::निकालपत्र:: (पारीत द्वारा- श्री अमोघ श्यामकांत कलोती, मा.अध्यक्ष ) (पारीत दिनांक –16 मार्च, 2013 ) 1. उभय तक्रारदार यांनी, फलॅटचे खरेदीपोटी वि.प.शी करार केला परंतु करारा नुसार विहित मुदतीत वि.प.ने बांधकाम पूर्ण करुन न दिल्यामुळे फलॅटचे खरेदीपोटी, विरुध्दपक्षास दिलेली रक्कम व्याजासह परत मिळावी यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 अंतर्गत प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचा समक्ष दाखल केलेली आहे.
2. उभय तक्रारदार यांचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे- 3. उभय तक्रारकर्ते हे नात्याने अनुक्रमे पती व पत्नी असून त्यांनी विरुध्दपक्षाशी फलॅटचे खरेदी संबधाने दि.31.05.2011 रोजी नोंदणीकृत करारनामा केला, सदर करारनाम्या नुसार मौजा बेलतरोडी, खसरा क्रं-3/1, 3/2, भूखंड क्रमांक 17 ते 26 व 29 ते 40 वरील “ लक्ष्मीविहार” विंग-“ सी” या ईमारती मधील गाळा क्रं-501 खरेदी करण्याचे ठरले. करारान्वये सदर गाळयाची एकूण किंमत रुपये-12,10,000/- एवढी ठरली होती. पैकी त.क.नीं, वि.प.ला आतापावेतो वेळोवेळी फलॅटपोटी रुपये-4,11,340/- एवढी रक्कम दिली.
4. डिसेंबर, 2011 पर्यंत बांधकाम पूर्ण करुन गाळयाचा ताबा देण्याचे वि.प.नी मान्य केले होते परंतु वि.प.ने करारा नुसार विहित मुदतीत ईमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही व दिलेले पैसे परत केले नाही म्हणून त.क.नीं, वि.प. विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली. 5. त.क.नीं आपले तक्रारीचे विनंती कलमात त्यांनी वि.प.ला फलॅटपोटी वेळोवेळी दिलेली रक्कम रुपये-4,11,340/- तसेच वि.प.ने विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करुन न दिल्याने इतरत्र भाडयापोटी झालेला खर्च, वि.प.चे कार्यालयास दिलेल्या भेटीचा खर्च, नोटीसखर्च, तक्रारखर्च, मानसिक, शारिरीक त्रास इत्यादी बाबीसह एकूण रक्कम रुपये-9,56,340/- द.सा.द.शे.24% दराने व्याजासह वि.प.कडून मिळण्याचे आदेशित व्हावे व योग्य ती दाद त.क.चें बाजूने मिळावी, असे नमुद केले आहे. 6. त.क.नीं पान क्रं 9 वरील यादी नुसार एकूण 14 दस्तऐवज दाखल केले. ज्यामध्ये प्रामुख्याने करारनामा, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, वि.प.ला दिलेली नोटीस, रजिस्टर पोस्टाची पोच, वि.प.ने दिलेले पत्र इत्यादीचा समावेश आहे. 7. प्रस्तुत तक्रार प्रकरणात वि.प.चे नावे रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता, सदर नोटीस वि.प.ला मिळाल्या बाबत वि.प.ची पोच अभिलेखावर पान क्रं-59 वर उपलब्ध आहे. परंतु वि.प.ला नोटीस प्राप्त होऊनही ते न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदनही दाखल केले नाही म्हणून वि.प.विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने प्रकरणात दि.01 मार्च,2013 रोजी पारीत केला.
8. त.क.चें वकीलानीं प्रकरणात पान क्रं 60 वर पुरसिस दाखल करुन त्यांची तक्रार हाच त्यांचा लेखी युक्तीवाद समजावा असे नमुद केले. 9. प्रस्तुत प्रकरणात न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मु्द्ये उत्तर (1) करारा प्रमाणे वि.प.ने, उभय त.क.नां विहित मुदतीत फलॅटचे बांधकाम पूर्ण करुन न देऊन व पैसे परत न करुन आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे काय............. .होय. (2) काय आदेश............................................... अंतिम आदेशा नुसार कारणे व निष्कर्ष -
मु्द्या क्रं 1 बाबत- 10. उभय तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे, प्रतिज्ञालेखावरील पुराव्याचे मंचाद्वारे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता असे स्पष्ट होते की, यातील विरुध्दपक्षास (यातील “विरुध्दपक्ष” म्हणजे- गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन आणि लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर सुरेश कोंडबाजी बुरेवार) रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता, ती त्यांना मिळाल्या बद्यलची रजिस्टर पोस्टाची पोच प्रकरणातील अभिलेख पान क्रमांक-59 वर उपलब्ध आहे. परंतु अशी नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष वा त्यांचे तर्फे कोणीही न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी म्हणणेही मंचा समक्ष मांडलेले नाही. म्हणून विरुध्दपक्षा विरुध्द सदरची तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.न्यायमंचाने प्रकरणात दि.01.03.2013 रोजी पारीत केला.
11. अशाप्रकारे विरुध्दपक्षास आपले म्हणणे न्यायमंचा समक्ष मांडण्याची संधी पूर्ण संधी देऊनही ते.न्यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही व आपले म्हणणे मांडले नाही. उभय तक्रारदार यांची तक्रार प्रतिज्ञालेखावर सादर आहे, त्यामुळे तक्रारदार यांचे म्हणणे मान्य करण्या योग्य आहे. 12. उभय तक्रारदार यांनी वेळोवेळी विरुध्दपक्षाचे कंपनी मध्ये फलॅट संबधाने रक्कम जमा केल्या बाबत वि.प. तर्फे निर्गमित केलेल्या 08 पावत्यांच्या झेरॉक्सप्रती (पान क्रं 10 ते 13) अभिलेखावर दाखल केल्यात. तसेच उभय पक्षांमध्ये दि.31 मे, 2011 रोजी झालेल्या करारनाम्याची (Agreement To Sell ) प्रत (पान क्रं 15 ते 47), , त.क.नीं, वि.प.ला दि.19.11.2012 रोजी दिलेले पत्र (पान क्रं 48), रजिस्टर पोस्टाची नोटीस (पान क्रं 49 व 50) पोच पावतीसह, वि.प.ने पाठविलेले पत्र व त्याचा लिफाफा झेरॉक्स प्रत ( पान क्रं 52 व 53) , फलॅटचे अपूर्णावस्थेत बांधकाम असलेली छायाचित्रे (पान क्रं 54 व 55) अभिलेखावर दाखल आहेत.
13. पान क्रं 52 वरील वि.प.ने, त.क.ला बिना तारीख व सही असलेले पत्र व पोस्टाचा लिफाफा याची झेरॉक्स प्रत त.क.नीं अभिलेखावर दाखल केलेली आहे. सदर पत्रामध्ये वि.प.ने स्पष्ट नमुद केलेले आहे की-
“हमे खेद है की, समय पर हम आपको फलॅट का स्वामित्व व अधिकार दे पाने मे असमर्थ है क्योंकी बाजार के चल रही मंदि, सरकार की परिवर्तनशील नितीया, कच्चे माल मे बढोत्तरी तथा लेबर प्रॉब्लेम की वजहसे आप सभी ग्राहक को अधिक परेशानियो का सामना करना पडा. आपकी समस्यो को ध्यान मे रखकर हम आपको विश्वास दिलाते है की निर्माण कार्य तेजीसे करवाकर फलॅट का अधिकार मई तक देने मे प्रयत्नशील है इस हेतु आपसे निवेदन है कि, आप हमे कुछ और समय देने का कष्ठ करे”. 14. तसेच त.क.नीं, फलॅटचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्या बद्यलचे फोटो अभिलेखावर दाखल केलेले आहेत, त्यामुळे उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे वि.प.ने, त.क.ला दिलेल्या पत्रातील मजकूरास पुष्टी मिळते.
15. उभय तक्रारदार यांनी वि.प.शी फलॅटचे खरेदी संबधाने नोंदणीकृत केलेला करारनामा दि.31 मे, 2011 वरुन असे स्पष्ट होते की, वि.प.ने “ लक्ष्मी विहार” विंग-“सी” नामक ईमारती मधील पाचव्या मजल्यावरील सदनीका क्रमांक-501 एकूण किंमत रुपये-12,10,000/- मध्ये उभय तक्रारदार यांना विक्री करण्याचे कबुल केले होते. 16. उभय त.क.नीं, वि.प.ला फलॅटपोटी वेळोवेळी विविध शिर्षका खाली दिलेल्या रकमांचा तपशिल प्रकरणातील दाखल पावत्यां वरुन खालील प्रमाणे- अक्रं | पावती क्रमांक | पावती दिनांक | दिलेली रक्कम | ज्या बाबीसाठी रक्कम दिली ते शिर्षक | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 1 | क्रं. 16311 | 10.04.2011 | 2000/- | फलॅटचे बुकींग | 2 | क्रं 30207 | 05.05.2011 | 3,49,000/- | फलॅट बुकींग | 3 | क्रं 62133 | 05.05.2011 | 30,250/-. | मुद्रांकशुल्क | 4 | क्रं 62148 | 05.05.2011 | 12,100/- | सेलडिड चॉर्जेस | 5 | क्रं 62150 | 05.05.2011 | 2990/- | कायदेशीर खर्च | 6 | क्रं 62149 | 05.05.2011 | 4000/- | जनरल लिगल एक्सपेन्डीचर | 7 | क्रं 30215 | 10.05.2011 | 9000/- | बुकींग रिसीप्ट | 8 | क्रं 30216 | 10.05.2011 | 2000/- | बुकींग रिसीप्ट | | | एकूण रक्कम | 4,11,340/- | |
17. अशाप्रकारे वर नमुद केल्या प्रमाणे उभय तक्रारदार यांनी फलॅटचे किंमती पोटी एकूण रक्कम रुपये-4,11,340/- वि.प.ला वेळोवेळी विविध शिर्षा खाली दिल्याचे स्पष्ट होते. 18. उभय तक्रारदार यांनी दि.07.12.2012 रोजी वकिला मार्फत वि.प.ला पाठविलेली नोटीस, ती पाठविल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पावती व वि.प.ला मिळाल्या बाबतची रजिस्टर पोस्टाची पोच अभिलेखावर दाखल आहे. परंतु नोटीस मिळूनही वि.प.ने नोटीसची पुर्तता केली नाही. वि.प.ने करारा प्रमाणे विहित मुदतीत त.क.नां फलॅटचे बांधकाम पूर्ण केले नाही तसेच ताबा व विक्रीपत्र करुन दिले नाही आणि त.क.नीं फलॅटपोटी जमा केलेल्या रकमेची मागणी करुनही वि.प.ने त्यांची रक्कम परत केली नाही, त्यामुळे वि.प.ने, त.क.नां दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
मु्द्या क्रं 2 बाबत- 19. वि.प.नीं करारा नुसार ठरलेल्या मुदतीत फलॅटचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही तसेच मागणी करुनही त.क.नां त्यांची रक्कम परत केली नाही. त्यामुळे त.क. हे त्यांनी फलॅटपोटी वेळोवेळी वि.प.कडे जमा केलेल्या रकमा व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत. तसेच त.क.नां शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास आणि मनःस्ताप व गैरसोय सहन करावी लागत आहे व त्या बाबत त.क. हे वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. त.क.च्यां अन्य मागण्या योग्य पुराव्या अभावी अमान्य करण्यात येत आहेत. 20. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. ::आदेश:: 1) उभय तक्रारदारांची, विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्षाने, तक्रारदारानां रक्कम रुपये-4,11,340/- (अक्षरी रुपये चार लक्ष अकरा हजार तीनशे चाळीस फक्त ) तक्रार दाखल दि.-27.12.2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह परत करावी. 3) विरुध्दपक्षाने, उभय तक्रारदारानां झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्यल नुकसानी दाखल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) द्यावेत. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत मिळाल्या पासून 30 दिवसाचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क देण्यात यावी. |