Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/13/374

अविनाश राजेंद्रकुमार कलरैया - Complainant(s)

Versus

टाटा डोकोमो - Opp.Party(s)

21 Jun 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/13/374
 
1. अविनाश राजेंद्रकुमार कलरैया
वय 47 वर्षे धंदा- वकीली रा. गाहा क्र. 11 दुसरा माळा अमर अपार्टमेंट वी.एम. वी. कॉलेज समोर, वर्धमाननगर, नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. टाटा डोकोमो
डी. 26, टीटीसी इंडस्‍ट्रीयल एरीया एम. आय.डी. सी. सन्‍पाडा पोस्‍ट ऑफीस तुर्भे नवी मुंबई
मुंबई
महाराष्‍ट्र
2. टाटा टेलीसर्विसेस (महा) लि.
अल अकमर बिल्‍डींग कला निकेतनचा मागे, संचेती हास्‍पीटल मागे गणेश खिंड मार्ग शिवाजी नगर, पुणे 411005
पुणे
महाराष्‍ट्र
3. टाटा डोकोमो
विष्‍णु वैभव प्‍लाजा, 222 पाम रोड, सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 21 Jun 2017
Final Order / Judgement

 -निकालपत्र

    (पारित व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्‍या.)

         ( पारित दिनांक- 21 जुन, 2017)

 

01.   तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष टाटा डोकोमो खाजगी दुरसंचार कंपनी विरुध्‍द सेवेत कमतरता या आरोपा वरुन तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

 

02.    तक्रारीचे स्‍वरुप थोडक्‍यात खालील प्रमाणे-        

       तक्रारकर्त्‍याचे भ्रमणध्‍वनीचा क्रं-8087691301 असा असून त्‍यावर तो विरुध्‍दपक्ष टाटा डोकोमो कंपनीची प्रि-पेड सेवा घेत असतो.  तो दर महिन्‍यास रुपये-555/-चे रिचॉर्ज करीत असतो आणि दर दोन सेंकदास एक पैसा कॉल दर मिळविण्‍यासाठी प्रतीमाह अतिरिक्‍त रुपये-27/- चे रिचॉर्ज करीत असतो. दिनांक-05/01/2012 रोजी तो धनलक्ष्‍मी मोबाईल, सदर नागपूर यांचे दुकानात गेला व रुपये-27/- चा अतिरिक्‍त रि-चॉर्ज करुन देण्‍याची विनंती केली असता त्‍याने रुपये-56/- चा एक नविन रि-चॉर्ज असून त्‍याची सेवेची मर्यादा    ही 06 महिन्‍यासाठी मिळू शकत असल्‍याचे सांगितले, त्‍या प्रमाणे त्‍याने  रुपये-56/- अतिरिक्‍त रि-चॉर्ज दर दोन सेंकदासाठी एक पैसा कॉल दर मिळण्‍यासाठी करुन घेतला. परंतु दुसरे दिवशी भ्रमणध्‍वनी वरुन फोन करताना त्‍याचे असे लक्षात आले की,  दर दोन  सेंकद वर एक पैसा या ऐवजी एका सेंकदवर एक पैसा द्दावा लागत आहे. दुसरे दिवशी त्‍याने संबधित रिटेलर कडे जाऊन चौकशी केली असता त्‍याने असे सांगितले की, प्रत्‍येक कॉलचे पहिले मिनिटासाठी कॉलदर एक सेंकदवर एक पैसा असा राहिल व त्‍यानंतर दोन सेंकदासाठी एक पैसा असे दर मिळतील.

