::निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्री अमोघ श्यामकांत कलोती, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक –30 मार्च, 2013 ) 1. उभय तक्रारदार अनुक्रमे नात्याने पती व पत्नी असून त्यांनी विरुध्दपक्षाकडे गाळा खरेदी पोटी जमा केलेली रक्कम परत मिळण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचा समक्ष दाखल केली आहे.
2. उभय तक्रारदारांचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे- 3. उभय तक्रारदार यांनी मौजा बेलतरोडी, प.ह.क्रं 38, खसरा क्रमांक-3/1, 3/2, भूखंड क्रमांक-3 ते 12, 17 ते 26 व 29 ते 40 वरील लक्ष्मी विहार अपार्टमेंट मधील गाळा क्रमांक-401, विरुध्दपक्षा कडून एकूण मोबदला रक्कम रुपये-12,10,000/- मध्ये विकत घेण्याचा नोंदणीकृत करारनामा दि.17/03/2011 रोजी विरुध्दपक्षा सोबत केला.. विरुध्दपक्षाने गाळयाचे व संपूर्ण योजनेचे बांधकाम हे सात महिन्यात म्हणजे सप्टेंबर, 2011 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तक्रारकर्ता यांचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी विरुध्दपक्षा सोबत दि.07.05.2011 रोजी पंजीबध्द विक्रीचा करारनामा सुध्दा केलेला आहे व करारात नमुद केल्या प्रमाणे रकमेचा भरणा सुध्दा विरुध्दपक्षाकडे केलेला आहे. 4. तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर गाळा विकत घेण्या करीता त्यांनी पंजाब नॅशनल बँकेतून रुपये-10,26,604/- चे कर्ज घेतले होते व तक्रारकर्ता आजही सदर कर्जाची परतफेड करीत आहे. सदर कर्जा करीता तक्रारकर्ता यांचे कडून बँकेने इन्शुरन्सपोटी रुपये-50,722/- एवढी रक्कम कर्ज खात्यातून कपात केली. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी आज पर्यंत विरुध्दपक्षास गाळयापोटी एकूण रक्कम रुपये-7,61,340/- एवढी रक्कम अदा केलेली आहे. 5. विरुध्दपक्षाने गाळयाचे बांधकाम पूर्ण केले नसून अद्यापही बांधकाम हे अर्धवट स्थितीत आहे. जेंव्हा की, विरुध्दपक्षाने गाळयाचे व संपूर्ण योजनेचे बांधकाम हे सात महिन्यात म्हणजे सप्टेंबर, 2011 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ऑगस्ट, 2011 मध्ये विरुध्दपक्षाने प्रत्यक्ष्य भेटीमध्ये 02 महिन्यात बांधकाम पूर्ण करुन देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून दि.11.07.2012 रोजी विरुध्दपक्षास वकिला मार्फत नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस प्राप्त होऊनही वि.प.ने प्रतिसाद दिला नाही. 6. म्हणून उभय तक्रारदार यांनी विरुध्दक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षाकडे गाळयापोटी भरणा केलेली रक्कम, नुकसान भरपाईसह मिळण्याची मागणी केली. 7. विरुध्दपक्षाने प्रकरणात न्यायमंचा समक्ष उपस्थित होऊन आपले लेखी उत्तर पान क्रं 71 ते 73 वर सादर केले. वि.प.ने आपले लेखी उत्तरात त.क.सोबत गाळा खरेदी संबधाने पंजीबध्द करारनामा झाल्याची बाब मान्य केली. विरुध्दपक्षाने सप्टेंबर, 2011 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे नमुद केले. ईमारतीचे 90% बांधकाम पूर्ण झाले असून, उर्वरीत बांधकाम कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्यावर लवकरात लवकर पूर्ण करुन देण्यात येईल असे नमुद केले. वि.प.चे कथना नुसार बांधकाम सुरु असताना मा.उच्च न्यायालय, खंडपिठ नागपूर यांनी एका याचीके मध्ये दिलेल्या आदेशा नुसार बांधकाम स्थगीत करण्यात आले. अशाप्रकारे बांधकाम पूर्ण करण्याची ईच्छा असूनही न्यायालयाचे आदेशा नुसार बांधकाम पूर्ण करणे शक्य नसल्याचे नमुद केले व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. 8. तक्रारकर्ता यांनी पान क्रं 10 वरील यादी नुसार एकूण 15 दस्तऐवज दाखल केले. ज्यामध्ये प्रामुख्याने माहितीपुस्तीका, वि.प.ने रक्कम मिळाल्या बाबत दिलेल्या पावत्या, उभय पक्षांमध्ये गाळा खरेदी संबधाने झालेला नोंदणीकृत करारनामा, त.क.ने वि.प.