जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 11/2019. तक्रार दाखल दिनांक : 14/01/2019. तक्रार निर्णय दिनांक : 21/09/2022.
कालावधी : 03 वर्षे 08 महिने 07 दिवस
विजयकुमार गोविंदराव पांचाळ, वय 61 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त,
रा. श्रीनगर, नांदेड रोड, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) डॉ. घनशाम बद्रीनारायण दरक, वय 48 वर्षे,
व्यवसाय : वैद्यकीय व्यवसाय, रा. चंद्रनगर, लातूर, ता. जि. लातूर.
(2) डॉ. संजयकुमार काशिनाथ शिवपुजे,
वय 35 वर्षे, व्यवसाय : वैद्यकीय व्यवसाय,
रा. श्रीकृपा, अक्षयनगर, जुना औसा रोड, लातूर.
(3) दी ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि., डी.ओ. - 3, न्यू दिल्ली, 4, ई./14,
आझाद भवन, झेंडेलवाले इ.एक्स.टी., न्यू दिल्ली - 110 055. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. बी.एच. पवार
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. ए.आर. बाहेती
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. एस.एस. सलगरे
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. के.जी. देशपांडे
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत ग्राहक तक्रारीमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणासंबंधी विवाद आहे. प्रकरणांमध्ये अनेक शब्द हे वैद्यकीय परिभाषेमध्ये नमूद आहेत. परंतु अनेक इंग्रजी शब्दांना मराठी भाषांतरीत शब्द उपलब्ध नसल्यामुळे ते इंग्रजीमध्ये नमूद करण्यात येत आहे.
(2) असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचे स्वतंत्र व्यक्तित्व आहेत. परंतु ग्राहक तक्रारीमध्ये अनेकवेळा त्यांचा 'गैरअर्जदार' याप्रमाणे संयुक्तदर्शक शब्दप्रयोग केलेला आहे. अशा स्थितीत विरुध्द पक्ष क्र.1 यांना "डॉ. दरक", विरुध्द पक्ष क्र.2 यांना "डॉ. शिवपुजे" व विरुध्द पक्ष क्र.3 यांना "विमा कंपनी" असे संबोधण्यासह त्या सर्वांकरिता 'विरुध्द पक्ष' असेही संयुक्तपणे संबोधण्यात येते.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, डॉ. दरक व डॉ. शिवपुजे हे वैद्यकीय व्यवसायिक आहेत. तक्रारकर्ता यांच्या छातीमध्ये वेदना होत असल्यामुळे दि. 2/11/2016 रोजी त्यांना आशिर्वाद क्रिटीकेअर येथे दाखल करण्यात आले. डॉ. दरक यांनी तक्रारकर्ता यांची angiography करावी लागेल, असे सांगितले. त्याकरिता डॉ. दरक यांनी बँकेच्या नांवे शिफारस पत्र दिले. विरुध्द पक्ष यांनी angiography व angioplasty करण्यासह उच्च प्रतीची stent बसविण्यात येईल, असे सांगून 10 वर्षे त्रास होणार नाही, अशी हमी दिली.
(4) तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन आहे की, दि.3/11/2016 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडे तक्रारकर्ता यांची angioplasty करण्यात आली. त्याकरिता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्याकडून शस्त्रक्रियेसाठी रुग्णालय खर्च रु.1,40,000/- व वैद्यकीय देयक रु.31,840/- घेतले. तक्रारकर्ता यांना दि.8/11/2016 रोजी आशिर्वाद क्रिटीकेअर येथून मुक्त करण्यात आले.
(5) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, दि. 22/3/2017 रोजी त्यांच्या छातीमध्ये वेदना होत असल्यामुळे डॉ. दरक यांच्याकडे दाखल केले असता त्यांनी तक्रारकर्ता यांना समर्थ हॉस्पिटल येथे पाठविले आणि तेथे उपचार करुन मुक्त करण्यात आले. त्यानंतर दि.26/3/2017 रोजी पुन्हा छातीमध्ये वेदना होत असल्यामुळे डॉ. दरक यांनी त्यांना दाखल करुन घेतले आणि उपचार करुन दि.28/3/2017 रोजी मुक्त केले. त्यावेळी तक्रारकर्ता यांच्याकडून रु.14,000/- रुग्णालय खर्च घेण्यात आला.