        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, रिचॉर्जसाठी रिटेलर जिम्‍मेदार नसल्‍याचे त्‍यास सांगण्‍यात आले. वस्‍तुतः त्‍याचे जास्‍तीत जास्‍त कॉल्‍स हे एका मिनिटा पेक्षा कमी वेळचे असल्‍याने त्‍याचे उपयोगी हा प्‍लॅन योग्‍य नव्‍हता म्‍हणून त्‍याने रुपये-27/- चा रिचॉर्ज करुन देण्‍याची विनंती केली परंतु रिटेलरने ते शक्‍य नसल्‍याचे सांगितले, त्‍यावर त्‍याने रुपये-56/- चा प्‍लॅन रिव्‍हर्स करुन देण्‍याची विनंती संबधित रिटेलरला केली परंतु ते सुध्‍दा शक्‍य नसल्‍याचे सांगण्‍यात आले. त्‍याने 198 नंबरवर कस्‍टमर केअर प्रतिनिधी सोबत संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु नेटवर्क प्रॉब्‍लेम मुळे संपर्क झाला नाही. तक्रारकर्त्‍याचा रुपये-56/- चा प्‍लॅन हा परत होऊ शकत नाही वा बंद पण होऊ शकत नाही तसेच रुपये-27/- चा रिचॉर्ज पण सहा महिने होऊ शकणार नाही. त्‍याने विरुध्‍दपक्षाचे प्रतिनिधी सोबत संपर्क साधून जर चुकीने एखाद्दा प्‍लॅन  रि-चार्ज केला असेल तर तो बंद न करता त्‍यास दुरसंचार कंपनी  तोच प्‍लॅन सहा महिन्‍याचे कालावधी करीता रिचॉर्ज करण्‍यासाठी बाध्‍य करु शकत नसल्‍याचे सांगितले परंतु प्रतिनिधीने त्‍यावर काहीही खुलासा केला नाही.

 

      तक्रारकर्त्‍याची अशीही तक्रार आहे की, त्‍याने जेंव्‍हा जेंव्‍हा विरुध्‍दपक्षाचे भ्रमणध्‍वनी/दुरध्‍वनीवर संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला त्‍या त्‍या वेळी विरुध्‍दपक्षाचे नेट वर्क चांगले नसल्‍याने संपर्क होण्‍यास ब-याच अडचणींचा सामना त्‍यास करावा लागला.  त्‍यानंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनीचे टाटा डोकोमो डिलर हेल्‍प लाईन क्रमांक-127343 वर संपर्क साधला असता रुपये-56/- चा रि-चॉर्ज प्‍लॅन परत होऊ शकत नसल्‍याचे सांगितले, त्‍यावर    रुपये-56/- रक्‍क‍म नको परंतु रुपये-56/- चा प्‍लॅन बंद करा परंतु त्‍यांनी असमर्थता दर्शविली. त्‍यानंतर तो पुन्‍हा रिटेलरकडे गेला असता त्‍याने रुपये-11/- चा रिचॉर्ज केल्‍यास भ्रमणध्‍वनीवरील चालू असलेले सर्व प्‍लॅन रद्द होतील असे सांगितलेपरंतु रुपये-11/- चा रिचॉर्ज विरुध्‍दपक्ष कंपनी कडून स्विकारण्‍यात आला नाही. त्‍यानंतर त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3) चे पत्‍त्‍यावर सविस्‍तर नोटीस दिनांक-08/01/2012 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविली तसेच दिनांक-24.02.2012 रोजीची नोटीस पाठविली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यानंतर त्‍याने विरुध्‍दपक्षाचे www.tatadocomo.com या ईमेल वर संदेश पाठविला असता त्‍यांनी तक्रार क्रमांक देऊन तक्रार 48 तासाचे आत दुर करण्‍याचे उत्‍तर दिले, त्‍यानंतर दिनांक-17.02.2012 रोजी नोडल ऑफीसरने ईमेल पाठवून तक्रार दुर करण्‍याचे आश्‍वासन दिले. त्‍यानंतर त्‍याने दिनांक-23.02.2012 व दिनांक-27.02.2012 रोजी विरुध्‍दपक्ष कंपनीकडे ईमेल संदेश पाठविला असता दिनांक-27.02.2012 रोजी विरुध्‍दपक्षा कडून ईमेलव्‍दारे तक्रार दुर करण्‍याचे आश्‍वासित करण्‍यात आले. त्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ला दिनांक-28.02.2012 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने पत्र पाठविले परंतु प्रतिसाद मिळाला नाही. दिनांक-28.02.2012 रोजीच्‍या विरुध्‍दपक्षाचे ई मेल व्‍दारे चांगली सेवा देण्‍याचे आश्‍वासित करण्‍यात आले व भ्रमणध्‍वनी क्रमांक पाठविण्‍यास विनंती करण्‍यात आली, त्‍याच दिवशी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास एक पत्र पाठविले जे त्‍यांना मिळाले.

       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाचे प्रतिनिधी   श्री किरण यांचा फोन तक्रारकर्त्‍याचे बीएसएनएल भ्रमणध्‍वनी क्रं-9422801301 वर आला व सांगण्‍यात आले की, विरुध्‍दपक्षास नोटीस पाठवून त्‍याने चुक केलेली आहे व दिलेले पत्र परत घेतले तरच रुपये-56/- चा प्‍लॅन रद्द करण्‍यात येईल परंतु तक्रारकर्त्‍याने सदरचा प्रस्‍ताव धुडकावून लावला. त्‍यानंतरही विरुध्‍दपक्षाचा दिनांक-29.02.2012 रोजी ईमेल प्राप्‍त झाला व   02 मार्च, 2012 पर्यंत तक्रार दुर करण्‍याचे आश्‍वासन देण्‍यात आले. त्‍यानंतर तक्ररकर्त्‍याने दिनांक-01.03.2012 रोजी विस्‍तृत ई मेल विरुध्‍दपक्षास पाठवून प्रतिनिधी श्री किरण यांचे संबधात तक्रार नोंदविली, त्‍याचे प्रतीउत्‍तर विरुध्‍दपक्षा तर्फे देण्‍यात आले. त्‍यानंतर विरुध्‍दपक्षा तर्फे दिनांक-03.03.2012 रोजी ईमेल पाठवून तक्रारीचा क्रंमांक-427191 असल्‍याचे सांगून टाटा डोकोमो प्रॉडक्‍ट क्रं-8087691301 संबधीची तक्रार असून ती लवकरात लवकर दुर करण्‍यात येईल असे कळविले, त्‍यावर तक्रारकर्त्‍याने त्‍याच दिवशी ई मेल पाठवून तक्रार दुर केली नसल्‍याचे कळविले. त्‍यानंतर तक्ररकर्त्‍याने दिनांक-11.03.2012 रोजी “ TRAI” (TELECOM REGULATING AUTHORITY OF INDIA) चे अधिका-यांकडे ई-मेल व्‍दारे तक्रार नोंदविली. त्‍यानंतर विरुध्‍दपक्षा तर्फे त्‍यास पासवर्ड पाठविण्‍यात आला. त्‍यानंतरही विरुध्‍दपक्षाने दिनांक-12.03.2012 रोजीचे ईमेल व्‍दारे सखोल खुलासेवार तक्रार नोंदविण्‍याची विनंती करण्‍यात आली. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने यापूर्वीच विरुध्‍दपक्षाकडे  दिनांक-08.01.2012, दिनांक-15.02.2012 आणि दिनांक-12.03.2012 रोजी  केलेल्‍या तक्रारींच्‍या प्रती पुन्‍हा पाठविल्‍यात. परंतु दिनांक-13.03.2012 रोजी विरुध्‍दपक्षा तर्फे ई मेल व्‍दारे तेच ते संदेश परत पाठविण्‍यात आलेत. दिनांक-21.03.2012 रोजी विरुध्‍दपक्षा कडून तक्रारकर्त्‍यास ईमेल पाठवून कळविण्‍यात आले की, तुम्‍ही चुकीचा रिचॉर्ज केला असल्‍याने तुम्‍हाला फायदे मिळू शकणार नाहीत परंतु तुम्‍हाला रुपये-56/- रिचॉर्जचे परत करण्‍यात येतील, त्‍यावर तक्रारकर्त्‍याने दिनांक-22.03.2012 रोजी ईमेल व्‍दारे संदेश पाठवून कळविले की, त्‍याने कधीही रुपये-56/- रिचॉर्जची रक्‍कम परत करण्‍याची विनंती केलेली नव्‍हती तर रुपये-56/- चा रिचॉर्ज प्‍लॅन परत करण्‍याची विनंती केली होती व तो प्‍लॅन रद्द करण्‍याची विनंती केली. त्‍यानंतर त्‍याने पुन्‍हा दिनांक-23.03.2012 व दिनांक-28.03.2012 रोजी विरुध्‍दपक्षास ई मेल पाठविलेत त्‍यानंतर विरुध्‍दपक्षा तर्फे  त्‍यास दिनांक-29.03.2012 रोजी ई  मेल  पाठवून  तुम्‍हाला काय पाहिजे अशी विचारणा करण्‍यात आली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक-29.03.2012 रोजी विरुध्‍दपक्षास ई मेल पाठवून तुम्‍ही रुपये-56/- चा रिचॉर्ज कोणतीही रक्‍कम परत न मागताही रद्द करण्‍यास तयार नसल्‍याने तो ग्राहक मंच, नागपूर येथे तक्रार करणार असल्‍याचे कळविले. त्‍यानंतरही विरुध्‍दपक्षा कडून त्‍यास दिनांक-03.04.2012 आणि दिनांक-11.04.2012 रोजी तसेच दिनांक-24.04.2012 रोजी, दिनांक-03.05.2012, दिनांक-20.07.2012, दिनांक-24.07.2012 रोजी  ई मेल संदेश पाठवून तक्रार दुर करण्‍याचे आश्‍वासन देण्‍यात आले परंतु काहीही करण्‍यात आले नाही. विरुध्‍दपक्षाचे कस्‍टमर केअर यंत्रणे कडून कोणतीही कारवाई करण्‍यात आलेली नाही.      दिनांक-03.05.2012 रोजीचे विरुध्‍दपक्षाचे ई मेल  व्‍दारे रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे बँक खात्‍यात पाच ते सात दिवसात परत करण्‍याचे नमुद करण्‍यात आले, परंतु कोणतीही रक्‍कम बँक खात्‍यात क्रेडीट करण्‍यात आली नाही. म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द मागण्‍या केल्‍यात-

