निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्री सतिश गोपाळराव देशमुख, मा.सदस्य ) (पारीत दिनांक –07 मार्च, 2013 ) 1. ग्रा.सं. कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
2. तक्रारकर्ते श्री शंकरराव श्रावण धकाते व सौ.लीला शंकरराव धकाते यांचा मुलगा श्री प्रविण शंकरराव धकाते (सध्या मृतक) याने तो हयातीत असताना, त्याचे इंडीका कार क्रमांक- MH-40/K.R.5510 वाहनाचे खरेदी करीता, विरुध्दपक्ष क्रमांक-2 महिन्द्रा आणि महिन्द्रा फायनॉन्शिअल सर्व्हीसेस प्रा.लि. या वित्तीय कंपनी कडून रुपये-3,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते व सदर वाहनाचे कर्जापोटी ग्रुप इन्शुरन्स योजने अंतर्गत विरुध्दपक्ष क्रं.1 कोटक महिन्द्र ओल्ड मॅच्युअल लाईफ इन्शुरन्स लिमिटेड या विमा कंपनी कडून रुपये-1320/- विमा प्रिमिअम रक्कम भरुन दि.23.12.2011 ते 22.12.2012 या 01 वर्षाचे कालावधी करीता स्वतःचा रुपये-3,00,000/- रकमेचा जिवनरक्षक विमा उतरविला होता.
3. सदर विमाधारक प्रविण शंकरराव धकाते याचा दि.11.02.2012 रोजी अल्प आजाराने मृत्यू झाला. विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे वडील (तक्रारकर्ता क्रं 1) यांनी, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 ला माहिती कळवून, विमाधारकाचे मृत्यू संबधाने , विमा रकमेची मागणी केली असता, विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 ने त्या संबधाने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
4. करीता त.क.ने, वि.प.क्रं 1 व 2 ला दि.05.07.2012 रोजी वकिला मार्फत रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवूनही उभय वि.प. नीं नोटीसचे उत्तर दिले नाही अथवा विमा दाव्याची रक्कमही मंजूर केली नाही.
5. म्हणून त.क.ने उभय वि.प.विरुध्द प्रस्तुत मंचा समक्ष तक्रार दाखल केली. 6. तक्रारकर्त्याची प्रार्थना- अ) विमा दावा रक्कम रुपये-3,00,000/- द.सा.द.शे.18% व्याजासह वि.प.कडून मिळावी. ब) त.क.ला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-1,90,000/- वि.प.कडून मिळावेत. 7. सदर तक्रारीचे अनुषंगाने, न्यायमंचाचे मार्फतीने वि.प.क्रं 1 व 2 ला नोटीस तामील झाली असता वि.प.क्रं 1 व 2 ने अनुक्रमे आप-आपले प्रतिज्ञालेखावरील उत्तर दि.07.02.2013 व दि.07.01.2013 रोजी व एकूण 81 दस्तऐवजासह सादर केले. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे निवेदन- 8. 1) त.क.चा मुलगा मृतक प्रविण ने वि.प.क्रं 1 कडून घेतलेल्या कर्जापोटी विमा पॉलिसी घेतली होती, त्यामुळे तो वि.प.क्रं 1 चा ग्राहक होत नाही. 2) पॉलिसीतील नियम व अटीतील कलम-3 “Cover” नुसार विमाधारकाची पॉलिसी नाकारली आहे. “Cover” हे सुदृढ प्रकृतीचे व्यक्तीचे संदर्भातील अट आहे व त.क.चा मुलगा विमाधारक प्रविणने त्याचे सुदृढ प्रकृती विषयी विचारलेल्या प्रश्नास वि.प.ला खोटी माहिती पुरविली होती. या संदर्भात डॉक्टर कडून उपलब्ध कागदपत्र दस्तऐवज क्रमांक-65, 66,73 व 74 हे महत्वाचे आहेत. त्यातील डॉ.पाछेल यांचे दि.18.01.2012 रोजीचे मानेच्या सी.टी.स्कॅन रिपोर्टमध्ये असे स्पष्ट नमुद आहे की, प्रविण (मृतक विमाधारक) हा कॅन्सर या रोगाने पिडीत होता. ही बाब विमाधारकास माहिती असून सुध्दा त्याने ही माहिती वि.प.क्रं 1 व 2 पासून लपवून ठेवली होती.
