न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
तक्रारदार क्र.1 व 2 हे मित्र आहेत. जाबदार क.1 ही खाजगी ट्रान्स्पोर्ट कंपनी आहे. जाबदार क्र.2 व 3 हे सदर कंपनीचे मालक असून जाबदार क्र.4 हा सदर कंपनीचा पुणे शाखेचा प्रमुख आहे. तक्रारदार क्र.1 यांचा जनता गॅरेज नावाने गाडी दुरुस्त करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदार क्र.1 यांनी नुकतीच पजेरो कार नं. एमएच-11-एएन-0909 ही कोशाल राजपुरोहित यांचेकडून खरेदी केली होती. सदरची गाडी तक्रारदार क.1 यांचे नावे करण्यासाठी आर.टी.ओ कार्यालयामध्ये आवश्यक कागदपत्रे देवून गाडी ताब्यात घेतली होती. याचदरम्यान घरगुती कार्यक्रमासाठी तक्रारदार क्र.2 यांना चारचाकी गाडीची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी तक्रारदार क्र.1 यांचेकडे गाडीची मागणी केली. तक्रारदार क्र.1 यांनी तक्रारदार क्र.2 यांना गाडी देणेचे मान्य केले. तक्रारदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 या ट्रान्स्पोर्ट कंपनीद्वारे सदरची गाडी दि. 5 जुलै 2021 रोजी कराड येथून ब्रम्हपूर (ओडीशा) येथे पाठविली. सदर वाहतुकीच्या खर्चाची रक्कम रु. 24,000/- ठरली. तक्रारदार क्र.2 यांनी जाबदार क्र.2 यांचे खात्यावर दि.5 जुलै 2021 रोजी रक्कम रु.20,000/- ऑनलाईन पाठवून दिले. उर्वरीत रक्कम गाडी पोहोच झाल्यानंतर देण्याचे तक्रारदारांनी जाबदार क्र.2 यांना सांगितले. त्याचदिवशी तक्रारदार यांनी जाबदार यांचे ताब्यात गाडी दिली. सदरची गाडी एका आठवडयात ब्रम्हपूर येथे पोहोचेल अशी खात्री जाबदार यांनी दिली. तदनंतर तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे दि.13 जुलै, 15 जुलै, 16 जुलै 2021 यादिवशी जाबदारांकडे चौकशी केली असता जाबदारांनी गाडी लवकरच पोहोचेल असा विश्वास दिला. दि.18 जुलै 2021 रोजी जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारास फोन करुन गाडीचा अपघात झाल्याचे सांगितले. तसेच सदरची गाडी दुरुस्त करुन देतो असेही जाबदार क्र.2 यांनी सांगितले. परंतु जाबदारांनी सदरची गाडी दुरुस्त करुन दिली नाही. ती आजपर्यंत तक्रारदार यांना मिळालेली नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदार यांना दि. 30/09/2021 रोजी नोटीस पाठविली. सदरची नोटीस मिळूनही जाबदार यांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही. अशा प्रकारे जाबदारांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.3,00,000/- मिळावेत, तसेच बिलापोटी स्वीकारलेली रक्कम रु.20,000/- परत मिळावी व अर्जाचा खर्च जाबदारांकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.
3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस व सदर नोटीसची पोचपावती, तक्रारदारांनी जाबदारांना दिलेल्या रकमेची पोहोचपावती, वाहनाचे कागदपत्रे इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र तसेच लेखी युक्तिवादही दाखल केला आहे.