ला पाठविलेली नोटीस, पोस्टाची पावती, पोच पावती, बांधकामाचे फोटो इत्यादी झेरॉक्स प्रतीचा समावेश आहे. तसेच पान क्रं 77 वरील यादी नुसार पंजाब नॅशनल बँकेचे प्रमाणपत्र व खाते उतारा दाखल केला. 9. वि.प.ने आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ्य मा.उच्चन्यायालय, खंडपिठ नागपूर यांचे समोरील रिटपिटीशन 5468/2009 आदेश दि.27.01.2010 ची प्रत पान क्रं 85 ते 86 वर दाखल केली आहे. तसेच बांधकाम पूर्णत्वास गेल्याचे फोटो दाखल केलेत. 10. तक्रारकर्ता यांनी पान क्रं 74 ते 75 वर आपले प्रतीउत्तर दाखल केले व प्रतीउत्तरालाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दाखल केली. तर विरुध्दपक्षाने पान क्रं 90 ते 93 वर आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. 11. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारां तर्फे वकील श्री कामडी तर वि.प. तर्फे वकील श्री कुळकर्णी यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. 12. उभय पक्षांचे कथन, अभिलेखा वरील उपलब्ध दस्तऐवज व दाखल युक्तीवाद विचारात घेता, मंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे नोंदविलेत- मु्द्ये उत्तर (1) विरुध्दपक्षाचे सेवेतील कमतरता सिध्द होते काय?.........................................होय. (2) काय आदेश?.............................................अंतिम आदेशा नुसार ::कारण मिमांसा::
मु्द्या क्रं 1 बाबत- 13. (यातील “तक्रारदार” म्हणजे डॉ. दिलीप सत्यशेखर गांगूली व स्नीग्धा गांगूली आणि “विरुध्दपक्ष” म्हणजे गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन आणि लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर सुरेश कोंडबाजी बुरेवार असे समजण्यात यावे) तक्रारदार यांनी, विरुध्दपक्षा सोबत केलेला दि.17.03.2011 रोजीचा नोंदणीकृत करारनामा, विरुध्दपक्षानी निर्गमित केलेल्या पावत्या, तक्रारकर्ता यांनी, वि.प.ला वकीला मार्फत जारी केलेली नोटीस व सदर गाळयाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्या बाबत फोटो अभिलेखावर दाखल केलेले आहेत. 14. तक्रारदार यांनी, विरुध्दपक्षास गाळयापोटी एकूण रक्कम रुपये-7,61,340/- दिल्याचे तक्रारीमध्ये नमुद केले आहे. सदर पूर्ण रक्कम मिळाल्याचे विरुध्दपक्षाने आपले लेखी उत्तरात मान्य केले नसले तरी, तक्रारदार यांनी काही रक्कम विरुध्दपक्षास दिल्याची बाब कबुल केली आहे. 15. तक्रारदार यांनी, विरुध्दपक्षास गाळया पोटी दिलेल्या रकमां बाबतचे विवरण उपलब्ध दस्तऐवजां वरुन- परिशिष्ट-“अ” अक्रं | पावती क्रमांक | पावती दिनांक | दिलेली रक्कम | शेरा | 1 | 30169 | 17/02/2011 | 11,000/- | दि.17.03.2011 रोजीचे नोंदणीकृत करारात सदर रक्कम एसबीआय चेक क्रं-269336, चेक दि.17/02/2011 नुसार मिळाल्याचे वि.प.ने मान्य केलेले आहे. | 2 | 30167 | 17/03/011 | 51,000/- | दि.17.03.2011 रोजीचे नोंदणीकृत करारात सदर रक्कम एसबीआय चेक क्रं-269337, चेक दि.17/03/2011 नुसार मिळाल्याचे वि.प.ने मान्य केलेले आहे. | 3 | 30168 | 17/03/011 | 70,000/- | दि.17.03.2011 रोजीचे नोंदणीकृत करारात सदर रक्कम एसबीआय चेक क्रं-269341, चेक दि.21/03/2011 नुसार मिळाल्याचे वि.प.ने मान्य केलेले आहे. | 4 | 61877 | 04/05/2011 | 80,000/- | सदर रक्कम चेक क्रमांक 470707 अनुसार मिळाल्याचे पावतीमध्ये नमुद आहे. | 5 | 62121 | 04/05/2011 | 30,250/- | रक्कम डी.एस.एस.गांगुली यांचे कडून मिळाल्याचे पावतीमध्ये नमुद आहे | 6 | 62122 | 04/05/2011 | 12,100/- | रक्कम डी.एस.एस.गांगुली यांचे कडून मिळाल्याचे पावतीमध्ये नमुद आहे | 7 | 62123 | 04/05/2011 | 4000/- | रक्कम डी.एस.एस.गांगुली यांचे कडून मिळाल्याचे पावतीमध्ये नमुद आहे | 8 | 62124 | 04/05/2011 | 2990/- | रक्कम डी.एस.एस.गांगुली यांचे कडून मिळाल्याचे पावतीमध्ये नमुद आहे | 9 | 62252 | 23/06/2011 | 5,00,000/- | सदर रक्कम डी.डी.क्रं 802524 नुसार मिळाल्याचे पावती मध्ये नमुद आहे. | | | एकूण बेरीज | 7,61,340/- | |