 

(1) विरुध्‍दपक्षाचे सेवेत गंभिर त्रृटी व कमतरता असल्‍याचे जहिर करण्‍यात

    यावे.

 

(2) विरुध्‍दपक्षाचा त्‍यांचे नेटवर्क चांगले असल्‍याचा दावा हा भ्रमीत करुन

    फसवणूक करणारा असल्‍याचे ग्राहक मंचा तर्फे जाहिर करण्‍यात यावे.

 

(3) विरुध्‍दपक्षाचे तक्रार निवारण  यंत्रणेनी संबधित ग्राहकांच्‍या तक्रारीचे

    निवारण करण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

(4) विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्ररकर्त्‍यास झालेल्‍या गैरसोयी बद्दल, त्रासा

    बद्दल तसेच मानसिक ताण व कष्‍ट इत्‍यादीसाठी रुपये-1,00,000/

    नुकसान भरपाई देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच नोटीस खर्च म्‍हणून रुपये

    2000/- व तक्रारीच खर्च म्‍हणून रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षा कडून

    देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

 

 

03.  विरुध्‍दपक्ष टाटा टेली सर्व्‍हीसेस महाराष्‍ट्र तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं-    (1) ते (3) यांनी एकत्रित लेखी उत्‍तर ग्राहक मंचा समक्ष सादर केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याचे भ्रमणध्‍वनीचा क्रं-8087691301 असा असून त्‍यावर तो विरुध्‍दपक्ष टाटा डोकोमो कंपनीची प्रि-पेड सेवा घेत असतो ही बाब मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याने जी सेवा मागितली होती तीच सेवा त्‍याला विरुध्‍दपक्षा कडून उपलब्‍ध करुन देण्‍यात आली होती. तक्रारकर्ता हा स्‍वतः उच्‍चशिक्षीत असून व्‍यवसायाने वकील आहे व त्‍याने मागितलेली सेवाच त्‍याला देण्‍यात आलेली होती. प्रिपेड व्‍यवस्‍थे मध्‍ये सर्व व्‍यवहार हे संगणकीकृत होत असल्‍याने त्‍यामध्‍ये एकदा सेवा सुरु झाली की त्‍यात बदल करता येत नाही व जर ती सेवा बंद करावयाची असेल तर त्‍या सेवेबद्दल कपात केलेली रक्‍कम परत करता येत नसल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे चुकीचे आहे की, विरुध्‍दपक्षाने खात्री दिल्‍यावर त्‍याने रुपये-56/- चा रिचॉर्ज केला, तो आपल्‍या चुकीचे खापर विरुध्‍दपक्षाचे डोक्‍यावर फोडू पाहत असल्‍याचे नमुद केले. त्‍याने जी सेवा मागितली होती तीच त्‍याला पुरविण्‍यात आली होती. रुपये-56/- चा रिचॉर्ज करताना त्‍याला स्‍पष्‍ट सांगण्‍यात आले होते की, पहिल्‍या एका मिनिटा करीता दरसेंकद एक पैसा राहिल व नंतरच्‍या काळा करीता दर दोन सेंकदा करीता एक पैसा असे कॉलचे दर राहतील. प्रिपेड मध्‍ये सुरु केलेल्‍या सेवेत नंतर कोणत्‍याही प्रकारे बदल करता येत नाही. कोणत्‍याही सेवेसाठी रिटेलरची जबाबदारी येऊ शकत नाही. विरुध्‍दपक्षाचे नोडल ऑफीसरने तक्रारकर्त्‍याला घेतलेल्‍या प्‍लॅन मध्‍ये बदल होऊ शकत नसल्‍याचे सांगितल्‍याची बाब कबुल केली. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला पाठविलेले ई-मेल्‍स मान्‍य केलेत. तक्रारकर्त्‍याच्‍या प्रत्‍येक ई मेलला त्‍यांनी उत्‍तरे दिलेली आहेत परंतु तक्रारकर्त्‍याची मागणी नियमबाहय असल्‍याने ती पूर्ण करणे शक्‍य नाही कारण ती मागणी विरुध्‍दपक्षाचे अधिका-यांच्‍या अधिकारा बाहेरची मागणी होती. त्‍यांचे कोणत्‍याही अधिका-याने तक्रारकर्त्‍याला धमकी दिलेली नाही. दिनांक-21.03.2012 रोजी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे पैसे परत करण्‍याचे मान्‍य केल्‍यावरही तो विरुध्‍दपक्षावर दोषारोप करीत असल्‍याचे नमुद केले. विरुध्‍दपक्ष चुकीचे रिचॉर्जचे पैसे देऊ शकतात मात्र प्‍लॅन मध्‍ये बदल करु शकत नसल्‍याचे अनेकदा त्‍याला सांगण्‍यात आले होते. विरुध्‍दपक्ष कंपनीचे नेटवर्क चांगले आहे, ते कोणावरही कोणती सेवा घ्‍यावी यासाठी बळजबरी करीत नाही, ग्राहकास स्‍वतःचे मोबाईल हाताळता येत नसेल तर त्‍यासाठी विरुध्‍दपक्ष जबाबदार राहू शकत नसल्‍याचे नमुद केले.  तक्रारकर्त्‍याची संपूर्ण तक्रार खोटी व बनावट असून त्‍याने विरुध्‍दपक्ष कंपनी विरुध्‍द केलेली अन्‍य सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत. विरुध्‍दपक्ष कंपनी ख्‍यातीप्राप्‍त कंपनी असून तिचा व्‍यवसाय देश व विदेशातही आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत केलेल्‍या मागण्‍या या चुकीच्‍या असून त्‍याची तक्रार ही खोटी व आधारहिन असल्‍याने विरुध्‍दपक्षाला तक्रारकर्त्‍या कडून तक्रारीचा खर्च देण्‍याचे आदेशित व्‍हावे, अशी विनंती विरुध्‍दपक्षां तर्फे करण्‍यात आली.

04.   तक्रारकर्त्‍याने तक्रारीतील दस्‍तऐवज यादी सोबत त्‍याने विरुध्‍दपक्षास दिनांक-08.01.2012 रोजी पाठविलेली रजिस्‍टर नोटीसची प्रत, पोच, विरुध्‍दपक्षा कडून परत आलेले दिनांक-10.01.2012 रोजीचे पॉकीट,    दिनांक-24.01.2012 रोजीची विरुध्‍दपक्षास पाठविलेल्‍या रजिस्‍टर नोटीसची प्रत, पोच अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच शपथेवर कथन व लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

05.    विरुध्‍दपक्षा तर्फे लेखी उत्‍तरा सोबत अन्‍य दस्‍तऐवज दाखल करण्‍यात आले नाहीत.

 

06.  तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री अग्रवाल तर विरुध्‍दपक्षा तर्फे वकील     श्री दावडा यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

07.   तक्रारकर्त्‍या तर्फे दाखल  दस्‍तऐवजाच्‍या प्रती आणि  उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो-

 

::निष्‍कर्ष ::

 

 

08.    तक्रारकर्त्‍याचे तक्रारी नुसार त्‍याचे भ्रमणध्‍वनीचा क्रं-8087691301 असा असून त्‍यावर तो विरुध्‍दपक्ष टाटा डोकोमो कंपनीची प्रि-पेड सेवा घेत असतो तसेच दर दोन सेंकदास एक पैसा कॉल दर मिळविण्‍यासाठी प्रतीमाह अतिरिक्‍त रुपये-27/- चा रिचॉर्ज करीत असतो. दिनांक-05/01/2012 रोजी तो धनलक्ष्‍मी मोबाईल, सदर नागपूर यांचे दुकानात गेला व रुपये-27/- चा अतिरिक्‍त  रि-चॉर्ज करुन देण्‍याची विनंती केली असता त्‍याने रुपये-56/- चा एक नविन रि-चॉर्ज असून त्‍याची सेवेची मर्यादा ही 06 महिन्‍यासाठी असल्‍याचे सांगितल्‍या वरुन त्‍याने रुपये-56/- अतिरिक्‍त रि-चॉर्ज दर दोन सेंकदासाठी एक पैसा कॉल दर मिळण्‍यासाठी करुन घेतला. परंतु दुसरे दिवशी भ्रमणध्‍वनी वरुन फोन करताना त्‍याचे असे लक्षात आले की,  दर दोन  सेंकद वर एक पैसा या ऐवजी एका सेंकदवर एक पैसा द्दावा लागत आहे. दुसरे दिवशी त्‍याने संबधित रिटेलर कडे जाऊन चौकशी केली असता त्‍यास सांगण्‍यात आले की, प्रत्‍येक कॉलचे पहिल्‍या एका  मिनिटासाठी कॉल दर एक सेंकदवर एक पैसा असा राहिल व त्‍यानंतर दोन सेंकदासाठी एक पैसा असे दर मिळतील. वस्‍तुतः तक्रारकर्त्‍याचे जास्‍तीत जास्‍त कॉल्‍स हे एका मिनिटा पेक्षा कमी वेळचे असल्‍याने त्‍याचे उपयोगा साठी हा प्‍लॅन योग्‍य नव्‍हता म्‍हणून त्‍याने रुपये-27/- चा रिचॉर्ज करुन देण्‍याची विनंती केली परंतु रिटेलरने ते शक्‍य नसल्‍याचे सांगितल्‍यावर रुपये-56/- चा प्‍लॅन रिव्‍हर्स करुन देण्‍याची विनंती केली परंतु ते सुध्‍दा शक्‍य नसल्‍याचे सांगितले. तसेच रुपये-27/- चा रिचॉर्ज पण सहा महिने होऊ शकणार नाही. त्‍याने जेंव्‍हा जेंव्‍हा विरुध्‍दपक्षाचे भ्रमणध्‍वनी/दुरध्‍वनीवर संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला त्‍या त्‍या वेळी विरुध्‍दपक्षाचे नेट वर्क चांगले नसल्‍याने संपर्क होण्‍यास ब-याच अडचणींचा सामना त्‍यास करावा लागला. यानंतर त्‍याने वेळोवेळी विरुध्‍दपक्षाकडे तक्रारीत दर्शविल्‍या प्रमाणे ई मेल व्‍दारे पत्रव्‍यवहार केला तसेच दोनदा रजिस्‍टर नोटीस सुध्‍दा पाठविली परंतु विरुध्‍दपक्षा तर्फे केवळ आश्‍वासनां व्‍यतिरिक्‍त कोणताही प्रतिसाद त्‍याला मिळालेला नाही.

 

 

 

09.   विरुध्‍दपक्षांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे भ्रमणध्‍वनीचा      क्रं-8087691301 असा असून त्‍यावर तो विरुध्‍दपक्ष टाटा डोकोमो कंपनीची प्रि-पेड सेवा घेत असतो ही बाब मान्‍य करण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याने जी सेवा मागितली होती ती सेवा त्‍याला विरुध्‍दपक्षा कडून उपलब्‍ध करुन देण्‍यात आली होती. प्रिपेड व्‍यवस्‍थे मध्‍ये सर्व व्‍यवहार हे संगणकीकृत  असल्‍याने त्‍यामध्‍ये एकदा सेवा सुरु झाली की  बदल करता येत नाही व जर ती सेवा बंद करावयाची असेल तर त्‍या सेवेबद्दल कपात केलेली रक्‍कम परत करता येत नाही.  तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे की, विरुध्‍दपक्षाने खात्री दिल्‍यावर त्‍याने रुपये-56/- चा रिचॉर्ज केला, तो आपल्‍या चुकीचे खापर विरुध्‍दपक्षाचे डोक्‍यावर फोडू पाहत आहे. त्‍याने जी सेवा मागितली होती तीच त्‍याला पुरविण्‍यात आली होती. रुपये-56/- चा रिचॉर्ज करताना त्‍याला स्‍पष्‍ट सांगण्‍यात आले होते की, पहिल्‍या एका मिनिटा करीता दर सेंकद एक पैसा राहिल व नंतरच्‍या काळा करीता दर दोन सेंकदा करीता एक पैसा असे कॉलचे दर राहतील. प्रिपेड मध्‍ये सुरु केलेल्‍या सेवेत नंतर कोणत्‍याही प्रकारे बदल करता येत नाही. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला पाठविलेले ई-मेल्‍स मान्‍य केलेत. तक्रारकर्त्‍याच्‍या प्रत्‍येक ई मेलला त्‍यांनी उत्‍तरे दिलेली आहेत परंतु तक्रारकर्त्‍याची मागणी नियमबाहय असल्‍याने ती पूर्ण करणे शक्‍य नाही कारण ती मागणी विरुध्‍दपक्षाचे    अधिका-यांच्‍या अधिकारा बाहेरची होती. दिनांक-21.03.2012 रोजी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे पैसे परत करण्‍याचे मान्‍य केल्‍यावरही तो विरुध्‍दपक्षावर दोषारोप करीत आहे. विरुध्‍दपक्ष चुकीचे रिचॉर्जचे पैसे देऊ शकतात मात्र प्‍लॅन मध्‍ये बदल करु शकत नसल्‍याचे अनेकदा तक्रारकर्त्‍याला सांगण्‍यात आले. विरुध्‍दपक्ष कोणावरही कोणती सेवा घ्‍यावी यासाठी बळजबरी  रीत नाही, ग्राहकास स्‍वतःचे मोबाईल हाताळता येत नसेल तर त्‍यासाठी विरुध्‍दपक्ष जबाबदार राहू शकत नाही. तक्रारकर्त्‍याची संपूर्ण तक्रार खोटी व बनावट असल्‍याचे नमुद केले.

 

 

 

10.     मंचाचे मते विरुध्‍दपक्षा तर्फे दिलेला एखाद्दा प्‍लॅन जर अयोग्‍य असेल तर संबधित ग्राहकाच्‍या मागणी प्रमाणे तो प्‍लॅन जास्‍तीत जास्‍त एक महिन्‍यात बदलवून देणे सर्वसाधारण व्‍यवहारात अभिप्रेत आहे परंतु तक्रारकर्त्‍याला वारंवार त्‍याच-त्‍या तक्रारी करावयास लावणे व लवकरात लवकर तुमच्‍या तक्रारीचे निराकरण करण्‍यात येईल अशी एकाच पध्‍दतीची एकाच पठडीतील आश्‍वासने देणे परंतु सतत केलेल्‍या तक्रारी कडे  दुर्लक्ष्‍य करणे व नंतर बराच कालावधी गेल्‍या नंतर तक्रारकर्त्‍यास प्‍लॅन मध्‍ये बदल करता येत नसल्‍याचे सांगणे हा विरुध्‍दपक्षाचा सर्व व्‍यवहार पाहता त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास दिलेली ही दोषपूर्ण सेवा आहे.

 

 

 

11.    वस्‍तुतः खाजगी कंपन्‍यांव्‍दारे जे विविध भ्रमणध्‍वनी संबधी कॉल प्‍लॅनस बाजारात आणल्‍या जातात ते कॉल प्‍लॅन्‍स भारत देशातील तक्रारकर्त्‍या सारखे अन्‍य असंख्‍य ग्राहक विकत घेत असतात तसेच खाजगी दुरसंचार कंपन्‍या हया संबधित ग्राहकां कडून कोटयावधी रुपये गोळा करतात परंतु त्‍या ग्राहकाने तक्रार केल्‍यावर त्‍याला तुमच्‍या तक्रारीचे लवकरात लवकर निराकरण करण्‍यात येईल अशी एकाच पठडीतील वारंवार आश्‍वासने देऊन ब-याच मोठया  कालावधी करीता काहीच न करणे व शेवटी त्‍याची तक्रार नामंजूर करणे ही विरुध्‍दपक्ष कंपनीची अवलंबलेली पध्‍दती चुकीची आहे. तक्रारकर्ता हा उच्‍चशिक्षीत आणि व्‍यवसायाने वकील आहे, त्‍याच्‍या सारख्‍या शिक्षीत व्‍यक्‍तीला जर विरुध्‍दपक्ष कंपनी जुमानत नसेल तर अज्ञानी ग्राहकांची काय अवस्‍था राहिल याची कल्‍पना येते. विरुध्‍दपक्षाचे असे म्‍हणणे आहे की, ग्राहकाने एकदा प्‍लॅन निवडल्‍या नंतर त्‍यात संगणकीय व्‍यवस्‍था असल्‍याने  बदल करता येत नाही परंतु हे त्‍यांचे म्‍हणणे मान्‍य होण्‍या सारखे नाही. एखाद्दा प्‍लॅन जर संबधित ग्राहकास आवडला नसेल तर फार तर तो जास्‍तीत जास्‍त एका महिन्‍यात त्‍याला बदलवून मिळणे आवश्‍यक आहे परंतु तक्रारकर्त्‍याचे प्रकरणात दिनांक-05/01/2012 रोजी निवडलेला प्‍लॅन त्‍याने वारंवार मागणी करुनही त्‍यास  दिनांक-24.07.2012 रोजी पर्यंत बदलवून दिला नाही वा रद्दही करुन दिला नाही, त्‍यासाठी त्‍याला विरुध्‍दपक्षा सोबत रोज वेळात वेळ काढून ईमेल व्‍दारे पत्रव्‍यवहार करावा लागला, विरुध्‍दपक्षाने मागितलेली माहिती  सुध्‍दा त्‍याने वेळोवेळी पुरविली  परंतु उपयोग झाला नाही. तसेच त्‍याने कायदेशीर नोटीस पाठवूनही त्‍याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही या सर्व प्रकारात तक्रारकर्त्‍याचा नाहक वेळ गेला तसेच त्‍याला वेळोवेळी मनःस्‍ताप सहन करावा लागल्‍याची बाब दाखल दस्‍तऐवजी पुराव्‍यां वरुन सिध्‍द होते. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष टाटा डोकोमो कंपनी तर्फे तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1) ते 3) यांचे विरुध्‍द मंजूर होण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

 

 

12.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

 

 

                    ::आदेश::

 

(01)  तक्रारकर्ता श्री अविनाश राजेंद्रकुमार कलरैया यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं-(1) टाटा डोकोमो, नवि मुंबई, विरुध्‍दपक्ष क्रं-(2) टाटा टेली सर्व्‍हीसेस (महा) लिमिटेड, पुणे आणि विरुध्‍दपक्ष क्रं-(3) टाटा डोकोमो, नागपूर यांचे विरुध्‍दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या (Jointly & Severally)  अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 विरुध्‍दपक्ष क्रं-(1) ते (3) टाटा डोकोमो कंपनी तर्फे संबधितानां आदेशित करण्‍यात येते की, यापुढे त्‍यांच्‍या ग्राहक यंत्रणे मार्फत संबधित ग्राहकांच्‍या तक्रारींचे निवारण त्‍वरीत करावे.

 

(03) विरुध्‍दपक्ष क्रं-(1) ते (3) टाटा डोकोमो कंपनी तर्फे संबंधितानीं तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) तसेच नोटीस खर्च व तक्रारखर्च म्‍हणून रुपये-7000/- (अक्षरी रुपये सात हजार फक्‍त) तक्रारकर्त्‍यास द्दावेत.

 

(04)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-(1) ते (3) टाटा डोकोमो कंपनी तर्फे संबधितानीं वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

(05)  प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.      

 

 

 

            

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.