4. जाबदार क्र.1 ते 4 यांनी याकामी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारीतील मजकूर परिच्छेदनिहाय नाकारला आहे. तक्रारदार यांनी गाडीचे मालकीबाबत जाबदारांना अंधारात ठेवले. तक्रारदार यांनी जाबदार यांचे ताब्यात जेव्हा गाडी दिली, त्यावेळी सदरची गाडी खोशाल जे. राजपुरोहित, रा. लोणावळा यांचे नावे नोंद असल्याचे रेकॉर्डवरुन स्पष्ट दिसून आले. सदरची गाडी जाबदार यांनी कराडहून पुणे येथे चालवित आणली. पूणे येथून ब्रम्हपूर येथे सदरची गाडी ही मल्टी ॲक्सल ट्रकद्वारे नेण्यात येत होती. त्यावेळी ब्रम्हपूरच्या आधी 50 ते 70 कि.मी. अंतरावर सदर वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाला व ट्रक मध्येच बंद पडला. तदनंतर तक्रारदार यांची संमती घेवून तक्रारदाराची गाडी ही एका ड्रायव्हरमार्फत ब्रम्हपूरकडे रवाना केली. मात्र रस्त्यात अचानक एक प्राणी आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात सदरचे वाहन पलटी झाले. त्यामध्ये वाहनाचे नुकसान झाले. सदरची बाब जाबदारांनी तक्रारदारास कळविली. तदनंतर सदरचे वाहन दुरुस्तीकरिता हैद्राबाद येथे नेणेचे ठरले. वाहन दुरुस्ती खर्चामध्ये मदत करण्याची तयारी जाबदारांनी दर्शविली. हैद्राबाद येथे गाडी दुरुस्तीचे काम सुरु झाले. त्याबाबतचे फोटो जाबदार हे तक्रारदारांना पाठवत होते. गाडीचे बहुतांश काम झाल्यावर जाबदार यांनी तक्रारदार यांना दुरुस्तीचे खर्चाबाबत विचारले असता तक्रारदार यांनी अचानकपणे भूमिका बदलून गाडी दुरुस्तीचा खर्च देण्यास नकार दिला. तक्रारदारांनी नकार दिल्याने जाबदारांनी सदरचे वाहन हैद्राबाद येथील गॅरेजमध्येच तसेच ठेवले आहे. ठरल्यानुसार तक्रारदाराने त्याचे हिश्श्याची दुरुस्तीची रक्कम दिली असती तर जाबदारांनी तक्रारदाराचे ताब्यात गाडी दिली असती. परंतु तक्रारदारांनी त्यास नकार दिल्याने सदरची गाडी किरकोळ दुरुस्तीअभावी गॅरेजमध्येच लावलेली आहे. सदरचे वाहनाचा पूर्ण कायदेशीर विमा तक्रारदारांनी उतरविलेला नव्हता, फक्त थर्ड पार्टी विमा उतरविला होता. तक्रारदाराने जाबदारास अपघातासाठी जबाबदार ठरवून नुकसान भरपाई मागणेचा प्रयत्न चालविला आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यात यावी अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.
5. जाबदार यांनी याकामी म्हणण्यासोबत शपथपत्र, तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, युक्तिवाद तसेच जाबदार यांचे म्हणणे, शपथपत्र, पुरावा शपथपत्र व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | जाबदार विमा कंपनीने तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार जाबदार यांचेकडून त्यांचे वाहन सुस्थितीत परत मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
7. तक्रारदार क्र.1 यांनी पजेरो कार गाडी नं. एमएच-11-एएन-0909 ही कोशाल राजपुरोहित यांचेकडून खरेदी केली होती. घरगुती कार्यक्रमासाठी तक्रारदार क्र.2 यांना चारचाकी गाडीची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी तक्रारदार क्र.1 यांचेकडे गाडीची मागणी केली. तक्रारदार क्र.1 यांनी तक्रारदार क्र.2 यांना गाडी देणेचे मान्य केले. तक्रारदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 या ट्रान्स्पोर्ट कंपनीद्वारे सदरची गाडी दि. 5 जुलै 2021 रोजी कराड येथून ब्रम्हपूर (ओडीशा) येथे पाठविली. सदर वाहतुकीच्या खर्चाची रक्कम रु. 24,000/- ठरली. सदर रक्कम रु.24,000/- चे इन्व्हॉइस तक्रारदाराने याकामी दाखल केले आहे. सदर इन्व्हॉइसवर जाबदार क्र.1 यांचे कंपनीचे नांव नमूद असून तक्रारदार यांची वाहन कराडहून ब्रम्हपूर (ओडीसा) येथे नेण्यासाठी रक्कम रु.24,000/- आकारण्यात येत असलेबाबतचा तपशील नमूद आहे. तक्रारदाराचे कथनानुसार, तक्रारदार क्र.2 यांनी जाबदार क्र.2 यांचे खात्यावर दि.5 जुलै 2021 रोजी रक्कम रु.20,000/- ऑनलाईन पाठवून दिले. उर्वरीत रक्कम गाडी पोहोच झाल्यानंतर देण्याचे तक्रारदारांनी जाबदार क्र.2 यांना सांगितले होते. जाबदार क्र.1 ते 4 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये सदरच्या बाबी नाकारलेल्या नाहीत. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. तक्रारदारांचे कथनानुसार, दि.18 जुलै 2021 रोजी जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारास फोन करुन गाडीचा अपघात झाल्याचे सांगितले. तसेच सदरची गाडी दुरुस्त करुन देतो असेही जाबदार क्र.2 यांनी सांगितले. परंतु जाबदारांनी सदरची गाडी दुरुस्त करुन दिली नाही. ती आजपर्यंत तक्रारदार यांना मिळालेली नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे. जाबदार यांनी त्यांचे म्हणणेमध्ये, पूणे येथून ब्रम्हपूर येथे सदरची गाडी ही मल्टी ॲक्सल ट्रकद्वारे नेण्यात येत होती. त्यावेळी ब्रम्हपूरच्या आधी 50 ते 70 कि.मी. अंतरावर सदर वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाला व ट्रक मध्येच बंद पडला. तदनंतर सदरची गाडी ही एका ड्रायव्हरमार्फत ब्रम्हपूरकडे रवाना केली. मात्र रस्त्यात अचानक एक प्राणी आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात सदरचे वाहन पलटी झाले. त्यामध्ये वाहनाचे नुकसान झाले. म्हणून सदरचे वाहन दुरुस्तीकरिता हैद्राबाद येथे नेणेचे ठरले. वाहन दुरुस्ती खर्चामध्ये मदत करण्याची तयारी जाबदारांनी दर्शविली. तथापि दुरुस्तीचा खर्च तक्रारदारांनी देण्यास नकार दिल्याने जाबदारांनी सदरचे वाहन हैद्राबाद येथील गॅरेजमध्येच तसेच ठेवले आहे असे जाबदारांचे कथन आहे.
9. उभय पक्षांची कथने, दाखल कागदपत्रे व युक्तिवाद विचारात घेता असे दिसून येते की, तक्रारदारांनी वादातील वाहन कराड येथून ब्रम्हपूर (ओरिसा) येथे नेण्यासाठी जाबदार यांचे ताब्यात दिले होते. तथापि, सदरचे वाहनास अपघात झाल्यामुळे वाहनाचे नुकसान झाले. सदर वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च देण्यास तक्रारदारांनी नकार दिल्याने जाबदारांनी तक्रारदाराचे वाहन तक्रारदाराचे ताब्यात दिलेले नाही. वादातील वाहनास अपघात झाल्याची बाब उभय पक्षांनी मान्य केली आहे. तथापि त्याबाबत उभय पक्षांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. वादातील वाहन वाहून नेण्याची जबाबदारी जाबदारांनी स्वीकारली होती व सदरचे वाहन वाहून नेत असताना त्यास अपघात झाला व त्यामध्ये त्याचे नुकसान झाले ही बाब उभय पक्षी मान्य आहे. सदरची बाब विचारात घेता, अपघातामुळे झालेल्या वाहनाच्या नुकसानीस तक्रारदार हे कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही किंवा सदर अपघाताशी तक्रारदाराचा कोणताही संबंध नाही. सबब, वाहनाच्या झालेल्या नुकसानीस तक्रारदारांना कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही ही बाब स्पष्ट होते. वाहन कराड येथून ब्रम्हपूर (ओरिसा) येथे वाहून नेण्याची जबाबदारी जाबदारांनी स्वीकारली होती. त्यानुसार सदरचे वाहन नेले जात असताना सदरचे वाहनास अपघात झाला आहे. सबब, सदरचे अपघातास व त्यामुळे वाहनाचे झालेल्या नुकसानीस जाबदार हेच जबाबदार आहेत असे या आयोगाचे मत आहे. सबब, तक्रारदारांनी त्यांचे हिश्श्याची दुरुस्तीची रक्कम अदा करावी हे जाबदारांचे कथन न्यायोचित वाटत नाही. सबब, जाबदारांनी तक्रारदाराचे वाहन सुस्थितीत परत न करुन तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र.3
10. तक्रारदार यांची पजेरो कार नं. एमएच-11-एएन-0909 ही कराड ते ब्रम्हपूर पर्यंत सुस्थितीत पोहोच करणेची जबाबदारी जाबदार यांची होती व त्याप्रमाणे गाडी ब्रम्हपूरपर्यंत पोहोच करणेस जाबदार असमर्थ ठरले आहेत व त्याद्वारे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे. वरील सदोष सेवेमुळे/सेवात्रुटीमुळे तक्रारदार यांना नुकसानीस सामोरे जावे लागलेले आहे. तथापि, तक्रारदार व जाबदार यांनी तक्रारदार यांची गाडी दुरुस्तीकरिता हैद्राबाद येथील गॅरेजमध्ये दिलेचे मान्य केले आहे. सबब, तक्रारदार यांना गाडीची किंमत देणे न्याय्य ठरणार नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, तक्रारदार हे जाबदार यांचेकडून त्यांचे वाहन सुस्थितीत परत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, वाहनाचे दुरुस्तीपोटी झालेल्या खर्चाची संपूर्ण रक्कम जाबदार यांनी संबंधीत दुरुस्तकास अदा करुन तक्रारदाराचे वाहन सुस्थितीत तक्रारदाराचे ताब्यात द्यावे असा आदेश करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच जाबदार यांनी दिलेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- जाबदार क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास त्यांची पजेरो कार नं. एमएच-11-एएन-0909 ही त्याची पूर्ण दुरुस्ती करुन व दुरुस्तीचा संपूर्ण खर्च स्वत: अदा करुन सुस्थितीत परत करावी.
- जाबदार क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.