16. अशाप्रकारे परिशिष्ट-“अ” मध्ये दर्शविल्या नुसार अ.क्रं 1 ते 9 च्या पावत्या अभिलेखावर तक्रारदार यांनी दाखल केलेल्या आहेत, ज्याची एकूण बेरीज रक्कम रुपये-7,61,340/-एवढी येते व सदर रक्कम रुपये-7,61,340/विरुध्दपक्षास तक्रारदार यांनी दिल्याची बाब पूर्णतः सिध्द होते. 17. विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, मा.उच्चन्यायालय, खंडपिठ नागपूर यांचे समोरील एका याचीके मध्ये दिलेल्या आदेशा नुसार बांधकामास स्थगीती दिलेली आहे, त्यामुळे ते उर्वरीत बांधकाम ईच्छा असूनही पूर्ण करु शकले नाहीत. वि.प.ने आपले लेखी उत्तरामध्ये आता 90% बांधकाम पूर्ण झाले असून त्या बाबतचे फोटो रेकॉर्डवर दाखल केले आहेत परंतु त.क.ने आपले प्रतीउत्तरामध्ये त्यास आता दुसरी सदनीका विकत घ्यावयाची असून पैसे परत करण्याची मागणी केलेली आहे. वि.प.ने आपले लेखी उत्तरामध्ये त.क.ला सदनीका नको असल्यास, त.क.ने जमा केलेली मुद्यल काही मुदत दिल्यास परत करण्याची तयारी सुध्दा दर्शविलेली आहे. 18. तक्रारकर्ते क्रमांक 1 हे निवृत्त कर्मचारी असून त्यांनी कष्ठाने कमविलेला पैसा विरुध्दपक्षाकडे जमा केला आहे असे आपले तक्रारीत नमुद केले आहे. तर विरुध्दपक्षाचा बांधकामाचा व्यवसाय आहे. दि.17 मार्च, 2011 रोजी गाळया संबधाने उभय पक्षांमध्ये करारनामा झाला परंतु एवढा मोठा कालावधी उलटूनही तक्रारदार यांना त्यांनी नोंदणी केलेल्या गाळयाचा ताबा मिळालेला नाही. अशास्थितीमध्ये एक तर विरुध्दपक्षाने न्यायालयाने बांधकामास स्थगीती दिल्यावर गाळेधारकांशी लेखी पत्रव्यवहार करुन योग्य ती परिस्थिती निदर्शनास आणून, तेंव्हाच पैसे परत करण्याची तयारी दर्शवावयास हवी होती परंतु तसे या प्रकरणात वि.प.ने काहीही केल्याचे दिसून येत नाही. इतकेच नव्हे तर तक्रारदार यांनी दि.11.07.2012 रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीसला साधे उत्तरही विरुध्दपक्षाने दिल्याचे दिसून येत नाही. सदर नोटीस वि.प.ला मिळाल्या बाबतची रजिस्टर पोच अभिलेखावर दाखल आहे. वरील सर्व परिस्थिती पाहता विरुध्दपक्षाने तक्रारदार यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 19. अशास्थितीत उभय तक्रारदार यांनी गाळयापोटी, विरुध्दपक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये- रुपये-7,61,340/- व्याजासह परत मिळण्यास तक्रारदार. पात्र आहेत असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. मु्द्या क्रं 2 बाबत- 20. वि.प.ने करारा नुसार, त.क.नां ठरलेल्या मुदतीत सदनीकेचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही व ताबा दिलेला नाही. तसेच नोटीसद्वारे मागणी करुनही उभय त.क.नां त्यांची जमा रक्कम परत केली नाही. त्यामुळे उभय त.क. सदनीकेपोटी वि.प. कडे जमा केलेली रक्कम रु.-7,61,340/- द.सा.द.शे.12% दराने व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत. तसेच उभय त.क.नां झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास आणि मनःस्ताप-गैरसोयी बद्यल रुपये-5000/- आणि तक्रारखर्चा बद्यल रुपये-3000/- उभय त.क. वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांच्या अन्य मागण्या या नामंजूर करण्यात येत आहेत. 21. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: 1) उभय तक्रारदारांची, विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्षाने, तक्रारदारानां रक्कम रुपये-7,61,340/- (अक्षरी रु.सात लक्ष एकसष्ठ हजार तीनशे चाळीस फक्त) तक्रार दाखल दि.-28/08/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह परत करावी. 3) विरुध्दपक्षाने, त.क.नां झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्यल नुकसानी दाखल रु.-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रु.-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) द्यावेत. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |