(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक-24 सप्टेंबर, 2021)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी आणि इतर एक यांचे विरुध्द तिच्या पतीचे अपघाती मृत्यू संबधाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे यातील विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंक आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या मार्फतीने तिचे पतीचा विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे उतरविला होता. तक्रारी मध्ये नमुद केल्या प्रमाणे तिच्या पतीची अपघाती मृत्यू संबधीची माहिती खालील विवरणपत्रामध्ये देण्यात येते-
मृतक विमाधारकाचे नाव | अपघाती मृत्यूचा दिनांक | अपघाती मृत्यूचे कारण | वि.प.क्रं 2 विदर्भ कोकण बॅंक क्षेत्रीय कार्यालय भंडारा यांचे कडे विमा दावा सादर केल्याचा दिनांक | वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नाकारल्याचा दिनांक व कारण |
01 | 02 | 03 | 04 | 05 |
श्री देवदास बळीराम निंबर्ते | 24.02.2019 (मृत्यू प्रमाणपत्रा वरुन) | दिनांक-11.02.2019 रोजी टाकळघाट येथे रस्त्याने पायी जात असताना मोटर सायकलने धडक दिल्याने जख्मी झाल्याचे पोलीस अहवाला मध्ये नमुद आहे. दाखल वैद्कीय वैद्दकीय महाविद्दालय नागपूरचे दस्तऐवजा वरुन उपचारा दरम्यान दिनांक-24.02.2019 रोजी मृत्यू झाला असल्याचे दिसून येते. | क्लेम फार्म सादर केल्याचा दिनांक-20.05.2019 (वि.प.क्रं 1 विमा कंपनीच्या पोच सही व शिक्क्या वरुन) | वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेला दि.13.11.2019 रोजी पत्र पाठवून विमा दाव्या सोबत मृतकाचा शव विच्छेदन अहवाल दाखल न केल्या मुळे विम्याची रक्कम देय नसल्याचे पत्राची प्रत दाखल आहे. |
तक्रारकर्तीचे असे म्हणणे आहे की, वस्तुतः तिने विमा दावा प्रस्तावा सोबत तसेच वेळोवेळी विरुध्दपक्षांचे मागणी प्रमाणे दस्तऐवजाची पुर्तता करुनही तिचा विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने नामंजूर केला. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तिचा दावा अकारण नामंजूर करुन तिची फसवणूक केलेली आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी तिला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तिला शारिरीक , मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षांनी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक-20.04.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे.
- तिला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावा. या शिवाय योग्य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्तीचे मृतक पतीचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये खाते होते. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी मध्ये विमा काढलेला होता. तक्रारकर्तीच्या पतीचा दिनांक-24.02.2019 रोजी अपघाती मृत्यू झाला या सर्व बाबी मान्य केल्यात. तसेच हे सुध्दा मान्य केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक-13.11.2019 रोजी मृतकाचा शवविच्छेदन अहवाल दाखल न केल्याचे कारणा वरुन नामंजूर केला होता. परंतु वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तिची फसवणूक केली, दोषपूर्ण सेवा दिली या बाबी नामंजूर करुन तिने तक्रारी मध्ये केलेल्या मागण्या अमान्य केल्यात. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने उत्तरातील परिच्छेद क्रं 9 मध्ये नमुद केले की, विमा दावा नामंजूर केल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीच्या अधिका-यांना सर्व दस्तऐवज मिळाले त्यामुळे विमा कंपनीचे अधिका-यांनी स्वतःहून दिनांक-03.07.2020 रोजी प्रकरण मंजूर करुन (विरुध्दपक्षक्रं 1 विमा कंपनीचे पुराव्याचे शपथपत्रा मध्ये विमा दावा मंजूर केल्याचा दिनांक-03.06.2020 असा असल्याचे नमुद केले) विमा रक्कम रुपये-2,00,000/- तक्रारकर्तीच्या बॅंक खात्यामध्ये दिनांक-05.06.2020 रोजी जमा केली व त्या रकमेचा वापर सुध्दा तक्रारकर्तीने लगेच केला. सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असे नमुद केले.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक भंडारा तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये नमुद केले की, तक्रारकर्तीच्या पतीचे अपघाती मृत्यू नंतर त्यांनी विमा दावा आवश्यक त्या दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे पाठविला होता परंतु मृतकाचा शवविच्छेदन अहवाल नसल्याचे कारणा वरुन तक्रारकर्तीच्या बॅंक खात्यात विमा दाव्याची रक्कम जमा झाली नव्हती. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे खात्यात दिनांक-05 जून, 2020 रोजी विम्याची रक्कम रुपये-2,00,000/- जमा केली, त्यामुळे लगेच त्या बाबत विरुध्दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्तीला माहिती दिली व त्यानंतर तक्रारकर्तीने त्या रकमेची उचल केलेली आहे. असे असताना सुध्दा तक्रारकर्तीने जिल्हा ग्राहक आयोगाची दिशाभूल करुन सदर प्रकरण मागे घेतलेले नाही. विमा दावा मंजूर वा नामंजूर करणे ही बाब विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे अखत्यारीतील बाब आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली.
05. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेचे लेखी उत्तर, दाखल दस्तऐवज, उभय पक्षांव्दारे दाखल साक्षी पुरावे आणि उभय पक्षांचे विदवान वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारकर्तीचे विमा दाव्या संबधीची रक्कम प्रथम वि.प.क्रं 1 विमा कंपनीने नामंजूर करुन नंतर विमा रक्कम तिचे वि.प.क्रं 2 बॅंकेच्या असलेल्या खात्यात जमा केल्याने तिला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -नाही- |
2 | काय आदेश | अंतिम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1 व क्रं 2 बाबत-
06. तक्रारकर्तीचे विरुध्दपक्ष क्रं 2 विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक, मानेगाव येथे असलेल्या बॅंकेच्या खाते उता-याची प्रत विरुध्पक्ष क्रं 2 बॅंके तर्फे अभिलेखावर दाखल करण्यात आली. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीचे खात्याचा क्रमांक-501010410001285 असा असून सदर खात्यामध्ये दिनांक-05.06.2020 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- जमा केली. सदर खाते उता-यावरुन असेही दिसून येते की, तिने दिनांक-08.07.2020 रोजी रक्कम रुपये-45,000/-दिनांक-06.08.2020 रोजी रुपये-45,000/-, दिनांक-01.09.2020 रोजी रुपये-45,000/- दिनांक-08.09.2020 रोजी रुपये-45,000/- आणि दिनांक-22.09.2020 रोजी रुपये-23,000/- अशा प्रकारे रकमांची उचल सुध्दा केलेली आहे.
07. तक्रारकर्तीने पुराव्याचे शपथपत्रात असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 अनुक्रमे विमा कंपनी आणि बॅंक यांनी आपल्या लेखी उत्तरात तिचे पतीच्या अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्या सोबत शवविच्छेदन अहवाल नसल्याचे कारणा वरुन प्रथमतः तिचा विमा दावा नामंजूर केल्याची बाब मान्य
केलेली आहे परंतु त्यानंतरही तिचे पत्तीचा शवविच्छेदन अहवाल अद्दापही उलब्ध नसताना विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने एकदा विमा दाव्याची रक्कम नाकारल्या नंतर तिचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत असलेल्या खात्यामध्ये मागाहून विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- का जमा केली. तिने पुराव्यात पुढे असेही नमुद केले की, तिने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-25.02.2020 रोजी तक्रार दाखल केल्या नंतर तक्रारीचा खर्च व शारिरीक, मानसिक त्रासाची रक्कम आणि आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम देणे लागू नये म्हणून तिला न कळविता तिचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या खात्यात विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दाव्याची रक्कम जमा केली त्यामुळे आता ती तक्रारीचा खर्च तसेच शारीरीक, मानसिक त्रास आर्थिक नुकसानीची रककम मिळावी म्हणून तक्रार पुढे चालवित असल्याचे नमुद केले.
08. या उलट, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे शपथे वरील पुराव्यात असे नमुद केले की, तक्रारकर्तीने सदरची तक्रार जरी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-25.02.2020 रोजी दाखल केलेली असली तरी सदर प्रकरणातील नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-14.01.2021 रोजी प्राप्त झाली. जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल झालेली आहे याची माहिती होण्या पूर्वीच विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला विम्याची रक्कम रुपये-2,00,000/- दिनांक-05.06.2020 रोजी दिलेली आहे आणि तक्रारकर्तीने सदर रकमेची वेळोवेळी उचल सुध्दा केलेली आहे, त्यामुळे त्यांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
09. जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे उभय पक्षां तर्फे दाखल साक्षी पुरावे, लेखी युक्तीवाद व दस्तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. प्रस्तुत तक्रार ही जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दिनांक-02.03.2020 रोजी पंजीबध्द झाली. दरम्यानचे काळात कोरोना रोगाचे प्रार्दुभावा मुळे शासनाने लॉगडाऊन घोषीत केला, त्या दरम्यान विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने, तक्रारकर्तीचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेच्या असलेल्या खात्या मध्ये विम्याची रक्कम रुपये-2,00,000/- जमा केली आणि त्या रकमेची उचल वर नमुद केल्या प्रमाणे वेळोवेळी तक्रारकर्तीने केल्याचे दाखल तक्रारकर्तीचे बॅंक खाते उता-या वरुन दिसून येते. परंतु अशी संपूर्ण विम्याची रक्कम उचल करुन सुध्दा तक्रारकर्तीने तक्रार मागे घेतली नाही आणि दिनांक-22.12.2020 रोजी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रारकर्तीचे वकील श्री क्षिरसागर यांनी तक्रार दाखल सुनावणी करीता युक्तीवाद केला परंतु असे दिसून येते की, तक्रारकर्तीने आपले विद्दवान वकील श्री क्षिरसागर यांना तिला विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून संपूर्ण विमा रक्कम रुपये-2,00,000/- मिळाल्या बाबतची माहिती पुरविली नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा व्दारे स्विकृत करुन विरुध्दपक्षां विरुध्द नोटीस काढण्याचे आदेशित करुन नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्षां वर जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस बजावणी झाल्या नंतर त्यांनी आपले लेखी उत्तर, साक्षी पुरावा आणि लेखी युक्तीवादा मध्ये तक्रारकर्तीला संपूर्ण विमा रक्कम दिल्याची व तिने वेळोवेळी सदर विमा रकमेची उचल केल्याची बाब जिल्हा ग्राहक आयोगाचे निर्दशनास आणून दिली तसेच पुराव्या दाखल तक्रारकर्तीचा विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये असलेल्या खात्याचा उतारा सुध्दा दाखल केला, त्यावरुन विरुध्दपक्षांचे कथनास पुष्टी मिळते, त्यामुळे विरुध्दपक्षांनी तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिल्याची बाबत सिध्द होत नाही आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर “नकारार्थी” नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 चे उत्तर “नकारार्थी “आल्याने, मुद्दा क्रं 2 अनुसार तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके विरुध्द खारीज होण्यास पात्र आहे, असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
10. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं-2 विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक तर्फे रिजनल मॅनेजर भंडारा यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.