9. करीता वि.प.क्रं 1 ने त.क.चा विमा दावा नाकारला असल्या बद्यल त्यास दि.31.03.2012 रोजीचे पत्राद्वारे कळविले. विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे निवेदन- 10. 1) मृतक विमाधारकाचा जीवनरक्षक विमा हा त्याने वि.प.क्रं 2 कडून घेतलेल्या कर्जापोटी काढलेला होता, त्यामुळे विमा दावा रकमेशी, वि.प.क्रं 2 चा काहीही संबध नाही. 2) विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याचे थकीत कर्जापोटी, काहीही रक्कम, त्याचे वडील म्हणजे त.क.ने जमा केलेली नाही करीता मृतक विमाधारकाचे वडीलाने (त.क.क्रं 1) त्यांचे वकिला मार्फत बजावलेल्या नोटीसला, वि.प.2 यांचे दि.30.07.2012 रोजीचे उत्तरात (निशाणी-17-b) ही बाब स्पष्ट नमुद केलेली आहे. कारणे व निष्कर्ष -
11. उभय पक्षानीं दाखल केलेल्या कागदपत्रांचे, प्रतिज्ञालेखावरील पुराव्याचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
12. मृतक विमाधारकाने, त्याचे हयातीत, सदर विमा पॉलिसी ही त्याने वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनी कडून घेतलेल्या कर्जापोटी काढलेली होती व त्या बद्यल विमा कंपनीला द्यावयाची सर्व कागदपत्रे पॉलिसीधारकाने वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनी कडे जमा केली होती व त्या अनुषंगाने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने “ Certificate of Insurance No.-F-12- 20099068-Loan Agreement No.-1848124 जारी केले होते व सदर Certificate चे मागील पानावर दिलेल्या पॉलिसी नियम व अट क्रं 4 मध्ये - (a) Proof of age. (b) “Declaration of Good Health” मध्ये स्पष्टपणे असे नमुद आहे की, It may be noted that cover shall be declined if the member is not able to provide satisfactory evidence of good health as required under this policy. 13. कर्ज कराराचे नियम व अटीमधील अट क्रं 4 ही मृतक विमाधारकास लागू होती व त्यानुसार मृतक विमाधारकाचे (Deceased Policy Holder ) विमित वाहन (Insured Vehicle ) हे वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनी कडे नजरगहाण आहे. त्यामुळे अट क्रं 12.2 अ नुसार सदर विमीत रक्कम (Insured Amount) वसूल करण्याचा वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनीला अधिकार आहे. 14. तक्रारीतील मुख्य मुद्या असा आहे की- वि.प.क्रं 1 विमा कंपनीने, त.क.चा नाकारलेला विमा दावा हा पॉलिसी नियमातील अटी नुसार योग्य आहे काय? .....................................................होय.
15. उपरोक्त मुद्या संबधाने वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे खालील निवाडयांवर आपली भिस्त ठेवली- A) AIR 1962 Supreme Court 814 (V 49 C 117) Mithoolal Nayak-V/s- LIC ***** B) AIR 1962 Supreme Court 821 (V 49 C 118) Maharana Shri Jayvantsinghji Ranmalsinghji -V/s- The State of Gujarat and others. ***** C) (2008) 1 Supreme Court Cases 321 P.C. Chacko and another -V/s- Chairman, Life Insurance Corporation of India ***** D) AIR 1986 Kerala 201 P.Sarojam-V/s_ L.I.C. of India. ***** E) AIR 1986 Kerala 206 Hameed-V/s- Jayabharat Credit & Investment Co.Ltd & others. ***** F) AIR 2004 Jharkhand 134 Smt.Saroj Agrawal -V/s_ L.I.C. of India. ***** G) AIR 2005 Bombay 214 L.I.C.of India and another -V/s_ Smt.Maya Dessai. ***** 16. तसेच वि.प.क्रं 1 विमा कंपनीने या अनुषंगाने दाखल केलेल्या दस्तऐवज क्रमांक 47 ते 81 चे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मृतक पॉलिसीधारक श्री प्रविण शंकरराव धकाते याने त्याचे हयातीत वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनीकडून वाहनासाठी कर्ज घेताना व सदर कर्जाचे अनुषंगाने विमा पॉलिसी काढताना तो कॅन्सर या व्याधीने ग्रस्त होता व असे असतानाही त्याने त्याचे आजारपणा बद्यल विरुध्दपक्ष क्रं 1 विमाकंपनीस व तत्वतःच वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनीलाही आपले प्रकृती विषयी सत्य माहिती पुरविली नाही.
17. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने आपली भिस्त ठेवलेल्या आदरणीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे निवाडयातून देखील हेच स्पष्ट झालेले आहे की, “इन्शुरन्स हा दोन्ही पक्षामध्ये विश्वासाने झालेला करार आहे, जर त्याबद्यल विमाधारकाने खोटी माहिती पुरविली असल्यास, विमा कंपनीला विमा दावा नाकारण्याचा अधिकार आहे ”. 18. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, हे न्यायमंच प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.. ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याचीं, विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क देण्यात यावी. ( श्री अमोघ श्यामकांत कलोती ) | (श्री सतिश गोपाळराव देशमुख) | मा. अध्यक्ष | मा. सदस्य |
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नागपूर ***** |