(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य )
(पारीत दिनांक– 29 एप्रिल, 2022)
01. मूळ विरुदपक्ष क्रं 1 तथा प्रस्तुत पुर्नविचार प्रकरणातील अर्जदार ए.एन.एस. ड्रीलिंग मायनिंग ट्रेडर्स प्राय. लिमिटेड, नागपूर तर्फे जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 40 प्रमाणे पुर्नविचार अर्ज (Review Application) क्रं- RA/22/2 जिल्हा ग्राहक आयोगाने मूळ ग्राहक तक्रार क्रं-सीसी/19/107 मध्ये दिनांक-29 जानेवारी, 2021 रोजी पारीत केलेल्या निकालपत्रातील अंतीम आदेशावर पुर्नविचार होण्यासाठी दाखल केलेला आहे.
02. मूळ विरुदपक्ष क्रं 1 ए.एन.एस. ड्रीलिंग मायनिंग ट्रेडर्स प्राय. लिमिटेड, नागपूर तर्फे दाखल केलेल्या पुर्नविचार अर्जा मध्ये मा. जिल्हा ग्राहक आयोगाने मूळ ग्राहक तक्रार क्रं-सीसी/19/107 मध्ये दिनांक-29 जानेवारी, 2021 रोजी पारीत केलेल्या निकालपत्र मध्ये काही ठोस मुद्दे विचारात घेतलेले नाहीत तसेच प्रकरणात दाखल असलेलया दस्तऐवजांचे योग्यरितीने अवलोकन केलेले नाही. त्याच प्रमाणे मूळ तक्रारी मधील अंतीम आदेशातील अक्रं 5 मधील मूळ विरुध्दपक्ष क्रं 1 तथा प्रस्तुत पुर्नविचार प्रकरणातील अर्जदार यांचे विरुध्द पारीत केलेला आदेश योग्य नाही असे पुर्नविचार अर्जात नमुद केलेले असून त्यांचे पुर्नविचार अर्जावर ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 40 प्रमाणे विचार व्हावा अशी मागणी केलेली आहे.
03. मूळ विरुध्दपक्ष क्रं 1 तथा प्रस्तुत पुर्नविचार प्रकरणातील अर्जदार यांचे अर्जावर आज अधिवक्ता श्री बी.एस. डोंगरे यांची जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष सुनावणी घेण्यात आली. त्यांनी मूळ तक्रारीचे निकालपत्रामधील अंतीम आदेशातील अक्रं 5 वर भिस्त ठेऊन सदर आदेश क्रं 5 वर पुर्नविचार करण्यात यावा या बाबत जिल्हा ग्राहक आयोगास विनंती केली.
04. जिल्हा ग्राहक आयोग भंडारा यांनी मूळ ग्राहक तक्रार क्रं-सीसी/19/107 मध्ये दिनांक-29 जानेवारी, 2021 रोजी पारीत केलेल्या निकालपत्राचे व त्यातील अंतीम आदेशाचे अवलोकन आज जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे करण्यात आले असता ही बाब प्रकर्षाने दिसून आली की, जिल्हा ग्राहक आयोगाने मूळ तक्रारी मधील उपलब्ध संपूर्ण दस्तऐवजांचे अवलोकन व वाचन योग्यरितीने करुन निकालपत्र पारीत केलेले आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायदा-2019 प्रमाणे रिव्हयू/पुर्नविचार अर्ज हा निकालपत्रातील/आदेशातील टंकलेखनातील चुका यामध्ये दुरुस्ती करण्याचे व प्रथमदर्शनी चुक तथा रेकॉर्डशी विसंगत मुद्दा तसेच कायदेशीर तरतुदीचा भंग यामधील दुरुस्ती या तत्वावर कलम 40 खाली करण्यात येतो. परंतु मूळ विरुध्दपक्ष क्रं 1 तथा अर्जदार यांनी पुर्नविचार अर्जा मध्ये ज्या मुद्दांवर आपली भिस्त ठेवलेली आहे असे मुद्दे त्यांना मा. वरिष्ठ न्यायालयात अपिला मध्ये मांडता येतात. करीता मूळ विरुध्दपक्ष क्रं 1 तथा प्रस्तुत पुर्नविचार प्रकरणातील अर्जदार यांनी पुर्नविचार करण्यासाठी केलेला अर्ज नामंजूर करण्यात येतो. सबब आम्ही पुर्नविचार अर्जावर खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
- मूळ विरुदपक्ष क्रं 1 तथा प्रस्तुत पुर्नविचार प्रकरणातील अर्जदार ए.एन.एस. ड्रीलिंग मायनिंग ट्रेडर्स प्राय. लिमिटेड, नागपूर यांचा पुर्नविचार अर्ज (Review Application) खारीज करण्यात येते.
- मूळ विरुदपक्ष क्रं 1 तथा प्रस्तुत पुर्नविचार प्रकरणातील अर्जदार ए.एन.एस. ड्रीलिंग मायनिंग ट्रेडर्स प्राय. लिमिटेड, नागपूर हे मूळ तक्रारीतील निकाला विरुध्द मा. वरिष्ठ स्तरावर अपिल दाखल करुन तेथे आपली दाद मागू शकतील.
- सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क मूळ विरुध्दपक्ष तथा पुर्नविचार प्रकरणातील अर्जदार यांना निःशुल्क त्वरीत देण्यात यावी.