(6) तक्रारकर्ता यांचे पुढे असे कथन की, त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यामुळे दि.29/3/2017 रोजी कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांची angiography करण्यात आली आणि पूर्वीची शस्त्रक्रिया निकृष्ठ दर्जाची होऊन stent निकृष्ठ दर्जाची वापरण्यात आल्यामुळे पुन्हा angioplasty करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तक्रारकर्ता यांची कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथे पुन्हा angioplasty करण्यात आली आणि त्यांना रुग्णालय खर्च रु.1,66,000/-, वैद्यकीय देयक रु.32,000/- व रुग्णवाहिका खर्च रु.10,000/- करावा लागला.
(7) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणा व फसवणुकीमुळे त्यांना खर्च करावा लागला. डॉ. शिवपुजे यांनी विमा कंपनी यांच्याकडे विमा उतरविण्यात आलेला असल्यामुळे डॉ. दरक, डॉ. शिवपुजे व विमा कंपनी संयुक्तरित्या जबाबदार आहेत.
(8) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांनी डॉ. दरक यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता खोटे व चूक उत्तर देण्यात आले. उक्त कथनाच्या अनुषंगाने अनुचित व्यापारी प्रथा बंद करण्याचा; आर्थिक नुकसान भरपाई रु.5,00,000/- देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.2,00,000/- देण्याचा व ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने रु.40,000/- खर्च व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष यांच्याविरुध्द आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(9) डॉ. दरक यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने खोटे व चुक असल्यामुळे अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता हे सन 2015 पासून त्यांच्याकडे औषधोपचार घेत आहेत. तक्रारीमध्ये नमूद उपचार त्यांच्याकडे घेतलेला नाही. ते physician आहेत आणि शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी surgeon यांची असते. आशिर्वाद क्रिटीकेअर व कॅथ लॅब येथे तक्रारकर्ता दि.2/11/2016 रोजी दाखल झाले असताना त्यांच्यावर डॉ. शिवपुजे यांनी उपचार केले आणि त्याचे अहवाल हे डॉ. शिवपुजे यांनी लिहिले आहेत. कागदपत्रांवरुन डॉ. शिवपुजे यांनी शस्त्रक्रिया केल्याचे लक्षात येते.
(10) डॉ. दरक पुढे कथन करतात की, तक्रारकर्ता यांच्या सूचनापत्रास उत्तर दिलेले असून त्यांनी कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथील वैद्यकीय कागदपत्रांची मागणी केली; परंतु तक्रारकर्ता यांनी त्याची पूर्तता केलेली नाही. तक्रारकर्ता यांना परदेशामध्ये तयार केलेली abbottt कंपनीची stent वापरण्यात आलेली आहे. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवर डॉ. दरक यांचे नांव व स्वाक्षरी नाही.
(11) डॉ. दरक यांचे पुढे कथन असे की, कागदपत्रांनुसार त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे अभिप्रेत नाही किंवा तसा तज्ञ अहवाल नाही. त्यांनी तक्रारकर्ता यांच्यावर वैद्यक शास्त्रानुसार उपचार केलेले आहेत आणि त्यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही. तक्रारकर्ता त्यांचे ग्राहक नाहीत. तसेच आशिर्वाद क्रिटीकेअर एल.एल.पी. व आशिर्वाद कॅथ लॅब एल.एल.पी. यांना पक्षकार केलेले नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(12) डॉ. शिवपुजे यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रार खोटी, चूक, तथ्यहीन, बनावट, त्रासदायक व गैरसमजुतीद्वारे केली असल्याचे नमूद करुन ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले आहेत. ते कथन करतात की, त्यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी किंवा निष्काळजीपणा केलेला नाही आणि त्यांच्याविरुध्द वादकारण निर्माण झालेले नाही.
(13) डॉ. शिवपुजे पुढे असे कथन करतात की, व्यवसायिक क्षतीपूर्तीकरिता त्यांनी विमा कंपनीकडून विमापत्र क्रमांक 272200/48/2017/6747 दि.1/7/2016 ते 30/6/2017 कालावधीकरिता घेतलेले आहे. त्यांनी DM Cardiology (GMC & JJ Group of Hospitals, Mumbai), MD Medicine (GMC & JJ Group of Hospitals, Mumbai), FIT SCAI (Society for Cardiovascular Angiography and Interventions) अर्हता प्राप्त केलेली आहे. ते Lifeline Cardio + Diabetic Center, Latur येथे सेवारत आहेत आणि Ashirwad CritiCare & Cath Lab येथे संचालक आहेत. ते ग्रँट मेडीकल कॉलेज, मुंबई येथे कार्डिओलॉजी विभागामध्ये माजी सहायक प्राध्यापक होते. तसेच ते CSI (Cardiological Society of India) येथे आजीव सदस्य आहेत.
(14) डॉ. शिवपुजे पुढे नमूद करतात की, दि.2/11/2016 रोजी डॉ. दरक यांच्याकडे रुग्ण myocardial infarction साठी दाखल झाला होता. रुग्णास Left Anterior Descending Artery मध्ये 99 टक्के block असल्याचे angiography द्वारे सुचविण्यात आले. दि.3/11/2016 रोजी रुग्णाची 2.75 x 23 mm Xience prime stent, FDA Approved Drug Eluting Stent ने यशस्वीरित्या angioplasty करण्यात आली. त्यांनी रुग्णास कोणतीही हमी दिलेली नव्हती. वास्तविक पाहता, रुग्णास दिलेल्या अहवालामध्ये risk of stent restenosis of 5 to 10% & risk of in stent thrombosis 1% नमूद केलेले होते. Angioplasty करिता वापरण्यात आलेली stent ही US FDA approved Xience Prime, stent, best quality drug eluting stent होती. चांगल्या stent मध्ये stent thrombosis riks of 1% and angiographic restenosis i.e. reblockage risk upto 10% असते. Angioplasty चांगली यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि रुग्णास मुक्त करण्यात आल्यानंतर मार्च 2017 पर्यंत लक्षणे नव्हती. रुग्ण त्यांच्याकडे सल्ला किंवा follow up साठी आलेला नव्हता आणि जो रुग्णाचा स्वत:चा निष्काळजीपणा आहे. Stent thrombosis or restenosis ही सर्वसाधारण गुंतागुंत असून रुग्णाने antiplatelet durgs न घेणे, हे त्याचे सर्वसाधारण कारण आहे. Stent failure साठी Stent Thrombosis (ST) and in-stent restenosis (ISR) असे दोन मुख्य कारणे असतात. डॉ. शिवपुजे पुढे नमूद करतात की, Current clinical registries and randomized trials with broad inclusion criteria show rate of ST at or <1% after 1 year and ~0.2-0.4% per year thereafter; rates of clinical ISR are 5% respectively. When a known complication occurs, but controls by giving anti-platelet blood thinners but cannot control completely happening of complication. Complication हे पूर्णत: संपुष्टात आल्यानंतरच पुढे complication येणार नाही, याची दक्षता घेता येते. त्याकरिता डॉक्टर हे अधिकारविना असतात. सत्य हे आहे की, कोणताही Cadiologist हा प्रामाणिकपणे करतो हीच त्यांची एक कला आहे. रोगी शरीर हे सत्य व अपरिवर्तनिय आहे आणि शरीर चालू ठेवणे ही नैसर्गिक देणे असल्यामुळे सर्वच रुग्णामध्ये ते असेलच असे नाही. निसर्गाची साथ न मिळाल्यास व रुग्णाने follow up न घेतल्यास डॉक्टर हतबल ठरतात आणि त्याकरिता त्यांना जबाबदार धरता येणार नाही.
(15) डॉ. शिवपुजे पुढे नमूद करतात की, त्यांनी सर्व काही परिश्रमपूर्वक, विवेकाने व अत्युच्च काळजी घेऊन केलेले आहे आणि त्यांनी निष्काळजीपणा, सेवेमध्ये त्रुटी किंवा अनुचित व्यापारी प्रथा अवलंबलेली नाही. रुग्णाने ह्दयरोगाकरिता उपचार घेण्याकरिता जो खर्च केला, त्याचे उत्पादन डॉ. शिवपुजे यांनी केलेले नाही. तक्रारकर्ता हे नुकसान भरपाई मिळण्याकरिता पात्र नाहीत. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(16) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने अमान्य केले आहेत. त्यांचे कथन असे की, ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार त्यांच्याविरुध्द ग्राहक तक्रार निर्णयीत करता येत नाही. तक्रारकर्ता यांना उपचार केल्यासंबंधी डॉ. दरक यांचे कागदपत्रे असल्यामुळे नुकसान भरपाई देण्याकरिता विमा कंपनी जबाबदार नाही. विमापत्रानुसार Location ID हा लाईफलाईन कार्डिओ डायबेटीज सेंटर, सुषमा अपार्टमेंट, खर्डेकर स्टॉप, लातूर असे असल्यामुळे अन्य ठिकाणी सेवेमध्ये चूक झाल्यास त्याकरिता विमा कंपनी जबाबदार नाही. डॉ. दरक व डॉ. शिवपुजे यांच्यामध्ये व्यवसायिक कलह आहे. तक्रारकर्ता यांनी Stent कनिष्ठ दर्जाची असल्यासंबंधी पुरावा सादर केलेला नाही. Stent ही FDA कडून मान्यताप्राप्त होती. तसेच कमलनयन बजाज येथील डॉक्टर यांनी शस्त्रक्रिया चुकीची झाली, असे अहवालाद्वारे निवेदन केलेले नाही. अंतिमत: नुकसान भरपाई देण्यासंबंधी जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात यावे आणि ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(17) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार; डॉ. दरक, डॉ. शिवपुजे व विमा कंपनीद्वारे दाखल लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांच्या विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता हे 'ग्राहक' संज्ञेत येतात काय ? होय (वि.प. क्र.1 व 2 यांचे)
(2) आशिर्वाद क्रिटी केअर एल.एल.पी. व आशिर्वाद कॅथ लॅब एल.एल.पी.
यांना विरुध्द पक्ष न केल्यामुळे ग्राहक तक्रारीस बाध निर्माण होतो काय ? नाही.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(4) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(5) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(18) मुद्दा क्र. 1 :- सर्वप्रथम, तक्रारकर्ता हे 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत, असा आक्षेप डॉ. दरक व विमा कंपनीद्वारे घेण्यात आलेला आहे. वाद-तथ्यांच्या अनुषंगाने दखल घेतली असता तक्रारकर्ता यांच्या angioplasty साठी डॉ. शिवपुजे आणि angioplasty पूर्वी व नंतर डॉ. दरक यांनी वैद्यकीय उपचार केले, ही मान्यस्थिती आहे. वादकथित वैद्यकीय उपचारास्तव शुल्क अदा केल्याचे दिसून येते. शिवाय, वैद्यकीय उपचार नि:शुल्क होता, असे डॉ. दरक व डॉ. शिवपुजे यांचे कथन नाही. वादविषयाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी वैद्यकीय सेवेकरिता शुल्क दिलेले असल्यामुळे ते डॉ. दरक व डॉ. शिवपुजे यांचे 'ग्राहक' आहेत आणि ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 चे कलम 2(1)(डी) अन्वये 'ग्राहक' संज्ञेत येतात.
