तक्रारदार स्वत:
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. श्रीकांत. एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 21/ऑगस्ट/2013
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्या विरुध्द सेवेतील त्रुटी संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
[1] तक्रारदार यांनी जाबदेणार संस्थेच्या टाईम्स ऑफ इंडिया च्या दिनांक 02/08/2011 रोजीच्या वृत्तपत्रामध्ये “आयकॉन जी 4” मोबाईलची जाहिरात पाहून त्याच दिवशी जाबदेणार यांनी दिलेल्या दुरध्वनी क्रमांकावरुन मोबाईल फोन साठी ऑर्डर दिली. दिनांक 3/8/2011 रोजी जाबदेणार यांच्या प्रतिनिधींनी तक्रारदार यांच्या पत्त्यावर आयकॉन जी 4 हो मोबाईल हॅन्डसेट आणून दिला. त्यापोटी तक्रारदार यांनी जाबदेणार प्रतिनिधींकडे मोबाईल फोनची रक्कम रुपये 6490/- व डिलीव्हरी चार्जेस रुपये 200/- एकूण रुपये 6690/- रोख दिले. जाबदेणार संस्थेच्या प्रतिनिधींनी तक्रारदारांना त्याबाबत बिलही दिले. तक्रारदार यांचे कथनानुसार सदर मोबाईल अत्यंत निकृष्ठ दर्जाचा होता, घेतल्यापासून दोन दिवसही तो व्यवस्थित चालला नाही. तक्रारदारांनी याबाबत जाबदेणार संस्थेला त्यांच्या कॉल सेन्टर वर फोन करुन कल्पना दिली. त्यांनी सदरचा मोबाईल कुरिअर कंपनीने ठाणे येथील वर्कशॉपरवर पाठविण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दिनांक 16/8/2011 रोजी ब्लू डार्ट या कुरिअर कंपनी तर्फे मोबाईल पाठविला. तो जाबदेणार यांना दुस-या दिवशी मिळाला व जाबदेणार यांनी सदर मोबाईल आठ दिवसात दुरुस्त करुन पाठवू असे कळविले. परंतू जाबदेणार यांनी आजअखेर तक्रारदार यांना मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही किंवा वारंवार विचारणा करुनही त्याबाबत आश्वासनाशिवाय कृती केली नाही व तक्रारदारांची फसवणूक केली. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून मोबाईलची किंमत रुपये 6690/-, कुरिअरने मोबाईल पाठविण्याचा खर्च रुपये 430/-, फोनवरुन चौकशीचा खर्च रुपये 2000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- एकूण रुपये 69,120/-मागतात.
[2] जाबदेणार क्र 1 व 2 यांना नोटीस बजावूनही ते हजर झाले नाहीत व त्यांनी कोणत्याही प्रकारचे लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. म्हणून सदरचे प्रकरण एकतर्फा चौकशीसाठी ठेवण्यात आले.
[3] तक्रारदारांनी तक्रारीच्या पु्ष्टयर्थ स्वत:चे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्या डिलीव्हरी चलन कम रिसीट चे अवलोकन केले असता तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे दिनांक “आयकॉन जी 4” मोबाईलसाठी ऑर्डर नोंदविली होती, मोबाईलची किंमत व डिलीव्हरी चार्जेस मिळून तक्रारदारांनी एकूण रक्कम रुपये 6690/- अदा केले होते व सदरहू मोबाईल सिस्टीम डिस्पॅच क्र. OC 2713020 नुसार जाबदेणार यांच्या प्रतिनिधींनी तक्रारदारांना घरी आणून दिला होता हे स्पष्ट होते. परंतू सदरहू मोबाईल मध्ये दोष असल्यामुळे तक्रारदारांनी ब्लू डार्ट या कुरिअर कंपनीमार्फत तो जाबदेणार यांच्याकडे दिनांक 16/8/2011 रोजी दुरुस्तीसाठी पाठविला होता व कुरिअर साठी तक्रारदारांनी रक्कम रुपये 430/- अदा केली होती हे पावती क्र 178671 वरुन स्पष्ट होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने जाबदेणार यांनी मंचासमोर हजर राहून लेखी जबाब दाखल करुन नाकारलेली नाहीत. जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून मोबाईलची संपूर्ण किंमत स्विकारुन मोबाईल मध्ये निर्माण झालेले दोष दूर करुन मोबाईल परत केला नाही ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. सबब तक्रारदार यांच्याकडून मोबाईल पोटी स्विकारलेली रक्कम रुपये 6690/- व मोबाईल पाठविण्यासाठी आलेला कुरिअर खर्च रुपये 430/- परत मिळण्यास पात्र ठरतात. मोबाईल अभावी तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला सबब तक्रारदार नुकसान भरपाई पोटी रुपये 3000/- मिळण्यास पात्र आहेत.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना मोबाईलची किंमत, डिलीव्हरी व कुरिअर चार्जेस मिळून एकूण रक्कम रुपये 7120/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 3000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
4. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत अन्यथा ते नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 21 ऑगस्ट 2013
[एस. एम. कुंभार] [व्ही. पी. उत्पात]
सदस्य अध्यक्ष