्याचे म्हटले आहे. पण कोणत्या विशिष्ट कारणासाठी तसे केले हे त्यात नमुद नाही.
गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता करुनविमादावा पाठविलेला आहे व गैरअर्जदार क्र. 2 यांनी तो पडताळणी करुन गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांचेकडे पाठविला आहे.
प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी अनावश्यक असलेल्या व्हीसेरा रिपोर्टची मागणी करुन अर्जदारास विमा दावा देण्याचे टाळाटाळ केलेले स्पष्ट आहे. अर्जदाराचा विमा दावा देण्याचे टाळाटाळ करुन व नंतर तो रद्य करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे व अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास दिलेला आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी अर्जदारास रक्कम रु.1,00,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत दिनांक 09.08.2012 पासून रक्कम अदाकरेपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्के व्याजासह द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.