(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा. अध्यक्ष )
(पारीत दिनांक- 22 एप्रिल, 2022)
01. तक्रारीकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -2019 च्या कलम-35 खाली विरुध्दपक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी आणि इतर यांचे विरुध्द तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्यू संबधात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02 आज त.क. तर्फे वकील श्री देवेन्द्र हटकर आणि विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील कु. दलाल यांचा मौखीक युक्तीवाद ऐकला. मौखीक युक्तीवादाचे वेळी उभय पक्षांचे वकीलांनी असे सांगितले की, या प्रकरणात विरुध्दपक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्तीला सदर विमा दाव्या पोटी रुपये-2,00,000/- दिनांक-22.07.2021 रोजी दिलेले आहेत आणि सोबत पेमेंट व्हाऊचर सुध्दा दिलेले आहे तसेच बॅंकेचा उतारा प्रकरणात दाखल केलेला आहे. त.क.चे वकीलांचे असे म्हणणे आहे की, त्यांना विमा दाव्याचे रकमेवर व्याज मिळालेले नाही तसेच तक्रारीचा खर्च मिळालेला नाही.
03. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, महाराष्ट्र बार असोसिएशनचे परिपत्रका नुसार त.क.ला तक्रारीचा खर्च वकील फी म्हणून रुपये-10,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे. तसेच विमा दाव्याचे रकमे वरील व्याजा संबधात आम्ही महाराष्ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्यामध्ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्या आहेत, त्यामधील विमा दावा निकाली काढण्यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.
अक्रं-9 विमा कंपन्यांना सुस्पष्ट कारणां शिवाय विमा प्रस्ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्यांनी नामंजूर विमा दाव्या प्रकरणी सुस्पष्ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी/आयुक्त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्ये नोंद घेणे अनिवार्य आहे.
अक्रं-10 विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 21 दिवसाच्या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील.
अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्यावर पंधरा दिवसांच्या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्यांच्या खात्या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्यथा तीन महिन्या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर 15 टक्के व्याज देय राहील.
अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्या पासून त्यावर 21 दिवसांच्या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्या प्रकरणी मंजूरी योग्य प्रस्ताव नाकारल्यास विमा सल्लागार कंपनीने शेतक-यांच्या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्यायाधीश/ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्यायालय येथे दावे दाखल करेल.
अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.
अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्त होणारे व संगणक प्रणाली मध्ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्ताव सुध्दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.
वरील प्रमाणे शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्या आहेत.
04. आम्ही महाराष्ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, तयामध्ये विमा कंपनीने विमा दावा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 21 दिवसात निर्णय घेऊन विमा भरपाई रक्कम संबधित शेतक-याच्या वारसदारांच्या आधार लिंक्ड बॅंक खात्यात डी.बी.टी.ई/ईसीएसने जमा करावी असे नमुद आहे. तसेच परिपत्रकातील अक्रं 11 प्रमाणे प्रकरण मंजूर केल्यावर पंधरा दिवसांच्या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्यांच्या खात्या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्यथा तीन महिन्या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर 15 टक्के व्याज देय राहील असे नमुद आहे.
05. सदर तक्रारीतील अभिलेखा प्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी मोहाडी यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्ताव दिनांक-04.12.2020 रोजी दाखल केलेला आहे, त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केलेला आहे. परंतु विरुदपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी नेमका कोणत्या तारखेस तक्रारकर्तीचा विमा दावा त्यांना प्राप्त झाला होता या बाबत उत्तरा मधून उहापोह केलेला नाही त्यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीला तक्रारकर्तीचा विमा दावा हा एक महिन्यात मिळाला असेल असे गृहीत धरले तर तक्रारकर्तीचा विमा दावा हा दिनांक-04.01.2021 रोजी मिळाल्याचे हिशोबात धरण्यात येते, तेथून विमा दावा निश्चीतीसाठी 21 दिवसाचा कालावधी हिशोबात घेतला तर दिनांक-25.01.2021 पर्यंत विमा दावा निश्चीत होणे आवश्यक होते परंतु सदर प्रकरणात दिनांक-22.07.2021 रोजी तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम मिळालेली आहे. त्यामुळे वर नमुद शासन परिपत्रका नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून तक्रारकर्तीला विमा विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- वर विमा दावा निश्चीतीसाठीचा दिनांक-25.01.2021 पासून ते 03 महिन्या पर्यंत म्हणजे दिनांक-25.04.2021 पर्यंत द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज आणि त्यानंतर दिनांक-26.04.2021 ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्याच बरोबर तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा सल्लागार कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
06. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ती श्रीमती शशीकला नामदेव बाहे यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे डिवहीजनल मॅनेजर, नागपूर यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे डिवहीजनल मॅनेजर, नागपूर यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला वर नमुद महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका नुसार विमा विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- वर विमा दावा निश्चीतीसाठीचा दिनांक-25.01.2021 पासून ते 03 महिन्या पर्यंत म्हणजे दिनांक-25.04.2021 पर्यंत द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज आणि त्यानंतर दिनांक-26.04.2021 ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15 टक्के दराने व्याज असे मिळून येणारी व्याजाची रक्कम दयावी कारण
तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार चालू असतानाच वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडून मिळालेली आहे.
- विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे डिवहीजनल मॅनेजर, नागपूर यांना असेही आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तक्रारीचा खर्च वकील फी म्हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दयावे.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे डिवहीजनल मॅनेजर, नागपूर यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष क्रं 2 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज नागपूर आणि विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी मोहाडी, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.