(19) विमा कंपनीच्या आक्षेपाची दखल घेतली असता व्यवसायिक क्षतीपूर्तीकरिता त्यांनी डॉ. शिवपुजे यांना विमापत्र दिल्याचे मान्य केले आहे. विमापत्र हे संविदालेख आहे आणि विमा संविदेमध्ये असणा-या अटी व शर्तीनुसार विमा दायित्व निश्चित होत असते. यदाकदाचित, रुग्ण किंवा अन्य व्यक्तीस नुकसान भरपाई देण्याचे दायित्व निर्माण झाल्यास विमापत्राच्या अनुषंगाने क्षतीपूर्तीसाठी विमाधारकाने विमा कंपनीकडे विमा दावा दाखल करणे उचित ठरेल. शिवाय, विमापत्राच्या अटी व शर्ती स्पष्ट झाल्याशिवाय व उचित पुराव्याशिवाय विमापत्राच्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे विमा कंपनीचे 'ग्राहक' किंवा लाभार्थी ठरु शकत नाहीत, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
(20) मुद्दा क्र. 2 :- डॉ. दरक यांच्याद्वारे उपस्थित मुद्दा असा की, आशिर्वाद क्रिटीकेअर एल.एल.पी. व आशिर्वाद कॅथ लॅब एल.एल.पी. यांना ग्राहक तक्रारीमध्ये पक्षकार केलेले नाही आणि त्याशिवाय ग्राहक तक्रार निर्णयीत करता येणार नाही. या मुद्याची दखल घेतली असता डॉ. दरक व डॉ. शिवपुजे यांनी आशिर्वाद क्रिटी केअर कॅथ लॅब ॲन्ड इंटेन्सीव्ह केअर युनीट रुग्णालयांतर्गत तक्रारकर्ता यांच्यावर वैद्यकीय उपचार केलेले दिसून येतात. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता आशिर्वाद कॅथ लॅब एल.एल.पी. ही भागीदारी संस्था असल्याचे व डॉ. दरक यांनी भागीदार संस्थेसंबंधी डॉ. शिवपुजे यांच्यासह अन्य व्यक्तीविरुध्द जिल्हा न्यायालयामध्ये विवाद उपस्थित केल्याचे दिसून येते. आमच्या मते, जिल्हा आयोगापुढे दाखल प्रकरणांमध्ये ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 मध्ये नमूद काही विशिष्ट तरतुदीशिवाय दिवाणी प्रक्रिया संहितेतील अन्य तरतुदी लागू नाहीत. विवादाच्या अनुषंगाने आशिर्वाद क्रिटी केअर कॅथ लॅब ॲन्ड इंटेन्सीव्ह केअर युनीट आवश्यक पक्षकार असले तरी एकमेव त्याच कारणाकरिता ग्राहक तक्रार रद्द करता येणार नाही. प्रस्तुत प्रकरण हे वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दल आहे आणि वादविषयाच्या अनुषंगाने वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर हे प्रस्तुत प्रकरणामध्ये "विरुध्द पक्षकार" आहेत. अशा स्थितीतमध्ये रुग्णालय संस्थेस पक्षकार न केल्यामुळे जिल्हा आयोगास प्रस्तुत तक्रार निर्णयीत करण्यासंबधी बाध निर्माण होत नाही आणि मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
(21) मुद्दा क्र. 3 ते 5 :- मुद्दा क्र. 3 ते 5 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, डॉ. दरक व डॉ. शिवपुजे हे वैद्यकीय व्यवसायिक आहेत, यासंबंधी उभय पक्षांमध्ये विवाद नाही. दि.3/11/2016 रोजी आशिर्वाद क्रिटी केअर कॅथ लॅब ॲन्ड इंटेन्सीव्ह केअर युनीट येथे डॉ. शिवपुजे यांनी तक्रारकर्ता यांची Angioplasty करण्यात केली, याबद्दल विवाद नाही. तक्रारकर्ता यांच्या Angioplasty पूर्वी व पश्चात डॉ. दरक व डॉ. शिवपुजे हे आशिर्वाद कॅथ लॅब संस्थेमध्ये कार्यरत होते आणि त्या-त्यावेळी त्यांनी तक्रारकर्ता यांच्यावर वैद्यकीय उपचार केले, असे दिसून येते.
(22) वाद-तथ्ये व संबध्द तथ्यांच्या अनुषंगाने दखल घेतली असता डॉ. दरक यांनी Angioplasty पूर्वी व नंतर उपचार केले दिसून येतात. डॉ. शिवपुजे यांनी तक्रारकर्ता यांच्या केलेल्या Angioplasty च्या योग्यतेसंबंधी वाद आहे आणि त्या Angioplasty प्रक्रियेमध्ये डॉ. दरक यांचा सहभाग होता, असे उभय पक्षांचे कथन किंवा कागदोपत्री पुरावा नाही. तसेच, डॉ. शिवपुजे यांना व्यवसायिक क्षतीपूर्तीच्या अनुषंगाने विमा कंपनीद्वारे विमापत्र निर्गमीत केले असले तरी विमापत्र हे अटी व शर्तीस अधीन राहून संविदालेख असल्यामुळे क्षतीपूर्तीच्या अनुषंगाने पुराव्याअभावी जिल्हा आयोगास प्रस्तुत प्रकरणामध्ये आदेश करता येणार नाहीत. अशा स्थितीत डॉ. दरक व विमा कंपनी यांना वादविषयाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांना देय नुकसान भरपाईकरिता जबाबदार ठरु शकत नाहीत, हे आम्ही प्रथमत: स्पष्ट करीत आहोत.
(23) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, डॉ. शिवपुजे यांनी दि.3/11/2016 रोजी तक्रारकर्ता यांची Angioplasty केलेली असताना त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला आणि दि.29/3/2017 रोजी कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी पूर्वीची शस्त्रक्रिया निकृष्ठ दर्जाची होऊन stent निकृष्ठ दर्जाची वापरण्यात आल्यामुळे पुन्हा angioplasty करण्यात आली आणि त्यांना रुग्णालय खर्च रु.1,66,000/-, वैद्यकीय देयक रु.32,000/- व रुग्णवाहिका खर्च रु.10,000/- करावा लागला. उलटपक्षी, डॉ. शिवपुजे यांचे कथन असे की, दि.3/11/2016 रोजी त्यांनी तक्रारकर्ता यांची 2.75 x 23 mm Xience prime stent, FDA Approved Drug Eluting Stent ने यशस्वीरित्या angioplasty केली आणि त्यांनी रुग्णास कोणतीही हमी दिलेली नव्हती.
(24) तक्रारकर्ता यांच्या Angioplasty करिता वापरण्यात आलेली stent ही Abbott Vascular कंपनीची परदेशामध्ये उत्पादन केलेली होती आणि Stent चे नांवे Xience Prime आहे, याबद्दल उभय पक्षांमध्ये दुमत नाही. तक्रारकर्ता यांना डॉ. शिवपुजे यांनी Xience Prime ही stent बसविल्यानंतर कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथे पुन्हा त्याच ठिकाणी stent बसविण्यात आली, हे विवादीत नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांना पुन्हा Angioplasty करणे भाग पडले आणि पुन्हा stent बसवावी लागल्यामुळे पूर्वी डॉ. शिवपुजे यांनी बसविलेली Stent सदोष होती काय ? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचा उकल करण्यासाठी उभय पक्षांपैकी कोणत्याही पक्षाने Stent च्या गुणवत्तेसंबंधी उचित पुरावा सादर केलेला नाही. तसेच Stent सदोष असल्यामुळेच पुन्हा Angioplasty करुन Stent बसविण्यात आली, असाही पुरावा नाही. अशा स्थितीत, Stent दोषयुक्त होती, असे अनुमान काढता येणार नाही.
(25) डॉ. शिवपुजे यांचा प्रतिवाद असा की, रुग्णास दिलेल्या अहवालामध्ये त्यांनी risk of stent restenosis of 5 to 10% & risk of in stent thrombosis 1% नमूद केलेले होते. चांगल्या stent मध्ये stent thrombosis riks of 1% and angiographic restenosis i.e. reblockage risk upto 10% असते. ते नमूद करतात की, Stent thrombosis or restenosis ही सर्वसाधारण गुंतागुंत असून रुग्णाने antiplatelet durgs न घेणे, हे त्याचे सर्वसाधारण कारण आहे. ज्यावेळी Angioplasty नंतर antiplatelet durgs घेणे आवश्यक असल्याचे डॉ. शिवपुजे यांचे कथन केले, त्यावेळी त्यांनी तक्रारकर्ता यांना Angioplasty नंतर कोणकोणते antiplatelet durgs शिफारस केले होते, याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेल्या औषधांच्या पावत्यामध्ये किंवा डॉ. दरक यांच्याकडे घेतलेल्या उपचारामध्ये antiplatelet durgs नाहीत, असेही डॉ. शिवपुजे यांचे कथन नाही. तक्रारकर्ता यांना दि.22/3/2017 रोजी आशिर्वाद क्रिटी केअर येथे दाखल केल्यानंतर उपचाराकरिता समर्थ हॉस्पिटल येथे स्थलांतरीत केल्याचे Discharge Summary वरुन दिसून येते. तसेच आशिर्वाद क्रिटीकेअरचे दि.23/3/2017 रोजीचे Progress Continuation Sheet चे अवलोकन केले असता Treatment of Discharge नमूद करुन औषधे लिहिलेले दिसून येतात. त्यानंतर दि.27/3/2017 रोजी अर्शिवाद कॅथ लॅब येथे डॉ. शिवपुजे यांनी तक्रारकर्ता यांच्या केलेली Angiogram आकृती दिसून येते. आशिर्वाद क्रिटीकेअर कॅथ लॅब ॲन्ड इंटेन्सीव्ह केअर युनीट यांनी दि.27/3/2017 रोजी तक्रारकर्ता यांचा Coronary Angiogram Report दिलेला असून ज्यामध्ये LAD : Type III TIMI Vessel LAD 99% instent lesion नमूद केले आहे. तसेच Advice : CABG vs PTCA + STENT to LAD असे नमूद केले आहे. त्यानंतर आर्शिवाद क्रिटीकेअर यांनी तक्रारकर्ता यांना दि.28/3/2017 रोजी दिलेली Discharge Summary दाखल केलेली आहे आणि त्यानंतर कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद यांच्याकडे पुढील उपचारास्तव तक्रारकर्ता यांना पाठविल्याचे दिसून येते.
(26) तक्रारकर्ता यांना दि.26/3/2017 रोजी आर्शिवाद क्रिटीकेअर येथे दाखल केलेले होते आणि त्यावेळी त्यांची Angiography करण्यात येऊन वैद्यकीय उपचार केलेले दिसून येतात. त्या कागदपत्रांमध्ये तक्रारकर्ता यांनी पूर्वी antiplatelet durgs घेतले नव्हते, असे नमूद नाही. तसेच ज्यावेळी Angioplasty केल्यानंतर डॉक्टर यांनी निर्देशीत केलेले औषधे रुग्ण घेणार नाही, हे ग्राह्य धरण्याकरिता पुरावा आवश्यक ठरतो आणि तो सादर करण्यास विरुध्द पक्ष असमर्थ ठरले आहेत. डॉ. शिवपुजे यांचा असाही बचाव आहे की, तक्रारकर्ता यांनी Angioplasty नंतर त्यांच्याकडे Follow up केलेला नाही. वास्तविक पाहता, तक्रारकर्ता यांना Angioplasty नंतर डॉ. शिवपुजे यांनी कोणते औषधे दिले आणि तक्रारकर्ता यांनी किती दिवसानंतर Follow up घ्यावा, असे दर्शविणारे कागदपत्रे दिसत नाहीत. परंतु तक्रारकर्ता यांनी डॉ. दरक यांच्याकडे दि.20/12/2016 व दि.23/2/2017 रोजी औषधोपचार घेतल्याचे दिसून येते. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांनी Follow up किंवा antiplatelet durgs घेण्यामध्ये निष्काळजीपणा केला, हे सिध्द होत नाही.
(27) डॉ. शिवपुजे यांचे कथन असे की, त्यांनी तक्रारकर्ता यांची Angioplasty यशस्वीरित्या केलेली होती आणि मार्च 2017 पर्यंत त्यांना लक्षणे नव्हती. Stent failure साठी Stent Thrombosis (ST) and in-stent restenosis (ISR) असे दोन मुख्य कारणे असून तक्रारकर्ता यांच्या अहवालामध्ये त्यांनी risk of stent restenosis of 5 to 10% & risk of in stent thrombosis 1% नमूद केलेले होते. वास्तविक पाहता, तक्रारकर्ता यांच्याकरिता in-stent restenosis उदभवण्याकरिता डॉ. शिवपुजे यांनी ज्या जोखिमेचे घटकांचा उल्लेख केला, त्याकरिता वैद्यकीय अभ्यास व संदर्भ दिलेले नाहीत. उलटपक्षी, तज्ञ अहवाल नसल्यासंबंधी विरुध्द पक्ष यांनी बचाव घेतलेला आहे. हे सत्य आहे की, तज्ञ अहवाल दाखल करण्यासाठी उभय पक्षांना संधी होती. परंतु कोणत्याही पक्षाने तज्ञ अहवाल सादर केलेला नाही. तसेच तज्ञ अहवाल केवळ तक्रारकर्ता यांनीच दाखल करावा, असेही अपेक्षीत नाही. डॉ. शिवपुजे यांनी Angioplasty केल्यानंतर तक्रारकर्ता यांना पुन्हा Angioplasty करणे भाग पडले असल्यामुळे तक्रारकर्ता यांची Angioplasty यशस्वीरित्या केली, हा डॉ. शिवपुजे यांचा बचाव पुराव्याअभावी ग्राह्य धरता येत नाही. दाखल पुराव्यांच्या आधारे डॉ. शिवपुजे यांनी केलेली Angioplasty दोषयुक्त होती, हाच एकमेव निष्कर्ष निघतो आणि त्या अनुषंगाने डॉ. शिवपुजे यांनी वैद्यकीय सेवा देण्यामध्ये निष्काळजीपणा व त्रुटी केल्याचे सिध्द होते.
(28) तक्रारकर्ता यांना कमलनयत बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथे पुन्हा Angioplasty करावी लागलेली आहे. त्यामुळे डॉ. शिवपुजे यांच्याकडे अयशस्वी ठरलेल्या Angioplasty करिता झालेला आर्थिक खर्च मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात. तसेच संपूर्ण घटनाक्रम पाहता तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात.
(29) डॉ. शिवपुजे यांच्या वतीने मा. सर्वोच्च न्यायालयाचा सिव्हील अपील नं. 7380/2009 मध्ये "डॉ. हरिष कुमार खुराणा /विरुध्द/ जोगींदर सिंग", निर्णय दि.7/9/2021 चा संदर्भ सादर करण्यात आला. त्याचे अवलोकन केले असता वाद-तथ्ये व कायदेशीर प्रश्नाकरिता न्यायनिर्णय सुसंगत नसल्याचे आढळून येते.
(30) तक्रारकर्ता यांनी रु.5,00,000/- आर्थिक नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.2,00,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.40,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. आमच्या मते, तक्रारकर्ता यांना कमलनयत बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद येथे पुन्हा Angioplasty करावी लागलेली असल्यामुळे डॉ. शिवपुजे यांच्याकडे अयशस्वी ठरलेल्या Angioplasty करिता झालेला आर्थिक खर्च मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात. तसेच संपूर्ण घटनाक्रम पाहता तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारकर्ता यांना डॉ. शिवपुजे यांच्याकडे Angioplasty करण्यासाठी व हॉस्पिटल शुल्क एकूण रु.1,71,840/- द्यावे लागले. तसेच दि.26/3/2017 ते 28/3/2017 या कालावधीमध्ये पुन्हा आर्शिवाद कॅथ लॅब व आशिर्वाद क्रिटीकेअर इंटेन्सीव्ह केअर युनीट येथे उपचार घ्यावे लागले आणि त्याकरिता रु.16,650/- खर्च करावे लागले. अशा स्थितीत, वैद्यकीय खर्चाच्या अनुषंगाने डॉ. शिवपुजे यांच्याकडून तक्रारकर्ता रु.1,88,490/- मिळण्यास पात्र ठरतात. नुकसान भरपाई रकमेवर व्याज देण्यासंबंधी तक्रारकर्ता यांच्या कथनाची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांना आशिर्वाद क्रिटीकेअर इंटेन्सीव्ह केअर युनीटमधून दि.28/3/2017 रोजी मुक्त केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याचा डॉ. शिवपुजे यांना आदेश करणे न्यायोचित आहे.
(31) तक्रारकर्ता यांना पुन्हा Angioplasty करावी लागल्यामुळे मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागले, हे स्पष्ट आहे. नुकसान भरपाई मिळविण्याकरिता तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.25,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(32) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 3 व 4 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.5 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.2 डॉ. शिवपुजे यांनी तक्रारकर्ता यांना रु.1,88,490/- नुकसान भरपाई द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.2 डॉ. शिवपुजे यांनी उक्त रकमेवर दि.28/3/2017 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देय द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 डॉ. शिवपुजे यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.2 डॉ. शिवपुजे यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-